(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा ३६ – चला, शेफ होऊ या!

अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधि अशा सारख्या पारंपरिक अभ्यासक्रमांवर अधिक लक्ष केंद्रित करणाऱ्या महाराष्ट्रीय पालक, विद्यार्थी, शिक्षक यांचं लक्ष, ‘इंडियन कलिनरी इंस्टिट्यूट’च्या अभ्यासक्रमाकडे जात नाही. जवळपास १०० टक्के उत्तम करिअर घडवण्याची क्षमता असणाऱ्या या अभ्यासक्रमाकडे अल्पसंख्येने मराठी मुलं जातात.

या संथेची स्थापना भारत सरकारने केली असून केंद्रिय पर्यटन विभागाच्या अंतर्गत ही संस्था कार्यरत आहे. अन्नपदार्थ निर्मितीचं उच्च दर्जाचं कौशल्य विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी संस्थेच्या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. या संस्थेचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम प्लेसमेंट मिळालं आहे. २०२० च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार या अभ्यासक्रमातील एक संपूर्ण सत्र म्हणजे साधारणत: सहा महिने इंटर्नशीपची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.  नवीन शैक्षणिक धोरणानुसार, जर एखाद्या विद्यार्थ्याला काही कारणास्तव तीन वर्षांचा बीबीए अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही, तर एका वर्षानंतर त्याला ‘प्रमाणपत्र’ आणि दोन वर्षांनंतर ‘डिप्लोमा’  घेऊन बाहेर पडण्याची आणि नंतर पुन्हा शिक्षण पूर्ण करण्याची संधी दिली जाते.

यासंस्थेत शंभर टक्के शाकाहारी स्वयंपाक  शिकण्यासाठी स्वतंत्र किचन आणि प्रयोगशाळांची सुविधा आहे. या संस्थेच्या अभ्यासक्रमात आता ‘मिलेट्स‘ (भरड धान्य) पासून बनवलेले आधुनिक भारतीय पदार्थ आणि झिरो वेस्ट कुकिंगयांसारख्या जागतिक स्तरावरील संकल्पनांवर विशेष भर दिला जातो.

पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमधून शिक्षण-प्रशिक्षण घेतलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांची संपर्कसाखळी, या संस्थेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार आणि संधी  मिळण्यासाठी सुलभतेने मार्गदर्शन मिळू शकते. आतिथ्यशीलता (हॉस्पिटॅलिटी) उद्योगात यशस्वी होण्यासाठी लागणारी सर्व कौशल्ये आणि तंत्र संस्थेच्या अभ्यासक्रमात शिकवली जातात.

इंडियन कलिनरी इंस्टिट्यूटला स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. अशाप्रकारचं शिक्षण-प्रशिक्षण देणारी आपल्या देशातील आघाडीची शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेत अत्याधुनिक किचन साहित्य, प्रयोगशाळा व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. आतिथ्यशीलता आणि सेवा उद्योगासाठी कलनरी शिक्षण/प्रशिक्षण हे सर्वाधिक आवश्यक व विशेष (स्पेशलाइज्ड) अर्हता समजली जाते. भारतीय अन्नपदार्थांचे जतन करणं, त्यांचं दस्तावेजीकरण (डाक्युमेंटशन) करणं, या बाबीसुध्दा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

करिअर संधी

हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील करिअर संधी मिळू शकतात-

(१) ‘क्लाउड किचनआणि फूड टेकमधील संधी२०२६ मध्ये हॉटेल उद्योगाचे स्वरूप बदलले असून आता फक्त मोठ्या हॉटेल्समध्येच नाही, तर ‘क्लाउड किचन’मध्येही शेफला मोठी मागणी आहे. ‘फूड टेक’ स्टार्टअप्समध्ये (उदा. स्विगी, झोमॅटोचे स्वतःचे ब्रँड्स) ‘मेन्यू इंजिनिअर’ आणि ‘फूड स्टायलिस्ट’ म्हणून करिअर करिअरची संधी मिळू शकते. (२) हॉटेल किंवा उपहारगृह आणि तत्सम सेवा उद्योगातील शेफ, (३) उपहार गृहातील स्वयंपाकगृह (किचन) व्यवस्थापन. करिअरच्या प्रारंभी इंटर्नशीपची संधी, (४) विमानसेवेतील किचन सेवा, (५) भारतीय नौसना आ‍‍थित्य (हॉस्पिटॅलिटी) सेवा, (५) आंतरराष्ट्रीय फास्टफूड साखळीमध्ये कार्यकारी पद किंवा व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी, (७) रुग्णालयातील आणि संस्थात्मक कॅटरिंग सेवा, (७) हॉटेल मॅनेजमेंट, फूड क्रॉफ्ट इंस्टिट्यूटमध्ये अध्यापन, (९) प्रवासी आणि व्यापारी जहाजातील कॅटेरिंग सेवेतील शेफ, (१०) भारतीय रेल्वे कॅटेरिंग आणि हॉस्पिटॅलिटी सेवा, (११) राज्य पर्यटन महामंडळाची उपहारगृहे आणि निवासस्थानातील किचन सेवा, (१२) स्वयंउद्योजकता,

