राज्य किंवा देश कसा चालतो,वेगवेगळे निर्णय कसे होतात याची उत्सुकता अनेकांना असते.तर बऱ्याच जणांना राज्याशी वा देशाची काही देणं घेणं नसतं.ते आणि त्यांचं कुटुंब हेच त्याचं राज्य असतं.ते सुरळीत चाललं की राज्य सुरळीत चालत असल्याची त्यांची समजूत असते.समजा महागाईचा फटका बसलाच तर मग मात्र सरकार निष्क्रिय असल्याचे ही मंडळी ज्याला त्याला सांगत सुटतात.सरकार निष्क्रिय असल्याचे जे अग्रलेख दैनिकांमध्ये छापून येतात त्याचं वाचन आवडीनं करतात. असे अग्रलेख लिहिणाऱ्या संपादकाला सर्वसामान्याचं हीत किती कळतं,या संपादकांचा सल्ला राज्य चालविण्यासाठी सरकार कां घेत नाही असही या मंडळींना वाटत असतं.
परमेश्वर बैठकिला कसे येणार?
ज्यांना राज्य कसे चालते हे जाणून घेण्याची इच्छा असते ते मात्र सरकारच्या हालचालिकडे बारकाईने लक्ष ठेऊन असतात.दैनिकांतील संपादकीय पानावर सरकारला देण्यात येणारे इषारे,सल्ले याकडे तो फारशा गांभीर्याने बघत नाही.एखादे वेळेस चुकून त्याने तसं बघितलं तरी त्याला या इषारा आणि सल्ल्याचं हसू येतं.अशा या कॅटेगरीमध्ये हेमंत गंगाधरराव तडस यांचा समावेश आहे.
हेमंत तडस हे मंत्रालयात स्टनो टायपिस्ट आहेत.त्यांचा राज्य शासनाच्या निर्णय प्रक्रियेत किंवा राज्य चालविण्याच्या कोणत्याही योजनेत फारसा संबंध येत नाही.सचिव महोदयांचे पर्सनल अस्टिटंट असल्याने त्यांना सचिव साहेबांनी सांगितलेलं डिक्टेशन घेणं,ते घेताना त्यात चुका करणं,ते टाईप झाल्यावर सचिवसाहेबांना दाखवणं आणि चुकांबद्यल शिव्या खाणं,सचिव साहेबांनी सुचविल्याप्रमाणे दुरुस्ती करुन अंतिम ड्रॉफ्ट वा मसूदा सचिव साहेबांसमोर ठेवणे हे काम करावं लागतं.अनेक सचिव आले आणि गेले.हेंमतराव हेच काम तशाच चुका–शिव्या–दुरस्तीसह अंतिम मसूदा या चक्राप्रमाणे करताहेत.याबद्यल त्यांची कसलीही तक्रार नाही.सचिव साहेबांचा पर्सनल असिस्टंट कम स्टेनो असल्याने त्यांना सचिव महोदयांकडे होणाऱ्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहवं लागतं आणि शार्ट हँडने बैठकिच्या नोंदी घ्याव्या लागतात.
