मार्ग यशाचा ४४-एमबीएच्या वेगळ्या वाटा (भाग दोन)
(१) नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट– ही संस्था भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयांतर्गत कार्यरत आहे. या संस्थेने, ‘एमबीए इन पॉवर मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. ऊर्जा क्षेत्रातील स्मार्ट नेतृत्व घडवण्यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. बदलत्या ऊर्जा क्षेत्राचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले अद्ययावत ज्ञान आणि कौशल्ये या अभ्यासक्रमाव्दारे प्रदान केली जातात.
फरिदाबाद येथे, या संस्थेच्या ‘सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड मॅनेजमेंट अँड पॉवर स्टडीज‘ केंद्रात हा अभ्यासक्रम शिकवला जातो. हा अभ्यासक्रम जे. सी. बोस विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न आहे. व्यवस्थापन सिद्धांतांसोबतच ऊर्जा क्षेत्रातील तांत्रिक आव्हानांवर या अभ्यासक्रमात लक्ष केंद्रित केले जाते.
अर्हता- (१) शैक्षणिक पात्रता- उमेदवाराला १० वी, १२ वी (किंवा पदविका) आणि इंजिनिअरिंगमध्ये या सर्व स्तरांवर किमान ६० टक्के गुण (किंवा समकक्ष सीजीपीए) असायला हवा. (२) या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी कॅट / जनरल मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट (जीमॅट) / कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट-पीजी / झेव्हिअर ॲप्टिट्यूड टेस्ट (झॅट) / सीमॅट / मॅट यांचे गुण ग्राह्य धरले जातात. ही परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिली नसेल, त्यांना या संस्थेची नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट (नॅट) ही परीक्षा द्यावी लागेल.
या अभ्यासक्रमात ७० टक्के व्यवस्थापन विषयघटक आणि ३० टक्के विषयघटक ऊर्जा क्षेत्राशी संबंधित असतात. मानव संसाधन, ऑपरेशन्स, फायनान्स, मार्केटिंग आणि आयटी, शाश्वत ऊर्जा डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी आणि क्लाउड हे विषय शिकवले जातात.
अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य
(१) या संस्थेचे विद्यार्थी जगभरात वेगवेगळया कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या संपर्कसाखळीचा लाभ हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळतो. या विद्यार्थ्यांना करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होतात, (२) विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि प्रत्यक्ष सुरु असलेले प्रकल्प (लाइव्ह प्रोजेक्ट्स) अशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात.
संपर्क– नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, कॉर्पोरेट ऑफिस, सेक्टर-३३, फरिदाबाद – १२१ ००३,
हरयाणा, ईमेल: nptifaridabad@npti.gov.in,संकेतस्थळ: www.npti.gov.in
(२) इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी– या संस्थेच्या ‘स्कूल ऑफ मॅरिटाइम मॅनेजमेंट’ मार्फत वेगवेगळे स्पेशलाइज्ड एमबीए अभ्यासक्रम चालवले जातात. हे अभ्यासक्रम जागतिक व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
१) एमबीए – पोर्ट आणि शिपिंग मॅनेजमेंट– हा अभ्यासक्रम प्रामुख्याने जहाजांचे व्यवस्थापन आणि बंदरांचे कार्यक्षम संचालन, चार्टरिंग (जहाजाचा व्यावसायिक वापर करून व्यवसाय आणि नफा मिळवून देणारा तज्ज्ञ. जगभरातील ९० टक्के व्यापार समुद्रमार्गे होत असल्याने या कार्यात कौशल्य मिळवलेल्या मनुष्यबळास आंतरराष्ट्रीय जहाज कंपन्यांमध्ये मागणी असते.), मेरीटाइम कायदे, सागरी विमा (मरिन इंश्युरन्स) आणि फ्लीट मॅनेजमेंट (कंपनीकडे असणाऱ्या अनेक जहाजांना कार्यक्षमतेने, सुरक्षितपणे आणि फायदेशीररीत्या चालवण्यासाठी राबवण्यात येणारी यंत्रणा) या विषयघटकांवर लक्ष केंद्रित केले जाते. अभ्यासक्रमाचा कालावधी- २ वर्षे.
