तणाव आणि आनंद प्लस
आपल्याला बरेचदा आपलं आयुष्य खडतर वाटतं.दररोजच्या जीवनातील धावपळच इतकी असते की येणारा शिण कमालीचा असतो.स्पर्धा आहेच.कामाचा प्रेशर आहे.हितसंबधांची गुंफण सुध्दा तणावाला निमंत्रण देत असते.सरळ सुखी आयुष्य जगावं असं वाटतं.पण ते शक्य होतं नाही.याचा परिणाम शरीर आणि मनावर होतो.जैविकशास्त्र असं सांगतं की,तणाव वाढला की आपल्या शरीरातील लाल रक्तपेशीवर त्याचा परीणाम होतो.त्यात बऱ्याच लालपेशी धाराशायी पडतात.लाल रक्तपेशिचं कमी होणं म्हणजे शरीराची प्रतिकार शक्ती कमी होणं.ही शक्ती कमी झाली की मग इतर अनेक शारीरिक समस्या निर्माण होणं ओघाणं आलच.हे एखाद्या चक्रव्युहासारख असतं.या चक्रव्युहात आपण अभिमन्युसारखं शिरत नाही.तर तेच आपल्याभोवती जाळं टाकतं.पण जीवनाचा वेगच असा,की या जाळयात अडकण्यावाचून पर्याय नाही.या परिस्थितीतून साऱ्यांनाच जावं लागतं.मग ते ओबामा असोत किंवा मग मनमोहनसिंगजी असोत किंवा सचीन तेंडुलकर असो की अमिताभ बच्चन असो.यातून कुणाची सुटका झालेली नाही.माणूस जितका मोठा तितकं तणावाची व्याप्ती मोठी. बरेचदा आपल्याला अशा स्थितीशी सामना करावा लागतो असं,एखादया सम्राटासारखं एैश्वर्य संपन्न आयुष्य जगत असलेला शाहरुख खान नेहमी सांगतो. पण ही मोठी आणि श्रेष्ठ मंडळी या परिस्थितीला पाठ दाखवत नाहीत. ते याचा सामना करतात.तणाव दूर करुन नवी उर्जा प्राप्त करण्यासाठी त्यांचं स्वत:चं एक छान मॉडेल तयार करतात.शाहरुख आपल्या दोन्ही मुलांसोबत गप्पा मारत बसतो.अमिताभ बच्चन आणखी काम करतो.
ताण–तणावा पासून मुक्तता मिळण्यासाठी किंवा हा तणाव आणखी कमी होण्यासाठी करण्यासारख्या छोटया छोटया गोष्टी बऱ्याच आहेत.पुढे दिल्याप्रमाणे—
1}कुटुंबासोबत क्वालिटी टाईम व्यतित करा–आपण घरी असतो म्हणजे कुटुंबासोबतच असतो असं म्हणणं धाष्टर्याचं ठरु शकतं. आपलं घरी असणं म्हणजे टीव्हीसमोर असणं,पेपरमध्ये डोकं घालून बसणं,मोबाईलवर असणं.मोबाईलवर खूप बोलू पण कुटुंबातील सदस्यांशी बोलायला वेळ नाही असं होतं आपलं.आपण घरी असूनही कुटुंबात नसतो,बरेचदा.एक अदृष्य भिंत घरी तयार होते.ती तोडायला हवी.मनमोकळा संवाद करायला हवा.खरं तर पत्नी मुलं यांचे स्वत:चे ताणतणाव असातत.ते सुध्दा शेअर करता येतील.त्यांच्याही आयुष्यात खूप काही लहान सहान घडतच असतं की.त्यात रस दाखवावा.विनोद करावा.विनोद वाचावा.विविध बाबींवर चर्चा करावी.अगदी आवडत्या किंवा नावडत्या सिरीयलवर सुध्दा.एखादं गंभीर प्रकृतीचं नाटक एका आठवडयात सगळयांनी मिळून बघावं तर दुसऱ्या आठवडयात मस्त पैकी विनोदी नाटक बघावं.असं बरच काही करता येइल की.