सरकारचं चालणं आणि धावणं या अशा बैठकांवर अवलंबून असतं हे हेमंतरावांना एवढ्या वर्षाच्या अनुभवावरुन चांगलं लक्षात आलं होतं.अशा बैठका झाल्या नाहीत तर सरकारलाच कायम बसावं लागेल,कदाचित सरकारला पोलियो होईल,कदाचित सरकार अपंगही होईल असा निष्कर्ष हेमंतरावांच्या सुक्ष्म मनाने काढला होता.मंत्रालयात तिन्ही त्रिकाळ बैठकाच होत असल्यानं मंत्रालयाला बैठकालय असं कां संबोधलं जात नाही असा सवाल पाच पन्नास वेळा त्यांना पडला.हा सवाल सचिव साहेबांच्या पुढे टाकला तर ते तुला टायपिंग नीट येत नाही,डिक्टेशन अचूकपणे घेता येत नाही चालला सजेशन द्यायला अशी हेमंतरावांच्या दृष्टिने खऊट पण सचिव साहेबांच्या दृष्टिने सुयोग्य प्रतिक्रिया एैकवतील याची त्याला खात्री असल्याने ही सूचना त्याने आपल्या बायको समोर मांडली होती.मंत्रालय–फंत्रालय असू दे नाही तर बैठकालय–फैटकालय असू दे तुमच्या किंवा माझ्या बापाचं काय जातं.पगार वाढणार आहे की वरची कमाई वाढणार आहे का ?अशी झोंबरी आणि बोचरी प्रतिक्रिया बायकोेने दिली. मंत्रालयाचं बैठकालय केल्यावर आपला पगार वाढ होणार नाही आणि वरकमाईत वाढ होणार नाही हे बायकोचं निरीक्षण बरोबर असल्याचं त्याच्या लक्षात आलं.त्यामुळे बायकोनं त्याचा बाप व तिचाही कायद्याने बाप(फादर इन लॉ) काढूनही तो तोंडात मिठाची गुळणी घेऊन चूप बसला.सचिव महोदय आपल्याला जसे झापतात तसं आपणही तिला तब्येतीनं झापावं असं हेमंत तडस यांना वाटलं पण बायकोनं आपल्या बापासोबत स्वत:च्याही बापाचाही उद्धार करुन बॅलन्स साधल्याचं लक्षात येताच काढल्याने बायको आपल्यापेक्षा काकणभर कां होईना हुषार असल्याचं त्याच्या लक्षात आलं.तेव्हापासून मंत्रालयाच्या बाबतीत त्याच्या डोक्यात आलेली कोणतीही कल्पना कधीही त्याने बायकोला सांगितली नाही.एखादे वेळेस खूपच तगमग झाली तर गल्लीतल्या ओळखीच्या कुत्र्याला जवळ बोलावून त्याच्याजवळ ही कल्पना तो शेअर करायचा.त्याला बिस्किट द्यायचा.कुत्राही जणू काही आपल्याला सारं काही कळलं.सरकारनं याची दखल घेऊन तुमचा सत्कार करायला पाहिजे आणि इतकी मौल्यवान सूचना सूचवल्याबद्यल चार आगावू वेतन वाढी दिल्या पाहिजे अशा आशयाची मान हलवायचा,शेपूटही हलवायचा आणि हेमंतरावांचे हात चाटायचा.यावरच हेमंतराव खुष होऊन जायचे.
0000
गेल्याच आठवड्यात एका महत्वाच्या बैठकीची लगबग मंत्रालयातील सचिव साहेबांच्या दालनात सुरु झाली होती.आपल्या विभागाच्या विकासाचा सर्वांगीण आढावा घेणारी सर्वाेच्च बैठक सचिव साहेबांनी बोलावली होती.या बैठकीला राज्याच्या सर्व जिल्ह्यातील विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार होतेच.पण पहिल्यांदाच विभागाच्या विषयाशी निगडित राज्यातील संशोधक,प्राध्यापक आणि तज्ज्ञांनाही या बैठकीसाठी विशेष निमंत्रित म्हणून बोलाविण्यात आले होते.राज्याला 2020 पर्यंत ग्लोबल स्टेट करण्याचं मुख्यमंत्र्याचं स्वप्न होतं.त्या स्वप्नपूर्तीसाठी एक सर्वांगीण आणि संपूर्ण रोडमॅप करण्यासाठी त्यांच्या आदेशानुसारच ही विशेष बैठक बोलाविण्यात आली होती.
000
या बैठकीची पूर्व तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती.या बैठकिच्या आधी सचिवसाहेबांनी नागपूर,ठाणे,पुणे,कोल्हापूर,नागपूर,अमरावती आणि नाशिक या ठिकणी जाऊन विभाग स्तरीय व जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन समन्वय साधला होता.
सर्व विभागीय व जिल्हास्तरीय बैठका झाल्यावर सचिव साहेबांनी मंत्रालयीन पातळीवरील विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रिपोर्ट तयार केले. पॉवर पॉईंट सादरीकरण–प्रेझेंटेशन तयार केले.
आकडेवारी गोळा करणे,माहिती गोळा करणे या कामात सचिवांच्या हाताखालील कक्ष अधिकाऱ्यांपर्यंत सर्व मंडळी व्यस्त झाली होती.
