मार्ग यशाचा- ६०- “बीबीए”ची सुयोग्य दिशा कशी ओळखणार?
कला, वाणिज्य आणि विज्ञान या ज्ञानशाखांपैकी कोणत्याही शाखेतून बारावीला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच पुढील वर्षीच्या प्रवेशाच्या दृष्टिने विचार सुरु करायला हवा. बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट (बीबीएम), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (बीसीए), इंटिग्रेटेड एमबीए आणि इंटिग्रेटेड एमसीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाची (स्टेट सीइटी सेल) सीइटी परीक्षा द्यावी लागते.
गेल्या वर्षापासून या परीक्षेच्या रचनेत एक महत्वाचा बदल झाला आहे. यापूर्वी बीएचएमसीटी (बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी) साठी आणि बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम साठी अशा दोन स्वतंत्र सीइटी घेतल्या जात होत्या. या सर्व अभ्यासक्रमांचे पात्रता निकष समान असल्याने आता या दोन्ही परीक्षा एकत्र करण्यात आल्या असून, ‘एमएएच-बीएचएमसीटी/बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम-सीइटी’ या नावाने एकच सामाईक परीक्षा घेतली जाते. त्यामुळे चार वर्षे कालावधीचा बीएचएमसीटी आणि पाच वर्षे कालावधीचा एम.एचएमसीटी (इंटिग्रेटेड) हे अभ्यासक्रमही आता याच परीक्षेच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहेत. एकाच परीक्षेच्या आधारे इतक्या पर्यायांचे दरवाजे उघडत असल्याने, या परीक्षेकडे गांभीर्याने पहायला हवे.
पात्रता
बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम या अभ्यासक्रमांसाठी उमेदवार भारताचा नागरिक असावा आणि त्याने १२ वी किंवा समकक्ष परीक्षा, संबंधित विद्यापीठाच्या प्रवेश धोरणानुसार उत्तीर्ण केलेली असावी. बीएचएमसीटी आणि एम.एचएमसीटी (इंटिग्रेटेड) साठी मात्र १२ वीला खुल्या संवर्गासाठी किमान ४५ टक्के आणि महाराष्ट्रातील राखीव संवर्ग, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक व दिव्यांग उमेदवारांसाठी किमान ४० टक्के गुण आवश्यक आहेत. यंदा १२ वीची परीक्षा देणारे विद्यार्थीही ही सीइटी देऊ शकतात.
परीक्षा पध्दती
ही परीक्षा संगणकाधारित म्हणजेच ऑनलाइन असून तिचा कालावधी १२० मिनिटांचा आहे. तथापि परीक्षा केंद्रातील प्रवेशापासून ते परीक्षा संपेपर्यंतच्या पडताळणी, कागदपत्रे, लॉग इन, सूचना अशा वेगवेगळया बाबींसाठी हा कालावधी १८० मिनिटांचा राहू शकतो, ही बाब सीइटी सेलने स्पष्ट केली आहे. हॉल तिकिटावर नमूद केलेल्या वेळेनंतर केंद्रावर पोहोचणाऱ्या उमेदवाराला परीक्षेस बसू दिले जात नाही, हे कटाक्षाने लक्षात ठेवावे.
या परीक्षेत बहुपर्यायी वस्तुनिष्ट पध्दतीचे १०० प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी चार पर्याय दिले जातात, यामधून अचूक उत्तर शोधावे लागते. प्रत्येक अचूक उत्तरास एक गुण दिला जातो. निगेटिव्ह गुण नाहीत. त्यामुळे एकही प्रश्न न सोडवता ठेवण्याचे कारण नाही.
विषयघटक आणि गुणविभाजन पुढीलप्रमाणे- (१) इंग्रजी (इंग्लिश लँग्वेज)- एकूण प्रश्न ३०, एकूण गुण ३०, (२) तार्किकता- शाब्दिक आणि गणितीय (रिझनिंग- व्हर्बल ॲण्ड अर्थमॅटिक)- एकूण प्रश्न ३०, एकूण गुण ३०, (३) सामान्य ज्ञान आणि जाणीव (जनरल नॉलेज ॲण्ड अवेअरनेस)- एकूण प्रश्न २०, एकूण गुण २०, (४) संगणकाचे मूलभूत ज्ञान (कॉम्प्युटर बेसिक्स)- एकूण प्रश्न २०, एकूण गुण २०. प्रश्न इंग्रजितच विचारले जातात.