२) एमबीए – इंटरनॅशनल ट्रान्सपोर्टेशन आणि लॉजिस्टिक मॅनेजमेंट– हा अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी मालाची वाहतूक आणि पुरवठा साखळी या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतो. जागतिक स्तरावर विविध माध्यमांतून (रस्ते, रेल्वे, हवा आणि जल) होणाऱ्या मालवाहतुकीचे नियोजन आणि व्यवस्थापनाचे कौशल्य शिकवले जाते. सप्लाय चेन मॅनेजमेंट (पुरवठा साखळी व्यवस्थापन), वेअरहाउसिंग (गोदाम व्यवस्थापन किंवा माल साठवणूक), मल्टी-मोडल ट्रान्सपोर्टेशन (बहु-पर्यायी वाहतूक व्यवस्था – उदा. रस्ते, रेल्वे आणि समुद्रमार्गाचा एकत्रित वापर), एक्सपोर्ट-इंपोर्ट डॉक्युमेंटेशन (आयात-निर्यात कागदपत्रे हाताळणी), ई-कॉमर्स लॉजिस्टिक्स (ऑनलाइन व्यापार मालवाहतूक आणि वितरण व्यवस्था) या विषयांचेही ज्ञान प्रदान केले जाते.
३) एमबीए – पोर्ट आणि शिपिंग लॉजिस्टिक्स – हा संयुक्त पदवी अभ्यासक्रम (जाईंट डिग्री) गती शक्ती विद्यापीठ आणि आयएमयू यांच्या संयुक्त विद्यमाने चालवला जातो. बंदरांवरील मालाची ने-आण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बंदरांचा विकास, यावर या अभ्यासक्रमात लक्ष केंद्रित केले जाते. रेल्वे आणि सागरी वाहतूक या दोन्ही क्षेत्रांचा मेळ घालून लॉजिस्टिक क्षेत्रातील आव्हाने सोडवण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
अर्हता- (१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी- खुला संवर्ग- किमान ५० टक्के गुण, अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती संवर्ग ४५ टक्के गुण).
निवड प्रक्रिया– इच्छूक उमेदवारांना ‘आयएमयू’ची सामायिक प्रवेश परीक्षा (आयएमयू-सीइटी) द्यावी लागेल.
करिअर संधी- (१) जगभरातील शिपिंग कंपन्या, खाजगी बंदरे (उदा. मुंद्रा, जेएनपीटी), लॉजिस्टिक कंपन्या, मालवाहतूक करणारी जहाजे आणि आंतरराष्ट्रीय निर्यात संस्था, (२) प्रमुख रिक्रूटर्स (नियोक्ते) – अदानी पोर्ट्स, डी पी वर्ल्ड, मैरस्क (Maersk), आयटीसी, रिलायन्स लॉजिस्टिक्स इत्यादी.
आयएमयू-सीइटी परीक्षा पद्धती– ही संगणकाधारित (कॉम्प्युटर बेस्ड) परीक्षा आहे. एकूण १२० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. कालावधी दोन तास. प्रत्येक अचूक उत्तरासाठी १ गुण. चुकीच्या उत्तरासाठी गुण कापले जात नाहीत. यापेपरमध्ये पुढील घटकांवर प्रश्न विचारले जातात- (१) क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी (संख्यात्मक कौशल्य)– २५ प्रश्न, (२) डाटा इंटरप्रिटेशन (तक्ते, आलेख आणि माहितीचे विश्लेषण)- २५ प्रश्न, (३) व्हर्बल ॲबिलिटी (इंग्रजी व्याकरण, शब्दसंग्रह आणि उताऱ्यावरील प्रश्न) –२५ प्रश्न, (४) लॉजिकल रिझनिंग (तर्कशास्त्र आणि बुद्धिमत्ता चाचणी)– २५ प्रश्न, (४) जनरल नॉलेज (चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान)– २० प्रश्न
