मार्ग यशाचा ३१-डिजिटल ज्ञानसंपदा!
भारत सरकारने ‘डिजिटल इंडिया’ अभियानांतर्गत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी बरीच डिजिटल व्यासपीठे उपलब्ध करून दिली आहेत. यावर जागतिक दर्जाचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे. यातील बहुतांश अभ्यासक्रम विनामूल्य असून, स्वयंअध्ययनासाठी ही व्यासपीठे उपयुक्त ठरतात.
१) नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्स्ड लर्निंग (एनपीटीइएल)- हे व्यासपीठ आयआयटी मुंबई, दिल्ली, कानपूर, खरगपूर, मद्रास, गौहाटी, रुरकी, इंदौर आणि गांधीनगर यांसारख्या आयआयटीच्या सहकार्याने चालवले जाते. ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आयआयटीमध्ये प्रवेश मिळू शकला नाही, त्यांच्यासाठी ही एक ‘व्हर्च्युअल आयआयटी’च आहे. येथे १००० हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आयआयटीमधील ज्येष्ठ प्राध्यापकांचे व्हिडिओ लेक्चर्स विनामूल्य पाहता येतात. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अत्यल्प शुल्क भरून परीक्षा देता येते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आयआयटीचे प्रमाणपत्र मिळते. हे प्रमाणपत्र वेगवेगळया उद्योगांमध्ये रोजगार मिळवताना उपयोगी पडते. २०२६ मध्ये एनपीटीइएलने ‘डिसिप्लिन स्टार्स आणि विशिष्ट विषयांतील ‘डोमेन सर्टिफिकेट्स‘ सुरू केल्यामुळे उद्योगांना हवे असणारे विशेष कौशल्य मिळवणे सोपे झाले आहे.
डिसिप्लिन स्टार्स हे एक प्रकारचे विशेष गौरव पदक असून ते विद्यार्थ्याची सातत्यपूर्ण कामगिरी लक्षात घेऊन दिले जाते. विद्यार्थ्यांनी मूळ विद्याशाखेतील (उदा. कॉम्प्युटर सायंस इ.) अभ्यासाशिवाय इतर अनेक अभ्यासक्रमांत उत्कृष्ट गुण मिळवल्यास त्यांना ‘डिसिप्लिन स्टार’ म्हणून ओळखले जाते. पदवीसोबतच तुम्ही एखाद्या विशिष्ट विषयात तज्ज्ञ आहात हे सिद्ध करण्यासाठी या प्रमाणपत्रांचा उपयोग होतो. डिसिप्लिन स्टार्समुळे विद्यार्थ्याची शिकण्याची चिकाटी अधोरेखित होते.
डोमेन सर्टिफिकेट्स- जेव्हा एखादा विद्यार्थी एका विशिष्ट विषयाच्या क्षेत्रात (उदा. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) प्रभुत्व मिळवू इच्छितो, तेव्हा त्याला ‘डोमेन सर्टिफिकेशन‘चा पर्याय दिला जातो. हे सर्टिफिकेट मिळवल्याने, त्यातील सर्व मूलभूत आणि प्रगत पैलूंचा सखोल अभ्यास केल्याचे सिध्द होते. आहे. हे प्रमाणपत्र उद्योगांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी उपयोगी ठरते. संकेतस्थळ– https://nptel.ac.in/
२) स्वयम (SWAYAM – स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर ॲस्पायरिंग माईंड्स) -हे केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत चालवले जाणारे ‘मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सेस’ (MOOCs) व्यासपीठ आहे. अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एनपीटीइएलचे अभ्यासक्रम या व्यासपीठावर उपलब्ध होतात. २०२६ मधील ‘नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क‘ (एनसीआरएफ-राष्ट्रीय श्रेयांक आराखडा/रचना) मुळे विद्यार्थी आता पदवीसाठी लागणाऱ्या एकूण क्रेडिट्स (श्रेयांक) पैकी ४० टक्क्यांपर्यंत क्रेडिट्स ‘स्वयम’वरील ऑनलाइन अभ्यासक्रमांतून मिळवून आपल्या विद्यापीठाच्या निकालात जोडू शकतात.
