अद्भूत
परवा तेजोमयी ॲव्हेंजर्स हा इंग्रजी चित्रपट बघण्यात दंगून गेली होती.
सिनेमा संपल्यावर वाSव, काय अफलातून कथा, अशी प्रतिक्रिया तिने बाबांकडे व्यक्त केली. अंतराळातील वेगवेगळया ग्रहांवर राहणारे मानवसदृष्य पण चमत्कारिक अशी शक्ती असणारे प्राणी, त्यांच्या या शक्तीमुळे निर्माण होणाऱ्या अदभूत आणि अंगावर शहाऱ्या आणणाऱ्या घटना, त्यांच्याकडे असणारी अत्याधुनिक पण जादूई अशी अवकाशयाने, त्यांचा अतिप्रचंड वेग, एकमेकांचा श्वास रोखून धरायला लावणारा पाठलाग, प्रत्येकाची वेगवेगळी अनोखी आणि हरखून टाकणारी सृष्टी, पृथ्वीवरील मानवजात नष्ट करुन पृथ्वी ताब्यात घेण्याची महत्वाकांक्षा असणारे एकापेक्षा एक भयंकर चेहऱ्याचे प्राणी अशा अनेक कथांचं एकत्रीकरण असणारा हा चित्रपट तेजोमयीस प्रचंड आवडत असे. या मालिकतेतील इतरही चित्रपट लागले की बाईसाहेब हातातील सर्व कामे सोडून एकटक टीव्ही बघत बसायच्या.
“आपल्याकडे कां हो, अशा कथा असत नाहीत?” एकदा बाबांना तिने विचारलं.
” कुणी सांगितलं तुला असं? आपल्याकडे याहीपेक्षा अदभूत अशा कथा आहेत की!” बाबा म्हणाले.
“खरंच की काय? तुम्हाला एखादी अशी अफलातून गोष्ट माहीत असेल तर सांगाना बाबा,” तेजोमयीने बाबांकडे हट्ट धरला.
“मी नक्कीच सांगतो अशी गोष्ट. पण तुला मनात ‘त्याला’ आधी बोलावलं लागेल.
“कोण तो?”
‘तो कोण? हे मी नंतर तुला सांगेनच. पण तू आधी मनातल्या मनात ‘त्याला’ बोलाव बघू.’
“पण ‘तो’ काय करणार, मी बोलवल्यावर?
“अग ‘तो’ कथा सांगेल.”
“म्हणजे तुम्ही नाही का सांगणार?”
“मीच सांगेन, पण ‘तो’ तुला प्रत्यक्ष कथा जशी जशी घडली ना त्या ठिकाणी घेऊन जाईल!”
“वा वा!”
“मग बोलाव ‘त्याला’ तुझ्या मनात”, बाबा म्हणाले. बाबांनी,तेजोमयीच्या कानात “त्याचं’ नाव सांगितलं.
तेजोमयीनं डोळे मिटलं आणि ‘त्याला’ ये म्हंटलं. क्षणार्धात ‘तो’ हजर झाला. त्याला बघून तेजोमयीस अत्यानंद झाला. तिने त्याला वंदन केलं. ‘त्यानेही’ हाय केलं नि तेजोमयीचं बोट पकडून उंच झेप घेतली. कितीतरी वेगाने तेजोमयी ‘त्याच्या’सोबत अनोख्या आणि अदभूत प्रदेशात जात राहिली.
काहीवेळाने ‘त्याने’ तेजोमयीला एका पर्वतावर उतरवलं.
“दिसतात का तुला त्या एका शिळेवर बसलेले ‘ते’ दोघं?” त्याने विचारलं.
“हो, ते तर महादेव आणि पार्वतीमातेसारखे दिसतात.”
“दिसतात नाही, तेच आहेत.”
“ते इथे काय बरं करताहेत? पार्वतीमातेचा कसला तरी आग्रह चाललाय?”
“अगदी बरोबर, अगदी बरोबर. पार्वतीमातेचा आग्रहच सुरु आहे. आपण तिथे जाऊनच बघूया.”
“आपण तिथे गेलो तर त्यांना दिसणार नाही का?”तेजोमयीनं विचारलं.
