(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा- ६६ – फूड प्रॉडक्शन नि बेकरी कंस सुरु करणार?

इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड न्यूट्रिशन, मुंबई ही आतिथ्यशीलता आणि हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची संस्था आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या या संस्थेने कौशल्य विकासाला प्राधान्य देणारे काही पदविका अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करता येतात. या अभ्यासक्रमांची रचना अशी केली आहे की, त्यातून विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी सहज उपलब्ध व्हाव्यात. हे अभ्यासक्रम प्रात्यक्षिकावर अधिक भर देणारे आहेत. संस्थेकडे उत्तम प्रयोगशाळा (किचन), आधुनिक उपकरणे आहेत आणि विद्यार्थ्यांना ती हाताळण्याची संधी मिळते.

पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सूचना वेळोवेळी जाहीर केली जाते. बारावीनंतर या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या पर्यायाचा विचार करावा. कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. बारावीत इंग्रजी विषय अनिवार्य आहे. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची बारावीतील गुणांनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्यानंतर मुलाखती घेतल्या जातात आणि अंतिम निवड होते.

सर्व पदविका अभ्यासक्रमांचा कालावधी दीड वर्षे आहे. त्यापैकी एक वर्ष संस्थेत सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाते. त्यानंतर कंपन्या किंवा औद्योगिक घटकांमध्ये सहा महिने औद्योगिक प्रशिक्षण (इंटर्नशिप) करावे लागते.

 

पदविका अभ्यासक्रम

 (१) डिप्लोमा इन फूड प्रॉडक्शन 

हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना हॉटेल, रेस्टॉरंट, फास्ट फूड आउटलेट, रिसॉर्ट, रेल्वे/एअरलाइन्स/जलवाहतूक खानपान सेवा इत्यादी क्षेत्रांत करिअर संधी उपलब्ध होतात. अभ्यासक्रमात पोषण मूल्ये, खाद्यपदार्थांचे मूल्य/किंमत, स्वयंपाकशास्त्र, अन्नपदार्थांची साठवणूक, स्वच्छता, आरोग्यदायी काळजी, वस्तू व पदार्थ यांचा समावेश आहे. वाणिज्यिक स्वरूपाच्या अन्नपदार्थांच्या पाककृती निर्मितीचे तंत्र आणि कौशल्य शिकवले जाते. भारतीय, चायनीज आणि कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थांचे प्रशिक्षण दिले जाते. भाज्या, मांस कापणे, फळे-भाज्या सजवणे आणि कोठार व्यवस्थापनाचे प्रशिक्षणही दिले जाते.

 (२) डिप्लोमा इन बेकरी अँड कन्फेक्शनरी

बेकरी उत्पादनाशी संबंधित विषयांचे सखोल ज्ञान दिले जाते. ब्रेड निर्मिती, पेस्ट्री, केक डेकोरेशन, चॉकलेट डेकोरेशन यांचा समावेश आहे. व्यवसायासाठी आवश्यक संवाद कौशल्य आणि संगणकीय ज्ञानही दिले जाते. बेकर्स, पेस्ट्री शेफ, चॉकलेटिअर्स, डेझर्ट स्पेशलिस्ट अशा करिअर संधी उपलब्ध होतात.

 (३) डिप्लोमा इन फूड अँड बिव्हेरेजेस सर्व्हिस 

अन्नपदार्थ आणि पेय सेवा क्षेत्रासाठी लागणारे तंत्र व कौशल्य शिकवले जाते. अन्नपदार्थ सेवा, विविध पेय सेवा, अन्न व पेये नियंत्रण, स्वच्छता व आरोग्य, व्यवसाय संवाद, रेस्टॉरंट व्यवस्थापन, बार व्यवस्थापन आणि कार्यान्वयन यांचा समावेश आहे.

 (४) डिप्लोमा इन हाऊसकीपिंग 

आतिथ्यसेवा केंद्रांच्या (हॉटेल/गेस्ट रूम/निवासस्थाने) दैनंदिन देखभालीची कार्यपद्धती, अंतर्गत सजावट, देखभाल-दुरुस्ती, स्वच्छता व आरोग्य, व्यवसाय संवाद यांचा समावेश आहे.

