(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

निळ्या टोपीचे रहस्य!

हॅलो! हॅलो!

कसे आहात? बाप्पांसमवेत मस्त मजेत गेले ना दिवस? बाप्पांचं विसर्जन झालं त्यादिवशी आम्हीसुद्धा त्यांचं दर्शन घेतलं राव. आम्हाला बघून ते जाम खुश झाले. आमची त्यांची ओळख साठ कोटी वर्षांपासूनची.

“त्यापूर्वी कां नाही?” असा प्रश्न तुम्हाला पडलाय ना? कारण त्यापूर्वी आमचा जन्मच झाला नव्हता. तुम्हा मानवांचा जन्म तीन लाख वर्षांपूर्वीचा. गंमत बघा, आमचा जन्म ६० कोटी वर्षांपूर्वीचा, पण आमचं नाव मात्र ठेवलंय तुम्ही! तुमचं डोकं बुवा फारच ग्रेट!

या डोक्यावरून आठवलं. आमच्या नावासाठी एका माणसाच्या डोक्यावरील टोपीचा आधार घेतलाय तुम्ही. काय तर म्हणे, आमचं डोकं तसं दिसतं म्हणून. त्याची ही गोष्ट!

तर, तुम्ही मानवांनी शोधलेल्या जहाजाला एक शिड असतं. त्याच्या मदतीने ही जहाजं या समुद्रातून त्या समुद्रात आणि या गोलार्धातून त्या गोलार्धात हजारो किलोमीटरचा सुरक्षित प्रवास करतात.

अगदी तसंच, आम्हीसुद्धा आमच्या डोक्यावरील शिडासारख्या दिसणाऱ्या फुग्याचा उपयोग करून हजारो किलोमीटरचा सागरी प्रवास करतो. आमच्या डोक्यावरील हा शिडासारखा फुगा एकाच प्राण्यावरचा नसतो, तर तो असतो आमच्या वसाहतीवरचा. आम्ही सिफोनोफोर  प्रजातीतले जलचर. शेकडो  झूइड  एकत्र येऊन आमची वसाहत बनवतो. ही वसाहत म्हणजे जणू एखादा वाडाच.

आम्ही सगळी कामं एकत्र करत नाहीत. ज्यांचं जे इंद्रिय स्ट्रॉन्ग, ते काम तो करेल असा आमचा शिरस्ता. म्हणजे जसं की, न्युमॉटोफोर हा गडी आमचा कप्तान, तो दिशा दाखवतो. आमच्यातला पन्नास फूट लांबीचा डॅक्टिलोझुइड हा सेनापती. त्याच्या अंगावर दंश करू शकणाऱ्या विषारी पेशी असतात. आम्हाला कुणी हात लावायला गेलं किंवा शत्रूची चाहूल लागली की या दंशपेशी आपली करामत दाखवून शत्रूची वाट लावतात. आमच्यातील गॅस्ट्रोझुइड हे भक्षक असतात. ते अवतीभवतीच्या छोट्या प्राण्यांना यूंव उचलात नि ट्यूंव पोटात ढकलतात, म्हणजे ते आमच्यासाठी अन्न तयार करणारे शेफच जणू. तर गोनाझुइड यांचं काम फक्त नव्या सदस्यांना जन्म देण्याचं.

काही सदस्यांना आमच्या डोक्यावर वायूची पिशवी तयार करण्याची कला अवगत असते. त्याचा काही भाग पाण्यात तर काही पाण्याचा वर असतो. या भागाचा रंग निळा नि त्यावर एक तुराही असतो. ही वायुपिशवी जहाजावरील शिडासारखं काम करते. यामुळे आम्ही समुद्रात पुढे पुढे ढकलले जातो. म्हणजे आमचा प्रवास सुरू होतो म्हणाना!

एकदा १५ व्या शतकात ब्रिटिश खलाशांना आम्ही दिसलो. तेव्हा आमच्या डोक्यावरची निळी पिशवी त्यांना पोर्तुगीज सैनिकाच्या टोपीसारखी वाटली. त्यावरून आमचं नामकरण केलं गेलं, ‘पोर्तुगीज मॅन’! पुढे १८ व्या शतकात आमच्या डोक्यावरील वायुपिशवी तुम्हाला पोर्तुगीज युद्धनौकांच्या शिडासारखी वाटली. मग, ‘पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर’ असं दुसऱ्यांदा नामकरण झालं.

‘अरे वा, अरे वा, अरे वा!’ अशी काही प्रतिक्रिया देऊ नका लगेच. कारण, हे पोर्तुगीज कोण? त्यांची टोपी कोणती? त्यांच्या युद्धनौकेतील शिड कसं दिसतं? याबद्दल आम्हाला काही म्हणून काही माहिती नाही. तुमचे ते सुप्रसिद्ध साहित्यिक शेक्सपिअर, “नावात काय ठेवलय?” असं काहीबाही म्हणून गेलेतना? आमच्या बाबतीत ते तंतोतंत लागू पडतं.

बाप्पांना आम्ही ही गंमत सांगितली तर ते आधी जोराने हसले नि मग गंभीर होत म्हणाले,

“मित्रा, या मनुष्यप्राण्याची अशी नावं देण्याची बुद्धी नि कौशल्य खरंच खूप कौतुकास्पद, पण…”

“पण काय, बाप्पा?”      

“मित्रा, अशी नावं प्रेमाने देणाऱ्या मनुष्यप्राण्याने पृथ्वीवरील जीवसृष्टीची प्रेमाने जपणूक केली तर…” 

“म्हणजे हो काय, बाप्पा?” आम्ही जरा घाबरून विचारलं.

“हे मनुष्यप्राणी माझे मोठे भक्त असले तरी त्यांचं स्वतःवरच भारी प्रेम. त्यांच्या उफराट्या वागण्यानं इतर जीवसृष्टी सतत संकटात येत चाललीय. याचं त्यांना काहीच वाटत नाही. तुला ते प्रेमाने ‘पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर’ म्हणतात, पण सध्या समुद्रावर चाललेल्या लढाईत तुझ्यासकट कित्येक जलचर धाराशायी पडताहेत, याचं यांना काहीच घेणं-देणं नाही रे राज्या.”

आम्ही घाबरून बाप्पांकडे बघू लागलो. पण एक मोठी लाट आली नि बघता बघता बाप्पा आमच्यापासून दूर निघून गेले.

०००