मार्ग यशाचा- ५२ -परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
राज्यातील वेगवेगळ्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्याच्या संधींपासून वंचित राहू नये यासाठी, महाराष्ट्र शासनाने परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.
वेगवेगळ्या संवर्गासाठी ही योजना, १) आदिवासी विकास विभाग परदेशी शिष्यवृत्ती, २) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग परदेशी शिष्यवृत्ती, ३) उच्च व तंत्र शिक्षण विभाग परदेशी शिष्यवृत्ती, ४) नियोजन विभाग परदेशी शिष्यवृत्ती), ५) इतर मागास बहुजन कल्याण विभाग परदेशी शिष्यवृत्ती, ६) अल्पसंख्याक विकास विभाग परदेशी शिष्यवृत्ती, ७) महसूल व वन विभाग परदेशी शिष्यवृत्ती,यांच्या मार्फत राबवली जाते.
सर्व संवर्गातील विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
उच्च तंत्रशिक्षण विभागाने, या शिष्यवृत्तीची अर्जप्रक्रिया सुलभरितीने व्हावी म्हणून, https://fs.maharashtra.gov.in/ या वेबपोर्टलची निर्मिती केली आहे. या वेबपोर्टलची लिंक तंत्रशिक्षण संचालनालयाच्या- https://dte.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरील मुख्यपृष्ठावर, “फॉरेन स्कॉलरशीप पोर्टल” यानावाने देण्यात आली आहे. त्यावर क्लिक केले की शिष्यवृत्ती पोर्टलवर जाता येते.
या संकेतस्थळावरील “क्विक लिंक” या दुव्याच्या मदतीने, शासनाच्या उपरोक्त नमूद विभागांच्या शिष्यवृत्तीच्या मुख्यपृष्ठा (होम पेज) वर जाता येते. या प्रत्येक विभागाच्या शिष्यवृत्तीविषयी विस्तृत माहिती या ठिकाणी मिळते.
क्यूएस क्रमवारी
या शिष्यवृत्तीसाठी महत्वाची अट म्हणजे विद्यार्थ्यांना जागतिक क्रमवारितील पहिल्या २०० महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळायला हवा. ही क्रमवारी क्वाकक्वारेल्ली सायमंड्स (क्यूएस) ही संस्था करत असते. या यादितील परदेशातील २०० सर्वोच्च शिक्षण संस्था नेमक्या कोणत्या? हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडू शकतो. त्यांच्यासाठी https://dte-fs.trti-maha.in:82/notices या संपर्क साखळीवर ही यादी ठेवण्यात आली आहे. ही यादी २०२५-२६ या वर्षाची आहे. दरवर्षी संस्थांची क्रमवारी बदलत असल्याने, ही यादीही त्यानुसार बदलत राहते. विद्यार्थ्यांना ज्या वर्षी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, त्या वर्षीची यादी बघणे गरजेचे आहे.
परदेशातील शिष्यवृत्ती (नवे बदल)
शासनाने दि. ६ ऑगस्ट २०२४ रोजी अध्यादेश जाहीर करुन, सर्व सवंर्गांसाठी पुढील समान निकष जाहीर केले आहेत-
(१) शैक्षणिक अर्हता- (अ) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेश– कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी परीक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळायला हवेत.
(ब) पीएचडी अभ्यासक्रम प्रवेश- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी परीक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळायला हवेत.
(२) एका पालकाच्या जास्तितजास्त दोन मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाईल. प्रवेश प्रकियेच्या वेळी, एकाच पालकाच्या, दोन मुलांनी अर्ज केल्यास, प्रवेश प्रक्रियेत जागा रिक्त राहिल्यास, दुसऱ्या मुलास शिष्यवृत्ती दिली जाईल.
(३) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या संबंधित विद्यार्थ्यास, हा अभ्यासक्रम करतानाच पीएचडी करण्याची संधी मिळाल्यास, त्याच्या शिष्यवृत्तीची श्रेणीवाढ केली जाईल. अशा विद्यार्थ्यास, सर्व अटी आणि नियमांच्या अधिन राहून आणखी, पुढील दोन वर्षासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल. मात्र पुढील खर्च संबंधित विद्यार्थ्यास करावा लागेल.
(४) निवड प्रक्रियेच्या काळात, सर्व जागा भरल्या गेल्या नाहीतर, सर्व नियम आणि अटी यांच्या अधिन राहून ही प्रकिया एकापेक्षा अधिक वेळ राबवली जाईल.
(५) निर्वाह भत्ता/ आकस्मिक खर्च/ इतर खर्च यासाठी अमेरिका आणि इतर देशांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना, दरवर्षी १५ शे अमेरिकन डॉलर्स दिले जातील. युनायटेड किंगमड (इंग्लड) साठी ११००जीबीपी (ग्रेट ब्रिटन पाउंड) दिले जातील. हा खर्च क्रमिक पुस्तके, वह्या, स्टेशनरी, प्रबंध अहवाल तयार करणे, टायपिंग, बायंडिंग, स्थानिक भेटी आणि अभ्यास सहली, आणि आकस्मिक खर्चासाठी करता येईल.
(६) निर्धारित संख्येतील आदिवासी विद्यार्थी मिळाले नाहीतर, उत्पन्नाची अट ८ लाखावरुन वाढवून १० लाखापर्यंत केली जाऊ शकते. तसेच क्यूएस रँकिंगची अट २०० वरुन ३०० पर्यंत शिथील करण्यात येईल.
००००
खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
ही योजना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी एकूण ४० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. यातील ३० जागा पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रम, १० डॉक्टोरेट /पीएचडी अभ्यासक्रमासाठी राखीव आहेत.
