इश्क सुफियाना..
मोनिका लेविंस्की या पुन्हा एकदा प्रकाशाच्या झोतात आल्या आहेत.खरं तर सूर्य–चंद्र असेपर्यंत त्या कायम प्रसिध्दीच्या झोतात झोकातच राहतील. कारण सूर्य–चंद्र असेस्तोव अमेरिका राहील.जोपर्यंत अमेरिका आहे, तोपर्यंत या देशाच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक होत राहील.ही निवडणूक आली की बिल क्लिंटन यांची आठवण यायलाच पाहिजे.कै.राजेशखन्ना यांचं स्मरण हे श्रीमती/सौ/मिस(सोई आणि ज्याच्या त्याच्या अमूल्य ज्ञानानुसार )अंजू महेंद्रू यांच्या पाडावाशिवाय जसं पूर्णत्वास जाऊ शकत नाही,तसच बिल यांची गाडी मोनिका नामक स्टेशनाला ओलांडून जाऊच शकत नाही.मुद्या असा की ज्यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आली की बिल आणि मोनिका यांची आठवण येणार नाही तो परग्रहावरचा किंवा उत्तर आफ्रिकेतील ऍ़निमल किंगडममधील बगळा असला पाहिजे,असे खुशाल समजावे.
तर पुन्हा एकदा अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक वाजू लागताच सूर्य आणि चंद्राला जसे विभक्त करता येत नाही तसच बिल आणि मोनिका यांना विभक्त करता येत नसल्याचं प्रत्यंतर आलं..श्रीयुत ओबामांच्या वार्मअप प्रचार सभेत बिल यांचं भाषण झालं नि कुठे तरी दूर–देशी प्रवासावर असलेल्या हिलरी वहिनींनी त्यावर टाळया वाजवल्या.यामुळे बिल यांच्यावरील प्रकाशझोताला चारचाँद नि पाचपन्नास सूर्य लागले.या प्रकाशानं मोनिका दीपून गेल्या.आपणच कां बरे 40 व्होल्टच्या दिव्यात राहावे,आपणही 1000व्होल्टच्या निऑन लाईट्समध्ये राहायलाच पाहिजे, असं त्यांना वाटले नि त्यांनी वन्स अपॉन ए टाईम होऊन गेलेल्या बिल–मोनिका एपिसोडवर पुस्तक लिहायचं घोषित केलं.
मोनिका लेविन्स्की या बिल यांच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांच्या पीए होत्या.त्यामुळे व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा बल्ले बल्ले वावर होता.बिल हे मिडनाईट वर्क–कल्चरचे प्रतिनिधी असल्याने एके रम्य रात्री,फायली क्लिएर करता करता त्यांना मोनिका यांच्या नयनी कविता फुललेली दिसली.कविता की फाईल,असे अद्वैत त्यांच्या मनी निर्माण झाले.पण काव्यांनदापुढे त्यांनी फाईलींवर फुल्या मारल्या.ते मोनिकांच्या नयनी रंगीत–संगीत होऊ घातलेली नाचरी कविता बघू लागले.त्यांच्या लक्षात आलं की मोनिका यांना सुध्दा त्यांचा नयनी काही तरी दिसलय.ते काही तरी होतं गझलेची तार.यथावकाश पुढे कविता गझलेला भूलली किंवा गझल कवितेला फसली,असे काहिसे झाले.दिव्यत्वाच्या पातळीवर पोहचण्याची दाट शक्यता असणारं हे नातं,कोणती तरी माशी शिंकल्यानं ,दुधात लिंबू टाकल्यावर ते जसं फाटतं तसं फाटलं.पुढचा इतिहास सर्वज्ञात आहेत.बिल इमोशनल झाले.मोनिकांच्या नयनी अश्रू ओघळले.बिल म्हणाले चूक झाली.मोनिका म्हणाली ती चूक नव्हतीच,तर तो आविष्कारच होता..प्रेमाच्या इस्टमनरंगी मोरपिसाऱ्याचा..
त्या इस्टमनरंगी मोरपिसाऱ्याच्या आठवणिंचा आविष्कार मोनिकांच्या प्रपोज्ड पुस्तकात होईल. बिल आणि त्यांच्यामधे व्हाईट हाऊसच्या राखीव खोल्यामंध्ये किंवा व्हाईट हाऊसच्या बाहेर असलेल्या आखीव खोल्यामंध्ये जी प्रेमाची अमूर्त रांगोळी रेखाटली गेली,त्याचं विहंगम दर्शन या पुस्तकाद्वारे घडविण्याचा त्यांचा संकल्प आहे.त्या मोरपंखी काळातच त्यांनी जी प्रेम–पत्रे बिल यांना लिहिली,तिही ग्रंथामध्ये देऊन त्याचे व्हल्यू ऍ़डिशन करण्याचा त्यांचा विचार आहे.
