मार्ग यशाचा-५८ -तणावमुक्त सीइटीसाठी काय कराल?
तणावमुक्त सीइटीसाठी काय कराल?
भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र (एमएच-सीइटी-पीसीएम) ही परीक्षा महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधीनिर्माण शास्त्र, बॅचलर ऑफ प्लॅनिंग, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयातील इंटिग्रेटेड मास्टर ऑफ इंजिनिअरिंगचे पहिले वर्ष, मास्टर ऑफ प्लॅनिंग (इंटिग्रेटेड), फार्म डी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाते.
ही संगणकाधारित म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा आहे. या परीक्षेची पहिली शिफ्ट (पाळी) साधारणतः सकाळी साडेसात वाजता आणि दुसरी शिफ्ट सकाळी साडेबारा वाजता सुरू होते. विद्यार्थ्यांना पहिल्या शिफ्टसाठी सकाळी ८.४५ वाजेपर्यंत आणि दुसऱ्या शिफ्टसाठी दुपारी १.४५ वाजेपर्यंतच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जातो. त्यानंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जात नाही. सकाळच्या पाळीचे पहिले लॉग-इन आणि सूचना वाचण्यासाठी सकाळी ८.५० वाजता आणि दुपारच्या पाळीचे पहिले लॉग-इन दुपारी १.५० वाजता करता येते. पहिल्या पाळीचा पेपर सकाळी ९ वाजता आणि दुसऱ्या पाळीचा पेपर २ वाजता सुरू होतो. सकाळची परीक्षा दुपारी १२ वाजता आणि दुपारची परीक्षा संध्याकाळी ५ वाजता संपते. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही विद्यार्थ्याला अतिरिक्त वेळ दिला जात नाही.
अभ्यासक्रम
सीइटी परीक्षेत ११ वीच्या अभ्यासक्रमातील नेमके कोणते विषयघटक असतील याची स्पष्टता सीइटी सेलने केली आहे. उजळणी करताना त्यावरच लक्ष केंद्रित करणे योग्य ठरेल. १२ वीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर सीइटीमध्ये प्रश्न विचारले जात असल्याने, सर्व घटकांचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. या परीक्षेतील २० टक्के भाग हा बोर्डाच्या ११ वीच्या आणि ८० टक्के भाग १२ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित राहील.
परीक्षा पद्धती
१. या परीक्षेतील भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयाचा पेपर इंग्रजी, मराठी आणि उर्दू या भाषेत राहील. गणिताचा पेपर इंग्रजी भाषेत राहील. विद्यार्थ्यांनी सीइटीचा अर्ज भरताना जी भाषा नमूद केली असेल, त्याच भाषेतील प्रश्नपत्रिका सोडवता येईल. मराठी आणि उर्दू भाषेतील प्रश्नांमध्ये काही समस्या वाटत असल्यास इंग्रजी प्रश्नपत्रिका बघण्याची सूचना सीइटी सेलने केली आहे.
२. ही बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल चॉइस क्वेश्चन) पद्धतीची आहे. प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली जातील. यापैकी एक अचूक उत्तर असेल. १८० मिनिटांमध्ये १५० प्रश्न सोडवावे लागतील. निगेटिव्ह गुण नाहीत.
३. पेपर एक हा गणिताचा असेल. गणिताच्या पेपरमध्ये १० प्रश्न ११ वीच्या अभ्यासक्रमावर आणि ४० प्रश्न १२ वीच्या अभ्यासक्रमावर राहतील. प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी प्रत्येकी २ गुण दिले जातील. कालावधी: ९० मिनिटे.
४. पेपर दोनमध्ये भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे प्रश्न विचारले जातील. या प्रत्येक विषयासाठी प्रत्येकी ५० प्रश्न विचारले जातील. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या पेपरमध्ये प्रत्येकी १० प्रश्न ११ वीच्या अभ्यासक्रमावर आणि ४० प्रश्न १२ वीच्या अभ्यासक्रमावर राहतील. प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी प्रत्येकी १ गुण दिला जाईल. कालावधी: ९० मिनिटे.
५. संगणकाच्या पडद्यावर एकावेळी एकच प्रश्न दिसेल. त्यामुळे एखादा प्रश्न सोडवण्यासाठी फार वेळ घालवू नये, अशी सूचना सीइटी सेलने केली आहे. या परीक्षेत प्रारंभी रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र गटातील प्रश्न संगणकाच्या पडद्यावर येतील. ९० मिनिटांचा कालावधी संपल्यावर, या गटाचा पेपर ऑटो (स्वयं/आपोआप) सबमिट किंवा सादर होताच गणिताचे प्रश्न दिसू लागतील. याचा कालावधी ९० मिनिटांचा असेल.
६. परीक्षागृहात प्रवेश करण्यासाठीच्या अंतिम निर्धारित वेनंतर कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र ते निवासस्थान, हे अंतर लक्षात घेऊन आणि वाहतुकीतील संभाव्य अडथळे लक्षात घेऊन पुरेशा वेळेआधीच परीक्षा केंद्रांवर पोहोचणे सोईचे ठरेल. त्यामुळे अनावश्यक धावपळ करण्याची गरज भासणार नाही व निष्कारण तणावही येणार नाही. कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही स्थितीत परीक्षेचा वेळ संपल्याशिवाय परीक्षा केंद्राच्या बाहेर सोडले जाणार नाही. परीक्षा संपल्यावर विद्यार्थ्याने परीक्षा केंद्र सोडल्यानंतर, त्याला पुन्हा परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
७. या परीक्षेचा निकाल पर्सेंटाइल पद्धतीनी जाहीर केला जाईल. पीसीबी आणि पीसीएम या दोन्ही गटाचे पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांचे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयातील पर्सेंटाइल हे दोन्ही गटांमध्ये अदलाबदल (इंटरचेंज) केले जाणार नाहीत. पर्सेंटाइल पद्धती ही गुणांच्या पर्सेंटेजपेक्षा वेगळी आहे. सीइटी देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पर्सेंटाइल पद्धती स्वीकारल्याचे समजले जाईल, अशी स्पष्टोक्ती सीइटी सेलने केली आहे.
८. मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटर किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक/डिजिटल उपकरण परीक्षागृहात नेता येणार नाही. विद्यार्थ्यांनी याची काळजी घेणे गरजेचे आहे.
९. कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य किंवा गैरव्यवहार करताना विद्यार्थी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि सीइटी परीक्षा व प्रवेश प्रक्रियेपासून त्याला बाद केले जाईल. सीइटीचा अर्ज भरताना चुकीची किंवा अर्धवट माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास परीक्षा आणि पुढील प्रवेश प्रक्रियेपासून संबंधित विद्यार्थ्याला बाद केले जाते.
१०. लेखनिकाची सुविधा घेणाऱ्या दिव्यांग उमेदवारांना प्रत्येक तासाला अतिरिक्त २० मिनिटांचा कालावधी दिला जाईल. ही सुविधा घेऊ इच्छिणाऱ्या दिव्यांग उमेदवारांना परीक्षा केंद्रावर दिव्यांगाचे अधिकृत प्रमाणपत्र (किमान ४० टक्के अपंगत्व) आणि लेखनिकासाठीचा अर्ज सादर करावा लागेल. हा लेखनिक/स्क्राइब संबंधितांना स्वखर्चाने उपलब्ध करून घ्यावा लागेल. सीइटीचा अर्ज भरतानाच दिव्यांगांना अशी सुविधा घेण्याविषयी नमूद करणे गरजेचे आहे.
११. या परीक्षेसंदर्भातील कायदेशीर बाबी मुंबई उच्च न्यायालयाच्या क्षेत्रात विचारात घेतल्या जातील.
व्हेन्यू ऑफिसर
परीक्षा केंद्रावर वेगवेगळ्या समस्यांना विद्यार्थ्यांना ऐनवेळी तोंड द्यावे लागू शकते (उदा. प्रशासकीय चुकीमुळे परीक्षेचा कालावधी कमी होणे किंवा परीक्षेसंदर्भातील इतर महत्त्वाच्या बाबी इत्यादी). या समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीइटी सेलमार्फत एक व्हेन्यू ऑफिसर नेमला जाईल. हा अधिकारी परीक्षेच्या दिवशी सकाळी साडेसात वाजेपासून परीक्षा संपेपर्यंत असेल. कोणतीही समस्या निर्माण झाली किंवा अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी तत्काळ परीक्षागृहातील पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणणे अपेक्षित आहे. त्यानंतर पर्यवेक्षकांमार्फत ही तक्रार व्हेन्यू ऑफिसरपर्यंत पोहोचवली जाईल. ते याची तत्काळ दखल घेऊन समस्या किंवा अडचणीचे निराकरण करतील. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांविषयी काही शंका असल्यास तत्काळ www.mahacet.org या संकेतस्थळावर संपर्क करून तक्रार नोंदवण्याची सूचना सीइटी सेलने केली आहे. त्यासाठी माहिती पुस्तिकेतील सूचनेप्रमाणे लॉग-इन करावे लागेल.
या परीक्षेचा सराव करण्यासाठी सीइटी सेलने [https://cetcell.mahacet.org/](https://cetcell.mahacet.org/) या संकेतस्थळावर मॉक टेस्ट उपलब्ध करून दिली आहे. यामुळे सीइटीच्या प्रश्नांच्या काठीण्यपातळीची कल्पना येऊ शकते.
जय्यत तयारी
सीइटी सेलतर्फे ही परीक्षा घेण्यासाठी सर्व जय्यत तयारी केली जाते. परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांनी सीइटी सेलने दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन केल्यास कुणालाही कोणतीही अडचण जाणार नाही. आता केवळ परीक्षेसाठी काही दिवस शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांनी कोणताही तणाव घेण्याची गरज नाही. जो काही आतापर्यंत अभ्यास केला असेल, तोच उपयुक्त ठरेल. ऐनवेळेस नवे काहीतरी करू नये, किंवा ‘हे राहिले, ते राहिले’ असे वाटून घेऊ नये. महत्त्वाच्या संकल्पनांची उजळणी करावी. आता शेवटच्या क्षणी उगाच जागरण करण्यातही हशील नाही. शेवटच्या दिवशी चांगले भोजन आणि उत्तम झोप आवश्यक आहे, ज्यामुळे प्रसन्नता कायम राहील. या प्रसन्नमुद्रेने परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचून आत्मविश्वासाने पेपर सोडवा. अधिकाधिक उत्तरे अचूक येतील याची काळजी घ्या. परीक्षा सभागृहात संपूर्ण लक्ष केवळ पेपरवरच केंद्रित करा. इतर बाह्य गोष्टींचा अजिबात विचार करू नका. या सर्व बाबींचे पालन केल्यास तुम्हाला नक्कीच चांगले यश मिळेल. सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
संपर्क: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, आठवा माळा, न्यू एक्सेलिअर बिल्डिंग, ए.के. नायक मार्ग, फोर्ट, मुंबई – ४००००१. टोल फ्री क्रमांक: १८००२०९०१९१, हेल्पलाइन: ०७९६९१३४४०२, संकेतस्थळ: [https://cetcell.mahacet.org](https://cetcell.mahacet.org)
सुदेश वांदिले