संस्थेच्या वतिने विद्यार्थ्यांना नामांकित हॉटेल्स, उपाहरगृहे, हॉस्पिटॅलिटी सेवा यामध्ये इंटर्नशीपची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.

अभ्यासक्रम

(१) बीबीए (बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन) इन कलनरी आर्ट- या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षांचा आहे. हा अभ्यासक्रम तिरुपती आणि नॉयडा येथील कॅम्पसमध्ये करता येतो. प्रत्येक ठिकाणी १२० जागा भरल्या जातात. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय अन्नपदार्थ निर्मितीच्या प्रशिक्षणावर या अभ्यासक्रमात भर दिला जातो. याअनुषंगाने उत्कृष्ट कौशल्य निर्मितीसाठीचं ज्ञान प्रदान केलं जातं व सखोल प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. अन्नपदार्थ तयार करण्यातील आपलं कौशल्य, आवड आणि सर्जनशीलता या बळावर शेफ ख्याती प्राप्त करु शकतो. आपल्या कोणत्याही हॉटेलमध्ये सर्वाधिक वेतन शेफला दिलं जातं. त्याच्या स्वयंपाकीय कौशल्याच्या बळावर ग्राहकांची संख्या वाढण्यात आणि उपहारगृह अथवा हॉटेलची लोकप्रियता वाढण्यास मोठा हातभार लागतो. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना अन्नपदार्थ निर्मिती ते किचन व्यवस्थापन, किचन प्रशासन अशा विविधांगी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.

काय शिकाल?

हा अभ्यासक्रम केवळ पाककलेपुरता मर्यादित नसून त्यात विज्ञान आणि व्यवस्थापन कौशल्याचे समन्वय साधण्यात येते.या अभ्यासक्रमात पुढील विषय घटकांचा समावेश आहे-  

          ) पाककलेचे जागतिक ज्ञान  भारतीय प्रादेशिक खाद्यसंस्कृतीसोबतच फ्रेंच, इटालियन, चायनीज आणि इतर जागतिक पाककला पद्धती आणि प्रक्रियांचा सखोल अभ्यास,२) बेकरी आणि कन्फेक्शनरी (मिठाई तयार करण्याचे शास्त्र)- ब्रेड, केक, पेस्ट्री आणि चॉकलेट निर्मितीचे बारकावे, ३) अद्ययावत तंत्रज्ञान ‘मॉलिक्युलर गॅस्ट्रोनॉमी’  हे अत्याधुनिक तंत्र शिकवले जाते. (हे एक आधुनिक पाककलाशास्त्र आहे. यात रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रातील संकल्पनांचा वापर करून अन्नाची चव, रूप आणि पोत पूर्णपणे बदलला जातो. नैसर्गिक पदार्थांचे रूपांतर वेगळ्या स्वरूपात केले जाते.), ४)न्नशास्त्र आणि पोषण- अन्नपदार्थांतील पोषक घटक, कॅलरीचे मोजमाप आणि आहारशास्त्र, खाद्यपदार्थांची सुरक्षा आणि स्वच्छता, अन्नपदार्थांची साठवणूक आणि सूक्ष्मजीवशास्त्र, या घटकांचे ज्ञान प्रदान केले जाते, ) हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवस्थापन/  किच मॅनेजमेंट मोठ्या प्रमाणावर अन्नाचे नियोजन आणि कचरा व्यवस्थापन, ६) खर्च नियंत्रण पदार्थांची किंमत ठरवण्याचे आणि नफा मिळवण्याचे गणित, ७) इव्हेंट मॅनेजमेंट लग्नासारख्या मोठ्या समारंभांचे किंवा थीम-बेस्ड रेस्टॉरंटचे नियोजन, ८) व्यावसायिक कौशल्ये /संवाद कौशल्य हॉटेल उद्योगात लागणारे सॉफ्ट स्किल्स आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, ९) अकाउंटन्सी आणि हॉटेलमध्ये वापरले जाणारे सॉफ्टवेअर्स, १०) उद्योजकता स्वतःचे कॅफे किंवा रेस्टॉरंट सुरू करायचे  असल्यास, त्याचे बिझनेस मॉडेल (व्यवसाय प्रारुप).