अभ्यासक्रमांचे विषय
(१) कला आणि वाणिज्य शाखा- समाजशास्त्र, मानसशास्त्र, तत्वज्ञान, अर्थशास्त्र, (२) विज्ञान शाखा-कृषी, पशुवैद्यकीय, हॉर्टिकल्चर (उद्यानविद्या), सामान्य विज्ञान (जनरल सायंस), वनस्पतीशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, (३) व्यवस्थापन शाखा- एमबीए-फायनांस, एमबीए-मार्केटिंग, एमबीए-ह्युमन रिसोर्स, एमबीए- सिस्टिम ॲनॅलिसीस, हॉटेल मॅनेजमेंट, (४) अभियांत्रिकी/ वास्तुकला शाखा-सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल, प्रॉडक्शन, कॉम्प्युटर, इंडस्ट्रिअल, एनव्हिरॉन्मेंटल, मायनिंग, पेट्रोकेमिकल, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/इन्फॉर्मेशन सिस्टिम/ इन्फॉर्मेशन सायंस, बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक इंजिनीअरिंग, नॅनोटेक्नॉलॉजी, इंडस्ट्री इंटरनेट ऑफ थिंग्ज, सायबर लॉ/सायबर सेक्युरिटी, बायोमेकिडकल इंजिनीअरिंग, क्लायमेंट चेंज, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, आर्किटेक्चर, (५) विधि, आणि (६) औषधनिर्माणशास्त्र या शाखांमधील शिक्षणासाठी दिली जाते. एकूण ४० जागांपैकी ३० टक्के जागा (१२ जागा) विद्यार्थिनींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
मिळणारे फायदे– या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील बाबींचा संपूर्ण खर्च दिला जातो- १) शंभर टक्के शिक्षण शुल्क, २) वैयक्तिक आरोग्य विमा, २) निर्वाह भत्ता (राहण्याचा व खाण्याचा खर्च), ३) आकस्मिक खर्च भत्ता, ४) परदेशी जाण्या-येण्याचा इकॉनॉमी क्लासचा विमान प्रवास खर्च (फक्त एक वेळ)
(टीप- साधारणत:- प्रत्येक संवर्गातील विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे साहाय्य केले जाते.)
०००
अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थी
ही शिष्यवृत्ती,मुस्लिम,बौध्द,जैन,शिख,पारसी,ज्यू,ख्रिश्चन या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना दिली जाते. एकूण ७५ शिष्यवृत्ती असून त्या या संवर्गातील लोकसंख्येच्या प्रमाणात दिल्या जातात.
अर्ज प्रकिया
इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी https://fs.maharashtra.gov.in या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
संपर्क– तंत्रशिक्षण संचालनालय, ३, महापालिका मार्ग, पोस्ट बॉक्स नं. १९६७, सेंट झेविअर्स कॉलेजच्या जवळ, धोबी तलाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ, मुंबई – ४००००१, दूरध्वनी ०२२-६८५९७४९६ / ०२२-६८५९७४५९ / ०२२-६८५९७४२१, ईमेल–foreignscholarship.desk18@dtemaharashtra.gov.in
०००
नॅशनल ओव्हरसिज स्कॉलरशीप
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागामार्फत, परदेशातील उच्च शिक्षणासाठी (मास्टर्स किंवा पीएच.डी.) या योजनेच्या माध्यमातून अर्थसाहाय्य केले जाते.
शिष्यवृत्तीचे स्वरूप– १) परदेशी विद्यापीठाचे संपूर्ण शिक्षण शुल्क थेट दिले जाते,२) अमेरिकेसह इतर देशांसाठी वार्षिक सुमारे १५,४०० अमेरिकन डॉलर्स आणि युनायटेड किंगडम साठी वार्षिक ९,९०० पौंड,३) राहण्याचा व खाण्याचा खर्च दिला जातो, ४) विमानाचे येण्या-जाण्याचे तिकीट, व्हिसा शुल्क, वैद्यकीय विमा आणि पुस्तकांचा खर्च दिला जातो.
पात्रता निकष– १) ही योजना अनुसूचित जाती, वंचित जमाती, भूमिहीन शेतमजूर आणि पारंपरिक कारागीर कुटुंबातील मुलांसाठी आहे,२) वय ३५ वर्षांपेक्षा कमी असावे आणि पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण असावेत, ३) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे. दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये सामाजिक न्याय मंत्रालयाच्या शिष्यवृत्ती पोर्टलवर (nosmsje.gov.in) ऑनलाइन अर्ज भरावे लागतात. क्यूस रँकिंगमध्ये ५०० पर्यंत क्रमवारी असणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश मिळायला हवा. ३० टक्के शिष्यवृत्ती महिलांसाठी राखीव ठेवण्यात येतात.
०००
राष्ट्रीय संस्थांसाठी शिष्यवृत्ती
राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द सवंर्गातील १०० विद्यार्थ्यांना देशांतील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येते.
विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे एकत्रित वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयेपर्यंत असावे. महाराष्ट्र शासनाने मान्य केलेल्या संस्थेत प्रवेश मिळालेला असावा (उदा. आयआयएम, आयआयटी, एनआयटी, आयआयएसइआर, आयआयआयटी, आयआयआयएम) या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी १२ वी परीक्षेत ५५ टक्के गुण मिळवणे आवश्यक.
लाभाचे स्वरुप
शैक्षणिक शुल्क, वसतिगृह व भोजन शुल्क, क्रमिक पुस्तके – ५,०००रु. व शैक्षणिक साहित्य ५,००० रु.असे एकूण प्रतिवर्षी १०,०००रु.
संपर्क-https://socialwelfare.maharashtra.gov.in/scheme
०००