(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा ४३-एमबीएच्या वेगळ्या वाटा (भाग एक)

भारत सरकारच्या काही महत्वाच्या शैक्षणिक संस्थांनी स्पेशलाइज्ड एमबीए अभ्यासक्रम सुरु केले आहेत. उत्तम करिअर घडविण्यासाठी हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतात. पारंपरिक एमबीए अभ्यासक्रमांसोबत या वेगळ्या पर्यांयांचा विचार मराठी मुलांना करायला हवा. या स्पशेलाईज्ड एमबीएच्या माध्यमातून करिअरच्या नव्या शिखरावर पोहचण्याची संधीही मिळू शकते. यातील बरेच अभ्यासक्रम हे कोणत्याही शाखेच्या पदवीधरास करता येतात. असे काही अभ्यासक्रम आणि संस्था पुढीलप्रमाणे आहेत-

    (१) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ प्लँटनेशन मॅनेजमेंट– भारत सरकारच्या वाणिज्य आणि व्यापार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या या संस्थेस ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (उत्कृष्टता केंद्र) चा दर्जा मिळालाय. ही संस्था व्यवस्थापन शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि सल्लागार क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. विविध प्रकारच्या पिकांची (चहा, कॉफी, रबर, मसाले, नारळ, कापूस, ऊस, वनीकरण, मळे शेती, फलोत्पादन, चारा लागवड, औषधी वनस्पती, सुका मेवा आणि मधमाशी पालन इत्यादी.)  लागवड, प्रक्रिया आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विपणनापर्यंतच्या संपूर्ण मूल्यसाखळीच्या व्यवस्थापनात या संस्थेने महत्वाचे योगदान दिले आहे.

अभ्यासक्रम   

(१) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲग्री बिझिनेस ॲण्ड प्लँटेशन मॅनेजमेंट– कृषी आणि प्लँटेशन (लागवड किंवा मळे) क्षेत्रातील जागतिक दर्जाचे व्यवस्थापक निर्माण करण्याच्या हेतूने या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आलीय. या उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमाचे विषयघटक निर्धारित करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमाचे मूल्यवर्धन करण्यासाठी विविध संशोधन संस्थांचे सहकार्य घेण्यात येते. या संस्थेत अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि संशोधन सुविधा उपलब्‍ध आहेत.

    अर्हता– (उमेदवाराकडे  मान्यताप्राप्त संस्थेची कृषी किंवा संबंधित विषयांतील (ॲग्रीकल्चर ॲण्ड अलाइड सेक्टर) ४ वर्षांची पदवी असणे आवश्यक. () पदवी परीक्षेत खुला संवर्गासाठी किमान टक्के गुण (किंवा समकक्ष सीजीपीए) आणि अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती संवर्ग/दिव्यांग संवर्ग उमेदवारांसाठी किमान ५५ टक्के गुण आवश्यक.

अलाइड सेक्टरमध्ये पुढील विषयांचा समावेश होतो- ॲग्री-बिझनेस मॅनेजमेंट, कृषी विपणन आणि सहकार, कृषी अभियांत्रिकी, कृषी माहिती तंत्रज्ञान, व्यावसायिक शेती, दुग्ध तंत्रज्ञान, मत्स्यव्यवसाय, वनीकरण, फलोत्पादन, रेशीम उद्योग, पशुवैद्यकीय शास्त्र, कृषी जैवतंत्रज्ञान आणि इतर संबंधित क्षेत्रे.

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॉमन ॲडमिशन टेस्ट (कॅट), कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट (सीमॅट), मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट (मॅट) यापैकी कोणत्याही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेचे गुण प्राथमिक चाळणीसाठी ग्राह्य धरले जातात. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षा दिल्या नसतील, त्यांना या संस्थेमार्फत घेतली जाणारी चाळणी परीक्षा द्यावी लागेल. अंतिम निवडीसाठी  १० वी, १२ वी आणि पदवीचे गुण,  शैक्षणिक विविधता, प्रवेश परीक्षेतील गुण, लेखन कौशल्य चाचणी, गट चर्चा, वैयक्तिक मुलाखत या सर्व घटकांचा एकत्रित विचार केला जातो.

