(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

बिब्ली पुराण

आजी घरी आली की रात्री तेजोमयीला गोष्ट सांगायची. आजीशी मैत्री झाल्यावर अलेक्झांडर गोष्टीच्या वेळी आजीजवळ बसू लागला. एखाद्या प्रसंगी तेजोमयीने मान डोलावली की हाही मान डोलवायचा नि शेपूट हलवायचा. “तुला रे काय कळतं यातलं?” असं एकदा आजी बोलून गेली, तर स्वारीने मागे पाय घासून आणि शेपटी हलवून आपली नाराजी व्यक्त केली.

“आजी, असं काही म्हणू नकोस गं. त्याला सगळं कळतं,” तेजोमयी म्हणाली.

“हो हो, मला सगळं कळतं,” अशा आशयाची मान अलेक्झांडरने हलवली.

“बरं बाबा बरं, यापुढे तुला असं काही म्हणणार नाही,” आजी त्याच्याकडे बघत म्हणाली. त्याचे डोळे लुकलुकले.

आजीने अर्धवट राहिलेली गोष्ट पुन्हा सांगायला सुरुवात केली. गोष्ट ऐकता ऐकता तेजोमयीचा डोळा लागला. अलेक्झांडर मात्र कान देऊन ऐकतच होता. तेजोमयी झोपल्याचं बघून आजीने गोष्ट सांगणं थांबवलं.

“तूसुद्धा झोप की…” आजी म्हणाली. तिचेही डोळे जड झाले होते. पण अलेक्झांडर काही तिथून जाण्याचं नाव घेईना. त्याला रागावताही येईना. तो आजीकडे बघू लागला आणि आजी त्याच्याकडे बघू लागली.

काही सेकंदं अशीच गेली. कशाचाच आवाज येत नाही हे बघून आई आजीच्या खोलीत डोकावली. अलेक्झांडर आणि आजी दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत बघत शांत बसलेले पाहून आईला आश्चर्य वाटलं.

“काय रे ठोंब्या, कशी वाटली आजीची गोष्ट?” आई त्याला म्हणाली.

“अगं, तेजो झोपी गेल्याने गोष्ट अर्धवटच राहिली. मग तो कसा काय सांगणार गोष्ट कशी होती ते?” आजी म्हणाली.

“हो का? अच्छा, असं आहे तर?”

“म्हणजे गं काय?”

“बहुतेक ठोंब्याच्या लक्षात आलंय, गोष्ट अपूर्ण असल्याचं. म्हणूनच तो असा तुमच्याकडे बघत बसलाय. पूर्ण करून टाका की गोष्ट.”

“आँ! काहीतरीच काय! अगं, मग उद्या तेजोला पुन्हा सांगावी लागेल ना,” आजी नाराजी व्यक्त करत म्हणाली.

आजीच्या खोलीत काय चाललंय हे बघण्यासाठी बाबा डोकावले. अलेक्झांडरला अपूर्ण गोष्ट पूर्ण ऐकायची आहे आणि आजीला सांगायची इच्छा नाही, हे त्यांच्या लगेच लक्षात आलं.

“अगं, सांग गं त्याला,” बाबा म्हणाले. अलेक्झांडरने आनंदाने मान हलवली. पण आजीचा नन्नाचा पाढा कायम होता.

आता काय करावं बरं? अलेक्झांडरस्वारी तिथून उठायला तयार नव्हती.

“काय रे, मी तुला गोष्ट सांगितली तर चालेल ना?” बाबा त्याला म्हणाले.

“तुला गोष्टी येतात? कधी तेजोला सांगताना दिसला नाहीस,” आजी आश्चर्याने म्हणाली. आईनेही आश्चर्य व्यक्त केलं.

“नाही म्हणजे, अलेक्झांडरला मी सांगू शकतो गोष्टी,” बाबा हातातल्या पेपरकडे बघत म्हणाले.

“या पेपरमध्ये गोष्ट आहे की काय?” आजी हसत म्हणाली.

“हसू नकोस गं. बघ, आता या पेपरमधूनच एखादी गोष्ट काढतो की नाही ते,” बाबा आजीला म्हणाले. त्यांनी पुरवणीची पानं उलटसुलट केली. एका पानावर त्यांना काहीतरी दिसलं आणि ते उत्साहात म्हणाले, “मिळाली गोष्ट!”

आईने टाळ्या वाजवल्या. आजीची उत्सुकता वाढली. बाबा गोष्ट सांगू लागले. अलेक्झांडरने छान मान डोलवली.

“ही गोष्ट आहे पुस्तक वाचणाऱ्यांना काय म्हणतात याची. तर एक होता सलीम, तो होता बिब्लिओबिबुली (BIBLIOBIBULI). एक होता नेपोलियन, तो होता बिब्लिओफाइल (BIBLIOPHILE).”

“तू काहीतरी काय वेड्यासारखा बडबडतोस?” आजी बोलून गेली.