2}तणाव मुक्त होण्यासाठी बऱ्याच जणांना अधून मधून छोट्या मोठ्या सहलीना जायला आवडतं.सहलीला जायचं पण तिथेही काम न्यायचं असं नको करायला.ते तर आयुष्यालाच पुरलय.जेव्हा सहलीला जातो तेव्हा सारं काही विसरुन त्याचा आनंद घ्यायला हवा.नि आपले नातेबंध आणखी सुदृढ आणि दृढ करायला हवे.सहलींमुळे ही संधी मिळते.छोटया सहलीपासून मोठयासहलीपर्यंत सारं काही नीट नियोजन केलं तर मस्त मजेत जाता येईल.सहलीमुळे एकसुरीपणा जातो.मन प्रसन्न होतं ही दुय्यम बाब झाली.पण मनाला नवी उर्जा मिळतं.हे महत्वाचं.ही उर्जाच आपल्याला नवा उत्साह मिळवून देते .
3}आपल्याला ठाऊकही नसतं की आपल्याला किती तरी घातक सवयी आहेत.उदा.उगाचच कुणाचिही निंदा नालस्ती करणं,चहाटळक्या करणं,दिवसभर चहा पित राहणं,अनावश्यक मेल पाठविणं,मोबाईलवरच बोलत राहणं,निष्फळ बडबड करणं इत्यादी.या किरकोळ सवयीं सोबतच काही घातक सवयी उदा.मद्यपान,धुम्रपान,पोर्नोग्राफी इत्यादी.या सर्व सवयी खरं तणावात भर घालणाऱ्या आहेत.त्यांना सोडचिठठी देणं प्रारंभी कठिण जाऊ शकतं.पण त्यांना सोडचिठठी म्हणजे तणावापासून मुक्तीच्या दिशनं टाकलेलं महत्वाचं पाऊल.
4}छंदाची जोपसाना हा सुध्दा तणाव मुक्तीचा छान मार्ग अनेकजण अवलंबतात.अगदी घरच्या गॅलरी गार्डन पासून तर किचनमधल्या प्रयोगांपर्यंत यात येतं.छंद गाणी गाण्याचा असू दे नाही तर एैकणाचा असू दे.छंद पोस्टाची तिकिटे जमविण्याचा असू दे नाही तर बूक मॉलमध्ये जाऊन विविध विषयांची पुस्तके न्याहाळणचा किंवा विकत घेण्याचा असू दे.अशा बाबी तणावापासून मुक्ती देऊ शकतात.दिवसातला काही वेळ किंवा आठवडयातला एखादा दिवस यासाठी देऊन बघा आणि आनंद प्लस तणाव मुक्तीचा अनुभव घ्या.
5}ही तशी जुनी शिकवण.आपल्याला कळू लागतं तेव्हापासून आई बाबा,आजी,आजोबा,गुरुजन सांगतात, लवकर उठे लवकर निजे त्याजकडे आरोग्य–लक्ष्मी वसे.अनुभवाचे बोल असतात ते.पण त्याकडे तरुण वयात दुर्लक्षच होतं.कामाच्या धबगडयात तर पार विचकाच होतो.निवांत झोपचं सुख नाहीच मिळत.टीव्हीचा एक अडथळा.आधीच्या तणावात पुरेशी झोप न घेणं, भर घालतं.लवकर उठण्याचा आणि लवकर झोपण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही.प्रारंभी कठीण वाटेल.पण अंगवळणी पडलं तर लाभ आपल्यालाच.लवकर झोपून लवकर उठल्यास दिवसभराच्या कामाचं उत्तम नियोजन करता येतं.उशिरा उठलं तर कसलं आलय नियोजन.कारण लोकल किंवा बेस्टच्या गाडयांचं वेळापत्रक आपल्या डोळयापुढं नाचायला लागतं.मग घाई.नाहीतर गाडी होणार मिस.म्हणजे कामाला जायला उशिर.म्हणजे ताण ताण आणि ताणच.हे टाळण्याचा उत्तम मार्ग लवकर निद्रादेवीच्या स्वाधीन होण्याची शिस्त लावून घेणंहाच.