प्लेसमेंटसाठी येणाऱ्या कंपन्या

    (१) कृषी आणि संबंधित क्षेत्रआयटीसी , कोरोमंडल इंटरनॅशनल, गोदरेज ॲग्रोव्हेट, सिंजेंटा, युपीएल, अदानी विल्मार, टाटा कॉफी, जेके पेपर, (२) बँकिंग आणि वित्तएचडीएफसी बँक, आयसीआयसीआई बँक, ॲक्सिस बँक, नाबार्ड, समुन्नती, (३) रिटेल आणि ई-कॉमर्सरिलायन्स रिटेल, बिग बास्केट, झोमॅटो, निन्जाकार्ट, मेट्रो कॅश अँड कॅरी, (४) कृषी तंत्रज्ञान आणि सल्लागारदेहात, वेग्रो, क्रॉप-इन, बायोकॉन.

    (२) ॲग्रीकल्चर एक्स्पोर्ट ॲण्ड बिझिनेस मॅनेजमेंट- भारतीय कृषी निर्यात क्षेत्रात कुशल व्यवस्थापक आणि उद्योजक निर्माण करण्याच्या अनुषंगाने या अभ्यासक्रमाची संरचना तयार करण्यात आली आहे. भारताची कृषी उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेले परदेशी बाजारपेठेचे ज्ञान, निर्यात प्रक्रिया आणि व्यवसाय व्यवस्थापन या विषयघटकांचे  ज्ञान प्रदान केले जाते.

    अर्हता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी मात्र कृषी आणि संबंधित विषयातील (ॲग्रीकल्चर आणि अलाइड सायंसेस) पदवीधरांना विशेष प्राधान्य दिले जाते. किमान ३ वर्षांचा कामाचा अनुभव असल्यास उत्तम. अनुभव नसलेले पदवीधरही अर्ज करू शकतात. ५ वर्षांचा अनुभव असलेल्या पदविका धारकांचाही प्रवेशासाठी विचार केला जातो.

    निवड प्रक्रिया निवड करताना खालील बाबींना महत्त्व (वेटेज) दिले जाते१० वी आणि १२ वीचे गुणप्रत्येकी ५ टक्के वेटेज, पदवीचे गुण२० टक्के वेटेज, शैक्षणिक विविधता ५ टक्के वेटेज. प्राथमिक निवडीसाठी कॅट, मॅट, सीमॅट अशा परीक्षा किंवा संस्थेच्या स्वत:च्या परीक्षेला २० टक्के वेटेज दिले जाते. लेखन चाचणी, गटचर्चा आणि मुलाखतीस उर्वरित वेटेज दिले जाते.

 अभ्यासक्रमाची रचना –   हा २ वर्षांचा पूर्णवेळ निवासी निवासी अभ्यासक्रम आहे. दुसऱ्या वर्षानंतर १२ आठवड्यांची कॉर्पोरेट ट्रेनिंग/समर इंटर्नशिप अनिवार्य आहे. या अभ्यासक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार कायदे, जागतिक गुणवत्ता आणि सुरक्षा व्यवस्थापन, परकीय चलन व्यवस्थापन, लॉजिस्टिक, सप्लाय चेन आणि डिजिटल मार्केटिंग यांसारख्या विषयांचा भर दिला जातो.

    या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने  अमेरिकेतील विस्कॉनसीन- मेडिसॉन, इंग्लंडमधील नॉटिंगहम ट्रेन्ट युनिव्हर्सिटी, मलेशिया इत्यादी देशांतील नामांकित विद्यापीठांशी शैक्षणिक करार करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना विदेशी व्यापार संस्थांना भेटी देण्याची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येते.