संकेतस्थळ– https://swayam.gov.in/
३) व्हर्च्युअल लॅब्स – हे व्यासपीठ केंद्रिय शिक्षण मंत्रालय आणि विविध आयआयटी यांच्या साहाय्याने चालवले जाते. अभियांत्रिकीमध्ये प्रत्यक्ष प्रयोगांना खूप महत्त्व असते. अनेक महाविद्यालयांमध्ये अत्याधुनिक उपकरणांची कमतरता असते. त्यामुळे ‘व्हर्च्युअल लॅब’ चा उपयोग करुन प्रात्यक्षिकाचे ज्ञान प्राप्त करता येते. २०२६ मध्ये या लॅब्स ‘ऑगमेंटेड रिअॅलिटी‘ (एआर) आणि ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी‘ (व्हीआर) तंत्रज्ञानाशी जोडल्या गेल्या आहेत. रिमोटद्वारे विद्यार्थी संगणकावर किंवा मोबाइलवर विविध प्रयोग करू शकतात. यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि कॉम्प्युटर सायन्सच्या शेकडो प्रयोगांचे सिम्युलेशन (एखादी प्रत्यक्ष प्रक्रिया, यंत्रणा किंवा परिस्थिती यांचा संगणकीय प्रणाली किंवा प्रारूपाच्या (मॉडेल) साहाय्याने केलेला हुबेहूब सराव किंवा आभासी अनुभव) उपलब्ध आहे. संकेतस्थळ: https://www.vlab.co.in/
४)दीक्षा (DIKSHA – डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग)- हे व्यासपीठ केंद्रिय शिक्षण मंत्रालयमार्फत चालवले जाते. हे व्यासपीठ शालेय शिक्षणासाठी असले तरी, ‘पूर्व-अभियांत्रिकी’ (प्रि इंजिनीअरिंग) तयारीसाठी हे एक उत्तम संसाधन आहे. १२ वी विज्ञानशाखेचा पाया पक्का करण्यासाठी, एनसीआरटी (नॅशनल काउंसिल ऑफ इज्युकेशन, रिसर्च ॲण्ड ट्रेंनिग- राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद), सीबीएसई(सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन-केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ) पाठ्यपुस्तके आणि जेईई (जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन) सारख्या परीक्षांच्या मूलभूत तयारीसाठी येथे क्यूआर कोड आधारित डिजिटल सामग्री उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाला लागणाऱ्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यासाठी हे पोर्टल उपयुक्त ठरते. शालेय शिक्षणासाठी डिजिटल पाठ्यपुस्तके, व्हिडिओ, क्विझ, इंटरॅक्टिव्ह कंटेंटचा मोठा साठा येथे आहे. हे साहित्य मराठीसह ३६ भारतीय भाषांमध्ये आहे. शिक्षकांसाठी– धड्याचे नियोजन (लेसन) प्लॅन, वर्कशीट्स, डिजिटल मूल्यांकन साधने, विद्यार्थ्यांसाठी– इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ, सराव प्रश्न, स्व-अभ्यासाची सुविधा आणि पालकांसाठी– मुलांच्या अभ्यासक्रमाशी निगडित डिजिटल सामग्री व मार्गदर्शन यावर उपलब्ध आहे. शालेय स्तरावर अभियांत्रिकीपूर्व तयारीसाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरते. गणित, विज्ञान, संगणकशास्त्र यांसारख्या विषयांचे डिजिटल स्वरुपातील विपुल साहित्य या ठिकाणी आहे. संकेतस्थळ- https://diksha.gov.in/
५) स्किल इंडिया डिजिटल हब – हे व्यासपीठ कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयमार्फत चालवले जाते. पदवी शिक्षणासोबतच उद्योगांना लागणारी कौशल्ये आत्मसात करण्यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरते. एआय, कोडिंग, डाटा सायन्स आणि सायबर सिक्युरिटी यांसारख्या आधुनिक क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे साहित्य इथे उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी आणि ‘अॅप्रेंटिसशिप’ मिळवून देण्यासाठी हे पोर्टल साहाय्य करते. विद्यार्थ्यांना एआय, मशीन लर्निंग, डिजिटल मार्केटिंग, कोडिंग यांसारख्या आधुनिक कौशल्यांमध्ये प्रशिक्षित होता येते. या व्यासपीठावर आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोटिव्ह, हेल्थकेअर इ. क्षेत्रांमधील अभ्यासक्रम विनामूल्य व सशुल्क उपलब्ध आहेत. नोकरी व अप्रेंटिसशिप संधी मिळवून देण्यासाठी, नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलशी हे पोर्टल जोडले आहे. कृत्रिम