सामान्य ज्ञान या घटकात संस्कृती, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी, व्यापार आणि वाणिज्य, क्रीडा, वैज्ञानिक शोध अशा उपघटकांवर प्रश्न विचारले जातात, असे सीइटी सेलने माहितीपुस्तिकेत नमूद केले आहे.
तयारी कशी कराल?
हा अभ्यासक्रम सर्वसाधारण स्वरुपाचा असून विद्यार्थ्यांची सर्वसामान्य आकलन क्षमता, सामान्यज्ञान, मूलभूत गणित अशासारख्या बाबींचे ज्ञान तपासण्यासाठी प्रश्न विचारले जातात. सीइटी सेलने माहितीपुस्तिकेच्या शेवटी काही नमूना प्रश्न दिले आहेत, त्यावरुन काठिण्यपातळीची कल्पना येऊ शकते. उदा- प्रसिध्द खजुराहो मंदिर कुठे आहे? किंवा कोणते शहर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? दाल बाटी आणि चुरमा हा कोणत्या राज्याचा प्रसिध्द खाद्यपदार्थ आहे? तार्किकता आणि गणितासाठी बैठकव्यवस्था, क्रम लावणे, सम-विषम संख्या, टक्केवारी अशा स्वरुपाचे नमूना प्रश्न देण्यात आले आहेत.
बारावीच्या अभ्यासाबरोबरच दररोज थोडा वेळ या परीक्षेसाठी राखून ठेवावा. वृत्तपत्रांचे नियमित वाचन, इंग्रजी शब्दसंग्रह आणि व्याकरणाचा सराव, आणि मूलभूत गणिताच्या संकल्पना पक्क्या करणे- या तीन गोष्टींवर भर दिल्यास बराच पल्ला गाठता येतो. संगणकाच्या मूलभूत ज्ञानाच्या घटकाचे प्रश्न २० झाल्याने, हार्डवेअर-सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम, इंटरनेट, एमएस ऑफिस अशा बाबींची उजळणी करणे आता अधिक फायद्याचे ठरणार आहे. बारावीची परीक्षा संपल्यानंतर सीइटीपर्यंत मिळणाऱ्या दिवसांत केवळ सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यावर लक्ष केंद्रित करावे.
नोंदणी, शुल्क आणि आधार पडताळणी
या परीक्षेचे वेळापत्रक साधारणत: दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सीइटी सेलच्या संकेतस्थळावर जाहीर होते. नोंदणी जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान सुरु होते आणि प्रत्यक्ष परीक्षा एप्रिलच्या अखेरीस घेतली जाते. गेल्यावर्षी ती २८ ते ३० एप्रिल या कालावधीत झाली. अर्ज केवळ ऑनलाइन पध्दतीनेच www.mahacet.org या संकेतस्थळावर भरावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हे संकेतस्थळ अधुनमधून पहात रहावे.
गेल्यावर्षीचे परीक्षा शुल्क- महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील खुल्या संवर्गातील उमेदवारांसाठी १३०० रुपये, तर महाराष्ट्रातील मागासवर्गीय संवर्ग (एससी, एसटी, व्हीजे/डीटीएनटी, एनटी, ओबीसी, एसबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस), दिव्यांग, अनाथ आणि तृतीयपंथी उमेदवारांसाठी १००० रुपये असे होते. हे शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळत नाही.
नोंदणी करताना उमेदवाराची आधार पडताळणी आणि अपार (एपीएएआर) ओळखक्रमांकाची पडताळणी डिजिलॉकरमार्फत केली जाते. त्यामुळे आधार कार्डावरील नाव, जन्मदिनांक, लिंग, छायाचित्र आणि पत्ता अद्ययावत असणे आवश्यक आहे. या तपशिलात तफावत आढळल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. ही दुरुस्ती करायला वेळ लागतो, म्हणून हे काम आतापासूनच करुन ठेवलेले बरे. जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस किंवा दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र ही कागदपत्रेही कॅप प्रक्रियेच्या वेळी लागतात, त्यांचीही जुळवाजुळव आधीच करुन ठेवावी.
