फुकाची भीती
मालकीनबाई काही दिवसांसाठी बाहेर गेल्या होत्या. त्यामुळे रॉबिन्सन उंदीरमामा आणि मार्गारेट मनीमावशी दोघांनांही घरात हुंदडायला स्वातंत्र्य मिळालं. पण याचा त्यांना दुसऱ्याच दिवशी कंटाळा आला नि आता करायचं काय, याचा विचार करु लागले.
दोघांनांही काहीच सूचेना. त्यामुळे मावशी वैतागली.
“हे बघ मावशे, असं वैतागण्यापेक्षा आपण आधी घराबाहेर पडू आणि वाट मिळेल तिकडे चालत राहू, चालताचालता काहीतरी छान सुचेल आपल्याला.” मामा म्हणाला. मावशीला ते पटलं. मग, ते दोघे घराबाहेर पडले नि मिळेल त्या वाटेन चालू लागले. चालता चालता ते घनदाट अरण्यात पोहचले. ‘पुढे जाऊ नका, पुढे जाऊ नका, धोका आहे.’ असं कुणीतरी म्हणाल्याचं, त्यांच्या कानावर आलं. दोघांनी मागे वळून बघितलं. एक पोपट त्यांना सावध करत होता.
“कसला धोका आहे?”
“आणखी पुढे गेलात, तर तिथे वाघोबा राहातो. त्याला असं कुणी आलेलं आवडत नाही. तो त्यांना खाऊन टाकतो.” पोपटाच्या बाजूला बसलेले माकड म्हणाले.
रॉबिन्सन आणि मार्गारेटने त्या दोघांकडे बघितलं. जोराने हसून म्हणाले, “मित्रांनो, आमची काळजी तुम्हाला वाटते, हे बघून आनंदच झाला. आम्ही ज्या मालकीनबाईंकडे राहतो, त्यांच्यापुढे वाघोबा म्हणजे किस झाड की पत्ती!” असं बोलून ते दोघे पुढे निघाले. या दोघांच्या मालकीनबाई वाघोबापेक्षा अधिक शक्तीशाली आहेत की काय? पोपटाने माकडोबाकडे शंका व्यक्त केली. आधी त्यांनी या दोघांना पाठवलं, मग स्वत: येऊन वाघोबाचा काटा काढतील. माकडाने दुसरी शंका व्यक्त केली. हे वाघोबाला सांगितलं पाहिजे. त्याला सावध केले पाहिजे. तो आपल्यावर खुष होऊन मोठा मानसन्मान करेल. माकडाने पोपटाला आपल्या मनातील विचार बोलून दाखवला. पोपटालाही तसंच वाटलं. लगेच, पोपट उडत आणि माकड या झाडावरुन त्या झाडावर उड्या मारत, त्वरेने वाघोबांच्या गुहेकडे पोहचले.
वाघोबा दुपारची मेजवाणी फस्त करुन निवांत बसले होते. थंडगार हवेच्या झुळकीने त्यांना डुलकीही येत होती. त्याचवेळी पोपट आणि माकड तिथे पोहचले. वाघोबांना कसं सांगावं, हा प्रश्न त्यांना पडला. वाघोबांना बघून दोघांना प्रचंड भीती वाटली. तेव्हढ्यात वाघोबांनी मोठ्ठी जांभई दिली. त्यांचा तो जबडा, त्यातील सुळे, तीक्ष्ण दात बसून माकड थरथर कापू लागले. ते गर्भगळीत होऊन खाली पडले. पोपटही भीतिने खाली पडला. काहीवेळाने ते दोघेही वाघोबांना दिसणार नाही अशारितीने एका झाडावर जाऊन बसले. उंदीर आणि मांजरीची फटफजिती बघूनच घरी परतू, असं दोघांनी ठरवलं. त्या दोघांची आतुरतेनं वाट बघू लागले.
इकडे रॉबिन्सन आणि मार्गारेटचा प्रवास मजेत सुरु होता. वेगवेगळी फळं खायला मिळत होती. वेगवेगळया ठिकाणी असलेल्या तलावातील मधुर पाणी प्यायला मिळत होतं. मध्येच डुलकी घ्यायला, झाडांची सावली आणि मऊशार गवत होतं. झाडे वेलींवरची वेगवेगळी फुलं बघण्याच्या आनंद मिळत होता. हा सगळा आनंद घेत दोघेही वाघोबाच्या गुहेजवळ पोहचले. वाघोबांची विश्रांती झाल्याने ते आरामात आकाशाला न्याहाळत बसले होते.