“अरे, विसरलोच की मी ते.” ‘तो’ म्हणाला. ‘त्याने’ तेजोमयी आणि स्वत:वर एक मंत्र पुटपुटला. दोघांचही रुपांतर फुलपाखरात झालं. ते उडत उडत महादेव आणि पार्वतीमाता बसलेल्या शिळेजवळ गेले. थोड्या अंतरावरुन पार्वतीमाता कशाचा आग्रह करत आहे, याकडे कान देऊन लक्ष देऊ लागले.
पार्वतीमाता महादेवांना विचारत होत्या, “तुम्हीच केवळ एकटे अमर म्हणजे नष्ट न होणारे कां आणि इतर कां नाहीत?”
महादेवांनी प्रारंभी काहीही सांगण्यास नकार दिला. पण पार्वतीमातेने हट्टच धरला. महादेव त्यांना समजावत म्हणाले,
“मीच फक्त अमर असण्याचं एक रहस्य आहे. ते सर्वांना कळलं तर सर्वजण अमर होतील आणि मग अंतराळात, पृथ्वीवर कुणालाही राहण्यासाठी जागाच शिल्लक राहणार नाही. खूप अनागोंदी माजेल.”
मात्र, पार्वतीमाता काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यांनी आपला हट्ट काही सोडला नाही. तेव्हा नाईलाजाने महादेव पार्वतीमातेला म्हणाले,
“आपण आधी अशी एक जागा शोधू की जिथे फक्त आपणच दोघे असू. म्हणजे मग हे रहस्य तुमच्याशिवाय कुणालाही कळणार नाही.”
पार्वतीमातेने यास होकार दिला. ते दोघेही अशा ठिकाणाच्या शोधात निघाले. फुलपाखरु झालेली तेजोमयी आणि ‘तो’सुध्दा महादेव आणि पार्वतीमातेच्या नकळत त्यांच्या अवतीभवती उडू लागले. पुढे घडणाऱ्या एकेक घटना नजरेत सामावून घेऊ लागले.
वाटेत महादेवांनी आपल्या नंदीला सोडून दिले. पुढे आणखी अंतर चालून गेल्यावर महादेवांनी आपल्या मस्तकावरील चंद्राला उतरवून ठेवलं. आणखी पुढे चालून गेल्यावर एका तळ लागलं. याठिकाणी आपल्या अंगावरील नागांना उतरण्यास सांगितलं. मग पुढे बराच अंतर महादेव आणि पार्वती चालत राहिले. एके ठिकाणी महादेवांनी आपल्या जटा खोलून गंगानदीस निघून जाण्यास सांगितलं.
त्यानंतर महादेवांना एक गुहा दिसली. या गुहेत दोघेही शिरले. इथेही त्या दोघांशिवाय कुणीही नाही याची त्यांनी खात्री करुन घेतली. तथापी गुहेच्या आजूबाजूच्या प्रदेशात पक्षी – प्राणी- वृक्षराजी असल्याने त्यांना आपली कथा ऐकायला जाईल असं वाटल्यानं महादेवांनी अग्नीस सांगून तो प्रदेश जाळून टाकला.
आता अवतीभवती कुणीही नाही हे बघून गुहेतील मृगाजीनावर महादेव बसले. इतकी काळजी घेऊन मृगाजीनाच्या खाली एक पोपटाचं अंड असल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही.
महादेवांनी एकाग्रचित्ताने आणि डोळे बंद करुन, तेच फक्त अमर कां? याचं रहस्य सांगायला सुरुवात केली. पार्वतीमाताही एकाग्रचित्ताने रहस्य ऐकू लागल्या. एक वाक्य संपलं की त्या हुंकार देत. हे रहस्य ऐकता ऐकता पार्वतीमातेला झोप आली आणि त्या गाढ निद्रेत गेल्या. त्याचवेळी पोपटाच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडून ते एकाग्रचित्ताने महादेवांचं रहस्य ऐकू लागलं. ऐकता ऐकता हुंकार देऊ लागलं. रहस्य पूर्ण सांगून झाल्यावर महादेवांनी डोळे उघडले. बघतात तर काय? पार्वतीमाता गाढ निद्रेत!
