मार्ग यशाचा- २७ ‘कले’तील दिशा आणि वाटा (भाग तीन)
सध्याच्या काळात तंत्रज्ञान आणि मानव्यशास्त्र यांचा समन्वय साधणारे अनेक वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम आयआयटी आणि एनआयटीमध्ये करता येतात. पारंपारिक एम.ए. व्यतिरिक्त कला आणि मानव्यशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासक्रम करिअरच्या उत्तम संधी मिळवून देऊ शकतात.
(१) एम.ए. संस्कृती, समाज आणि विचार (कल्चर, सोसायटी,थॉट)- आयआयटी दिल्लीच्या मानव्य आणि समाजशास्त्र विभागातर्फे २०२४ पासून हा दोन वर्षांचा (पूर्णवेळ) अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. हा विविध ज्ञानशाखांचा मेळ घालणारा अभ्यासक्रम आहे. यामध्ये समाजशास्त्र, साहित्य, तत्त्वज्ञान आणि इतिहास या मुख्य विषयांच्या साहाय्याने आधुनिक जगातील विविध पैलूंचे सखोल विश्लेषण करायला शिकवले जाते. विशेषतः संस्कृती, समाज आणि मानवी विचार या त्रिसूत्रीवर भर दिला जातो. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आधुनिक जगाकडे पाहण्याच्या विविध तात्विक आणि शास्त्रीय दृष्टिकोनांचे प्रशिक्षण देतो.
करिअर संधी- (१) हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थी आयआयटी दिल्ली किंवा जगभरातील कोणत्याही विद्यापीठात पी.एच.डी. साठी पात्र ठरतात. ज्या विद्यार्थ्यांचा सी.जी.पी.ए. ८ किंवा त्यापेक्षा जास्त आहे, ते आयआयटी दिल्लीच्या नियमांनुसार थेट पी.एच.डी.साठी अर्ज करू शकतात. (२) पदवीधर विद्यार्थी सरकारी संस्था, अशासकीय सरकारी संस्था (एनजीओ), संशोधन संस्था आणि ‘थिंक टँक‘मध्ये काम करू शकतात. प्रसारमाध्यमे, प्रकाशन संस्था, पत्रकारिता, सामाजिक उद्योजकता आणि विकास सल्लागार, अशा संधीही मिळू शकतात.
प्रवेश प्रक्रिया- या अभ्यासक्रमासाठी ‘गेट‘ (एक्सएच) परीक्षेत पात्र होणे किंवा आयआयटी दिल्लीच्या मानव्य विभागामार्फत घेतली जाणारी स्वतंत्र लेखी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यानंतर प्राध्यापकांच्या पॅनेलद्वारे मुलाखत घेतली जाते. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. पदवीच्या शेवटच्या वर्षात असलेले विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. मात्र त्यांचा निकाल जुलै अखेरपर्यंत लागायला हवा. आयआयटी दिल्लीच्या पीजी ॲप्लिकेशन पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करता येतो.संपर्क-https://hss.iitd.ac.in/macst
२) कॉग्निटिव्ह सायन्स– (बोधनशास्त्र / ज्ञानमीमांसा शास्त्र) आयआयटी दिल्ली, आयआयटी गांधीनगर येथे एम.एससी. इन कॉग्निटिव्ह सायन्स अभ्यासक्रम करता येतो. हा अभ्यासक्रम मानवी मन आणि त्याची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी विविध सिद्धांत आणि आधुनिक साधनांची ओळख करून देतो.
वैशिष्ट्ये- (१) मानसिक आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी येथे अद्ययावत प्रयोगशाळा विकसित केल्या जात आहेत. (२) विविध विषयांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात किंवा उद्योग क्षेत्रात काम करण्यासाठी तयार केले जाते.
करिअर संधी– (१) मेंदू विज्ञान (ब्रेन सायंसेस), (२) व्यवस्थापन, इंजिनीअरिंग आणि डिझाइन (रोबोटिक्स, स्मार्ट सॉफ्टवेअर, ह्युमन-मशीन इंटरॲक्शन) (५) सामाजिक संस्थांमध्ये कामाच्या संधी मिळतात.