(५) डिप्लोमा इन फ्रंट ऑफिस ऑपरेशन 

आतिथ्यसेवेच्या कार्यालयाचे कामकाज, कार्यपद्धती, लेखाविषयक बाबी, हॉटेल लेखा, व्यवसाय संवाद आणि संगणकाचा वापर शिकवला जातो.

क्राफ्ट कोर्स इन प्रोफेशनल बारटेंडिंग 

कालावधी सहा महिने. कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण (इंग्रजी विषय अनिवार्य) विद्यार्थ्यांना करता येतो. बारावीतील गुण आणि मुलाखतीवर आधारित प्रवेश. पंचतारांकित हॉटेल्समध्ये रोजगाराची संधी मिळू शकते.

रोजगार से हुनर (हुनर से रोजगार) 

आतिथ्य सेवा उद्योगासाठी कौशल्ययुक्त मनुष्यबळ निर्मितीसाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू आहेत. किमान अर्हता आठवी उत्तीर्ण. 

(१) बेकरी – कालावधी आठ आठवडे, वयोमर्यादा १८ ते २८ वर्षे. 

(२) फूड अँड बिव्हेरेज – सहा आठवडे, १८ ते २८ वर्षे. 

(३) फूड प्रॉडक्शन – आठ आठवडे, १८ ते २८ वर्षे. 

(४) हाऊसकीपिंग युटिलिटी – सहा आठवडे, १८ ते २८ वर्षे.

प्रशिक्षण सुविधा 

औद्योगिक प्रशिक्षण, इंटर्नशिप आणि प्लेसमेंटच्या संधी द लीला, मॅरियट, हिल्टन, फोर सीझन्स, नोव्होटेल, आयटीसी, हयात, ताज, ओबेरॉय, ट्रायडंट, मेरिडियन, रॅडिसन, फेअरमॉंट, हॉलिडे इन, सॉफिटेल, इंटरकंटिनेंटल इत्यादी संस्थांमध्ये उपलब्ध होतात.

**संपर्क** 

इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड न्यूट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई – ४०००२८ 

दूरध्वनी: ०२२-४५२८४१०० 

ईमेल: admissions@ihmctan.edu / info@ihmctan.edu 

संकेतस्थळ: www.ihmctan.edu

**सर्वोत्कृष्ट संस्था – आयएचएम पुसा, नवी दिल्ली** 

नवी दिल्लीस्थित इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग अँड न्यूट्रिशन (पुसा) ही पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी संस्था आहे. आतिथ्यशीलता आणि हॉटेल व्यवस्थापन शिक्षणातील देशातील सर्वोत्कृष्ट संस्थांपैकी एक मानली जाते.

येथेही कौशल्य विकासास प्राधान्य देणारे पुढील पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत: 

(१) डिप्लोमा इन बेकरी अँड कन्फेक्शनरी – १२० जागा 

(२) डिप्लोमा इन फूड अँड बिव्हेरेजेस सर्व्हिस – ६० जागा 

(३) डिप्लोमा इन फूड प्रॉडक्शन – १२० जागा 

तिन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी दीड वर्षे आहे (एक वर्ष संस्थेत + सहा महिने औद्योगिक प्रशिक्षण). कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण (इंग्रजी विषय अनिवार्य) विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. चाळणी परीक्षा नाही. बारावीतील गुणांनुसार गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रम साधारणतः जुलै-ऑगस्ट मध्ये सुरू होतो.

**प्रशिक्षण संधी** 

डिव्हाइन बेकरी, कॅफे दिल्ली, क्राउन प्लाझा, फोर सीझन्स, गझल रेस्टॉरंट, ग्रँड हयात, हॉलिडे इन, हयात रिजेन्सी, आयटीसी ग्रँड/मौर्य/शेरटन, जे डब्ल्यू मॅरियट, ली मेरिडियन, ओबेरॉय, प्राइड प्लाझा, रॅडिसन ब्लू, शांग्रिला, ताज, द ललित, लीला पॅलेस, ओबेरॉय राज विलास/उदय विलास, पार्क, विवांता, वेलकम, रेनॅसॉ इत्यादी संस्थांमध्ये औद्योगिक प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत.

 

**संपर्क** 

इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, लायब्ररी अव्हेन्यू, पुसा कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली – ११००१२ 

दूरध्वनी: ०११-२५८४१४११ 

संकेतस्थळ: www.ihmpusa.net 

ईमेल: ihm.pusa@gov.in / ihmpusa@rediffmail.com

0000