(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

पहिल्या कथेचा शोध!

बराच वेळ झाला तरी, अलेक्सा गोर्जीचा आवाज आला नाही, म्हणून तेजोयमी तिच्याकडे गेली. गोर्जी डोळे मिटून बसलेली तिला दिसली. तेजोमयी आल्याचं गोर्जीला कळलंच नाही. तेजोमयीने तिच्या डोक्यावर टकटक केलं, तेव्हा भानावर येऊन तिने डोळे उघडले.

“गोर्जे, दिवसाढवळ्या स्वप्न बघणं बरोबर नाही. रात्रीच्या अंधारातच स्वप्न चांगली रंगतात.” तेजोमयी ‍मिश्किलपणे म्हणाली.

“पण तेजो, तुला कुणी सांगितलं मी स्वप्न बघत होते म्हणून.”

“मग डोळे मिटून काय करत होतीस? तू स्वप्नात इतकी दंग झाली होतीस की, मी आले तरी तुला काही पत्ता नव्हता.”

“हो का? सॉरी. पण मी स्वप्न बघत नव्हते.”

“मग टाइमपास करत होतीस का?”

“जरा शोध घेत होते.”

“नवीन पिझ्झ्याच्या दुकानाचा का? चल लगेच ऑर्डर बूक कर बघू.”

“तेजू, पिझ्झा आणि बर्गरपेक्षाही बरच काही महत्वाचं असतं.”

“बरं बाई, काय महत्वाचा शोध घेत होतीस तू?”

“सांगू की दाखवू?”

“अरे हाँ, तुझ्या मेंदूत असणाऱ्या ‘फ्लिकी’ (Fliki) सॉफ्टवेअरमुळे तुझ्या मनातील कल्पनेवर आधारित व्हीडिओच बनवू शकतेस की. मग तेच कर.” तेजोमयी म्हणाली.

गोर्जीने डोळे मिटले. जे काही तिच्या मनात होतं ते तिने ‘फ्लिकी’ला सांगितलं. काही क्षणात व्हिडिओ तयार झाल्याचे सिग्नल ‘फ्लिकी’ने गोर्जीला दिले. गोर्जीने लगेच आपला मेंदू वायफायने टीव्हीशी जोडला. तेजोमयीने टीव्ही सुरु केला.

समोर एकेक दृष्य येऊ लागलं…

५१ हजार २०० वर्षापूर्वीची ही घटना. इंडोनेशिया देशातील सुलावेसी बेट. इथे त्याकाळातील माणसं लिअँग करंपुआँग गुहेकडे (Leang Karampuang) जात होती. गुहेत पोहोचल्यावर त्यांनी गुहेच्या छतावर चित्र काढायला सुरुवात केली. आधी त्यांनी एक मोठा डुक्कर (वाइल्ड पिग) काढला. मग, त्याच्या आजूबाजूला तीन माणसांसारखे  प्राणी. त्यांचं अर्ध शरीर माणसाचं तर अर्ध शरीर पशुचं (थेरियन्थ्रोप) होतं. त्या तिघांना बघून डुक्कर घाबरलं. या तिघांपुढे आपला निभाव लागणार नाही, हे त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे प्राण वाचवण्यासाठी तो गयावया करु लागला.

त्या तिघांनी हास्याचा गडगडाट केला. “आयती मेजवाणी कशी सोडायची?” त्यातला एकजण म्हणाला. एकाने भाला काढला. डुक्कर आणखीनच घाबरला. पण त्याचवेळी त्याला आईची एक शिकवण आठवली, ‘संकटाच्या वेळी नाही घाबरायचं, शक्ती कमी पडत असल्यास युक्तीनं काम करायचं.’

डुक्कराच्या मनातील भीती कमी झाली. आपल्याला उडी मारता येत असल्याचं त्याला आठवलं. त्याने भाला धरलेल्या व्यक्तीवर छलांग मारली. हे अनपेक्षितपणे घडल्यानं तो भालाधारी दुसऱ्या व्यक्तीवर जाऊन पडला. त्याचा भाला त्या व्यक्तीच्या पोटात गेला. तो जोरात ओरडला. या आवाजाने घाबरुन ते दोघेही पळून गेले. डुक्कराचा स्वत:च्या डोळ्यावर विश्वासच बसेना. ‘आत्मविश्वास असेल तर जगही जिंकता येतं’,ही त्याच्या आईची दुसरी शिकवण त्याला आठवली.

खरंच होतं ते.

आज तो, केवळ आत्मविश्वासाच्या बळावर विजयी झाला होता. या आनंदात त्याने त्या गुहेत नाचायला लागला. “जे माझी मेजवाणी करायला आले, डाव उलटवून त्यांनाच पळवून लावले, ढिंचँक ढिचँक ढिंक!”, असं जोरजोरात गाणं म्हणत ते डुक्कर आणखी जोषात नाचू लागले.