6}व्यायाम–लवकर उठण्याचा महत्वाचा फायदा म्हणजे अर्धा एक तास तरी व्यायामाला मिळू शकतो.हा व्यायाम घरच्या घरी करता येऊ शकतो.किंवा फिरायला जाण्याचा राहू शकतो.सारेच गुरु सांगतात की किमान 10-15 मिनिटं ध्यानधारणा आणि श्वाच्छोश्वासाचे व्यायाम केलं तर तुमचं तुमच्यावरचं नियंत्रण छान राहू शकतं.याचा अर्थ तणावाला दोन हात दूर ठेवण्यासाठी ते उपयुक्त ठरतं.
7}झोपण्यापूर्वी किंवा झोपून उठल्यावर पहिले पाच मिनिटे हे दिवसभराच्या कामासाठी सकारत्मक आराखडा किंवा नियोजन करणार असावं.म्हणजे असं की आज अमूक कामं उत्तमरित्या करु असं थेट लिहूनच काढायचं. मला अमूक काम जमेलच हा विचार मनी धरला तर कामाला भिडताना भीती वाटणार नाही आणि आपलं सारं कौशल्य त्यात ओतलं जाईल.संध्याकाळी घरी परतताना त्याचं मिळणारं समाधान लाखाच्या लॉटरीपेक्षा अधिक राहील.
8}याचाच पुढचा भाग म्हणजे संपूर्ण दिवसाच्या कामाचं छान पैकी नियोजन करणं.म्हणजे अगदी रात्री 9.30 वाजता झी टीव्हीरची मालिका बघणं.10 वाजता हेडलाईन्स बघणं.10.15वाजता झोपी जाणं या सारख्या छोटया बाबींपासून ते कार्यालयातील महत्वाची त्या दिवशी करावयाची कामं,दूरध्वनी,कार्यालयीन वेळेनंतर घरातील काही महत्वाची कामं असतील तर ती.सारं काही एका छोटया कागदावर लिहिनं. त्याबरहुकूम अगदी पुढे पुढे जात राहिलो ना तर बघा.कामाचा निपटाराही होईल.समाधानही मिळेल.दिवस छान सत्कर्मी लावल्याचा.असं नाही की यादीतील 100टक्के कामं व्हायलाचं हवीत.ती झाली तर दुधात खडी साखर.पण आपण यंत्र नाही ना.एखाद दुसरं काम होणार नाही.किंवा एखादया कामाला खूप वेळ लागल्याने इतर कामांकडे बघायला वेळ मिळणार नाही.हे असं घडण्याची शक्यता असतेच.त्यामुळे कामांची प्राथमिकता ठरवली व त्या कामावर लक्ष केंद्रित केलं तर ही कामं नक्कीच पूर्ण होतात.दुय्यम स्वरुपाची काम दुसऱ्या दिवशी करता येतील.कामाची यादी करण्यानं बरचं प्रेशर कमी होऊ शकतं.कारण काय करायचं हे निश्चित झालेलं असतं.तसं करण्याची प्रेरणा आणि आठवण कागदाचा तुकडा दिवसभर देत राहतो.
9}आपल्याला दिवसभरात काही काही गोष्टी कराव्याशाच वाटत नाही.म्हणजे या गोष्टी मांजर आडवी जाणे याच प्रकारातील असतात.त्या कराव्या की करु नये.असा संभ्रम निर्माण होतो.म्हणजे असं की आपल्या डोक्यावर आधीच कामाचा डोंगर बसलाय.त्याला पोखरण्याचं काम सुरु आहे,आपलं व्यवस्थितपणे.छानपैकी वेळचंही नियोजनही केलय.पण मध्येच बॉस आताच अमूक एखादी गोष्ट मागतो.सहकाऱ्याला कसली तरी मदत हवी असते.एखादा वेळखाऊ दूरध्वनी येतो.कुणी तरी आगंतुक व्हीजिटर येतो.पण जायचं नावच घेत नाही.जीवाचा तिळपापड होतो.तणावाची सुरुवात होते.काय करावं ते कळत नाही.अशा वेळेला नकार किंवा नाही या शस्त्राचा वापर करावा.तो सौम्यपणेच करावा.आपलं म्हणणं ठामपणे सांगावं.आपल्या कामाची प्राथमिकता समवाजून सांगावी.शहाणी व्यक्ती समजून घेईल.ज्यांना समजून घ्यायचं नसेल ते जातील उडत.हा एक नवा ताण राहू शकेल.पण आपल्या हाती असलेलं महत्वाचं किंवा प्राथमिकतेचं काम पूर्ण झाल्याचं समाधान या तणावाला पळवून लावेल हे ही तितकच खरं.नकार देण्याची शक्ती प्राप्त करणं फार गरजेचं आहे.
