हुप्पेरावांचं काय चुकलं?
माकड हाच मानवाचा पूर्वज असल्याचंगुळगुळीत आणि बुळबुळीत वाक्य,वाक्यकोशातून बाद करायला हवं.पण माणूस आणि माकडं हे दोघेही या भूतलावर ठाण मांडून आहेत,तोपावेतो तरी या वाक्याचं अमरत्व कायम राहील.हे सिध्द करणाऱ्या घटना सतत घडत असतात.किंबहुना आपणच माकडाचे खरेखुरे वारस आहोत हे पुन्हा पुन्हा सिध्द करण्यासाठी मानव ,माकडचाळे करत असतो.
या भूतलावरील इतर कोणत्याही प्राण्याला असे चाळे कधीच करावे वाटले नाहीत.चार्लस डार्विन एवढा जगभर प्राण्यांचा शोध घेत फिरला पण त्यालाही असं आढळून आलं नाही.फक्त आणि फक्त मानवच असे चाळे करतो हे डार्विनच्याही चाणाक्ष नजरेतून सुटले नाही.पण त्याने याची नोंद करण्याचे टाळले, बस एवढेच.मारुतराव चितमपल्ली साहेबांना सुध्दा एखादा वाघ,माकड चाळे करताना दिसलेला नाही.जिम कार्बेटनेही असे काही बघितले नाही.गुज्जू ब्रँड ऍ़म्बेसेडर श्रीयुत अमिताभ बच्चन यांनी गिरच्या जंगलातील सिंह महाराज माकडेचाळे करतात असे काही बघितलेले नाही.तसे असते तर त्यांच्या मायक्रोब्लॉग मधून कधीचेच जगजाहीर केले असते.केसरीच्या आफ्रिकन टूर मध्ये गेलेल्या हजारो पर्यटकांना जिराफ,झेब्रा,रानगवा,मोर,हरीण हे माकडचाळे करताना आढळलेले नाहीत.तसे असते तर त्या सुरम्य आठवणिंचा पाऊस,पत्र नव्हे मित्र आणि लोकमान्य लोकशक्तीतून दर रविवारी पडला असता.एकाही सर्प मित्राला नागराव किंवा नागीनकाकू माकडचाळे करताना दिसलेले नाही.राणीच्या बागेतल्या पाणघोड्याने माकडचाळे केल्याचे कुणी सिध्द करुन दाखवले तर आपण त्या पानघोडयाचे चुंबन घेऊन दाखवू.मुषक स्वामी उर्फ उंदिरराव टणाटणा उड्या मारतात पण तेही माकडचाळ्यांच्या वाटेला गेले नाहीत.मांजर मावशीला वाटेतून आडवे जाणे आणि माहीमच्या मच्छी बाजारात हलव्यावर ताव मारणे एवढचं ठाऊक असल्यानं ती माकडचाळया–फाळयांच्या फंदातच पडत नाही.वीरप्पन यांचे द एन्ड, झाले असल्याने म्हैसुरच्या जंगलातील गजराज माकडचाळे करत होते किंवा कसे,हे सध्या विचारायची सोय नाही.हाथी मेरे साथीमधील रामू हत्तीने,सर्कशितल्या रिंगणात येऊन प्रेक्षकांना अभिवादन करणाऱ्या रामू हत्तीने किंवा मुंबईच्या रस्त्यावरुन डुलत डुलत जाणाऱ्या आणि शी किंवा सू लागली तर भररस्त्यात टनभर किंवा मनभर शि–सू करणाऱ्या रामू हत्तीने आपली सभ्यता कधी सोडल्याचे दिसले नाही.गाढव हा मनमौजी प्राणी असल्याने,त्याचे जे काही,जेव्हा कधी होते,ते त्याचे स्वत:चेच असते.त्याची ब्रँड इक्विटी सध्यातरी त्याच्याकडे कायम राहिलेली आहे.आसाम मधील एकशिंगे गेंड एकतर शिकाऱ्यांच्या गोळयांना बळी पडतात किंवा ब्रम्हपुत्रेच्या पुराला बळी पडतात.सध्या त्यांच्या भागदेयात एवढेच असल्याने इतर गोष्टी म्हणजेच माकडचाळे करण्याइतपत त्यांच्याकडे लक्झरी नाही.सध्याच्या काळात एखादे वेळेस म्हाताऱ्या आईवडिलांना फ्लॅटमध्ये राहायला कांकू करणारा मनुष्यप्राणी हा कुत्रेरावांना अगदी आनंदाने राहू देतात.त्याच्यासाठी छोट्याशा खोलीपासून ते स्पा पर्यंत बऱ्याच सोइ करतात.कुत्रेराव मनुष्य प्राण्याचा सखा वगैरे झाला असला तरी त्यालाही अजून माकडचाळयांचा गुण चिटकलेला नाही,हे छातीठोकपणे सांगता येतं.ही सर्व उदाहरणं,माणूसच कसे माकड चाळे करतो हे खणखणितपणे सिध्द करायला स्वयंस्पष्ट आहेत.
