(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आमची “महागौरी”

सकाळीच गोर्जीने तेजोमयीच्या कानात काहीतरी सांगितलं. ते तिने बाबांच्या कानात सांगितलं. हे तिघेही जण एकमेकांच्या कानात सांगताहेत पण आपल्याकडे दुर्लक्ष करताहेत, हे अलेक्झांडर स्वारींच्या बरोबर लक्षात आलं. त्यामुळे स्वारी रुसून एका कोपऱ्यात जाऊन बसली. गोर्जीने ते लगेच बघितलं. ती लगबगीने त्याच्याकडे गेली. त्याच्यासमोर उभी राहून स्वतःचे कान पकडले. तर स्वारीने खाली पाडलेले कान वर केले. गोर्जीला हसू आलं. तिने लगेच त्याच्याही कानात ती जे तेजोमयीच्या कानात पुटपुटली होती, ते टाकलं. स्वारी ताडकन उभी राहिली. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. या आनंदात त्याने स्वतःभोवती एक गिरकीही घेतली.

“हे आईला अजिबात कळू द्यायचं नाही, अलेक्झू!” गोर्जीने बजावलं. त्याने आज्ञाधारकपणे मान हलवली. ही सगळी गंमत बघत असणारे बाबा आणि तेजोमयीने अलेक्झांडरचे कुरवाळून लाड केले.

“मग बाबा, आता आपण काय करायचं? आईची पूजा संपेल लगेचच,” तेजोमयीने विचारलं.

“तुला काय वाटतंय?” बाबांनी गोर्जीला विचारलं.

“बाबा, तुम्हाला जे कानात सांगितलं, ते मी केलंय.”

“म्हणजे?”

“फक्त एक मिनिट थांबा,” गोर्जी म्हणाली.

सगळेजण एक मिनिट संपण्याची वाट बघू लागले. तो संपताच दारावरची बेल वाजली. अलेक्झांडर तिकडे धावला. त्याला आवरत तेजोमयीने दार उघडलं. दारात हेल्थ कंपनीकडून रक्ततपासणीसाठी तंत्रज्ञ आला होता. गोर्जीने त्याला आत बोलावलं. तेवढ्यात आईची पूजाही आटोपून ती दिवाणखान्यात आली. समोर हेल्थ कंपनीचा तज्ज्ञ बघून ती आश्चर्यचकित झाली.

बाबा म्हणाले, “तुझं पूर्ण चेकअप करायचं आहे.”

“अहो, पण मला काहीच तर झालं नाहीय ना?”

“काही झाल्यावरच तपासायला हवं, असं काही महादेवांनी लिहून ठेवलेलं नाही,” तेजोमयी मिश्किलपणे म्हणाली.

“अगदी बरोबर,” गोर्जीने पुस्ती जोडली. अलेक्झांडरने मान डोलावली.

“तुला बरं कळलंय रे ठोंब्या!” आईने हलकेच अलेक्झांडरचा प्रेमाने कान उपटला.

“आता चर्चा पुरे. रक्त देण्यासाठी बस इथे,” बाबा म्हणाले.

आई रक्त घेणाऱ्या तंत्रज्ञासमोर बसली. त्याने तीन वेगवेगळ्या नळीत रक्त घेतलं. “संध्याकाळपर्यंत व्हॉट्सॲपवर रिपोर्ट पाठवतो,” असे सांगून तो निघून गेला.

“आज आई स्वयंपाक करणार नाही,” तेजोमयीने जाहीर केलं.

“मग तुम्ही करणार आहात का?”

“आम्हीसुद्धा करणार नाही.”

“मग उपाशी राहणार की काय? बरं झालं माझे तेवढेच श्रम वाचतील,” हसू दाबत आई म्हणाली.

“आज आपण बाहेर जेवायला जायचं.”

“अहो, आज कुणाचा वाढदिवस नाही की सण नाही. लॉटरी लागली की काय?”

“ते तुला आम्ही सांगूच की नंतर…”

“आता का नाही?”

“आता आपण डोळ्यांच्या दवाखान्यात जायचं, तिथून दातांच्या दवाखान्यात जायचं. मग जेवायला जायचं. चार वाजताच्या नाटकाचं तिकीट काढलंय. नाटक संपेपर्यंत रक्त तपासणीचे रिपोर्ट येतील. मग ते घेऊन आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जायचं. ते रिपोर्ट तपासतील. त्यांचं तपासणं झालं की ‘एनी टाईम मिसळ’ दुकानातील झणझणित मिसळ खायची नि मग घरी,” बाबा एका दमात म्हणाले.

“आमचा याला पाठिंबा!” गोर्जी आणि तेजोमयी जोरात म्हणाल्या. अलेक्झांडरनेही उडी मारून आपला पाठिंबा दर्शवला.

“अहो, हे चाललंय तरी काय तुम्हा सर्वांचं? तुमचा काहीतरी भयंकर प्लॅन दिसतोय. खरंच मला काही झालंय का?” आईने काळजीच्या स्वरात विचारलं.

“तुम्हाला तुमचा हा महादेव कसं बरं काही होऊ देईल?” बाबा नाटकी आविर्भाव करत म्हणाले.

“अहो, खरं काय ते सांगा बघू. माझ्या छातीत धडधड वाढली आहे,” आई रडवलेल्या स्वरात म्हणाली.

तेजोमयी आणि गोर्जी लगेच आईजवळ गेल्या. तेजोमयी आईच्या डोळ्यात बघत म्हणाली—

“आई, आज अष्टमी. महागौरीचा दिवस. तू महागौरीची पूजा केलीस. पण आम्हा सगळ्यांसाठी तूच महागौरी आहेस ना?”

“सगळ्यांसाठी सदैव झटणारी, काळजी घेणारी, अथक राबणारी!”

“तू काही आम्हाला तुझी पूजा करू दिली नसतीना.”

“म्हणून आम्ही ठरवलं की, आमच्या घरातली ही महागौरी कायम तंदुरुस्त आणि आरोग्यदायी राहिली पाहिजे. त्यासाठी आरोग्याच्या सगळ्या तपासण्या केल्या पाहिजेत. आजच डॉक्टरांना विचारून समजा काही समस्या असतील, तर त्यावर उपाय सुरू करता आले पाहिजेत.”

“तू तुझ्या मूर्तीरूपातील महागौरीची पूजा फुलं-फळं वाहून करतेस. आम्ही आमच्या या महागौरीची पूजा आरोग्य तपासणी करून करणार…” बाबांनी समजावलं.

आईच्या डोळ्यात अश्रू आले. अलेक्झांडरने आईला घट्ट मिठी मारली. तेजोमयीने गोर्जीला थँक्यू म्हटलं. गोर्जीने तिच्या कानात पुटपुटलेलं हे रहस्य होतं!