मग, आतापर्यंत कोण हुंकार देत होतं आपणास? महादेवांना प्रश्न पडला. पार्वतीमाता निद्रेतून जाग्या झाल्यावर त्यांनी या बाबत पार्वतीमातेस विचारलं. पार्वतीमातेचं लक्ष, पोपटाच्या पिलाकडं गेलं. त्यानी महादेवाचं लक्ष तिकडे वेधलं.
महादेवांनी त्या पोपटाच्या पिल्लास पकडण्याचा प्रयत्न केला. तर जिवाच्या आकांताने तिथून ते पिल्लू उडालं. अमर होण्याची कथा ऐकल्याने ते पिल्लू अमर झालं होतं. पण ते त्याला ठाऊक नसल्याने ते घाबरुन उडत राहिलं.
उडता उडता ते पिल्लू व्यास मुनींच्या आश्रमात आलं. त्याचवेळी आश्रमाच्या दारात बसलेल्या व्यासमुनींच्या पत्नीला जांभई आली. हे बघून त्या पोपटाच्या पिल्लानं सूक्ष्म रुप धारण केलं आणि त्यांच्या पोटात जाऊन दडला.
पोपटाच्या पिल्लाचा शोध घेत, महादेव व्यासमूनींच्या आश्रमात आले. महादेवांनी ते तिथे कशासाठी आले, हे व्यासमूनींना सांगितलं.
आता करायचं काय? पोपटाला बाहेर काढण्यासाठी व्यासमुनींच्या पत्नीला ठार करावं लागणार होतं. पण असं कृत्य करणं म्हणजे महापाप ठरलं असतं. महादेवांना याची जाणीव झाल्याने नाईलाजाने ते तिथून निघून गेले.
काही दिवसांनी पोटातील पोपटामुळे व्यासमुनींच्या पत्नीचं पोट दुखू लागलं. त्यांना असह्य वेदना होऊ लागल्या. काहीच उपाय न सुचल्याने व्यासमुनी ब्रम्हदेव आणि विष्णूकडे गेले. पण त्यांच्याकडेही काही उपाय मिळाला नाही. मग ते तिघेही महादेवांकडे गेले. महादेवांनी तिघांनांही पोटातील पोपटाची स्तुती करण्यास सांगितलं. या स्तुतीने प्रसन्न होऊन पोपट मनुष्यरुपात बाहेर आला. व्यासमूनींनी त्याचं नाव शुकदेव ठेवलं.
हा शुकदेव एकही क्षण तिथे थांबला नाही. तो लगेच वनात निघून गेला. व्यासमुनींनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. तू माझा मुलगा असल्याने माझ्यासोबत आश्रमातच रहा, अशी त्यांनी शुकदेवाला विनंती केली. पण तिकडे शुकदेवाने दुर्लक्ष केलं.
व्यासमुनी त्याच्या पाठीमागे जात राहिले आणि त्याला आश्रमात येण्याची विनंती करत राहिले. शेवटी शुकदेव म्हणाला, मला योग्य गुरु मिळाला की मी तुमच्या आश्रमात येईन. असं बोलून शुकदेव गुरुच्या शोधात पुढे निघून गेला.
या शोधयात्रेत तो राजा जनकाच्या दरबारात पोहचला. राजा जनकाचे ऐश्वर्य बघून शुकदेवाचे भान हरपले. हे खरे ऐश्वर्य, हे खरे वैभव, असं त्याचं मन म्हणालं. राजा जनकाकडे अनेक सिध्दी होत्या. त्यामुळे त्यांनी शुकदेवाच्या मनात काय चाललय? हे ओळखलं. त्यांनी शुकदेवाची परीक्षा बघण्यासाठी आपल्या महालास आग लावली. ते बघून शुकदेव घाबरला. महादेवाचं अमर होण्याचं रहस्य ऐकल्याने खरंतर तो अमर झाला होता. पण राजा जनकाच्या राजवाडयाच्या आगीत आपण जळून खाक होऊन जाऊ या भीतिने शुकदेव थरथर कापू लागला. त्याचे लक्ष राजा जनकाकडे गेले. राजवाडा जळत असताना जनक राजा शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. याचं शुकदेवास फार आश्चर्य वाटलं. तेव्हा शुकदेवाच्या मनातील घालमेल बघून राजा जनकाने राजवाडयास लावलेली आग स्वत:जवळील सिध्दीने विझवली. पुन्हा राजवाडा जशाचा तसा केला. राजा जनकाजवळील ही सिध्दी बघून शुकदेवाने त्यांना दंडवत घातला आणि त्यांनाच गुरु केले.