10}तणाव कमी करण्याचा खात्रीचा मार्ग म्हणजे आपण कुठलही काम करत असू ते आनंदानेच करायला हवं.होतं काय की आपल्याला काही वर्षानंतर आपल्या नेहमीच्या कामाचा कंटाळा यायला लागतो.मग पाटया टाकणं सुरु होतं.खर तर त्यातुनच तणावाचा जन्म होतो.एकसुरी कामाचा कंटाळा स्वाभाविक असला तरी काम बदलणं तर काही आपल्या हाती नसतं.ते शक्यही नसतं.मग तेच काम नव्या पध्दतीनं करुन बघायला काय हरकत आहे.समजा आपण दररोज 10 पृष्ठ टाईप करत असू तर 11 करुन बघू या.टायपिंगचा स्पीड वाढवून बघू या.डाक्युमेंटचं सादरीकरण अधिक सुंदर करण्यासाठी संगणकातील टूल्स वापर करुन बघू या.संगणकाच्या मदतीने फाईल्सचं व्यवस्थापन करुन बघू या.जे सहकारी आपल्याला प्रेरणा देऊ शकतात नि स्वत:नव्या उर्जेने दररोज काम करतात त्यांच्या सहवासात दररोज अधिकाधिक काळ घालवू या.कामातल्या एकसुरीपणामुळे येणारा तणाव कमी करण्यासाठी हे सारं उपयुक्त ठरु शकेल.
11}असं सांगितलं जातं,बोललं जातं की आनंद म्हणजे एक सतत चालणारा प्रवास होय.तो काही अंतिम पडाव नव्हे.त्यामुळेच आपल्या क्षमतेनुसार ,कुवतीनुसार एखादं उद्दिष्ट ठेऊन प्रामाणिकपणे कष्ट करायचं.मेहनत घ्यायची.यशाचा मार्ग आपल्याला दिसण्याएैवजी तोच आपल्यापर्यंत चालत येऊ शकतो.यातला काव्याचा भाग सोडून देऊ या.पण तणावाला दूर ठेवण्यासाठी आपल्या उद्दिष्टांवर फोकस करुन कार्यरत राहणं हा थोरामोठयांनी अवलंबिलेला राजमार्गच होय.अण्णाचं बघा.सचीन तेंडूलकर,अमिताभ बच्चन यांच्याकडे बघा,म्हणजे खात्री पटेल.ही जरा ग्लॅरस उदाहरणं झाली.हिवरे बाजाराचे सरपंच पोपटराव पवार किंवा आनंदवनातील विकास आमटे यांच्याकडे बघा.म्हणजे याची खात्री पटेल.
12}आपल्याला एक गोष्ट पक्की ठाऊक असूनही त्याकडे आपण लक्ष देत नाही.तो म्हणजे गेलेला दिवस पुन्हा यायचा नाही.पण आपण मात्र गेलेल्या दिवसातच फार काळ रममाण असतो.कुणी काय म्हणालं,काय बोललं,कुणी अपमान केला,कोण चिडला,कुणी फसवणूक केली,कुणी बदनामी केली,वगैरे वगैरे.हे सारं काही घडलेलं असतं.त्याचा खूप म्हणजे खूपच ताप आपल्याला होतो.डोकं सटकतं.अपमानाची भावना खोलवर जाते.एखाद्या विहरीसारखा तिचा तळ दिसत नाही.गेलेल्या दिवसातल्या या प्रकरणांची पृष्ठं मात्र उद्या परवा आणि पुढे येणाऱ्या अनेक दिवसात तशीच फडफडत राहतात.या फडफडण्यानं त्रास होतो तो आपल्यालाच.यातून वाढत जातो तो तणाव.म्हणजे गेलेल्या दिवसातल्या किती गोष्टी ध्यानात ठेवायच्या,किती सोडायच्या की संपूर्ण सोडायच्या हा व्यक्तिगत आणि नाजूक प्रश्न.पण विस्मरण हे सर्वोत्तमच.नाही तर कुरुक्षेत्रावर जे घडलय ना तेच आपल्याही बाबतीत घडू शकतं.
