(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टिट्यूट (आयएसआय) (भारतीय सांख्यिकी संस्था) ही भारतातील सांख्यिकी आणि गणित या विषयातील शिक्षण /प्रशिक्षण देणारी सर्वोत्कृष्ट संस्था आहे. १९३१ साली प्रख्यात सांख्यिकीतज्ज्ञ प्रसांतचंद्र महालनोबिस यांनी तिची स्थापना केली. सुरुवातीला ही संस्था केवळ सांख्यिकी संशोधनासाठी होती, परंतु कालांतराने ती बहुज्ञानविषयक संशोधन केंद्र बनली. भारताची पहिली पंचवार्षिक योजना तयार करण्यात या संस्थेचा महत्वाचा वाटा होता.

या संस्थेचे मुख्य कॅम्पस कोलकत्यात आहे, तर दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई आणि तेजपूर येथे उपकेंद्रे आहेत. याशिवाय पुणे, मुंबई, हैदराबाद, वडोदरा, कोयंबतूर अशा ठिकाणी औद्योगिक सल्ला व संशोधनासाठी शाखा कार्यालये कार्यरत आहेत.

इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टिट्यूट (आयएसआय) (भारतीय सांख्यिकी संस्था)या संस्थेत सांख्यिकी, गणित, डेटा सायन्स, क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स, क्वालिटी कंट्रोल, ऑपरेशन्स रिसर्च या विषयांमध्ये मध्ये पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. स्तरावरील अभ्यासक्रम चालवले जातात. सांख्यिकी, गुणवत्ता नियंत्रण, ऑपरेशन्स रिसर्च, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील संशोधनात ही  संस्था अग्रगण्य मानली जाते. भारत सरकारने या संस्थेला नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्पॉर्टन्सचा दर्जा दिला आहे.

अशा या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि महत्वाच्या शैक्षणिक संस्थेत मराठी मुलं अभावानेच प्रवेशासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे उच्चश्रेणीच्या अनेक करिअर संधीला ते मुकतात. ही बाब लक्षात घेऊन मराठी विद्यार्थ्यांनी या संस्थेत प्रवेशासाठी प्रयत्न करायला हवेत. (या संस्थेच्या प्रवेश प्रकियेकडे मराठी विद्यार्थी आणि पालक वेळेवर  लक्ष देत नाहीत. यंदा या संस्थेतील विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या, ‘आयएसआय टेस्ट’ प्रवेश परीक्षेचा अर्ज करण्याची शेवटची तरीख १३ मार्च २०२६ होती. ही परीक्षा १० मे २०२६ देशभरातील विविध शहरांमध्ये घेतली गेली. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर आणि पुणे या केंद्रांचा समावेश होता. २०२७ साली या परीक्षेची प्रवेश प्रक्रिया साधारणत: मार्च मध्ये सुरु होईल. तिकडे लक्ष ठेवावे लागेल.)

अभ्यासक्रम

() बॅचलर ऑफ मॅथेमॅटिक्स (ऑनर्स)- कालावधी- तीन वर्षे. हा अभ्यासक्रम बेंगळुरु कॅम्पस येथे शिकवला जातो. अर्हता- गणित आणि  इंग्रजी या विषयांसह १२ वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण.

(२) बॅचलर ऑफ स्टॅटेस्टिक्स (ऑनर्स)– कालावधी- तीन वर्षे. हा अभ्यासक्रम कोलकाता कॅम्पस येथे शिकवला जातो. अर्हता- गणित आणि  इंग्रजी या विषयांसह १२ वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण.

(३) मास्टर ऑफ मॅथेमॅटिक्स (ऑनर्स)- कालावधी- दोन वर्षे. हा अभ्यासक्रम कोलकाता आणि दिल्ली कॅम्पस येथे शिकवला जातो. अर्हता- गणित विषयासह बी.एस्सी परीक्षा उत्तीर्ण.

(४) मास्टर ऑफ स्टॅटिस्टिक्स (ऑनर्स)- कालावधी- दोन वर्षे. हा अभ्यासक्रम कोलकाता आणि दिल्ली कॅम्पस येथे शिकवला जातो. अर्हता- गणित विषयासह बी.एस्सी परीक्षा उत्तीर्ण.

प्रवेश प्रक्रिया

     बी.मॅथ/ बी.स्टॅट आणि एम.मॅथ/एम.स्टॅटया अभ्यासक्रमांना देशस्तरीय चाळणी परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो.

