(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

नवा धडा

तेजोमयीच्या घरी बाप्पांचं आगमन झालं. बाप्पांना मखरात बसवलं गेलं. सजावटीसाठी बाबांनी खूप फुलं आणली होती. आई, बाबा आणि तेजोमयी या तिघांनीही मिळून छान सजावट केली. मखरात बसलेला  कुणीतरी खासा असल्याचं अलेक्झांडरला कळलं. त्यामुळे तोही कौतुकानं तिघांच्या सजावटीकडे बघू लागला.

हे तिघेही काम करताहेत नि आपणास काहीच करता येत नाही, याची खंत अलेक्झांडरला वाटली असावी म्हणून मग त्याने फुलांची पिशवी उचलली नि इकडून तिकडे फिरवून आणली. पुन्हा तो तिघांकडे आणि नंतर बाप्पांकडे उत्सुकतेनं बघू लागला. थोड्याच वेळात पुन्हा अस्वस्थ झाला. त्याने पुन्हा फुलांची पिशवी उचलली नि इकडून तिकडे फिरवून आणली.

अरे, तुझं चाललय तरी काय, जरा शांत बसना,तेजोमयी अलेक्झांडरला रागावली. पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं नि फुलाची पिशवी इकडून तिकडे पुन्हा फिरवून आणली. अलेक्झांडर आपलं ऐकत नाही हे बघून तेजोमयीने आईकडे त्याची तक्रार केली.

आई, समजाव गं तुझ्या लाडक्याला.”

काय रे ठोंब्या, कां असा अस्वस्थ झालास तू. शांत बसना जरा.आईने त्याला समजावलं. आईचं  समजावणं अलेक्झांडरला बरोबर कळतं. त्यामुळे तो काही वेळ, मान जमिनीस टेकवून शांतपणे बसला. पण पुन्हा अस्वस्थ झाला. यावेळी त्याने फुलांची पिशवी घेतली आणि तिला उपडी केली. सर्व फुलं खाली सांडली.

अरे, काय चाललय अलेक्झू तुझं हे, शांत बसना गधड्या.बाबा त्याच्यावर जोरात ओरडले. त्यामुळे बिचारा चांगलाच दचकला. आता, आई अलेक्झांडरचे कान नक्कीच उपटेल, असं तेजोमयीला वाटलं. पण झालं भलतचं. आई बाबांना रागवत म्हणाली,

अहो, असं ओरडू नका बिचाऱ्यावर.

म्हणे बिचारा ! बाबांचा राग अजून गेला नव्हता.

अहो,जरा शांत व्हा. अलेक्झांडर मघा दोनदा फुलांची थैली घेउुन इकडून तिकडे करुन आला. आता त्याने फुलांची थैली खाली उपडी केली. याचा अर्थ कळतय का तुम्हास?”

कसा अर्थ आई?” तेजोमयीनं विचारलं.

सगळा अनर्थ !बाबा रागातच म्हणाले.

अहो, हा मघापासून आपण तिघेही बाप्पांची आरास करतोय हे बघतोयना, त्यालाही तसंच करावसं वाटत असलं पाहिजे. तो त्याच्या पध्दतीनं तेच सांगत असावा. पण आपल्या ते लक्षातच आलं नाही. म्हणून शेवटचा उपाय म्हणून त्याने पिशवीच उपडी केली. बरोबरना रे माझ्या राज्या? प्रेमाने त्याच्याकडे बघत आई म्हणाली.

आई, काही होकारार्थी बोलली की अलेक्झांडरला ते बरोबर कळतं. आईने आपली बाजू घेतल्याचं त्याच्या लक्षात येताच तो मान आणि शेपूट दोन्ही हलवून आईच्या कुशीत शिरला. आईने त्याच्या पाठीवरुन मायेने हात फिरवला. त्याला एक झेडुंचं फुल दिलं. त्याने ते हळूवारपणे मखरासमोर ठेवलं. बाप्पांनाही दंडवत घातला. बाबांचा राग कुठल्याकुठे पळून गेला. त्यांनी अलेक्झांडरला पोटाशी धरलं. तेजोमयीस गहिवरुन आलं. शेपूटवाल्या दोस्तांच्या प्रत्येक कृतीकडे अधिक काळजीपूर्वक बघण्याचा नवा धडा तिला मिळाला.

सुरेश वांदिले

०००