शुकदेव नंतर नैमिष्यारण्यात गेला आणि तिथे असलेल्या काही ऋषिंनी त्यांना अमर होण्याचं रहस्य सांगण्याची विनंती केली. शुकदेवाने ते रहस्य सांगण्यास सुरुवात केली. ते बघून देवलोकात घबराट उडाली. हे रहस्य ऐकून पृथ्वीवरील सर्व जीवजंतू-मनुष्यप्राणी अमर झाले असते आणि पृथ्वीचा समतोल बिघडून त्यात तिचा अंतही झाला असता. हा धोका लक्षात आल्याने सर्व देवांनी महादेवांकडे धाव घेतली.
महादेवांच्या लक्षात सर्व परिस्थिती आली. तत्काळ नैमिष्यारण्यात येऊन महादेवांनी शुकदेवास शाप दिला की, तू जेव्हा जेव्हा अमर होण्याचं रहस्य एखाद्याला सांगशील तेव्हा त्याचा कोणताही परिणाम होणार नाही आणि कुणीही अमर होणार नाही.
०००
“अरे वा ! किती घटना एकापाठोपाठ घडत गेल्या. सगळयाच्या सगळया कशा चित्तथरारक, श्वास रोखून धरणाऱ्या!” तेजोमयी डोळे उघडत बाबांना म्हणाली.
“आहे ना, ॲव्हेंजर्सपेक्षाही दसपट थरारक गोष्ट ही?”बाबांनी विचारलं.
“हो हो हो. बाबा पण ही गोष्ट सांगणाऱ्यास हे इतकं कसं बरं कळलं असेल हो?”
“अगं बाळे, गोष्ट सांगणारा तो प्रत्यक्ष तुझा लाडका बाप्पा होताना.”
“अरे हां हां हां, विसरलेच की? बाप्पांनी मला सूक्ष्मरुपात फुलपाखरु करुन या गोष्टीतल्या प्रत्येक ठिकाणी नेलं.”
“म्हणजे, ही अमर होण्याची गोष्ट प्रत्यक्ष तुझ्याच समोर घडली म्हणायची.” बाबा हसत म्हणाले.
“अगदी बरोबर. बाप्पा म्हणजे काय, टाइम मशिनच. ते भुतकाळातही घेऊन जाऊ शकतात नि भविष्यकाळतही घेऊन जाऊ शकतात. नाही का हो बाबा?”
“हो हो हो, म्हणूनच त्यांचं एकाग्रचित्तानं स्मरण करुन त्यांना बोलावयचं नि सांगायचं, उघडा बरं तुमच्याकडील कथांचा खजिना. मग बाप्पा, थेट गोष्ट जशी घडली आणि जिथे घडली तिथे घेऊन जाणार!”
“वा S व ! पण बाबा, महादेवांची ही गोष्ट तर तुम्हीच मला सांगत होतात ना.”
“ते बाप्पा नि मी बाबा. दोघांमध्येही बा आहे ना. त्या बा कडून या बा कडे अशा कितीतरी गोष्टी येणारच ना. तू त्या बाप्पांच त्यांचं स्मरण करायचं नि या बाबाला सांगायचं. गोष्ट तुझ्यासमोर हजर!
“टा S व!” असं म्हणत तेजोमयीने बाबांना टाळी दिली. त्याचवेळी तिच्या नजरेसमोर तरळलेल्या बाप्पांना बाय केलं.
सुरेश वांदिले
७वा माळा,देवराई सहकारी गृहनिर्माण संस्था,चारकोप, सेक्टर सहा,कांदिवली पश्चिम,मुंबई ६७
९३२४९७३९४७