          या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांवर अधिक भर  दिला जातो. चौथ्या सत्रात विद्यार्थ्यांना मोठ्या हॉटेल्समध्ये औद्योगिक प्रशिक्षण दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो.

प्रवेश प्रक्रिया

आयजीएनटीयू- आयसीआय- जेइइ (इंदिरा गांधी नॅशनल ट्रायबल युनिव्हर्सिटी- इंडियन कलिनरी इंस्टिट्यूट- जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन)- ही परीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ट पध्दतीची आहे. यापरीक्षेचा कालावधी दोन तासांचा आहे. एकूण १०० प्रश्न पुढीलप्रमाणे विचारले जातात- (१) संख्यात्मक क्षमता आणि विश्लेषणात्मक कल‍ (न्युमरिकल ॲबिलिटी आणि ॲनॅलिटिकल ॲप्टिट्यूड), (२) कार्यकारणभाव आणि तार्किकता  (रिझनिंग आणि लॉजिकल डिडक्शन), (३) सामान्यज्ञान आणि चालू घडामोडी, (४) इंग्रजी, (५) सेवा क्षेत्रासाठी कल (ॲप्टिट्यूट फॉर सर्व्हिस सेक्टर). प्रत्येक विषय घटकाचे प्रत्येकी २० प्रश्न विचारले जातात. प्रत्येक अचुक उत्तराला एक गुण दिला जातो. निगेटिव्ह गुण नाहीत.

    अर्हता- चाळणी परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या खुल्या संवर्ग आणि नॉन क्रिमिलेयर इतर मागासवर्ग संवर्गातील कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्याला १२ वी मध्ये ५० टक्के गुण मिळायला हवेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग संवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के गुण मिळायला हवेत. राज्याने मान्यता प्रदान केलेल्या १२ वी व्होकेशनल अभ्यासक्रमाचे विद्यार्थीही ही परीक्षा देऊ शकतात.

प्लेसमेंट

बीबीए आणि एमबीए अभ्यासक्रम केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील कंपन्या/ संस्था/ उपाहरगृहे/ हॉटेल यामध्ये प्लेसमेंट मिळाले आहे. (१) बिग सेडॉर लॉज, अमेरिका, (२) आयटीसी हॉटेल्स, (३) मॅरिऑट ग्रुप्स, (४) रेसिडंसी ग्रुप्स, (५) कंम्पास ग्रुप्स, (६) रॅडिसन ग्रुप्स, (७) द रेन ट्री हॉटेल ग्रुप्स, (८) ताज ग्रुप्स ऑफ हॉटेल्स, (९) ॲकॉर हॉटेल्स, (१०) नेसले, (११) जिओ मार्ट, (१२) ॲमेझान, (१३) ओबेरॉय ग्रुप

संपर्क(१) नॉयडा-  ए, ३५, निअर एनसीएचएमसीटी, ब्लॉक ए, इंडस्ट्रिअल एरिआ,सेक्टर ६२ नॉयडा – उत्तरप्रदेश २०१३०९, संकेतस्थळ-https://www.icinoida.com, ,ईमेल- noidaici@gmail.com, भ्रमणध्वनी ९७१८१०३९५ आणि ९९१००९२३०३, (२) तिरुपती- पापानैदूपेटा(पोस्ट),कुर्राकावला व्हिलेज,टीसीएल रोड,काराकाम्बादी रुरल,तिरुपती- ५१७५२६, admissions.icitpt@gmail.com, भ्रमणध्वनी- ८१०८१०३४७८,