बुध्दिमत्तेवर आधारित विद्यार्थ्याची डिजिटल सीव्ही तयार करण्यास साहाय्य केले जाते. ही सीव्ही विद्यार्थ्यांचे कौशल्य प्रमाणित करते. रोजगार मिळण्यासाठी याचा उपयोग होतो. प्रत्यक्ष प्रशिक्षण सत्रे (लाइव्ह ट्रेनिंग सेशन्स) आयोजित केली जातात. यामध्ये उद्योगतज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. हे अभ्यासक्रम मराठीसह अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यंदा ‘ग्रीन स्किल्स‘ (शाश्वत ऊर्जा) आणि नॅनो-तंत्रज्ञान यावर विशेष अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आले आहेत. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या कालावधीत उद्योगांसाठी आवश्यक असणारी (इंडस्ट्री-रेडी) कौशल्ये मिळवण्यासाठी हे पोर्टल उपयुक्त ठरते. संकेतस्थळ –
https://www.skillindiadigital.gov.in/
६) नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया (एनडीएलआय)- हे व्यासपीठ आयआयटी खरगपूर चालवते. हे भारताचे सर्वात मोठे डिजिटल वाचनालय आहे. पुस्तके, शोधनिबंध, व्हिडिओ लेक्चर्स आणि जुन्या प्रश्नपत्रिका अशा विपुल शैक्षणिक संसाधनांचा संग्रह येथे आहे. ही संसाधने अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहेत. संकेतस्थळ- https://ndl.iitkgp.ac.in/
७) ई-यंत्र (e-Yantra) – या व्यासपीठाची जबाबदारी आयआयटी मुंबईवर आहे. रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमध्ये रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त प्रकल्प या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. प्रकल्प-आधारित शिक्षणाद्वारे विद्यार्थी क्लिष्ट तांत्रिक समस्या सोडवायला शिकतात. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांना स्वत:चे कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळते. संकेतस्थळ– https://www.e-yantra.org/
८) एआयसीटीई (ऑल इंडिया काउंसिल फॉर टेक्निकल एज्युकेशन- अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद) इंटर्नशिप पोर्टल– कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवून देण्यासाठी हे पोर्टल विद्यार्थ्यांना विविध सरकारी आणि खासगी कंपन्यांशी जोडते. स्मार्ट सिटी प्रकल्प वा नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विद्यार्थी आपल्या आवडीनुसार इंटर्नशिप शोधून नोंदणी करू शकतात. संकेतस्थळ: https://internship.aicte-india.org/
९) नीएट (नॅशनल एज्युकेशनल अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी– तंत्रज्ञानासाठी राष्ट्रीय शैक्षणिक आघाडी)-अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे हे पोर्टल एआय तंत्रज्ञानाचा वापर करून वैयक्तिक शिकण्याच्या गरजा पूर्ण करते. येथे जगभरातील सर्वोत्तम शैक्षणिक कंपन्यांचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रम मोफत मिळण्याची तरतूद आहे. संकेतस्थळ: https://neat.aicte-india.org/
१०) स्पोकन ट्युटोरियल– आयआयटी मुंबईचे हे ‘सेल्फ-लर्निंग’ पोर्टल, सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग शिकण्यासाठी सर्वोत्तम आहे. पायथन, जावा, सी++ यांसारख्या भाषा मराठीतून ऑडिओ-व्हिडिओ स्वरूपात येथे शिकता येतात. यासाठी इंटरनेटची गती कमी असली तरी चालू शकते. संकेतस्थळ: https://spoken-tutorial.org/
११) समर्थ ई-गव्ह (सिमलेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट ॲण्ड रिसोर्स ट्रॅकिंग फॉर हायर एज्युकेशन– उच्च शिक्षणासाठी प्रशासकीय व्यवस्थापन आणि संसाधन ट्रॅकिंग प्रणाली)- हे विद्यापीठांच्या व्यवस्थापनासाठी पोर्टल असले तरी, त्यात विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा आहेत. त्याच्या प्रवेशापासून निकालापर्यंतची सर्व माहिती आणि डिजिटल सेवा एकाच लॉगीनमध्ये या ठिकाणी उपलब्ध करून होते.
मुख्य पोर्टल: https://samarth.edu.in
सुरेश वांदिले