दिव्यांग उमेदवारांसाठी लेखनिकाची (स्क्राइब) सुविधा आहे. लेखनिकाची व्यवस्था उमेदवाराने स्वखर्चाने करावयाची असून, त्याची शैक्षणिक अर्हता उमेदवाराच्या अर्हतेपेक्षा दोन वर्षे कमी असावी लागते. अशा उमेदवारांना प्रति तास २० मिनिटे या प्रमाणात जादा वेळ दिला जातो. मुख्य लेखनिक ऐनवेळी गैरहजर राहिल्यास अडचण होऊ नये म्हणून पर्यायी लेखनिकाचाही तपशील आधीच द्यावा लागतो.
काही संस्था
या परीक्षेच्या आधारे सामाईक प्रवेश (कॉमन ॲडमिशन प्रोसेस- कॅप) प्रकियेत सामील झालेल्या काही संस्था व महाविद्यालये नमुन्यादाखल पुढे दिली आहे-
मुंबई-
(१) अखिलेश दिनेश मोदी इंस्टिट्यूट ऑफ फायनांस ॲण्ड मॅनेजमेंट- बीएमएस-एमएमएस इंटिग्रेटेड आणि बीएमएस, (२) स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई विद्यापीठ उपकेंद्र ठाणे- बीएमएस-एमएमएस इंटिग्रेटेड आणि बीएमएस, (३) ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी- बीबीए, (४) आदित्य इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲण्ड रिसर्च- बीएमएस, (५) भारतीय विद्याभवनचे एमएम कॉलेज ऑफ आर्ट्स, एनएम इंस्टिट्यूट ऑफ सायंस, एचआरजे कॉलेज ऑफ कॉमर्स- बीएमएस, (६) आर ए पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स- बीबीए आणि बीएमएस, (७) मिठीबाई कॉलेज ऑफ आर्ट्स- बीएमएस, (८) नर्सी मोन्जी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स- बीएमएस, (९) एसआयइएस कॉलेज ऑफ आर्ट्स, सायंस ॲण्ड कॉमर्स- बीएमएस, (१०) गुरु नानक खालसा कॉलेज ऑफ आर्ट्स, सायंस ॲण्ड कॉमर्स- बीएमएस, (११) जयहिंद कॉलेज- बीबीए आणि बीएमएस, (१२) रामनारायण झुनझुनवाला कॉलेज ऑफ आर्ट्स, सायंस ॲण्ड कॉमर्स- बीएमएस आणि बीबीए, (१३) उषा प्रवीण गांधी कॉलेज ऑफ आर्ट्स, सायंस ॲण्ड कॉमर्स- बीएमएस, (१४) डी. जी. रुपारेल कॉलेज ऑफ आर्ट्स, सायंस ॲण्ड कॉमर्स- बीएमएस, (१५) विद्यालंकार स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी- बीएमएस, (१६) विवेकानंद एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ आर्ट्स, सायंस ॲण्ड कॉमर्स- बीबीए आणि बीएमएस, (१७) सस्मिरा इंस्टिट्यूट ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स- बीएमएस, (१८) वझे कॉलेज ऑफ आर्ट्स, सायंस ॲण्ड कॉमर्स- बीएमएस आणि बीबीए, (१९) जानकीदेवी बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- बीबीए (एसएनडीटी विद्यापीठ)
पुणे-
(१) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र नाशिक- बीबीए, (२) डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पुम्बा)- बीबीए इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड फॅसिलिटीज मॅनेजमेंट, (३) विद्या प्रतिष्ठान इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बारामती- बीबीए, (४) एमआयटी कॉलेज ऑफ आर्ट्स, सायंस ॲण्ड कॉमर्स- बीबीए, बीबीए (कॉम्प्युटर ॲप्लिकेशन), बीबीए (इंटरनॅशनल बिझिनेस), (५) सर परशुराम भाऊ कॉलेज- बीबीए आणि बीबीए (इंटरनॅशनल बिझिनेस), (६) सेंट मिरा कॉलेज फॉर गर्ल्स- बीबीए आणि बीबीए (कॉम्प्युटर ॲप्लिकेशन)
इतर-