0000
राज्य स्तरीय बैठकीचा दिवस उजाडला.मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर असलेल्या परिषद सभागृहात ही बैठक सुरु झाली.
सचीव साहेब एक एक विभागाचा आढावा घेऊ लागले.सचीव साहेबांच्या नोंदी टिपून घेण्यासाठी हेमंतराव त्यांच्या पाठिमागेच बसले.
सचीव साहेबांच्या चेहऱ्यावरचे भाव आज काही वेगळेच दिसत होते.राज्याच्या विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी केवळ आपल्यावरच आहे या आशयाच्या अभिमान त्यांच्या देहबोलितून जाणवत होता.आजच्या या राज्यस्तरीय बैठकीमुळे विकासाचा रोडमॅप तयार करण्याचा रोड कोणता असेल हे अचुकपणे कळेल असे विधान त्यांनी बैठकीच्या प्रारंभी केले.
सचिव साहेबांनी बैठकीसाठी पूर्वतयारी उत्तम केली होती.हेमंतरावांना एवढया वर्षाच्या अनुभवावरुन चांगलं ठाऊक होतं की सचिव साहेब अशा महत्वाच्या बैठकीचा वेळी ते त्यांच्या मेंदूत असलेल्याकंम्पुटर हमखास ऍ़क्टिव्ह करत.समोर कितीही कागद असले,फाईली असल्या तरी सचीव साहेब अशा वेळी बैठकीतील उपस्थितांसमोर–फार्मात असताना ज्याप्रमाणे सचीन तेंडूलकर फटकेबाजी करतो – तसच आकड्यांची फटकेबाजी करतील आणि बैठकीला गार गार करुन टाकतील.त्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांना पुढे लपवाछपवी,बनवाबनवी याची गुंजाईशच नसे.आजची बैठक सुरु होताच सचीव साहेबांनी आपला हिट फार्म्युल्याचा उपयोग केला.या फार्म्युल्याने उपस्थितांवर मोहिनी पडली.हेमंतरावही प्रभावित झाला आणि भयभितही झाला.कारण तो शार्टहँड टायपिस्ट असला तरी त्याची गती साहेबांच्या मुखातून धो धो पावसारखी पडणारी आकडेवारी काही त्याच्या शार्टहँडशी मैत्री करायला तयार नव्हती आणि आकडेवरीची चूक म्हणजे पुन्हा त्याच शिव्या आणि तोच पानउतारा.पण हेमंतरावांना नापास होण्यात डिस्टिंक्शन आणि शिव्या खाण्यात मेरिट मिळाल्याने त्यांनीही जो होगा देखा जाएगा असं मनात म्हणून जेवढी आकडेवारी पकडता येते.तेवढी पकडली बाकी भगवान भरोसे सोडून दिली.
000
पहिली फेरी जिंकून सचीव साहेबांनी बैठक ताब्यात घेतली.त्यानंतर त्यांनी प्रत्येक जिल्ह्याचा आणि विभागाचा आढावा घ्यायला सुरुवात केली. काही विभागाच्या कामांना सशाची गती मिळाली होती तर काही विभागांच्या कामांना कासवाचीही गती अद्याप मिळाली नव्हती. अशाने तुम्ही राज्याच्या दुर्गतीला हात भार लावत आहात अशी एक तिखट कॉमंेट सचिव साहेबांनी केली.अशा तिखट मिरचींची प्रादेशिक स्तरीय अधिकाऱ्यांना सवय असल्याने ते ही तिखट मिरचीला गुलाबजामून समजत होते.सचिव येतात,जातात.सरकार कधी धावते तर कधी उठा बशा करते..आपलं काहीच होत नाही.होऊ शकत नाही असा आत्मविश्वास बहुतेक प्रादेशिक स्तरीय अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर विलसत असल्याचं हेमंतरावांना दिसलं.हे अधिकारी आपल्याच कुटुंबातील वरिष्ठ श्रेणिचे नातेवाईक असल्याची सुक्ष्म नोंद त्याच्या मेंदूत झाली.