काय शिकाल? –यात प्रामुख्याने कॉग्निटिव्ह सायन्सची ओळख, प्रोग्रामिंगची मूलभूत तत्त्वे, भाषेचा मनावर होणारा परिणाम, कॉग्निटिव्ह न्यूरोसायन्स, मनाचे तत्त्वज्ञान, आणि संशोधन पद्धती यांसारख्या विषयांचा समावेश आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या सत्रात विद्यार्थी आपल्या आवडीनुसार विशेष विषय (इलेक्टिव्ह) निवडू शकतात. यामुळे त्यांना कॉग्निटिव्ह सायन्सच्या एखाद्या विशिष्ट शाखेत तज्ज्ञ बनता येते किंवा सर्व विषयांची व्यापक माहिती प्राप्त करणे शक्य होते. अर्हता- कोणत्याही शाखेतील पदवी (किमान ५५-६० टक्के गुण). संकेतस्थळ: cogs.iitgn.ac.in (आयआयटी गांधीनगर), https://hss.iitd.ac.in/msc-cognitive-science(आयआयटी दिल्ली)
(३) डिजिटल मानव्यशास्त्र – हा अभ्यासक्रम आयआयटी जोधपूर येथे करता येतो. या अभ्यासक्रमात कला आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घातला जातो. पारंपारिक इतिहास, साहित्य, भाषाशास्त्र, कला हे मानव्यशास्त्रातील विषय आधुनिक संगणकीय साधने, विदा विश्लेषण आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अभ्यासले जातात. हा अभ्यासक्रम केल्यावर इंटिग्रेटेड एम.ए. – एम.टेक ही पदव्युत्तर पदवी मिळते. याच विषयात पीएचडीही करता येते.
वैशिष्ट्ये- १) विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, विदा संकलन (डाटा मायनिंग), आणि आभासी वास्तव (व्हर्च्युअल रिॲलिटी) या तंत्रज्ञानाचा मानव्यशास्त्रातील वापर, यावर प्रशिक्षण दिले जाते. २) जुनी हस्तलिखिते, ऐतिहासिक कागदपत्रे आणि सांस्कृतिक वारसा यांचे ‘डिजिटल स्वरूपात’ जतन आणि विश्लेषण याचे तंत्र व कौशल्य शिकवले जाते.३) या अभ्यासक्रमात संगणकीय विचारसरणी आणि सामाजिक प्रश्नांची जाण यांचा एकत्रित विचार केला जातो.
अर्हता- १) मानव्यशास्त्र, समाजशास्त्र किंवा कला शाखेतील कोणत्याही विषयातील पदवी (किमान ६० टक्के गुण). संगणकाचे प्राथमिक ज्ञान असल्यास उत्तम. परंतु ते अनिवार्य नाही. २) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या प्रारंभिक चाळणीसाठी ‘गेट‘ (एक्स-एच) परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. त्यानंतर संस्थेमार्फत स्वतंत्र परीक्षा व मुलाखत घेतली जाते.
करिअर संधी– संग्रहालये, ग्रंथालये आणि आर्काइव्हजमध्ये ‘डिजिटल क्युरेटर (पुराभिलेखागारातील डिजिटल तज्ज्ञ- डिजिटल माहिती (उदा. फाइल्स, फोटो, व्हिडिओ, डेटाबेस) निवडणे, जतन करणे आणि भविष्यातील वापरासाठी ती सुरक्षित ठेवण्याचे काम करणारा तज्ज्ञ), २) मोठ्या कंपन्यांमध्ये ‘मानवी-संगणक संवादक’ (ह्युमन कॉम्प्युटर इंटरॲक्शन) तज्ज्ञ ,३) चित्रपट, गेमिंग आणि डिजिटल माध्यमांमध्ये संशोधन आणि सादरीकरण, ४) जागतिक स्तरावर डिजिटल वारसा जतन करण्याच्या प्रकल्पांमध्ये संधी. संकेतस्थळ: dh.iitj.ac.in
४) डेव्हलपमेंट स्टडीज
आयआयटी मद्रासच्या ‘मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्र’ विभागात हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाव्दारे विद्यार्थ्यांना या विषयातील मूलभूत सिद्धांतांचे सखोल ज्ञान प्रदान केल जाते. आजच्या काळातील विकासाशी संबंधित महत्त्वाच्या आणि नवीन समस्यांचा अभ्यास यातून केला जातो. प्रत्यक्ष धोरणनिर्मिती करण्यात आणि प्रशासकीय कार्यात रस असणाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. शैक्षणिक क्षेत्रात किंवा उच्च संशोधनात कारकीर्द घडवता येते.
विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्रातील मूलभूत संकल्पनांची ओळख करून दिली जाते. भारत आणि भारतीय उपखंडातील परिस्थितीच्या संदर्भात हा अभ्यास केला जातो. दुसऱ्या वर्षात विद्यार्थी स्वतःच्या आवडीनुसार विषय निवडू शकतात. यामध्ये समाजशास्त्र, मानववंशशास्त्र इतिहास, आणि विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यास यांसारख्या क्षेत्रांतील ऐच्छिक विषय निवडण्याची संधी मिळते. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार आयआयटी मद्रासच्या इतर कोणत्याही विभागातील दोन विषय निवडून आपल्या संशोधनाला तंत्रज्ञानाची जोड देऊ शकतात.
अर्थशास्त्र- आयआयटी मद्रासचा हा बहुआयामी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतो. या अभ्यासक्रमातील ११ मुख्य विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अर्थकारणाचे सखोल सैद्धांतिक ज्ञान दिले जाते. ‘ऐच्छिक विषयामुळे’ विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील नवीन बदलांची ओळख होते. विद्यार्थ्यांना डेव्हलपमेंट स्टडीज, मॅनेजमेंट, गणित, संगणक शास्त्र किंवा संस्थेतील इतर संबंधित विभागांचे दोन विषय निवडता येतात. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी ‘रिसर्च मेथोडोलॉजी’ हा विषय आणि एक ‘संशोधन प्रकल्प’ अनिवार्य करण्यात आला आहे. बाजारपेठ आणि तंत्रज्ञानाचा सातत्याने विस्तार होत असल्याने सक्षम अर्थतज्ज्ञांची मागणी जगभरात वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी आणि विदेशी बँका, गुंतवणूक कंपन्यांमध्ये करिअरसंधी मिळतात.
या दोन्ही विषयामध्ये विद्यार्थ्यांचा सैद्धांतिक पाया मजबूत करण्यासोबतच त्यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी (मार्केटमध्ये) लागणारी कौशल्ये शिकवली जातात. येथील आंतरज्ञानशाखीय प्राध्यापकांनी त्यांच्या अनुभवातून आणि संशोधनातून हे अभ्यासक्रम तयार केले आहेत.
संकेतस्थळ- https://hss.iitm.ac.in/m-a-programme/
५) एम.ए. बाय रिसर्च आयआयटी मुंबई येथे मानव्यशास्त्र आणि समाजशास्त्र विभागात विभागात हा अभ्यासक्रम करता येतो. हा संशोधन केंद्रित अभ्यासक्रम असून त्यासाठी विद्यार्थी स्वतःचा विषय निवडू शकतात (साहित्य, समाजशास्त्र, इतिहास इ.). अर्हता- पदवी आणि गेट (एक्सएच) किंवा या संस्थेची परीक्षा. करिअर संधी – पीएचडी, संशोधन, अध्यापन, धोरण विश्लेषण. संकेतस्थळ– hss.iitb.ac.in.
६)अभिकल्प (डिझाइन) अभ्यासक्रम– आयआयटी मुंबई, गौहाटी, कानपूर, दिल्ली येथे ‘मास्टर ऑफ डिझाइन’ अभ्यासक्रम करता येतो. रेखाटन किंवा सृजनात्मक कामात गती आणि रस असलेले विद्यार्थी ‘सीड’ (कॉमन एन्ट्रन्स एक्झामिनेशन फॉर डिझाइन) ही परीक्षा देऊन येथे प्रवेश घेऊ शकतात. अर्हता- कोणत्याही शाखेतील पदवी (किमान ५५ टक्के गुण). करिअर– प्रॉडक्ट डिझायनर, ग्राफिक्स डिझायनर, कला दिग्दर्शक. संकेतस्थळ: ceed.iitb.ac.in
३) सार्वजनिक धोरण (पब्लिक पॉलिसी)- आयआयटी दिल्ली, आणि मद्रास येथे ‘मास्टर ऑफ पब्लिक पॉलिसी’ अभ्यासक्रम करता येतो. करिअर– प्रशासकीय सेवा, सामाजिक संस्थांमध्ये धोरण आखणी, शासकीय सल्लागार. संकेतस्थळ– spp.iitd.ac.in, (आयआयटी दिल्ली)