दूध , ब्रँडी आणि नोबेल पुरस्कार
दारासिंगा,असा दु:खीकष्टी होऊन का बसलास रे,किंगकाँग यांनी विचारलं.
इंद्रपुरीत दररोजसुप्रभात वॉक करताना दोघेही एकमेकांची साथ करीत.कायम प्रफुल्लित असणारे दारासिंग असे कोमेजल्या सारखे कां झाले असावेत,असा प्रश्न किंगकाँग यांना पडला.दारासिंग यांनी किंगकाँग यांच्याकडे बघितले आणि ते धाय मोकलून रडू लागले.
रुस्तम–ए– हिंद असे रडणे बरे नव्हे हो.तुज काय झाले ते मज कळू तरी दे.
हुंदके देतदारासिंग उत्तरले,माझ्या परममित्रा,तू निरक्षर राहिलास ते बरेच झाले.मी शिकलो म्हणून मला वाचता येतं आणि त्या वाचनाने आज सक्काळी सक्काळी मज वेदना दिल्या.त्याचे हे रडणे.
झाले तरी काय,मज सांग बघू,मी निरक्षर असलो तरी निरक्षिर विवेकासाठी साक्षर असणं गरजेचं नाही असं शेक्सपिअरने म्हंटले आहे.
कालीदासानेही असच काहीसे सांगून ठेवले आहे.
मग आता अश्रू ढाळायचे थांबव नि तू सक्काळी सक्काळी काय वाचले ते सांग.
ते वाचून मज मोठाच धक्का बसला रे.
प्रस्तावना पुरे झाली दारासिंगा,माझा सयंम तुटला तर इथेच फ्रीस्टाइल करीन तुझ्यासोबत.
नको नको,आता त्याची इच्छाच उरली नाही.शेकडो फ्रीस्टाइल केल्या.मुमताज सोबत लव्हशव्ह करणारे पिक्चर केले.बजरंगबली केले.नटश्रेष्ठ अमिताभ बच्चन यांच्या पिताश्रींची भूमिका केली.आता कोणतीच इच्छा उरली नाही.
मग तुला रडायला काय झाले.बॉडी–पहेलवान असे रडू लागले तर काडी–पहेलवानांचे फावणार नाही का फ्रीस्टाइलमध्ये.
ते परवडले.पण हे नाही.
पण हे काय?किंगकाँग संयमाने म्हणाले.
किंगकाँगा,मी पाच लाख लिटर्सपेक्षा दूध प्यालो असेल ना आतापावेतो.
इसमे कोणसी बडीबात है,हिंदुस्थान,पाकिस्तान और बांगलादेश के पहिलवान सालोसे यही करते आये है.कुणाच्या तरी गैरसमजुतीला तुम्ही पहेलवान बळी पडलात.
तसे नाही रे.दूध प्याल्यानेच बॉडीशॉडी तयार होते.
असे भीमाने म्हंटल्याचे तुझ्या कानावर आले का?व्यासमुनिंनी महाभारतात साऱ्याच गोष्टी लिहून ठेवल्या.हे लिहिलं का?मी तर वाचू शकत नाही.पण एकदा ब्रुस–लीने मला महाभारत,हा जय नावाचा इतिहास असे दोन पुस्तक वाचून दाखवले होते.त्यामुळे मला माहीत आहे.हनुमानाने तरी म्हंटले का,बॉडीशॉडीसाठी दूध मस्ट, म्हणून.मोहम्मद अली एकदा माझ्या वाढदिवसाला रामायण घेऊन आला होता.त्याने ते वाचून दाखवले,त्यातही असे काही लिहिलेले नाही.म्हणजे दूध प्याल्याने बॉडीशॉडी होते ही अफवा आहे,हे सिध्द होते.हिंदुस्थान हा अफवांचा देश असे म्हंटल्यास तुला राग येऊ नकोस दारा.
दूध प्याल्याने बॉडीशॉडी तयार होते असे कुठे म्हणतो मी. माझा मुद्या तो नाही रे मित्रा.
मग,
मी पाच लाख लिटर्स दूध पिऊनही मला नोबल पुरस्कार मिळाला नाही ना.
कोणत्या कुस्ती प्रकारातला हा पुरस्कार आहे,दारा.मी तर कधी ऐकलच नव्हतं.मी सुध्दा पार्टिसिपेट केलं असतं..
हा कुस्तिचा नाही पुस्तकांचा पुरस्कार आहे.जगातल्या उत्कृष्ट पुस्तकांसाठी दिला जातो.
दारासिंगा,त्याच्याशी तुझा काय संबंध.पहेलवानाची बुध्दी घुटन्यात.मेंदूत थोडीच असते..
तुझं म्हणणे उत्तमच आहे,पण मी प्यालेले पाच लाख लिटर्स दूध वाया नाही का गेले.
ते कसे..
आज सक्काळी सक्काळी मी नवं संशोधन वाचलं,ज्या व्यक्ती खूप दूध पितात त्यांना नोबेल पुरस्कार मिळतात.असं हे संशोधन सांगतं..
असे होय.
नाही तर काय,म्हणून मला रडू येत आहे..
दारासिंगा,असा तू रडू नकोस.तू ते संशोधन पूर्ण वाचले का.
होय तर..
मग त्यात कोणते दूध पिल्याने नोबेल पुरस्कार मिळतो असे म्हंटले आहे.किंगकाँग यांनी विचारले.दारासिंग यांनी इंद्रपुरी ट्रिब्युन खिशातून बाहेर काढला.झरदिशी बातमी वाचून काढली.किंगकाँग यांचे म्हणणे खरेच होते. दूध कुणाचे हे काही नमूदच नव्हते.
तू म्हणालास ते खरेच आहे.गायीचे,म्हशीचे,शेळीचे,मेंढीचे,कुत्र्याचे,सापाचे की गाढवाचे.दूध कुणाचे हे काहीच लिहिलेच नाहीत.
असं असतं या गोऱ्या–फोऱ्यांच संशोधन.चकवा देतात. एवढी थंडी असते तिकडे.थंडित काय पितात,
ब्रँडी.
किंवा मग तिची बहिन शॅम्पेन,तिची काकू व्हिस्की,तिची मावशी व्होडका,तिची मामी वाइन.हो की नाही.
खरेच की.
यात दूध आले कुठून.
इंद्रपुरीकडे प्रस्थान करेस्तोव विन्स्टन चर्चिल काय प्राशन करीत होते..
ब्रँडी,शॅम्पेन,व्हिस्की,व्होडका,वाईन.
करेक्ट..त्यांना काय मिळालं.
नोबेल पुरस्कार..
खरं की रे मित्रा..जे दूध पितात त्यांना रुस्तम ए हिंद पुरस्कार मिळतो नि नि जे ब्रँडी,शॅम्पेन,व्हिस्की,व्होडका,वाईन पितात त्यांना नोबल पुरस्कार मिळतात,असं हे गणित आहे तर..
तू सक्काळी सक्काळी वाचलेल्या संशोधनाचा बिटवीन द लाइन अर्थ असाच आहे,दोस्ता..किंगकाँग म्हणाले.आपला हा निरक्षर मित्र किती हुषार आहे याचा सार्थ अभिमान वाटून दारासिंग यांनी त्यांना साष्टांग दंडवत घातला.