(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा- ६२-  बारावी बोर्डाच्या परीक्षेचं महत्व नेमकं काय?

दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे समजले जातात. पण गेल्या काही वर्षांत या दोन्ही परीक्षांपेक्षा जेईई, नीट या परीक्षांच्या अभ्यासाला अधिक महत्त्व दिलं जात असल्याने दहावी आणि बारावी बोर्डाच्या अभ्यासाकडे बहुसंख्य विद्यार्थी दुर्लक्ष करतात.

बोर्डाच्या परीक्षेत जेमतेम किंवा बऱ्यापैकी गुण मिळाले की झाले, फार कष्ट करायची गरज नाही, अशीही एक समजूत दृढ होत चाललीय. विशेषत: १२ वीमध्ये बरीच मुलं केवळ प्रात्यक्षिकांसाठीच महाविद्यालयात प्रवेश घेतात, बाकी त्यांचा संपूर्ण वेळ हा शिकवणी वर्गातच जातो.

दुर्लक्षाचे परिणाम १२ वी नंतरच्या वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जेईई किंवा नीट सारख्या चाळणी परीक्षेतीलच गुण महत्त्वाचे असल्याने, विद्यार्थी तिकडेच अधिक लक्ष केंद्रित करतात, किंबहुना त्यांच्या मनावर तसंच बिंबवण्यात येतं. परिणामी ही मुलं १२ वीच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेत बऱ्याच जणांना यथातथाच गुण मिळतात. पालक आणि विद्यार्थ्यांना याचं फारसं सोयरसुतक नसल्याचंही दिसून येतं.

१२ वी बोर्डाचे गुण फार महत्त्वाचे नसण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. बऱ्याच पालक आणि विद्यार्थ्यांना हे ठाऊक नसते की, १२ वी बोर्डाच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळाले तर भविष्यात उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेताना, चाळणी परीक्षांमधील गुणांसोबत या गुणांचाही विचार केला जातो. याची काही उदाहरणं पुढीलप्रमाणे देता येतील:

  1. आयआयटी मुंबईच्या अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये (SJMSoM) एमबीए प्रवेशाच्या वेळी, १० वी व १२ वीमधील गुणांना अतिरिक्त वेटेज दिलं जातं.

  2. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) रांचीच्या एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, १० वी आणि १२ वीमध्ये ८५ टक्क्यांच्यावर गुण असल्यास प्रत्येकी गुण दिले जातात.

  3. आयआयएम मुंबईच्या एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश देताना १० वी आणि १२ वी मधील गुणांच्या टक्केवारीनुसार अचूक वेटेज दिले जाते. अशाच प्रकारे इतरही आयआयएमच्या धोरणानुसार १० वी आणि १२ वीतील गुणांना अंतिम गुणवत्ता यादीचे गुणांकन करताना अतिरिक्त वेटेज दिले जातं.

  4. आयआयटीमधील प्रवेशासाठी खुल्या संवर्ग आणि नॉन क्रिमिलेअर ओबीसी संवर्गातील उमेदवारांना १२ वीमध्ये किमान ७५% (किंवा संबंधित बोर्डाचे टॉप २० परसेंटाईल) आणि राखीव संवर्गातील उमेदवारांना किमान ६५% गुण मिळणे आवश्यक आहे. समजा एखाद्या खुल्या संवर्गातील विद्यार्थ्याला जेईई ॲडव्हान्सडमध्ये उत्तम गुण मिळाले, परंतु १२ वीत ७४ टक्केच गुण मिळाले तर त्याला आयआयटीच्या प्रवेशापासून वंचित राहावे लागेल.

  5. भारतीय नौदलाच्या १०+२ बीटेक या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विषयात सरासरीने किमान ७०% गुण मिळवणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाला जेईई-मेन मधील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. मात्र एखाद्या विद्यार्थ्यास जेईई-मेन मध्ये उत्तम गुण मिळवूनही, १२ वीमध्ये निर्धारित गुण मिळाले नाहीत तर, त्याचा प्रवेशासाठी विचार केला जात नाही.

  6. भारतीय लष्कराच्या १०+२ बीटेक अभ्यासक्रम प्रवेशासाठीही जेईई-मेनचे गुण ग्राह्य धरले जातात. मात्र अशा विद्यार्थ्यांना १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित यामध्ये सरासरीने किमान ६०% गुण मिळायला हवेत. अन्यथा प्रवेशापासून वंचित राहावे लागते.

  7. बिट्स पिलाणी यासारख्या नामांकित खाजगी संस्थेत बीई/बीटेक प्रवेशासाठी १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विषयांमध्ये सरासरीने किमान ७५% गुण मिळणे आवश्यक आहे. शिवाय या प्रत्येक विषयात किमान ६०% गुण मिळायलाच हवेत.

  8. एसपीजैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च (SPJIMR), या संस्थेतील एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना, विद्यार्थ्यांना १० वी आणि १२ वीतील गुणांकडे विशेष लक्ष दिले जाते. विद्यार्थ्यांना या दोन्ही परीक्षांमध्ये उच्चश्रेणीचे गुण मिळाले असल्यास, त्याचा प्रवेशासाठी सकारात्मक परिणाम होतो.

