मार्ग यशाचा- ५१ -“सर” कसे व्हाल?
रिजनल इंस्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या संस्थेतील बी.एस्सी-बीएड, बीएड, एमएड, इंटिग्रेटेड एम.एस्सी-एड या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश (कॉमन एन्ट्रन्स एक्झामिनेशन -सीइइ)घेतली जाते.
या परीक्षेत तीन क्षेत्रांमधील विद्यार्थ्यांच्या क्षमतेची चाचपणी केली जाते– १)इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व – यामध्ये विद्यार्थ्याची इंग्रजी भाषेची समज तपासली जाते. यात परिच्छेद समजून घेणे (कॉप्रिहेन्शन), वाक्यातील चुका दुरुस्त करणे (रिअरेंजिंग सेन्टेसेस), रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरणे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द (वन वर्ड सबस्टिट्यूशन) आणि व्याकरणविषयक चुका शोधणे या घटकांचा समावेश असतो.(एकूण गुण -२०),२) अध्यापन कल (टिचिंग ॲप्टिट्यूड/ॲटिट्यूड)- यात विद्यार्थ्याची शिक्षक बनण्याची आवड आणि दृष्टिकोन तपासला जातो. यात शालेय शिक्षण क्षेत्राशी संबंधित विशिष्ट बाबी, विद्यार्थी आणि व्यवसायाप्रती असलेली शिक्षकाची वृत्ती, नेतृत्वगुण आणि समूह व्यवस्थापन, , आंतरवैयक्तिक कौशल्ये (इंटरपर्सनल स्किल्स) आणि संवाद कौशल्ये यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. (एकूण गुण -३०),३) तार्किक आणि बुद्धिमत्ता क्षमता– (रिझनिंग ॲबिलिटी)- यामध्ये उमेदवाराची विचार करण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता तपासली जाते. यात संख्या मालिका (नंबर सिरिज), अक्षर मालिका (लेटर सिरिज), नातेसंबंध, वर्गीकरण, विसंगत घटक ओळखणे, विधाने आणि निष्कर्ष आणि वेगवेगळ्या अमूर्त किंवा सांकेतिक तार्किक समस्या (अनॅलॉगी / कोडिंग-डिकोडिंग) यांचा समावेश असतो. (एकूण गुण -३०)
परीक्षा पध्दत- या परीक्षेची प्रश्नपत्रिका एकूण ८० गुणांची किंवा ८० प्रश्नांची असते. कालावधी १२० मिनिटे.परीक्षेतील प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे (मल्टिपल चॉइस क्वेश्चन्स) असतात, प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिलेले असतात,२) विद्यार्थ्याच्या शैक्षणिक स्तराची योग्य चाचणी घेण्यासाठी ही परीक्षा तीन वेगवेगळ्या गटात (ग्रुप्स) घेतली जाते. १) गट ‘अ‘ (ग्रुप एक)- बी.एस्सी.-बी.एड., बी.ए.-बी.एड. किंवा एम.एस्सी–एड. हा पदवीपूर्व किंवा १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी,२) गट ‘ब‘ (ग्रुप बी)- दोन वर्षांचा बी.एड. किंवा तीन वर्षांचा एकात्मिक बी.एड.-एम.एड. अभ्यासक्रम करु इच्छिणाऱ्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी,३) गट ‘क‘ (ग्रुप सी)- दोन वर्षांच्या एम.एड. अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणारे पदव्युत्तर पदवी किंवा बी.एड. पूर्ण केलेले विद्यार्थी. तीनही गटांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्नांचे स्वरूप आणि काठीण्य पातळी ही शैक्षणिक अर्हतेनुसार वेगवेगळी ठेवलेली असते.
गुण निश्चिती – प्रत्येक अचूक उत्तरासाठी उमेदवाराला २ गुण दिले जातात. उमेदवाराने सोडवलेल्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे असल्यास, ०.५ (अर्धा) गुण वजा केले जातात. एखादा प्रश्न सोडवला नसल्यास किंवा अनुत्तरित ठेवल्यास, त्या प्रश्नासाठी शून्य गुण दिले जातात. ओएमआर पेपरवर एकापेक्षा जास्त पर्यायांना गोल केले असल्यास, ते उत्तर चुकीचे मानले जाते. त्यासाठी ०.५ गुण वजा केले जातात. अंतिम गुण हे मिळवलेले एकूण अचूक गुण आणि चुकीच्या उत्तरांमुळे वजा झालेले गुण यांचा एकत्रित विचार करून निश्चित केले जातात.
अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना सामाईक प्रवेश परीक्षेतील (सीइइ) गुणांना ६० टक्के भारांश (वेटेज) दिले जाते. अर्हता परीक्षेतील (१२ वी, पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेतील एकूण गुण) गुणांना ४० टक्के भारांश दिले जातो. दोन किंवा अधिक विद्यार्थ्यांचे समान गुण असल्यास सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांना प्राधान्य दिले जाते. हे गुणही समान असल्यास, अर्हता परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीचा विचार केला जातो. या घटकातही समान गुण समान असल्यास, ज्या विद्यार्थ्याचे वय जास्त असेल, त्याला गुणवत्ता यादीत वरचे स्थान दिले जाते.