(१) लेडी अमृताबाई डागा लेडिज कॉलेज ऑफ आर्ट्स, सायंस ॲण्ड कॉमर्स, नागपूर- बीबीए, (२) हिस्लॉप कॉलेज, नागपूर- बीबीए, (३) शिवाजी सायंस कॉलेज, अमरावती- बीबीए, (४) डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स ॲण्ड मॅनेजमेंट, कोल्हापूर विद्यापीठ, कोल्हापूर- बीबीए-एमबीए इंटिग्रेटेड, (५) कर्मवीर भाऊराव पाटील इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च, सातारा- बीबीए, (६) जीएस रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड मॅनेजमेंट, जळगाव- बीबीए
अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाने बीबीए, बीएमएस या अभ्यासक्रमांना व्यावसायिक (प्रोफेशनल) अभ्यासक्रमाचा दर्जा दिल्याने, याचे प्रवेश सीइटी मार्फत घेण्यात येत आहेत. या परीक्षेत उत्तम गुण मिळवून चांगल्या संस्थेत प्रवेश मिळाल्यास, इंटर्नशीप, प्लेसमेंट सारख्या संधी मिळू शकतात. बरीच महाविद्यालये आता स्वायत्त झाली आहेत. उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन आणि त्यांच्या सल्ल्यानेही काही संस्था अभ्यासक्रमातील विषय घटक ठरवताहेत. त्यामुळे अशा संस्थांमधील प्रवेश हा पुढील करिअरच्या अनुषंगाने उपयुक्त ठरु शकतो. जागांची संख्या मोठी असल्याने प्रवेश मिळणे अवघड नाही; मात्र मनासारख्या आणि दर्जेदार संस्थेत प्रवेश हवा असेल, तर सीइटीतील गुणच कामी येतात. त्यादृष्टिने आतापासूनच नियोजन करावे.
०००
हॉस्पिटॅलिटी ॲण्ड फॅसिलिटीज मॅनेजमेंट
डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पुम्बा) ही संस्था व्यवस्थापनविषयक शिक्षण-प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील महत्वाची आणि प्रतिष्ठित संस्था आहे. १९७१ साली स्थापन झालेल्या या संस्थेचा, व्यवस्थापनशाखेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करणाऱ्या देशातील पहिल्या काही संस्थांमध्ये समावेश होतो.
या संस्थेने, बीबीए इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड फॅसिलिटीज मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम २०१८ सालच्या जुलै महिन्यात सुरु केला. कला, वाणिज्य, विज्ञान किंवा व्होकेशनल या शाखांपैकी कोणत्याही शाखेतून १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरतो. १२ वीमध्ये खुल्या संवर्गातील विद्यार्थ्याला ४५ टक्के आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्याला ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक असून, इंग्रजी हा विषय असणेही बंधनकारक आहे. प्रवेश सीइटीच्या गुणांवर आधारित कॅप प्रक्रियेतून होतात; यासाठीचा संस्था संकेतांक (इंस्टिट्यूट कोड) ६००१ असा आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पुनर्रचित हा अभ्यासक्रम १७० श्रेयांकांचा (क्रेडिट) असून प्रत्येक सत्रात २० ते २२ श्रेयांक पूर्ण करावे लागतात.
याच विभागाने बीबीए इन फॅसिलिटी ॲण्ड सर्व्हिसेस मॅनेजमेंट (एफएसएम) हा शिकाऊ उमेदवारी अंतर्भूत (ॲप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रॅम- एईडीपी) स्वरुपाचा आणखी एक अभ्यासक्रम सुरु केला असून त्याच्या जागा विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रात आहेत. या अभ्यासक्रमाचे प्रवेश मात्र सीइटीमधून नव्हे, तर विद्यापीठाच्या स्वत:च्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेतून (एसपीपीयू- ओइइ) होतात.
काय शिकाल?