हे दृष्य संपताच पडद्यावर वर्ष उमटलं, २०२५!

आजच्या काळातील संशोधक, लिआँग करंपुआंग गुहेत गेले होते. त्यातील एकाने गुहेच्या छतावरील चित्रांवर एका यंत्रातून लेसर किरण टाकलं. या यंत्रात ‘लेसर ॲब्लेशन युरेनियम सिरीज डेटिंग’, ही अत्याधुनिक यंत्रणा होती. या यंत्रणेतून बाहेर पडलेल्या लेसरकिरणांनी चित्रावर नैसर्गिकरित्या जमलेल्या कॅल्शियम कार्बोनेटच्या थरांचे डेटिंग केलं. त्यातून चित्राचं वय कळलं – किमान ५१,२०० वर्षे!

व्हिडिओ पुढे चालू राहिला. गोर्जी म्हणाली,

“तेजू, हे चित्र फक्त कथा नाही तर हे मानवाचं पहिलं ‘कथाकथन-स्टोरीटेलिंग’ आहे. माणसांनी प्राण्यांना अर्धमानव- अर्ध पशू म्हणून चित्रित केलं. त्यांच्या दंतकथा (मिथक) केल्या. कधी स्वप्नात, तरी कधी धर्मग्रंथात प्राणी आणि माणसांना एकरूप दिलं. आज  अलेक्सा गोर्जी म्हणजेच म्हणजेच मी, एआयच्या मदतीनं  तुझ्या मेंदूशी जोडली गेलीय.  तसं प्राचीन काळी माणूस स्वतःला निसर्गाशी, प्राण्यांशी अशाप्रकारचे स्वत:ला जोडून एकरुप होत होता.

गोर्जी हे सांगत असतानाच स्क्रीनवर आलं वर्षं २०२६!

“म्हणजे यंदाच की”,तेजोमयी म्हणाली.

“होना, यंदा एक नवी गंमत घडली.”

“कोणती गं?”

“तुम्हाला म्हणजेच मनुष्यप्राण्यास सुलावेसीतच, मूना बेटावरील लिआंग मेटांडुनो (Liang Metanduno) गुहेत एक हँड स्टेन्सिल  सापडली. किमान ६७,८०० वर्ष जुनी!  

“हँड स्टेंसिल म्हणजे काय गं?”

“हँड स्टेंसिल म्हणजे गुहेतील भिंतींवर चित्र काढण्याची आदिमानवाची प्राचीन आणि नैसर्गिक पद्धत.”

“अरे,वा!”

“हो ना, या पध्दतीने आदिमानवानं हाताची ठळक आउटलाइन  म्हणजेच आराखडा काढला. हे जगातलं सर्वात जुनं रॉक आर्ट!

“हे रॉक म्हणजे गं काय?”

“प्राचीन काळातील मानवानं नैसर्गिक खडकांच्या पृष्ठभागावर केलेली चित्रकला, कोरीव काम किंवा चिन्हांकन,  म्हणजे रॉक आर्ट!”

“याचा अर्थ, माणूस अतिप्राचिन काळापासून ‘स्वतःला’ चित्रित करतोय नि स्वत:ची गोष्ट रंगवतोय म्हणयाचा”  तेजामयी म्हणाली.

हा व्हिडिओ संपतासंपता  शेवटी एक ओळ आली, “ही होती माणसाने सांगितलेली किंवा चित्ररुपातील जगातील पहिली कथा!”

तेजोमयीने गोर्जीकडे कौतुकानं बघितलं.

“म्हणजे तू पहिल्या कथेचा शोध घेण्यासाठी ध्यान लावून बसली होती म्हणायची.”

“मी नाही लावला शोध. तुम्हा मानवातील संशोधकांकडे याचं श्रेय जातं. मी फक्त बघत होते.”

“गंमतच म्हणायची.”

“होना, याआधी स्पेनमधील एल. कास्तिलो गुहेत ४० हजार ८०० वर्षापूर्वीचं कथाचित्रं आणि सुलावेसितील गुहेत ४३ हजार ९०० वर्षापूर्वीचं शिकारचित्र मिळालं होतं. आता हे त्याआधीचं म्हणजे सर्वात जुनं कथाचित्र मिळालं. संशोधक मंडळी ही कमाल कशामुळे करु शकतात, हे सांगू शकशील का?”

“कशामुळे?”

“मानवास सारखा काहीतरी शोध घ्यावा वाटतो. मग, त्यासाठी धडपड करतो. धडपड म्हंटली की अभ्यास आला. त्यातून नवं ज्ञान मिळवतो, तंत्रज्ञानाचा शोध लावतो. मग त्याचा उपयोग करुन असं काहीतरी भन्नाट शोधतो.”

“जसा अलेक्सा गोर्जीचा शोध लागला, तसचना?” तेजोमयीने हसतहसत टाळीसाठी गोर्जीकडे हात समोर केला. 

सुरेश वांदिले

९३२४९७३९४७