(१) बी.मॅथ/ बी.स्टॅट- या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी दोन पेपर असतात. पहिला पेपर हा बहुपर्यायी वस्तुनिष्ट पध्दतीचा असतो. दुसरा पेपर हा वर्णनात्मक असतो. हा पेपरमधील प्रश्न १२ वीच्या गणितावर आधारित असतात.

(२) एम.स्टॅट प्रवेशासाठीच्या पेपर मधील प्रश्न बी.एस्सी स्टॅट (ऑनर्स) च्या स्तरावरील असतात. या पेपरमध्ये पहिल्या भागात सांख्यिकी आणि गणितावर आधारित बहुपर्यायी प्रश्न असतात,तर दुसऱ्या भागात लघुत्तोरी प्रश्न असतात

(३) एम.मॅथ प्रवेशासाठीच्या पेपर मधील प्रश्न बी.एस्सी मॅथ (ऑनर्स) च्या स्तरावरील असतात.या पेपरमध्ये पहिल्या भागात गणितावर आधारित बहुपर्यायी प्रश्न असतात,तर दुसऱ्या भागात लघुत्तोरी प्रश्न असतात

गणित या विषयासह बी.ई किंवा बी.टेक किंवा या संस्थेची बी.स्टॅटिस्टिक्स आणि बी.मॅथ ही  पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना एम.मॅथ अभ्यासक्रमाला थेट प्रवेश दिला जातो.

    इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल ऑलम्पियाड ट्रेनिंग कॅम्पसाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेपासून सूट देण्यात येते. या ऑलम्पियाडचे आयोजन, नॅशनल बोर्ड ऑफ हायर मॅथेमॅटिक्स, डिपार्टमेन्ट ऑफ ॲटोमिक एनर्जी यांच्यामार्फत केले जाते. मात्र, या उमेदवारांना इतर उमेदवारांसारखा अभ्यासक्रमासाठी अर्ज करावा लागतो. या उमदेवारांची अंतिम निवड मुलाखतीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर केली जाते.

बॅचलर ऑफ स्टॅटेस्टिकल ॲण्ड डाटा सायंस (ऑनर्स) –

हा अभ्यासक्रम यंदा (२०२६) च्या शैक्षणिक वर्षापासून  सुरु करण्यात आला आहे. कालावधी- चार वर्षे. (इच्छुक विद्यार्थी या अभ्यासक्रमाचा कालावधी आणखी एक वर्षासाठी वाढवू शकतात. अशा विद्यार्थ्यांना इंटिग्रेटेड मास्टर्स डिग्री इन स्टॅटेस्टिकल डाटा सायंस ही पदवी दिली जाते.) हा अभ्यासक्रम कोलकता, बेंगळुरु आणि दिल्ली कॅम्पस येथे शिकवला जातो. अर्हता- गणित किंवा उपयोजित गणित आणि इंग्रजी या विषयांसह १२ वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण. १२ वीमध्ये सरासरीने ७५ टक्के गुण मिळायला हवेत. राखीव संवर्गासाठी ६५ टक्के गुण मर्यादा.

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जेइइ मेन २०२५, जेइइ मेन २०२६, गणित आणि इंग्रजी हे विषय घेऊन दिलेली सीयुइटी युजी २०२५ किंवा २०२६  या परीक्षांधील गुण ग्राह्य धरले जातील. इच्छुक विद्यार्थी २० जून २०२६ पर्यंत अर्ज करु शकतात.

    शिष्यवृत्ती-

    (१)  बी.मॅथ- दरमहा हजार रुपये आणि दरवर्षी पुस्तके व इतर शैक्षणिक खर्चासाठी हजार रुपये. (२)  एम.मॅथ-  दरमहा  हजार रुपये आणि दरवर्षी पुस्तके व इतर शैक्षणिक खर्चासाठी हजार रुपये.