काही वेळाने रॉबिन्सन आणि मार्गारेटला वाघोबांचं दर्शन झालं. धिप्पाड वाघोबा बघून रॉबिन्सन गळपटला. मार्गारेटही जराशी टरकली.
“आता काय करायचं? वाघोबा काही आपल्याला सोडायचा नाही.” गर्भगळीत झालेला रॉबिन्सन म्हणाला.
“रॉब्या, हे बघ, आपण मोठ्या हिमतीने आणि हिकमतीने इथपर्यंतच आलोचना. मग आता अशी माघार घेऊन पळपुटेपणा करायचा नाही. वाघोबाने शक्तीचा प्रयोग केला तर आपण युक्तीचा करु.”
“म्हणजे गं काय करायचं?”
“वाघोबापेक्षा आपण चपळ आहोत, त्याच्याकडून काही दगाफटका होण्याचे चिन्ह दिसलं तर तू चटदिशी त्याच्यावर उडी घेऊन कानाला चावा घेऊन धूम पळायचं. मी लगेच त्याच्या जबड्यावर माझ्या पंजाच्या नखाने ओरबडून धूम पळेन. समजलं.”
मावशीचं सांगणं मामाला पटलं. त्याची भीती कुठल्या कुठे पळून गेली.
दोघांनी मोठा श्वास घेवून ते वाघोंबासमोर उभे ठाकले.
“हाय वाघेश्वर!” मार्गारेट आत्मविश्वासाने त्याला म्हणाली.
“नमस्कार सर!” रॉबिन्सनही आत्मविश्वासाने अभिवादन करत म्हणाला.
कुणीतरी आपल्यासोबत धिटाइने बोलताहेत हे बघून वाघोबा आश्चर्यचकित झाले. कारण, असं त्यांच्याजवळ येण्याचं धाडस कुणी आजपर्यंत केलं नव्हतं. त्यामुळे वाघोबांना त्यांचं फार कौतुक वाटलं. त्यांच्या चेहऱ्यावर, उग्र भाव जाऊन प्रेमळ भाव उमटला. त्यांनीही रॉबिन्सन आणि मार्गारेटला अभिवादन केलं. त्यांची ख्यालीखुशाली विचारली. कुठून आलात, कां आलात? हे विचारलं.
माकड आणि पोपटाने जे सांगितलं, त्याच्या अगदी विरुध्द वाघोबाचं वागणं होतं. त्यामुळे रॉबिन्सन आणि मार्गारेटची उरलीसुरली भीतीही गेली. ते तिघेही हसतखिदळत गप्पाटप्पा करु लागले. थोड्यावेळाने, वाघोबाने त्यांना मस्त मेजवाणही दिली. हे बघून झाडावर फांद्याच्या आड बसलेल्या पोपट आणि माकडाचे डोळे विस्फारले. उंदीर आणि मांजरीने वाघोबांवर नक्कीच जादू केली पाहिजे, असं दोघांनांही वाटलं. हे सगळया वनात लगेच सांगितलं पाहिजे असं दोघांनी ठरवलं. झाडावरची त्यांची चुळबूळ वाढल्याने, वाघोबाचं लक्ष तिकडे गेलं. त्यांनी डरकाळी फोडली. त्याने घाबरुन माकड खाली पडलं. पोपटाची वाचा जाऊन तोही खाली पडला.
पोपट आणि माकडाला बघून रॉबिन्सन आणि मार्गारेटने, या दोघांनी आपली कशी तुमच्याबद्दल दिशाभूल केली हे सांगितलं. वाघोबांनी दरडावून त्यांना खरं काय ते विचारलं. दोघांनींही मान खाली घालून कबुली दिली.
“गधड्यांनो, तुम्ही सतत असेच भीत राहिलात, म्हणून माझ्यापासून दूर राहिलात. या दोघांसारखी हिम्मत दाखवली असती, आत्मविश्वास दाखवला असता, माझ्याविषयीच्या अफवांवर विश्वास ठेवला नसता अफवा पसरवल्या नसत्या, तर तुम्हीही माझे मित्र झाले असता. समजलं. यांच्यासारखं हिमतीने जे वागतात, त्यांना नव्या गोष्टी दिसतात, नवे अनुभव घेता येतात. तेच यशस्वी होतात. चला फुटा इथून, असं म्हणून वाघोबानं दोघांना हाकलून लावलं. रॉबिन्सन आणि मार्गारेटला शाही पाहुण्यांचा दर्जा दिला.