(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा ३९-संस्थांचा दर्जा कसा ओळखायचा?(भाग एक)

वेगवेगळ्या बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षांचे निकाल लागले आहेत. पुढील शिक्षणासाठी प्रवेश देणाऱ्या जवळपास सगळ्या चाळणी परीक्षाही उरकल्या आहेत. लवकरच त्यांचेही निकाल लागतील. आता प्रवेश कुठे घ्यावा, याची लगबग सुरू होईल. कोणती शिक्षण संस्था चांगली नि कोणती यथातथा, याची बरीच चर्चाही होईल.

व्यावसायिक अभ्यासक्रम चालवणाऱ्या सगळ्याच संस्था, आपण कसे उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देतो, हे वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरातीतून सांग‍त असतात. गेल्यावर्षी हिंदी सिनेमातील एका अभिनेत्रीची छबी, एका संस्थने त्यांच्या जाहिरातीत ठळकपणे दिली. यंदा याच संस्थेच्या जाहिरातीत एक प्रसिध्द क्रिकेटपटू, या संस्थेचे अभ्यासक्रम कसे जागतिक दर्जाचे वगैरे आहेत, हे सांगत असतो. काही संस्था आपले अभ्यासक्रम केल्यावर विद्यार्थ्यांना कसे लाखालाखाचे पॅकेज मिळते यावर जाहिरातीत भर देतात. काही शैक्षणिक संस्था, जागतिक रँकिंग करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आपल्याला कोणता क्रम दिलाय आणि आपण कसे भारतात किंवा दक्षिण आशियात सर्वोत्कृष्ट आहोत, हे उच्चरवाने सांगत असतात. कोणत्या संस्थेने काय नि कशा पध्दतीने विद्यार्थ्यांना व पालकांना आकर्षित करावे, हा ज्याचा त्याचा उद्योग! तो कुणी कसा करायचा, याला सध्यातरी आपल्याकडे काही बंधन नाही. मात्र, या संस्थांच्या जाहिरातीकडे आकर्षित होऊन संस्थांची निवड करताना पालक आणि विद्यार्थ्यांनी डोळ्यात तेल घालून काळजी घेतली पाहिजे.

आता, ही काळजी घ्यायची म्हणजे नेमके काय करायचे? यासाठी कशाचा आधार घ्यायचा? त्या आधाराची वस्तुनिष्ठता काय? असे प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतात. या काही प्रश्नाची उत्तरे ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क- राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन आराखडा’ (एनआयआरएफ) या उपक्रमांतर्गत दरवर्षी प्रकाशित होणारा अहवाल देऊ शकतो.

गुणांकनाची पध्दत

एनआयआरएफ पुढील पाच प्रमुख निकषांवर गुण देते- १) अध्यापन, शिक्षण आणि संसाधने यात विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर, विद्याशाखेतील पीएचडीधारक शिक्षक आणि आर्थिक संसाधनांची तपासणी, २) संशोधन  संस्थेने किती पॅटेंट मिळवले, किती शोधनिबंध प्रसिद्ध केले, प्रकल्पांचा दर्जा, यांची तपासणी, ३) ग्रॅज्युएशन आउटकम (शिक्षणोत्तर फलश्रुती) परीक्षांचे निकाल आणि पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नोकऱ्या  किंवा पुढील उच्च शिक्षणाच्या संधी, ४) आउटरीच (संस्थेच्या प्रभावाची व्याप्ती) आणि सर्वसमावेशकता दुसऱ्या राज्यातील विद्यार्थी, महिला, आर्थिकदृष्ट्या मागास आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा, ५) धारणा शैक्षणिक क्षेत्रात आणि उद्योगजगतात सबंधित संस्थेची प्रतिमा किंवा पत.

या निकषांचा आधार घेऊन शैक्षणिक संस्था आणि या संस्थांतील वेगवेगळया अभ्यासक्रमांची क्रमवारी तयार केली जाते. ही क्रमवारी पुढीलप्रमाणे दिली जाते-

१) एकूण (ओव्हरऑल)– सर्व निकषांवर आधारित देशातील सर्वोत्तम संस्था, २) विद्यापीठ – उच्च शिक्षण आणि प्रगत संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली विद्यापीठे, ३) महाविद्यालये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांची पदवी महाविद्यालये, ४) अभियांत्रिकी- तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी शिक्षणातील आघाडीच्या संस्था, ५) व्यवस्थापन- एमबीए आणि व्यवस्थापन क्षेत्रातील सर्वोत्तम संस्था, ६) फार्मसी- औषधनिर्माण शास्त्र आणि औषधी क्षेत्रातील संशोधनासाठीच्या संस्था, ७)  वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय संशोधनासाठीच्या संस्था, ८) दंतवैद्यकीय शिक्षण आणि उपचारांमधील उत्कृष्ट संस्था, ९) विधी/कायदाया विषयाचे शिक्षण आणि वकिली क्षेत्रातील नामवंत संस्था, १०) वास्तुकला आणि शहर नियोजनातील तज्ज्ञ संस्था, ११) कृषी- शेती आणि संलग्न क्षेत्रातील शिक्षण व संशोधन, १२) नाविन्यता – नवीन कल्पना आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणाऱ्या संस्था.