भविष्यातील फायदा १० वी आणि १२ वीमध्ये उत्तम गुण असल्यास भविष्यातही वेगवेगळ्या संस्थांमधील प्रवेशाच्या वेळी लाभ होतो. प्लेसमेंटच्या वेळी नियुक्तीकर्त्यांच्या लक्षात गुणांतील सातत्य येते. याचा परिणाम मुलाखतीच्या वेळी व्यक्तिमत्त्वाची सर्वांगीण चाचपणी करताना, मुलाखतकर्ते किंवा नियुक्ती अधिकारी यांच्यामार्फत अधिक अनुकूलता दाखवण्यासाठी होतो.

मानसिकता बदलण्याची गरज नीट, जेईई अशा चाळणी परीक्षांना बसण्यासाठी किमान अर्हता असणारे, १२ वीमध्ये गुण मिळवले तर चालले, ही मानसिकता बदलण्याची गरज यामुळेच आहे. दहावी आणि बारावीतील गुणसुद्धा विद्यार्थ्यांचे पाणी किती खोल आहे, हे जोखण्यासाठी उपयुक्त ठरतात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक माहिती किंवा परिचयपत्रामध्ये (CV) १० वीपासूनच्या पुढील सर्व परीक्षांचे गुण हे त्याच्या व्यक्तिमत्त्वावर आणि बुद्धिमत्तेवर प्रकाश टाकत असतात. शैक्षणिक कामगिरीतील सातत्य यातून लक्षात येते. याचा निश्चितपणे लाभ होतो. त्यामुळेच १२ वीच्या अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष न करणे अधिक चांगले.

१२ वी बोर्डाच्या क्रमिक पुस्तकांतील सर्व विषयघटकांचा सखोल अभ्यास केला, त्यातील सर्व संकल्पना समजून घेतल्यास प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी किंवा स्पर्धा परीक्षेतही उत्तम यश मिळू शकते. कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (CUET) या परीक्षेचा मूळ पायाच हा १२ वी बोर्डाचा अभ्यासक्रम आहे. एवढाच अभ्यास करून विद्यार्थ्यांनी ही परीक्षा द्यावी, असे साधारणत: अपेक्षित आहे.

शिकवणी वर्गात जाणारे जे चाणाक्ष विद्यार्थी १२ वी बोर्डाच्या अभ्यासक्रमाकडेही तितकेच मनापासून लक्ष देतात, त्यांना जेईई किंवा नीट किंवा इतर चाळणी परीक्षा कठीण जात नाही. त्यामुळेच क्रमिक पुस्तकातील विषय घटकांमुळेच अभ्यासाचा पाया मजबूत होतो, ही बाब ध्यानात घ्यायला हवी. शिवाय कोणत्याही पद्धतीचे प्रश्न समोर आल्यास, ते सोडवण्याची क्षमताही या अभ्यासामुळेच प्राप्त होते.

जेईई किंवा नीटच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून बरेच विद्यार्थी १२ वी बोर्डाच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. शिकवणी वर्गाचे चालक या दोन परीक्षांच्या अभ्यासावरच १२ वी बोर्डाच्या परीक्षेत कामचलाऊ किंवा चांगलेही गुण मिळवू शकतो, असे वातावरण निर्माण करतात. पालकांनासुद्धा चाळणी परीक्षेच्या गुणांमध्येच अधिक रस असल्याने ते मुलांच्या १२ वीच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात किंवा मग कानाडोळा करतात.

बरेच पालक १० वी आणि १२ वीच्या वर्षात आम्ही मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्यासाठी सुटी घेतली किंवा बऱ्याच तडजोडी केल्या, वगैरे सांगत असतात. पण ही मंडळी अभ्यासाकडे लक्ष देतात म्हणजे चाळणी परीक्षेच्या अभ्यासावर देतात किंवा लक्ष ठेवून असतात. १२ वी बोर्डाच्या अभ्यासक्रमाकडे कितपत लक्ष ठेवले जाते, मुलाची यातील प्रगती कितपत लक्षात घेतली जाते, हा संशोधनाचा विषय ठरू शकतो.

याची विस्ताराने चर्चा करण्याचे कारण म्हणजे १२ वीच्या गुणांनासुद्धा भविष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवरील प्रवेशाच्या वेळी आणि प्लेसमेंटच्या वेळी महत्त्व दिले जाते. व्यक्तिमत्त्व तपासणीचा, अभ्यासातील सातत्य तपासणीचा हा एक आधार ठरू शकतो. आयआयएम वा इतर दर्जेदार संस्थांमधील एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या वेळी अतिरिक्त वेटेज दिले जाते, याची कल्पना यावी. स्पर्धा प्रचंड असल्याने, आता अशा शुल्लक वाटणाऱ्या बाबीकडे झालेले दुर्लक्ष पुढे महागात पडू शकते. तेव्हा नशिबाला किंवा इतर अनावश्यक व आभासी घटकांना दोष दिला जातो. तसे केल्याने स्वतःशीच फसवणूक होते, हे लक्षात घेतलेले बरे. त्यामुळे चाळणी परीक्षेच्या अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांनी १२ वी बोर्डाच्याही अभ्यासक्रमाकडे अधिक लक्ष देण्याची आणि यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे.

सुरेश वांदिले