(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 मार्ग यशाचा- ६३-सीइटीचे महत्व कां?

 

नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या मुलीचे पालक आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी असलेल्या कोचिंग क्लासला भेटून आले होते. या शिकवणी वर्गाच्या संचालकांनी त्यांच्या क्लासमध्ये जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेईई)ची जय्यत तयारी करून दिली जात असल्याने १०० टक्के यशाची हमी दिली. प्रत्येक शिकवणी वर्ग असेच सांगतो. ही परीक्षा दिली तर राज्य शासनाच्या सीईटीचीही तयारी होऊन जाते, असेही ठासून सांगतात.

 

जेईई प्रवेशपरीक्षा शिकवणी वर्गाच्या संचालकांना भेटून आलेल्या पालकांना महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येच मुलीला टाकायचे आहे. त्यातही त्यांची पहिली पसंती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. त्यांनी तसे स्पष्टही केले. महाराष्ट्रातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश जेईईने शक्य असल्याचे संचालकांनी सांगितले. खरेतर वस्तुनिष्ठ माहिती द्यायला हवी होती.

जेईई मेन किंवा जेईई ॲडव्हान्स्डच्या गुणांवर राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश दिला जात नाही. राज्यातील खाजगी शिक्षण संस्थांमधील १५ ते २० टक्के जागा जेईई मेनमधील गुणांवर भरल्या जातात. पण या जागा केवळ महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव नसतात. त्यांचे स्वरूप अखिल भारतीय आहे. म्हणजे देशातील कोणत्याही राज्यातील विद्यार्थी अर्ज करू शकतो. महाराष्ट्रातील मुलेही इतर राज्यातील खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये १५ ते २० टक्के प्रवेशाचा पर्याय निवडू शकतात.

जेईई-मेनच्या गुणांवर नागपूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) या संस्थेत प्रवेश मिळतो. पण ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी संस्था आहे. देशातील सगळ्या एनआयटीमधील प्रवेश जेईई-मेनच्या गुणांवर होतात. नागपूर एनआयटीमध्ये ५० टक्के जागा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असल्या तरी त्यांची संख्या सुमारे ३५० ते ३७५ च्या आसपास असते. त्यातही वेगवेगळ्या संवर्गासाठी राखीव जागा असतात. जेईई ॲडव्हान्स्डचे गुण केवळ आयआयटीच्या प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातात. या सगळ्या बाबी शिकवणी वर्ग चालकांनी पालकांना स्पष्ट करून सांगितल्या पाहिजेत.

 

सीईटीचे महत्त्व 

ज्या पालकांना आपल्या मुलाला किंवा मुलीला राज्यातील शासकीय आणि दर्जेदार खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये टाकावयाचे असेल, त्यांच्यासाठी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (सीईटी) चा पर्याय सर्वोत्तम ठरतो. ही सीईटी शासनाच्या सीईटी सेल मार्फत घेतली जाते.

यंदापासून (२०२६-२७ प्रवेशासाठी) ही परीक्षा दोन वेळा घेतली जाणार आहे. दोन्ही परीक्षा देण्याचा किंवा कोणतीही एक परीक्षा देण्याचा पर्याय विद्यार्थी निवडू शकतात. दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळतील, ते प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील. अशी प्रक्रिया जेईईसाठीही राबवली जाते. यामुळे विद्यार्थ्यांना कामगिरी सुधारण्याची संधी मिळते. काही कारणाने पहिली परीक्षा अवघड गेल्यास दुसऱ्या परीक्षेचा पर्याय स्वीकारायला हवा.

या परीक्षेची काठीण्य पातळी जेईईसारखीच असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. तथापि सीईटीचा संपूर्ण अभ्यासक्रम ११वी आणि १२वीच्या उच्च माध्यमिक बोर्डाच्या क्रमिक पुस्तकातील विषय घटकांवर आधारित असतो. त्यामुळे हा अभ्यास समजून-उमजून केलेल्या विद्यार्थ्यांना सीईटीत चांगले गुण मिळू शकतात. या परीक्षेत निगेटिव्ह गुणांकन नाही. ही सुद्धा एक जमेची बाजू आहे. त्यामुळे जेईईच्या अभ्यासातच सीईटीचाही अभ्यास होऊन जातो, असे सांगणाऱ्या शिकवणी वर्गांच्या संचालकांकडे दुर्लक्ष केलेले चांगले असले तरी हा निर्णय ज्याचा त्यानेच घ्यावयाचा आहे.

महाराष्ट्रातीलच अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे एकदा मनात पक्के ठरवल्यावर जेईईच्या वाटेने जाण्याचा विचारही करू नये. जेईईच्या ऐवजी सीईटीच्या तयारीवर संपूर्ण लक्ष केंद्रित केल्यास अधिक फायद्याचे ठरू शकते.

काही चतुर पालक आणि विद्यार्थी हा मार्ग स्वीकारतात. त्याचे फळ त्यांना चांगले मिळते. जेईईसाठी प्रचंड अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याला जेईईमध्ये विशिष्ट गुण मिळाले नाहीत तर चांगली एनआयटी किंवा आयआयआयटी मिळत नाही. दोन्ही चाळणी परीक्षांच्या अभ्यासक्रमांचा दर्जा आणि परीक्षा पद्धती वेगळी असल्याने बरेचदा अशा विद्यार्थ्याची सीईटी चांगली जात नाही. त्यामुळे त्याला महाराष्ट्रातील शासकीय वा इतर टॉपच्या खाजगी महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण जाते. याउलट सीईटीवर लक्ष केंद्रित केलेली मुले व्हीजेटीआय, सीओईपी, अमरावती, कराड व इतर ठिकाणची शासकीय महाविद्यालये तसेच सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयासारखी शासन अनुदानित महाविद्यालये आणि गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागात असलेल्या नामवंत खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात सुलभतेने प्रवेश मिळवतात.