000
विभागाच्या विविध विकास योजनांसाठी निधी आर्थिक वर्षाच्या प्रारंभी मंजूर करुन व तो प्रादेशिक पातळीवर पाठवूनही तो अद्याप खर्च झालेला नसल्याचे सचिव साहेबांनी निदर्शनास आणलं.25 वर्षापासून यात काहीही फरक झालेला नाही हे हेमंतरावला ठाऊक होतं,कारण खर्च केला नाही म्हणून तुमच्यावर कारवाई कां करण्यात येऊ नये अशी प्रेमळ सूचना वा इषारा देणारी असंख्य पत्रे त्याने या 25 वर्षात टाईप केले होते.पण एकाही अधिकाऱ्यावर कारवाई झाली नव्हती हेही त्याला ठाऊक होते.त्यामुळे हेमंतरावांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले.हे स्मित कुणाच्याही लक्षात येण्याआधीच त्याने लगेच गंभिर मुद्रा धारण केली.
निधी वेळेवर खर्च न करणे म्हणजे नागरिकांच्या हिताला बळी देणे,राज्याच्या विकास कामात अडथळा निर्माण करणे होय,असं सचिव साहेब बोलले.उपस्थितांनी मान हलवली.निधी खर्च कां झाला नाही याची कारणं सांगा असं त्यांनी फर्मावलं तेव्हा प्रादेशिक स्तरावरील अधिकाऱ्यांनी कारणांचा पाऊस पाडला.जर सचिव साहेबांनी मध्येच इंटरफिअर केलं नसतं तर या पावसामुळे महापूर सुध्दा आला असता असं हेमंतराव स्वत:लाच म्हणाले.सरकारी अधिकाऱ्यांना इतकी कारणं कशी सुचत असतील याचं त्याला आश्चर्य वाटलं.कारणांच्या कुरणातच ही अधिकारी मंडळी चरत असल्यानेच त्यांना हे शक्य होत असावं अशी स्वत:ला पटणारी कारणमीमंासा त्याने मनातल्या मनात करुन टाकली. ज्या अधिकाऱ्यांनी असा निधी खर्च करण्यास कुचराई केली,चालढकल केली,तांत्रिककारणे दाखवली त्या सर्वांना कारणे दाखवा नोटीस द्या असे आदेश सचिव साहेबांनी बैठकीतच दिले.
इतक्या ब्रिलिएंट कारणांसह कामावर येणाऱ्या या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा पाठविण्यास आपले सचिव साहेब कां सांगतात हा प्रश्न हेमंतरावांच्या सुक्ष्म मनाला पडला.
000
आकडेवारीच्या जंजाळातून बाहेर पडल्यावर विभागाच्या सध्याच्या योजना,भविष्याचे नियोजन आणि त्यांची अंमलबजावणी यावर विस्तृतचर्चा सुरु झाली.अजेंड्याप्रमाणे सचिव साहेब एक एक विभागाचा आढावा घेत होते.असा आढावा घेत घेत सचिव साहेब विदर्भापर्यंत आले.या विभागाच्या एका उपविभागाने अद्यापपर्यंत कोणतही काम केलं नव्हतं.ते बघून सचिव साहेबांनी संबधित प्रादेशिक अधिकाऱ्यांना उभा–आडवा कापला.या उपविभागाचा अधिकारी कोण अशी विचारणा त्यांनी केली.हा अधिकारी कधीच कोणत्याही बैठकीला येत नाही,माहिती देत नाही.वरच्या कनेक्शनचा दाखला देउुन आपणास दमदाटी करत राहतो,असे प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे एैकून सचिवसाहेबांसह सभागृह थक्क झाले,स्तंभित झालं.
कोण हा अधिकारी,सचिव साहेबांनी न राहवून विचारलं.
सर,परमेश्वर ,प्रादेशिक स्तरीय अधिकाऱ्याने माहिती पुरवली.
परमेश्वराचे नाव कानावर पडताच हेमंतराव फुदकन हसले.शांततेत चाललेल्या बेठकीला गालबोट लागले.त्यामुळे सचिव साहेबांनी रागाने मागे वळून पाहिले.
व्हाट इज धिस नांसेंस.हसता काय तडस,धिस इज नॉट कॉमेडी मूव्ही..ते हेमंतरावांना बरसले.
आपल्याकडून हा काय मूर्खपणा घडला असं हेमंतरावांना वाटलं.सचिवांच्या सरबत्तीने ते ताडकन उभेच राहिले आणि त त प करायला लागले.
