(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

“सर” होऊ या !

भारत सरकारच्या नॅशनल काउंसिल ऑफ एज्युकेशन रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग (एनसीइआरटी)या संस्थेने अजमेर, भोपाळ, म्हैसुरु, शिलाँग, भूवनेश्वर या पाच ठिकाणी क्षेत्रीय शिक्षण संस्था सुरु केल्या आहेत. अध्यापन क्षेत्रातच करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी या संस्थांमध्ये अभ्यासक्रम चालवले जातात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या शिफारशींनुसार, शालेय शिक्षण आणि शिक्षक शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा  विकसित करण्याची जबाबदारी एनसीआरटीकडे सोपवण्यात आली आहे.

क्षेत्रीय शिक्षण संस्थांमध्ये अध्यापन कौशल्य निर्मितीसाठी उपुयक्त असणारे अभ्यासक्रम अनुभवी शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांकडून शिकवले जातात. अध्यापन क्षेत्रातील संशोधन आणि विकासकार्यास या संस्थांमध्ये प्राधान्य दिले जाते. या संस्थांमधील विद्यार्थ्यांना शासकीय व नामवंत खाजगी शिक्षणसंस्थांमध्ये प्राधान्याने नोकरीची संधी मिळते.

या संस्थांमध्ये संबंधित क्षेत्रात येणाऱ्या राज्यातीलच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. मात्र म्हैसूरु  आणि भोपाळ येथील संस्थांमधील काही अभ्यासक्रम यासाठी अपवाद आहेत. या अभ्यासक्रमांना कोणत्याही राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो.

क्षेत्रीय शिक्षण संस्था, भोपाळ

या संस्थेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. या संस्थेतील अभ्यासक्रम बरकतउल्लाह विद्यापीठाशी संलग्नित आहे.

अभ्यासक्रम-

()बी.एस्सी-बी.एड(जीवशास्त्र गट)- या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने पदवी स्तरावर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र किंवा जैवतंत्रज्ञान या विषयांचा अभ्यास केलेला असावा, ()बी.एस्सी-बी.एड(भौतिकशास्त्र गट) या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने पदवी स्तरावर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा सांख्यिकी या विषयांचा अभ्यास केलेला असावा. विद्यार्थ्यांना १२ वी आणि पदवी स्तरावर ५० टक्के गुण मिळायला हवेत. अनुसूचित जाती आणि जमाती आणि दिव्यांग संवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये ५ टक्के सूट दिली जाते.

या अभ्यासक्रमात सैध्दांतिक अभ्यास आणि प्रात्यक्षिके यांचा समन्वय साधला जातो. प्रभावी, सक्षम आणि समर्थ अशा माध्यमिक शिक्षकाची पायाभरणी होण्यासाठी उपयुक्त ठरणारे विषयघटक या अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

या अभ्यासक्रमात आधुनिक अध्यापन पध्दती, या क्षेत्रातील संशोधन, प्रयोग यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांचे संवादकौशल्य विकसित व्हावे यासाठी अभ्यासक्रमाच्या कालावधीत विशेष लक्ष पुरवले जाते.

अशा प्रकारचा हा देशातील पहिला अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमांतर्गतील विषय घटकांमुळे विद्यार्थी – (१) भौतिकशास्त्र, गणित रसायनशास्त्र आणि ()रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र या दोन विषयगटांसाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षक होण्याची पात्रता प्राप्त करतात.

(३)चार वर्षे कालावधीचा बी.ए-बी.एड – या अभ्यासक्रमामध्ये समाजशास्त्र आणि मानव्यशास्त्रे या विषयाचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांतर्गत हिंदी, इंग्रजी, उर्दू, मराठी, गुजराती यापैकी कोणतीही एक भाषा आणि इतिहास/ भूगोल आणि अर्थशास्त्र/ राज्यशास्त्र या सामाजिक शास्त्रातील विषयापैकी एक विषय पर्याय म्हणून स्वीकारता येतो. यामुळे सामाजिक शास्त्रे आणि भाषा या विषयातील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणून कार्य करण्यास विद्यार्थी सक्षम होतात. हा अभ्यासक्रम इंग्रजी आणि हिंदी भाषेत शिकवला जात असल्याने हे विद्यार्थी या दोन भाषांमध्ये उत्तमरीत्या शिकवू शकतात.

शाळा अनुभव कार्यक्रम

या अभ्यासक्रमांतर्गत चौथ्या वर्षी आठ आठवडयांचा शाळा अनुभव कार्यक्रम(स्कूल एक्सपिरिअंस प्रोग्रॅम) हा उपक्रम राबवला जातो. त्यामुळे अध्यापनाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. त्याचा उपयोग प्रत्यक्ष कार्यरत झाल्यावर होतो. क्षेत्रीय स्तरावरील कार्यानुभव, शारीरिक शिक्षण याचेही धडे विद्यार्थ्यांना दिले जातात. त्यामुळे समाजातील समस्या आणि प्रश्नाची त्यांना जाणीव होते.

()बी.एड-एम.एड(इंटिग्रेटेड)

 अर्हता- विज्ञान / समाजशास्त्र या विषयातील ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये ५ टक्के सूट. कालावधी- तीन वर्षे.