हे सारं आठवायचं कारण म्हणजे नुकतच पुन्हा एकदा मानवाच्या माकडचाळयांवर शिक्कामोर्तब करणारी घटना घडली.अमेरिकेतल्या एका नररत्नाने इन्शुरंस कंपनीकडे आपला मोबाइल चोरिला गेल्यानं त्याची नुकसान भरपाई करण्यासाठी दावा दाखल केला.कंपनीनं या नररत्नाला मोबाइल चोरिचं कारण विचारलं.
हे श्रीमान आपल्या गाडीत प्रवासाला निघाले असताना वाटेत घनदाट झाडी लागली.काही झाडांवर माकडं त्यांचा आवडता खेळ करत होती.कुणी उलट लटकत होतं.कुणी उगीचच कराकरा डोकं खाजवत होतं.कुणी दात विचकटून रस्त्याने जाणा–या येणाऱ्यांवर डोळे वटारत होतं.कुणी फळ खात होतं.कुणी या फांदीवरुन त्या फांदीवर लटकत होतं.थोडक्यात मुक्त सर्कस चालली होती.या मनोहारी दृषाने त्या नररत्नाचे भान हरपले.हे अविस्मरणीय दृष्य कायमस्वरुपी आपल्या जवळी असावे म्हणून त्याने आपला मोबाइल काढला नि तो माकडारावांच्या मुक्त सर्कशीचे चित्रण करु लागला.आपल्या लिलांवर कुणीतरी नजर ठेऊन असल्याचं एका चाणाक्ष हुप्पेरावांच्या लक्षात येताच तो झरझर झाडावरुन खाली उतरला नि त्याने त्या नरनरत्नाच्या हातातला मोबाईल कधी पळवला हे त्याच्याही लक्षात आलं नाही..हुप्पेराव आले नि त्याच गतिने झाडाच्या फांदीवर जाऊन बसले.मोबाइल दाखवून नररत्नांला चिडवू लागले.त्याने बाबापुता केल्या पण छे..उलट या बाबापुताला कंटाळून हुप्पेरावांनी मोबाईल गर्द झाडित भिराकावून दिला नि नररत्नाकडे दात विचकटून बघू लागला..
तर असं हे मोबाईल हरवण्याचं कारण.
हे असं करायला सांगितलं होतं कुणी तुम्हाला..हुप्पेरावांना तर आम्ही काही विचारु शकत नाही.तुम्हीच सांगा आम्हाला..इन्शुरन्स कंपनीनं विचारलं..
नररत्न याचं काय उत्तर देणार.
माणासातला माकड जागा झाला की हे असचं व्हायच.(जंगलातले हुप्पेराव असंच काहीसं स्वत:शी बालून आणि दात विचकटून फिदी फिदी हसत असेल ..नाही का..)