..याचा अर्थ आग दोनो तरफसे लगी थी..म्हणजेच की एकटे बिल यांना कबुतर चावले नव्हते तर मोनिका यांना सुध्दा त्याची चोच लागली होती.बिल यांनी प्रेमपत्र लिहिले होते की नाही हे अद्याप सांगितलेले नाही.त्यांच्या आत्मचरित्रातही त्याचे सुतोवाच नाही.मात्र मोनिकांनी प्रेमपत्र लिहिण्यासाठी पीएगिरीचा कार्यालयीन वेळ चोरला,असं त्यांच्या कथनावरुन स्पष्ट होतय. ही प्रेमपत्र त्यांनी गुलाबी शाईने,हिरव्या कागदावर,जांभळी रांगोळी काढून नि आकाशी शब्दांमध्ये लिहिली होती किंवा कसे, हे ही पत्र प्रकाशित झाली की कळेलच.
तर सांगावायचे एवढेच की,बिल यांना लिहिलेल्या पण पोस्टात टाकण्यास विसलेल्या प्रेमपत्रांना प्रकाशित करण्याचं मोनिकांनी जाहीर करताच जगभरातून व्टीटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला..काय होत्या या प्रतिक्रिया..बघा जरा..
1)महेश भट– राज फोर,साठीच्या कथेची चिंता मिटली म्हणायची.
2) कै यश चोप्रा– प्रेमाला न्यू डायमेन्शन देणारी कथा दिसतेय,यात मला.ही फिल्म मीच डायरेक्टर करणार.
3)विद्याबालन–डर्टी पिक्चर नंतर डटी लेटर्स..आणखी एक अवार्ड विनिंग फिल्म..एकता कपूरला सांगायला हवं.
4)रणबीर कपूर–ऐकून मस्त वाटलं.मोनिकाजी तुम्हाला मी बर्फी दाखतो नि बर्फीही चाखवतो..गूड गूड गूड ओएए..
5)स्व.मर्लिन मन्रो(थडग्यातून)-अगं सटवे,अध्यक्षाचे प्रेम–पात्र व्हायला नशिब लागतं.ते तुला लाभलं..आता कशाला प्रेम–पत्रांच्या उकिरड्याचे झाकण उघडतेस..
6)बराक ओबामा–क्या बात है,धिस लव्ह–नॉ–मिक्स वुइर्ल गिव्ह मच निडेन बूस्ट टू अमेरिकन इकानॉमिक्स.
7)अमिताभ बच्चन–बाबूजी होते तो उन्हे शायद मोनिका–शाला लिखने की प्रेरणा मिलती.मधुशाला मे मोनिका आ जाए तो उसका मजा चार गुना तो बढनाही है ना..
8)सलमान खान–बिग बॉस मध्ये मोनिकाला आणलं तर प्रोग्रॅमचे रेटिंग टायगर होऊन जाईल…
9)सचीन तेंडूलकर–मी नक्कीच मोनिकाचे पुस्तक वाचण्यासाठी वेळ काढीन..
10) मल्लिका शेरावत– मी जर अमेरिकेत जन्मले असते तर मोनिकापेक्षाही ग्रेट पीए झाले असते,क्लिटंन यांची..नॉट ओन्ली ग्रेट बट हॉट–र दॅन सूरज का गोला..
11)सलमान रश्दी– प्रेम प्रेम असतं,शेक्सपियअरचं असो की मंगेश पाडगावकारांचं ,सेम असतं.मोनिका आगे बढो..
12)व्लादिमीर पुतीन–आमच्या रशियात अध्यक्षांच्या बंगल्यात पीएची कामे कां बरे पुरुषांनाच दिली जातात..मी नक्कीच लेनिन यांच्याकडे याचा जाब विचारेन कधीतरी.
12)कट्रिना कैफ–मी कुणाला बरं लिहू प्रेम पत्र ,सल्लू की रणबीर..
13)विवेक ओबेरॉय–ब्रेव्हो मोनिका,घाबरु नकोस मी तुझ्या पाठिशी भक्कमपणे राहीन.ऐश्वर्याच्या पाठिशी मी भक्क उभा राहिलो होतो.तो अनुभव आहे माझ्या पाठीशी..
14)चेल्सिया क्लिंटन– वंडरफूल..जनरेशन नेक्स्टसाठी हे लव्ह लेटर्स उत्तम गाईड ठरतील की गडे..
15)हिलरी क्लिटंन–माझ्या प्रेमपत्रांची सर तिच्या पत्रांना कशी बरे येईल..
16)बिल क्लिंटन–मेरा इश्क सुफियाना..मेरा इश्क सुफियाना..