मिस्टर तडस या बैठकीचं गांभीयर् तुम्हाला माहीत नाही काय.स्टुपिड..
प..प..र..प र मे श्व र..सर..हेमंतराव कसेबसे बोलले.प र मे श्व र कसे बरे येतील बैठकीला, सर..म्हणून हसू आलं सरं..सॉरी सर..
म्हणजे काय,सचिव साहेब गर्जले.या गर्जनमुळे हेमंतरावांचे पाय कंपवात झाल्यासारखे लटपटू लागले.पण आता कसायापुढे बकरा गेल्यावर जशी त्याची स्थिती होते.तशीच हेमंतरावांची.सचिवांच्या गर्जनेला चिरक्या आवाजात कां होईना उत्तर देणं आवश्यकच होतं.त..त..प.. प करत हेमंतराव मग बोलून गेले—-
स स र ,तुम्ही तिरुपतीबालाजीच्या दर्शनाला जाता नं सर..
व्हाड डू यू मिन..बालाजी माझे कुलदैवत आहे..सचीव गरजले..
तिरुपती बालाजी तुमच्या दर्शनाला कधी आले होते का सर..हेमंतराव आता जरा हिमतीने म्हणाले.
आर यू मॅड..तडस..परमेश्वर कधी आपल्या दर्शनाला येतो का ..
स स र सर तेच तेच मला म्हणायचं होतं आपण परमेश्वराच्या भेटीला म्हणा वा दर्शनाला म्हणा जात असतो ..तो आपल्या भेटीला येत नाही..हेमंतराव कसे बसे बोलले.त्याच्या घशाला कोरड पडली.साहेब आता कच्चा फाडणार हे त्याने ताडले.आता बोलून तर चुकलो.जे होईल ते होईल.असं मनात म्हणत हेमंतरावांनी स्वामी समर्थांचा धावा सुरु केला.
हेमंत तडस याला इथेच सस्पंेशनची ऑर्डर सचीव साहेब देतील असं बैठकीला आलेल्या प्रत्येकाला वाटलं.त्यांना हेमंतरावांची दया आली.खुद्य तिरुपती बालाजी इथे आले तरी हंेमंतरावं काही सचीव साहेबांच्या तावडीतून वाचू शकणार नाही याची प्रत्येकाला खात्री पटली.आता पुढे काय नाट्य घडतं हे बघण्यासाठी सर्वजण आतूर झाले.
नाट्य घडलं.पण अपेक्षेपेक्षा वेगळच. परमेश्वर बैठकीला कसा येणार,त्याच्या भेटिला आपल्याला जावं लागतं असं हेमंतराव उदगारताच महागंभीर चेह–याच्या सचीवसाहेबांना हसू फुटलं.सचीव हसताहेत म्हणजे पुन्हा काही तरी गडबड झालीय.आता तडसची गच्छंती पक्कीच असं प्रत्येकाला वाटलं.सभागृहात पिन ड्रॉप सायलेंस निर्माण झालं.
सचीव साहेबांचा हसरा चेहरा काही क्षण तसाच राहिला आणि ते उपस्थितंाकडे वळून म्हणाले–
परमेश्वर असे जर बोलावल्या बरोबर आले असते तर सगळया समस्या नसत्या का सुटल्या..तेव्हा या परमेश्वराकडे आपणच जावू या..मला सुध्दा तिरुपतीच्या बालाजी कडे जायला लागलं नसतं.नोटीस काढून त्यालाच इथे बोलावून घेतलं असतं ना मी.. बरोबर ना तडस,सचिव साहेब हेमंतरावंाकडे बघत म्हणाले.
सचिव साहंबांचे बोलणे एैकून सभागृहात हास्यस्फोट झाला.हेमंतरावांच्या डोक्यावरचं टेन्शन दूर पळालं.त्याने आपल्या विभागाच्या या न पाहिलेल्या परमेश्वराला मनातल्या मनात दंडवत घातला.सचिव साहेबांनी सुध्दा आपल्या विभागातल्या परमेश्वराच्या भेटीला पुढच्याच आठवड्यात येण्याचे जाहीर करुन टाकले.