“अलेक्झूला कळेल असं काहीतरी सांगा की,” आई म्हणाली.

“त्याला कळतं, पण तुम्हाला कळत नाही,” बाबा उत्तरले.

“हो का? मग आता तुम्ही जी काय बडबड केली, तिचा अर्थ काय बरं?” आईने विचारलं.

“बिब्लिओबिबुली म्हणजे सतत पुस्तक वाचणारा आणि बिब्लिओफाइल म्हणजे ज्याला पुस्तकं खूप आवडतात आणि जो त्यांचा संग्रह करतो, तो.”

“काय रे अलेक्झू, बरोबर ना?” बाबांनी अलेक्झांडरला विचारलं.

“अगदी बरोबर,” अशा आशयाची मान त्याने डोलावली.

“बृहस्पतीच जणू!” आजी जांभई देत म्हणाली.

“तर एका जिनपिंगला बिब्लिचॉर (BIBLICHOR) फार आवडायचं. म्हणजे असं, की जुन्या पुस्तकांचा जो एक गंध असतो ना, तो!” आई आणि आजी याविषयी काही विचारण्याआधीच बाबांनी सांगून टाकलं.

“पुरे झालं तुझं हे बिब्ली पुराण. अलेक्झांडरला घेऊन जा तुमच्या खोलीत,” आजी जांभई देत म्हणाली. पण अलेक्झांडर उठायचं काही नाव घेईना.

“अलेक्झू, एक होती मोनालिसा. ती होती हेइको दोकुशो (HEIKO DOKUSHO)…”

“डाकू होती का ती?” आईने हसत विचारलं. आजीला काय वेडेपणा चाललाय असं म्हणावंसं वाटलं.

“अगं, ती मोनालिसा खरंच डाकू होती. एखादं पुस्तक दिसलं की टाक त्यावर डाका आणि घे वाचायला. ते वाचता वाचता आणखी एखादं पुस्तक दिसलं की टाक त्यावर डाका आणि लाग लगेच वाचायला. म्हणजे ती एका वेळी अनेक पुस्तकं वाचत राहायची.”

“खरंच?” असे आश्चर्याचे भाव अलेक्झांडरच्या डोळ्यांत उमटले. “पुढे काय?” असं त्याला विचारावंसं वाटलं.

“तुला कंटाळा नाही का आला?” आजीने अलेक्झांडरला विचारलं.

“अं हं.” अलेक्झांडरने नकारार्थी मान हलवली.

“सांग बाबा सांग, तुझ्या या लाडक्याला आख्खी डिक्शनरी,” आजी वैतागून म्हणाली.

“तर एक होती भुवनेश्वरी. ती होती रीडग्रेट (READGRET). म्हणजे कोणतंही पुस्तक वाचायला घेतलं की तिला वाटू लागे, हे पुस्तक आधीच का बुवा आपण वाचलं नाही?”

“बरं, पुढे?” आता आजीच म्हणाली.

“म्हणजे तुम्हालासुद्धा यांच्या बडबडीत रस वाटायला लागला की काय?” आईने आश्चर्याने विचारलं. आजी हसली.

“हं बाबा, पुढे…” अलेक्झांडरने पंजा उचलून इशारा केला.

“पुढे काय? मीच की! म्हणजे सुंडोकू (TSUNDOKU)…”

आजी आणि आई हसल्या.

“काय झालं हसायला?”

“याचा अर्थ तुम्हीच सांगा की. पण तो तुम्हाला अचूक लागू पडू शकतो, म्हणून आम्ही हसलो,” आई म्हणाली.

“वा! मनकवडे आहात! तर मी म्हणजे सुंडोकू. म्हणजे असं, की जो पुस्तकं तर विकत घेतो, पण ती कधीच वाचत नाही.” बाबा काही क्षण थांबले आणि “आँ!” असं स्वतःलाच म्हणाले.

“हा हा हा!” आजी हसली.

“ब ब च्या बडबडीत पोलखोल होऊन गेली,” आई हसत म्हणाली.

या दोघी का हसताहेत हे लक्षात न आल्याने अलेक्झांडर दोघींकडे आळीपाळीने बघू लागला.

“गोष्टीच्या सापळ्यात तुझे बाबा अलगद अडकले, ठोंब्या,” आई म्हणाली. आपण काहीतरी मोठ्ठा पराक्रम गाजवला, असं अलेक्झांडरला वाटलं. त्याने स्वतःभोवती गिरकी घेऊन हा आनंद व्यक्त केला.

“या गोष्टीचं तात्पर्य असं, की जो पुस्तक वाचत नाही तो गोष्टी कशा सांगणार? म्हणून यापुढे पुस्तकं वाचत जा. वेळ नाही हे कारण सांगू नकोस,” असं बाबांचा कान पकडत आजी म्हणाली. हे बघून अलेक्झांडरने आपले कान झटदिशी खाली नेले. त्याच्या या कृतीने तिघांच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं.

 

सुरेश वांदिले