या अभ्यासक्रमात पुढील विषयघटकांचा समावेश आहे- (१) आंत्रप्र्युनरशिप डेव्हलपमेंट ॲण्ड प्रोजेक्ट मॅनेजमेंट (उद्योजकता विकास आणि प्रकल्प व्यवस्थापन), (२) ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट (मनुष्यबळ व्यवस्थापन), (३) ॲडव्हान्स्ड हॉस्पिटॅलिटी ॲण्ड फॅसिलिटीज ऑपरेशन्स (प्रगत आतिथ्य आणि सुविधा संचालन), (४) मॅक्रो आणि मायक्रो इकॉनॉमिक्स (समग्रलक्षी आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र), (५) रिटेल मॅनेजमेंट (किरकोळ विक्री व्यवस्थापन), (६) टुरिझम मॅनेजमेंट (पर्यटन व्यवस्थापन), (७) फायनांशिअल मॅनेजमेंट (वित्तीय व्यवस्थापन), (८) मार्केटिंग मॅनेजमेंट (विपणन व्यवस्थापन), (९) डिझास्टर मॅनेजमेंट (आपत्ती व्यवस्थापन), (१०) सप्लायचेन मॅनेजमेंट (पुरवठा साखळी व्यवस्थापन), (११) हॉस्पिटॅलिटी ॲण्ड फॅसिलिटीज मॅनेजमेंट (आतिथ्य आणि सुविधा व्यवस्थापन), (१२) ॲनॅलिटिक्स ॲण्ड डाटा प्रोटेक्शन (विश्लेषणशास्त्र आणि विदा संरक्षण), (१३) ऑर्गनायझेशनल बिहेव्हिअर (संघटनात्मक वर्तन), (१४) बिझिनेस स्टॅटिस्टिक्स (व्यावसायिक संख्याशास्त्र), (१५) ॲडव्हान्स्ड हॉस्पिटॅलिटी स्किल्स (प्रगत आतिथ्य कौशल्ये), (१६) बिझिनेस इथिक्स (व्यवसाय नीतिमूल्ये), (१७) बिझिनेस लॉ (व्यवसायविषयक कायदा), (१८) एनव्हीरॉन्मेंटल सायंस (पर्यावरणशास्त्र), (१९) इंग्लिश फॉर बिझिनेस कम्युनिकेशन (व्यावसायिक संवादासाठीचे इंग्रजी), (२०) ईकॉमर्स (ई-वाणिज्य), (२१) फॅसिलिटीज ऑपरेशन स्किल्स (सुविधा संचालन कौशल्ये), (२२) बिझिनेस मॅथेमॅटिक्स (व्यावसायिक गणित), (२३) इव्हॉल्यूशन ऑफ इंडियन सर्व्हिस इंडस्ट्री (भारतीय सेवा उद्योगाची वाटचाल), (२४) बेसिक्स ऑफ हॉस्पिटॅलिटी स्किल्स (आतिथ्य कौशल्यांची मूलतत्वे), (२५) फंडामेंटल्स ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (संगणक उपयोजनाची मूलतत्वे), (२६) इंटरनॅशनल रिटेल मॅनेजमेंट (आंतरराष्ट्रीय किरकोळ विक्री व्यवस्थापन), (२७) इंटरनॅशनल टुरिझम मॅनेजमेंट (आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यवस्थापन), (२८) इंटरनॅशनल फायनांशिअल मॅनेजमेंट (आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन), (२९) इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट (आंतरराष्ट्रीय विपणन व्यवस्थापन), इत्यादी
करिअर संधी
तीन वर्षे कालावधीचा हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील करिअर संधी मिळतात- (१) इव्हेंट मॅनेजमेंट (कार्यक्रम व्यवस्थापन), (२) फॅसिलिटीज मॅनेजमेंट (सुविधा व्यवस्थापन), (३) हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट (आतिथ्य व्यवस्थापन), (४) रिटेल मॅनेजमेंट (किरकोळ विक्री व्यवस्थापन), (५) ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट (प्रशासकीय व्यवस्थापन), (६) सेल्स ॲण्ड मार्केटिंग (विक्री आणि विपणन), (७) बँकिंग ॲण्ड फायनांस (बँकिंग आणि वित्तव्यवहार), (८) ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम (प्रवास आणि पर्यटन), (९) कस्टमर रिलेशनशीप ॲण्ड केअर (ग्राहक संबंध आणि ग्राहक सेवा)
संपर्क- https://pumba.in. सीइटी आणि प्रवेश प्रक्रियेच्या अद्ययावत माहितीसाठी- www.mahacet.org / cetcell.mahacet.org, मदतकक्ष दूरध्वनी- १८००२०९०१९१
सुरेश वांदिले