एनआरआयएचे महत्व-

(१) खाजगी संस्थांच्या आकर्षक जाहिरातींपेक्षा सरकारी निकषांवर आधारित माहिती मिळते, (२) दोन संस्थांमध्ये नेमका फरक (उदा. एका संस्थेत प्लेसमेंट चांगली आहे तर दुसऱ्या संस्थेत संशोधन), हे गुण पाहून कळतो, (३) हे रँकिंग, केंद्र सरकार जाहीर करत असल्याने माहितीची विश्वासहार्यता अधिक असते.

एखाद्या संस्थेचा किंवा विद्यापीठाचा क्रमांक पहिला असेल म्हणजे तिथे शिकवले जाणारे सगळेच अभ्यासक्रम पहिल्या क्रमांकाचे असतील असे नव्हे. अशा संस्थांमधील वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची क्रमवारी वेगवेगळी राहू शकते. एखादी शिक्षण संस्था या क्रमवारित ५० व्या क्रमांकावर असूनही याच संस्थेतील एक वा अनेक शाखानिहाय अभ्यासक्रम हे सर्वोच्च दहा (टॉप टेन) मध्ये राहू शकतात.

०००

महत्वाच्या संस्था

एनआयआरएफच्या गेल्या काही वर्षातील रँकिंगनुसार विविध शाखांमधील देशस्तरीय महत्वाच्या संस्था

(१) तंत्रज्ञान १) आयआयटी मद्रास, २) आयआयटी दिल्ली, ३) आयआयटी मुंबई, ४) आयआयटी कानपूर, ५) आयआयटी खरगपूर, ६) आयआयटी रुरकी, ७) आयआयटी हैदराबाद, ८) आयआयटी गौहाटी, ९. एनआयटी तिरुचिरापल्ली, १०) आयआयटी बीएचयू (वाराणसी).

(२) वैद्यकीय – १) ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस (एम्स) नवी दिल्ली, २) पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (पीजीआयएमईआर) चंदीगड, ३) ख्रिश्चन मेडिकल कॉलेज (सीएमसी) वेल्लोर, ४) जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्टग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (जेआयपीएमइआर) पुदुचेरी, ५) संजय गांधी पदव्युत्तर आयुर्विज्ञान संस्था लखनौ, ६) बनारस हिंदू युनिव्हर्सिटी- इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस वाराणसी, ७) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस (निमहान्स) बेंगळुरू, ८) किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी लखनौ, ९) अमृता विश्व विद्यापीठम कोईम्बतूर, १०) कस्तुरबा मेडिकल कॉलेज मणीपाल.

(३) व्यवस्थापन – १) आयआयएम अहमदाबाद, २) आयआयएम बेंगळुरू, ३) आयआयएम कोझिकोड, ४) आयआयटी दिल्ली (डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज), ५) आयआयएम लखनौ, ६) आयआयएम मुंबई, ७) आयआयएम कोलकाता, ८) आयआयएम इंदौर, ९) एक्सएलआरआय  जमशेदपूर, १०) शैलेश जे. मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंट (आयआयटी मुंबई).

(४) औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी)- १) जामिया हमदर्द, नवी दिल्ली, २) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (एनआयपीआयआर), हैदराबाद, ३) बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (बिट्स), पिलानी, ४) जेएसएस कॉलेज ऑफ फार्मसी, उटी, ५) इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ( आयसीटी), मुंबई, ६) जेएसएस कॉलेज ऑफ फार्मसी, म्हैसूर, ७) पंजाब युनिव्हर्सिटी, चंदीगड , ८) मणीपाल कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस, मणीपाल, ९) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, अहमदाबाद, १०) अमृता विश्व विद्यापीठम, कोची

(५) विधी / कायदा१) नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बेंगळुरू, २) नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली, ३) नॅशनल अॅकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च  युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, हैदराबाद, ४) पश्चिम बंगाल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ जुडिशियल सायन्सेस कोलकाता, ५) सिम्बायसिस लॉ स्कूल, पुणे, ६) जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली, ७) नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, जोधपूर, ८) गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, गांधीनगर, ९) शिक्षा ओ अनुसन्धान, भुवनेश्वर, १०) बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ, लखनौ

(६) वास्तुकला१) आयआयटी  रुरकी,२) आयआयटी खरगपूर, ३) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कालीकत, ४) स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर, नवी दिल्ली, ५) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी, शिबपूर, ६) स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर, भोपाळ, ७) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तिरुचिरापल्ली, ८) स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर, विजयवाडा, ९) सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजी  युनिव्हर्सिटी, अहमदाबाद, १०) अण्णा विद्यापीठ, चेन्नई

(७) महाविद्यालये

 (एनआयआरएफ मध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांसाठी स्वतंत्र विभाग नसून ‘महाविद्यालय’ या एकाच श्रेणीमध्ये या सर्व शाखांच्या नामांकित संस्थांचा समावेश होतो.)

१) हिंदू कॉलेज दिल्ली, २) मिरांडा हाऊस दिल्ली, ३) हंस राज कॉलेज दिल्ली, ४) किरोडीमल कॉलेज दिल्ली, ५) सेंट स्टीफन्स कॉलेज दिल्ली, ६) रामकृष्ण मिशन विद्यामंदिर हावडा, ७) आत्माराम सनातन धर्म कॉलेज दिल्ली, ८) सेंट झेवियर्स कॉलेज कोलकाता, ९) पीएसजीआर कृष्णम्मल कॉलेज कोईम्बतूर, १०) पीएसजी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स कोईम्बतूर.