संपर्क- ज्ञानभारती कॅम्पस, पी.ओ. मलताहल्ली, बेंगळुरू – ५६० ०५६, कर्नाटक, दूरध्वनी- ०८०-२३२१२७७० / २३२११७१६, ईमेल: iipm@iipmb.edu.in / abpmplacement@iipmb.edu.in,संकेतस्थळ: www.iipmb.edu.in

(२) नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी (एनएफएसयू)– ही संस्था भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत असलेली ‘राष्ट्रीय महत्त्वाची संस्था’ (इंस्टिट्यूशन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स) आहे. या विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’द्वारे चालवले जाणारे एमबीए अभ्यासक्रम हे सामान्य एमबीएपेक्षा वेगळे आणि विशेष तांत्रिक क्षेत्रांवर आधारित आहेत.

१) एमबीए फॉरेन्सिक अकाउंटिंग आणि फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन आर्थिक गुन्हे, भ्रष्टाचार आणि बँक फसवणुकीचा तपास करणाऱ्या तज्ज्ञांसाठी या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. २) एमबीए सायबर सिक्युरिटी मॅनेजमेंट सायबर हल्ल्यांपासून संरक्षण आणि डिजिटल सुरक्षा व्यवस्थापन या विषयघटकावर यात लक्ष केंद्रित केले जाते, ३) एमबीए बिझनेस ॲनॅलिटिक्स आणि इंटेलिजन्स उपलब्ध डाटा वापरुन व्यवसायातील निर्णय घेण्याचे तंत्र यात शिकवले जाते.

अर्हता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही ज्ञानशाखेतील पदवी. खुला संवर्ग  किमान ५५ टक्के. अनुसूचित जाती /जमाती /दिव्यांग उमेदवार- ५० टक्के गुण). वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी  किंवा व्यवस्थापन पदवीधरांना त्यांच्या विषयानुसार संबंधित अभ्यासकमामध्ये प्राधान्य मिळू शकते.

निवड प्रक्रिया या संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील एनएफएटी (नॅशनल फॉरेंसिक ॲडमिशन टेस्ट) ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

करिअर संधी- हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सीबीआय (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन- केंद्रिय अन्वशेन विभाग), ईडी (एनफोर्समेंट डायरोक्टोरेट- अंमलबजावणी संचालनालय), मोठ्या बँका, सायबर सुरक्षा कंपन्या आणि फॉरेन्सिक ऑडिट कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी मिळतात. विद्यार्थ्यांना आर्थिक गुन्ह्यांचा शोध आणि सायबर सुरक्षा याचे प्रात्यक्षिके  विद्यापीठाच्या अद्ययावत ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ प्रयोगशाळांमध्ये करण्याची सुविधा आहे.

हे अभ्यासक्रम गांधीनगर (गुजरात) – मुख्य कॅम्पस, दिल्ली कॅम्पस, गोवा कॅम्पस, त्रिपुरा कॅम्पस येथे करता येतात.

संपर्क नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी, सेक्टर-९, गांधीनगर – ३८२००७, दूरध्वनी-(०७९) २३९ ७७१०३ / २३९ ७७१०५, ईमेल: info@nfsu.ac.in / admissions_gnr@nfsu.ac.in, संकेतस्थळ: www.nfsu.ac.in

(३) नॅशनल ॲकॅडेमी फॉर डिफेन्स प्रॉडक्शन- ही संस्था भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. ही संस्था ऑर्डनन्स फॅक्ट्रीमध्ये भरती झालेल्या उमेदवारांना संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यवस्थान या घटकांचे प्रशिक्षण देते. अशा प्रशिक्षणाचा या संस्थेकडे चाळीस वर्षांचा अनुभव आहे. या संस्थेने दोन वर्षे कालावधीचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझिनेस मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाचा मुख्य भर हा, संरक्षण साहित्य उद्योगाचे व्यवस्थापन यावर ठेवण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधरास करता येतो. हा अभ्यासक्रम केलेल्या पहिल्या तुकडीस १०० टक्के प्लेसमेंट मिळाले.

संपर्क- नॅशनल ॲकॅडेमी फॉर डिफेन्स प्रॉडक्शन, अंबाझरी, नागपूर – ४४००२१, महाराष्ट्र. संकेतस्थळ- nadp.ac.in/pgdm

 

०००