संपर्क –https://cee.ncert.gov.in
०००
विभागीय शिक्षण संस्था, म्हैसुरू
या संस्थेत इंटिग्रेटेड एम.एस्सी– बी.एड (मास्टर ऑफ सायंस- बॅचलर ऑफ एज्युकेशन) हा अभ्यासक्रम (१)गणित, (२) रसायनशास्त्र, (३)भौतिकशास्त्र या विषयांमध्ये करता येतो. यांचा कालावधी प्रत्येकी सहा वर्षे. म्हैसूर विदयापीठाच्या बी.एस्सी(भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ गणित) आणि एम.एस्सी – गणित, या विषयाच्या अभ्यासक्रमांचे घटक संयुक्तरीत्या एमएस्सी- एड, या अभ्यासक्रमात सामील करण्यात आले आहेत. याच विद्यापीठाच्या बॅचलर ऑफ एज्युकेशन अभ्यासक्रमात उच्च माध्यमिक अध्यापनासाठी आवश्यक असणाऱ्या विषय घटकांचा अंतर्भाव एम.एस्सी-एड, या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. ही पदवी म्हैसूरु विद्यापीठाच्या एम.एस्सी आणि बी.एड या पदवी अभ्यासक्रमांच्या समकक्ष आहे. ही पदवी घेतल्यावर विद्यार्थ्यांना संबंधित विषयात पीएचडीसाठी नोंदणी करता येते.
अर्हता– १२ वी विज्ञान शाखेची परीक्षा गणित, भौतिकशास्त्र आणि गणित या विषय गटांसह ४५ टक्के सरासरीने उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.(अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गासाठी गुणांमध्ये ५ टक्के सुट).
इतर महत्वाचे
(१)या संस्थेच्या कॅम्पस प्लेसमेंटमधून १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. (२)अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना एम.एस्सी-एड या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. २० टक्के विद्यार्थ्यांना शिक्षणशुल्कातून सूट दिली जाते. ५० टक्के मुलांना मेरिट-कम-मिन्स(गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती) या योजनेंतर्गत अर्थसाहाय्य केले जाते.
संपर्क – प्राचार्य, क्षेत्रीय शिक्षा संस्था, मानसगंगोत्री म्हैसुरु – ५७०००६ , दूरध्वनी-०८२१-२५१४०९५,संकेतस्थळ- www.riemysore.ac.in, ईमेल- principal@rimysore.ac.in
०००
एम.ए. एज्युकेशनल टेक्नॉलॉजी
दोन वर्षे कालावधीचा हा अभ्यासक्रम, क्षेत्रीय शिक्षण संस्था नेल्लोर येथे करता येतो. शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी कुशल व्यावसायिक व तज्ज्ञ तयार करण्यासाठी या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील संधी मिळू शकतात- (१) डिजिटल आणि आधुनिक पद्धतीने शैक्षणिक अभ्यासक्रम डिझाईन करणारे तज्ज्ञ, (२) शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मार्गदर्शन करणारे सल्लागार, (३) शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणारे तज्ज्ञ, (४) हा अभ्यासक्रम, उच्च शिक्षणसंस्थांमध्ये शैक्षणिक तंत्रज्ञान हा विषय शिकवण्यासाठी, या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी आणि शिक्षकांसाठी क्षमता निर्माण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सक्षम बनवतो.
अर्हता- कोणत्याही शाखेतील किमान ५०% गुणांसह पदवी. अनुसूचित जाती,जमाती आणि दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये ५% सूट. या अभ्यासक्रमाला सीइइ परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो. हा अभ्यासक्रम विक्रम सिंहपुरी युनिव्हर्सिटी, नेल्लूर यांच्याशी संलग्न आहे.
संपर्क- रिजनल इंस्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, व्ही.आर. कॉलेज कॅम्पस, ट्रंक रोड, एस.पी.एस.आर. नेल्लोर – ५२४००१ (आंध्र प्रदेश), ईमेल– rienellore@gmail.com
०००
इंटिग्रेटेड टिचर एज्युकेशन प्रोग्रॅम
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयआयटी), नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) आणि केंद्रिय साहाय्यता मिळणाऱ्या इतर संस्थांमध्ये दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षकांच्या निर्मितीसाठी, इंटिग्रेटेड टिचर एज्युकेशन प्रोग्रॅम (आयटीइपी) इन बीएस्सी बीएड, हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाला, नॅशनल कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (एनसीइटी) मार्फत प्रवेश दिला जातो. इंटिग्रेटेड अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना, शिक्षण (एज्युकेशन) किंवा संबंधित मुख्य विषय (भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी करण्याचीही सुविधा उपलब्ध होते.
काही संस्था
(१) आयआयटी खरगपूर या संस्थेत, इंटिग्रेटेड बीएस्सी बीएड हा अभ्यासक्रम भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात करता येतो. १२ वी मध्ये भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र हे विषय घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरतात. संपर्क- https://www.iitkgp.ac.in/studyprogrammes/view/29,(२) आयआयटी भुवनेश्वर- या संस्थेत इंटिग्रेटेड बीएस्सी बीएड हा अभ्यासक्रम भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात करता येतो. संपर्क- https://itep.iitbbs.ac.in/, (३) आयआयटी रोपर- येथे इंटिग्रेटेड बीएस्सी- बीएड अभ्यासक्रम करता येतो. भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या तीन विषयांपैकी एक विषय अभ्यासक्रमाचा मुख्य विषय म्हणून निवडता येतो. संपर्क –https://www.iitrpr.ac.in/bsc-bed, (४) आयआयटी जोधपूर- या संस्थेने भावी शिक्षकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी स्वत:चे प्रारुप (मॉडेल) तयार केले आहे. संपर्क-https://www.iitj.ac.in/itep/, ५) एनआयटी तिरुचिरापल्ली या संस्थेत, बीएस्ससी बीएड (गणित) हा चार वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम करता येतो. संकेतस्थळ-https://www.nitt.edu, ६) एनआयटी अगरताळा–या संस्थेत इंटिग्रेटेड ड्युएल डिग्री बीएस्सी- बीएड हा अभ्यासक्रम करता येतो. अर्हता- विद्यार्थ्यांने १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्राचा अभ्यास केलेला असावा. संकेतस्थळ- https://www.nita.ac.in