गोंधळ टाळा 

त्यामुळेच कोणती चाळणी परीक्षा द्यायची आणि कशासाठी द्यायची, हे पालक व पाल्यांनी आधी स्पष्ट करून घ्यायला हवे. त्यामुळे कोणताही गोंधळ राहणार नाही. तयारीची दिशा नेमकी माहीत असल्याने सीईटीच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येईल. अनावश्यक महागडे शिकवणी वर्ग लावण्याची गरज भासणार नाही. या वर्गातील जाण्या-येण्यासाठीचा वेळही वाचेल. सीईटीचा अभ्यास आणि १२वी बोर्डाचा अभ्यास समांतररित्या होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही परीक्षांत चांगले गुण मिळू शकतात.

स्वत:ची क्षमता जोखा 

जेईईची परीक्षा नेमकी कशासाठी द्यायची, हेही पालक आणि पाल्यांनी मनात स्पष्ट करून घ्यायला हवे. आयआयटीतील प्रवेश हेच स्वप्न असल्यास त्यासाठी कसून मेहनत हा एक भाग झाला. पण स्वत:च्या बौद्धिक क्षमतेचा पारदर्शकपणे विचार करूनच ही मेहनत केल्यास त्याचे फळ मिळू शकेल. अन्यथा अपयशाचे दार आपणच उघडू, हे पक्के समजावे. आपल्या बौद्धिक कुवतेचा अंदाज आल्यावर जेईई-मेनवरच लक्ष केंद्रित करून एनआयटी, आयआयआयटी सारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळवता येऊ शकेल.

कोणत्या एनआयटी किंवा आयआयआयटीमध्ये प्रवेश मिळवायचा, याचीही स्पष्टता मनात केलेली बरी. कारण काही एनआयटी आणि आयआयआयटीमधील प्रवेशासाठी जेईई-मेनमध्ये बरेच गुण लागतात. विशेषतः नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) या शैक्षणिक संस्थांच्या गुणानुक्रमाच्या सर्वेक्षणात सर्वोच्च क्रमांक मिळवणाऱ्या एनआयटी आणि आयआयआयटी संस्थेत प्रवेशासाठी अधिक चुरस असते. त्यासाठी अधिक गुण मिळवावे लागतात. त्यामुळे आपल्याला कोणत्या संस्थेत प्रवेश मिळवायचा, हे लक्षात ठेऊन जेईई-मेनच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे लागते. यासाठी गेल्या वर्षीच्या वेगवेगळ्या संवर्गातील कटऑफ किती होते, याची माहिती घेतल्यास प्रवेशासाठी असणारी स्पर्धा लक्षात येऊ शकते.

एनआयआरएफ क्रमवारी (NIRF २०२५ Engineering ) 

एनआयआरएफ २०२५ मध्ये अभियांत्रिकी/तंत्रज्ञान श्रेणीत टॉप NITs पुढीलप्रमाणे आहेत: 

(१) एनआयटी तिरुचिरापल्ली – क्रमांक ९ 

(२) एनआयटी रुरकेला, ओडिशा – क्रमांक १३ 

(३) एनआयटी कर्नाटक, सुरतकल – क्रमांक १७ 

(४) एनआयटी कालिकत (कोझिकोड), केरळ – क्रमांक २१ 

(५) एनआयटी वरंगल, तेलंगाणा – क्रमांक २८ 

(६) मलवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जयपूर – क्रमांक ४२ 

(७) विश्वेश्वरय्या एनआयटी नागपूर – क्रमांक ४४ 

(८) एनआयटी दुर्गापूर, पश्चिम बंगाल – क्रमांक ४९ 

(९) एनआयटी सिलचर, आसाम – क्रमांक ५० 

(१०) एनआयटी पाटणा – क्रमांक ५३ 

(एनआयटी दिल्ली – क्रमांक ६५)

या क्रमवारित दरवर्षी बदल होत राहतो. एक-दोन किंवा चार क्रमांकांनी बदल होतो. त्यामुळे या एनआयटींच्या गुणवत्ता आणि दर्जामध्ये खूप फरक पडेल, असे काही होत नाही. ही क्रमवारी कोणत्या संस्थेत प्रवेशासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे, यासाठी दिशादर्शक ठरू शकते. अशीच क्रमवारी आयआयआयटीबाबतही लक्षात घ्यावी.

कोणत्याही संस्थेत प्रवेश मिळाला तरी चालू शकते, अशी भावना ठेवल्यास प्रयत्न कमी पडू शकतात. सर्वच एनआयटी आणि आयआयआयटी यांना केंद्र शासनाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्पॉर्टन्सचा दर्जा दिला असला तरी, या संस्थांबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेले पर्सेप्शन, प्लेसमेंटसाठी येणाऱ्या कंपन्या, औद्योगिक घटकांसोबत असलेली संपर्क साखळी, संशोधन सुविधा आदी बाबींचा क्रमवारी काढताना विचार केला जातो. 

(जेईई-मेन परीक्षेतील गुणांचा आधार घेऊन मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या शासकीय संस्थेतील बॅचलर ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाच्या एकूण ७५ जागा असून त्यापैकी ७० टक्के जागा सीईटीने आणि ३० टक्के जागा अखिल भारतीय स्वरूपाच्या असल्याने जेईईने भरल्या जातात. त्यासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसह देशातील सर्व राज्यातील विद्यार्थी अर्ज करू शकतात.)

सुरेश वांदिले