प्लेसमेंट

    या संस्थेचे अभ्यासक्रम केल्यावर विद्यार्थ्यांना पुढील ठिकाणी प्लेसमेंट्स मिळाल्या आहेत – अमेरिकन एक्स्प्रेस, ॲक्सिस बँक, एक्सए लाइफ इंश्युरन्स, बीएआरसी इंडिया, बीसीएस टेक्नॉलॉजी, ब्लॅक रॉक, बार्कलेज शेअर्ड सर्व्हिस, कॅपिटल वन, सिटी बँक, क्रिसिल, सिटी कॉर्पोरेशन, डेलॅाइट, आयबीएम, आयसीआयसीआय, अर्न्स्ट ॲण्ड यंग, गोल्डमन सॅच, एचसीबीसी टेक्नॉलॉजी ॲण्ड सर्व्हिस, जे.पी.मॉर्गन, केपीएमजी, मॅकिन्सी, मीडिया नेट, मायक्रोसॉफ्ट, नॉव्हॅरटीस, निलसेन, पेट्रॅबाइट्स, रिलायन्स, सॅमसंग, स्टँडर्ड चार्टर्ड, टीसीएस ॲनॅलिटिक्स, टीसीएस इनोव्हेशन लॅब, युनायटेड हेल्थ ग्रुप, वालमार्ट,

इतर अभ्यासक्रम

(१) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्टॅटिस्टिकल मेथड्स ॲण्ड ॲनॅलिटिक्स- या अभ्यासक्रमात सांख्यिकीचे मूलभूत सिद्धांत, डेटा अॅनॅलिटिक्स आणि संगणकीय कौशल्ये  शिकवली जातात. यासाठी गणित विषयास कोणत्याही शाखेतील पदवीधर, किंवा बीई/बीटेक पदवीधर पात्र ठरतात. प्रवेश प्रक्रिया लेखी परीक्षा आणि मुलाखतीवर आधारित असते. हा एक वर्षाचा अभ्यासक्रम असून डेटा अॅनॅलिटिक्स, बँकिंग, वित्तीय संस्था आणि आयटी कंपन्यांमध्ये करिअर संधी उपलब्ध होतात.

(२) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲग्रिकल्चरल ॲण्ड रुरल मॅनेजमेंट- ग्रामीण विकास, कृषी व्यवस्थापन आणि सांख्यिकीचा वापर करून कृषी विषयक धोरणांची रुपरेषा ठरवण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. कृषी, अर्थशास्त्र, व्यवस्थापन किंवा संबंधित शाखेतील पदवीधर यासाठी पात्र असतात. प्रवेश लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होतो. हा एक वर्षाचा अभ्यासक्रम असून कृषी कंपन्या, ग्रामीण विकास संस्था, सरकारी प्रकल्प आणि अशासकी संस्थांमध्ये संधी मिळतात.

 

(३) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्टॅटिस्टिकल ॲण्ड कॉम्प्युटेशनल जेनॉमिक्स- या अभ्यासक्रमात जीनॉमिक्स (जनूकशास्त्र), बायोइन्फॉर्मेटिक्स(जैव माहितीशास्त्र) आणि सांख्यिकी या तीन विषयांचा समावेश आहे. जीवशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, बायोइन्फॉर्मेटिक्स, सांख्यिकी किंवा संगणकशास्त्रातील पदवीधर यासाठी पात्र असतात. प्रवेश लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होतो. हा एक वर्षाचा अभ्यासक्रम असून रिसर्च संस्था, फार्मा कंपन्या, बायोटेक्नॉलॉजी आणि हेल्थकेअर ॲनॅलिटिक्स क्षेत्रात करिअर संधी उपलब्ध होतात.

या सर्वच अभ्यासक्रमांची संरचना अशा पध्दतीने करण्यात आली आहे की तो पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यास गणित, सांख्यिकी, संगणकशास्त्र, गणितीय भौतिकशास्त्र याविषयांमध्ये उच्च शिक्षण घेता येणे सुलभ जावे.  गणित विषयाचा ज्या ठिकाणी थेट उपयोग केला जातो, तिथे या विद्यार्थ्यांना करिअरची संधी तत्काळ मिळते.

मास्टर ऑफ सायंस इन क्वालिटी मॅनेजमेंट ॲण्ड बिझिनेस ॲनॅलिटिक्स, मास्टर ऑफ सायंस इन क्वालिटी मॅनेजमेंट, मास्टर ऑफ सायंस इन लायब्ररी  ॲण्ड इन्फॉर्मेशन सायंस हे अभ्यासक्रमही करता येतात.

संपर्क

इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टिट्यूट २०३, बराकपोर ट्रंक रोड, कोलकाता-७००१०८, संकेतस्थळ –https://www.isical.ac.in, ईमेल: admissionsupport@isical.ac.in,दूरध्वनी: ०३३-२५७५२५०४

सुरेश वांदिले

 

 

मार्ग यशाचा ३७-आकडेमोडीच्या शास्त्राचे शस्त्र हाती घ्या…