कॅम्पस- (१) आयएमयू चेन्नई कॅम्पस- एमबीए पोर्ट अँड शिपिंग मॅनेजमेंट आणि एमबीए इंटरनॅशनल ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक मॅनेजमेंट, ईमेल- director.chennai@imu.ac.in, संकेतस्थळ imu.edu.in/chennaicampus, (२) आयएमयू कोची कॅम्पस- एमबीए पोर्ट अँड शिपिंग मॅनेजमेंट आणि एमबीए इंटरनॅशनल ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक मॅनेजमेंट, ईमेल- director.kochi@imu.ac.in, संकेतस्थळ- imu.edu.in/kochicampus ,(३) आयएमयू कोलकाता कॅम्पस- एमबीए इंटरनॅशनल ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक मॅनेजमेंट- ईमेल- director.kolkata@imu.ac.in, संकेतस्थळ-imu.edu.in/kolkatacampus, (४) आयएमयू मुंबई पोर्ट कॅम्पस- एमबीए पोर्ट अँड शिपिंग मॅनेजमेंट, ईमेल- director.mumbaiport@imu.ac.in, संकेतस्थळ- imu.edu.in/mumbaiport, (५)आयएमयू विशाखापट्टणम कॅम्पस- एमबीए पोर्ट अँड शिपिंग मॅनेजमेंट आणि एमबीए इंटरनॅशनल ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक मॅनेजमेंट, ईमेल- director.vizag@imu.ac.in, संकेतस्थळ- imu.edu.in/vizagcampus
संपर्क– (१) आयएमयू, ईस्ट कोस्ट रोड, सेम्मनचेरी,चेन्नई – ६०० ११९, (२) मुंबई पोर्ट कॅम्पस हाय वे रोड, शिवडी, मुंबई – ४०००३३, (३) नवी मुंबई कॅम्पस (टीएस चाणक्य)- करवे रोड, नेरुळ, नवी मुंबई – ४०० ७०६. ईमेल: academicscell@imu.ac.in, संकेतस्थळ: www.imu.edu.in
(३) गतीशक्ती विद्यापीठ
परिवहन आणि मालवाहतूक या क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनास प्राधान्य देणारे ‘गतीशक्ती विद्यापीठ’ हे भारतातील एकमेव विद्यापीठ. हे विद्यापीठ भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या विद्यापीठाला केंद्रिय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. परिवहन आणि मालवाहतूक उद्योगाचा गरजा लक्षात घेऊन या विद्यापीठातील अभ्यासक्रमांची संरचना करण्यात आली आहे. या विद्यापीठाने अशा सर्व मोठ्या उद्योगांसोबत सक्षम संपर्कसाखळी निर्माण केली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि आंतरज्ञानशाखीय अभ्यासक्रम यांचा मेळ या अभ्यासक्रमात घालण्यात येतो. जागतिक पातळीवर नामांकित तज्ज्ञ आणि अध्यापक हा अभ्यासक्रम शिकवतात. सध्याच्या काळात आवश्यक असणारे क्रिटिकल थिंकिंग (समीक्षात्मक विचारक्षमता), संवाद कौशल्य, नाविन्यता (इनोव्हेशन) हे कौशल्य विद्यार्थ्यांना प्रभावीपणे प्रदान केले जातात. प्रकल्प आधारित अभ्यासक्रमावर भर देण्यात येतो. रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि इतर क्षेत्रनिहाय असलेल्या मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशीप करण्याची सोय उपलब्ध करुन दिली जाते. अत्याधुनिक रेल्वे प्रयोगशाळांमध्ये काम करण्याची संधी मिळते. पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशा वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. हे अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्लेसमेंट संधी मिळाव्यात यासाठी संस्थेमार्फत साहाय्य केले जाते.
अभ्यासक्रम
(१) एमबीए इन लॉजिस्टिक्स ॲण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट, (२) एमबीए इन मेट्रो रेल मॅनेजमेंट, (३) एमबीए इन एव्हिएशन ॲण्ड ऑपेरेशन मॅनेजमेंट, (४) एमबीए इन इन्फास्ट्रक्चर ॲसेट मॅनेजमेंट, (५) एमबीए इन डिजिटल मेरिटाइम, (६) एमबीए इन मल्टीमोडल ट्रान्सपोर्टेशन,
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, ‘गतीशक्ती विश्वविद्यालय एंट्रंस टेस्ट,’ घेतली जाते.
संपर्क- लालबाग वडोदरा- ३९०००४, ईमेल-admissions@gsv.ac.in, संकेतस्थळ- gsv.ac.in
०००