(५)बी.एड- हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. विज्ञान, गणित, समाजशास्त्रे आणि भाषा या विषयातील दर्जेदार माध्यमिक शिक्षकांची निर्मिती होण्यासाठी या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांतर्गत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती यापैकी कोणतीही एक भाषा शिकावी लागते. यामुळे ते उत्तम भाषा शिक्षक बनू शकतात. भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांना एकत्रित करुन एकच विषय म्हणून शिकवला जातो. यामुळे ते सामाजिक शास्त्र हा विषय शिकवण्यासाठी पारंगत ठरतात. या अभ्यासक्रमांतर्गत पहिल्या वर्षी, चार आणि दुसऱ्या वर्षी आठ आठवडयांचा शाळा अनुभव कार्यक्रम, हा उपक्रम राबवला जातो. त्यामुळे अध्यापनाचा अनुभव घेता येतो. त्याचा उपयोग प्रत्यक्ष कार्यरत झाल्यावर होतो.

क्षेत्रीय स्तरावरील कार्यानुभव, शारीरिक शिक्षण याचेही धडे विद्यार्थ्यांना दिले जातात. त्यामुळे समाजातील समस्या आणि प्रश्नांची त्यांना जाणीव होते. याचा उपयोग समुदायांसोबत सुसंवाद साधण्याचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी होतो.

अर्हता- सरासरी ५० टक्के गुणांसह बी.ए/बी.एस्सी. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये ५ टक्के सूट दिली जाते. बी.एस्सी पदवी घेतलेल्या उमेदवारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र ,प्राणीशास्त्र या विषयांपैकी कोणत्याही दोन विषयांचा अभ्यास केलेला असावा किंवा बी.ए पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी पदवीस्तरावर हिंदी, गुजराती, मराठी, उर्दू आणि इंग्रजी यापैकी कोणत्याही एका भाषेचा आणि इतिहास, अर्थशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र यापैकी कोणत्याही एका विषयाचा अभ्यास केलेला असावा.(गणित आणि विज्ञान या विषयातील स्पेशलायझेशन केलेले बीई/बीटेक पदवीधर या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात. त्यांना पदवी परीक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळायला हवेत. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गासाठी गुणांमध्ये ५ टक्के सुट)

(६)एम.एड- अध्यापक प्रशिक्षण संस्थांच्या गरजा लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शैक्षणिक संशोधन आणि क्षेत्रीय स्तरावरील शैक्षणिक अभ्यासाचे विषय घटक या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत.

अर्हता– बी.एडमध्ये लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेत ५५ टक्के गुण मिळायला हवेत. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी गुणांमध्ये ५ टक्के सूट.

() डिप्लोमा इन गायडंस ॲण्ड काउंसिलिंग – विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक बाबींसाठी मार्गदर्शन करण्यासाठी, हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम सेवेत असलेले शिक्षक, शैक्षणिक प्रशासक, अप्रशिक्षित शैक्षणिक सल्लागार, शिक्षक- सल्लागार करु शकतात. अधिकाधिक व्यक्तिंना हा अभ्यासक्रम करता यावा म्हणून ऑनलाइन आणि दूरस्थशिक्षण पध्दतीची सुविधा आहे. या अभ्यासक्रमांतर्गत आठ आठवड्यांची इंटर्नशिप, नामांकित सल्लागार संस्था/ कंपनीमध्ये करण्याची संधी दिली जाते.

अर्हता– पदवी आणि अध्यापन पदवीसह अध्यापन क्षेत्रात असणारे शिक्षक किंवा दोन वर्षाचा शिकवण्याचा अनुभव असलेले पदवी व अध्यापन पदवीधारक किंवा मानसशास्त्र/ अध्यापन/ सामाजिक कार्य / बालविकास या विषयांमधील पदव्युत्तर पदवी. प्रवेश प्रक्रिया दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सुरु होते. कालावधी एक वर्षं. संपर्क-www.ncert-idgc.org

(८) पीएचडी– प्रवेश मिळवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट-नेट (कला आणि सामाजिक शास्त्रे), ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूट टेस्ट इन इंजिनीअरिंग -गेट (अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान) आणि आयआयटी-जॉईंट अडमिशन फॉर मास्टर्स (विज्ञान शाखा) या परीक्षा द्याव्या लागतात.अर्हता- ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी

संस्थेची वैशिष्ट्ये

या संस्थेत विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण बौध्दिक, शारीरिक आणि भावनिक विकासास सातत्याने साहाय्य केले जाते. सतत शिक्षणाची ओढ निर्माण केली जाते. ज्ञानप्राप्ती, कौशल्यप्राप्ती आणि प्रगतीच्या क्षमतांची निर्मिती करून विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक करिअरसाठी सामर्थ्य प्रदान केले जाते. त्यामुळे हे विद्यार्थी  सध्याच्या स्पर्धात्मक युगात सक्षमरीत्या कार्यरत राहू शकतात

प्लेसमेंट सेल-

()बी.एस्सी- बी.एड आणि बी.एड ही अर्हता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांस केंद्रीय विद्यालये, जवाहर नवोदय विद्यालये, दयानंद अँग्लो वेदिक स्कूल, ॲटोमिक एनर्जी, बीएड सोसायटी आणि देशातील अशाच समकक्ष शाळांमध्ये प्लेसमेंट मिळाले आहे.

()डिप्लोमा इन गायडंस ॲण्ड काउंसिल हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना नामांकित शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मार्गदर्शक म्हणून करीअर संधी मिळाली आहे.

()एम.एड हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना अध्यापक प्रशिक्षण महाविद्यालये/ शैक्षणिक संस्थांमध्ये करिअर संधी मिळाली आहे.

संपर्क- रिजनल इंस्टिट्यूट एज्युकेशन शामला हिल्स, भोपाळ- ४६२०१३, दूरध्वनी- ०७५५- २५२२००३, ईमेल—principal@riebhopal.in, संकेतस्थळ-https://riebhopal.ncert.gov.in

०००