13}इमोशनल असणं हे आपण संवदेनक्षम असल्याचं चिन्ह होय.पण हा आपला गुण अनेकदा आपल्याला तणावाच्या गर्तेत टाकू शकतो.हेही तितकच खरं.त्यामुळे प्रत्येक बाबीमंध्ये भावनिक गुंतवणूक किती करायची हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे.आपल्या मनाच्या विरोधात घडणाऱ्या किंवा मानसिक खच्चिकरण करणाऱ्या बाबी घडत असतात.आपल्या पुढ्यात येऊन पडत असतात.अशा वेळी आपण भावनिक दृष्ट्या सक्षम असल्यास तणावाला थोडं तरी दूर ठेवता येतं. कौंटुंबिक पातळीवरही भावनिक संतुलन राखणं गरजेचं असतं.कारण तिथेही अनेपक्षित गोष्टी उदा–आजारपण,अपघात,अपयश,वादविवाद,जवळच्यांचा मृत्यू यामध्ये किती गुंतायचं हे ठरवणं निश्चितपणे आपलल्या ठरवता आलं पाहिजे.
14}अधूनमधून सुट्यांच्या दिवशी आपल्या मित्र–मैत्रिणींकडे जाणं,त्यांच्याशी गप्पा मारणं,सुख दु:ख शेअर करणं,त्यांच्या सोबत छोट्या–छोट्या पार्टी करणं,सोबत भोजन करणं,मनोरंजानाचे कार्यक्रम बघणं.कधी त्यांना आपल्या घरी बोलावणं,सोबत भटकंती करणं यासारख्या बाबी तणावमुक्तीसाठी उपयुक्त ठरु शकतात.
15}आजच्या स्पर्धेच्या काळात आपण सारचे प्रगतीसाठी,आणखी यश मिळविण्यासाठी,आहे त्यापेक्षा अधिक,पुन्हा अधिक मिळविण्याची तीव्र इच्छा ठेऊन असतो.तो मानवी स्वभाव असल्यानं आपण रॅट–रेस मध्ये सामील होतो.किंवा आपणास या दौडित धावावच लागतं.उर फाटेस्तोव आपली दौड सुरु असते.सहकाऱ्यांशी स्पर्धा सुरु होते.त्यातून इर्षा आणि द्वेष यांची निर्मिती होते.या साऱ्या बाबी नकारात्मक असतात.त्यावर मात करणं आपल्याच हाती असतं.स्पर्धा इतरांशी नव्हे तर स्वत:शी करायलाच हवी.त्यामुळे आपल्या व्यक्तीमत्वाला खरोखरच चार चाँद लागू असतात.नवंकौशल्य प्राप्त करणं शक्य होऊ शकतं.याचा लाभ स्पर्धेमध्ये इतरांपेक्षा समोर राहायला होऊ शकतो.तसच तणावापासून दूर राहायला पण सहाय्य होऊ शकतो.
16}तणावापासून चार हात दूर ठेवण्यासाठी आपला आहार सुध्दा कामी पडतो.जुण्या जाणत्याचं सांगणं की सकाळची न्याहारी राजा सारखी करावी,दुपारचं जेवण राजपुत्रासारखं करावं आणि रात्रीचं भोजन एखादया द्रारिद्री नारायणासारखं करावं.याचा अर्थच असा की सकाळची न्याहारी अगदी भरपेट करावी.दुपारचं जेवण मर्यादित असू द्यावं आणि रात्री अतिशय अल्प आहार घ्यावा.आपल्या आहारात काकडी,मुळा,गाजर यासारख्या भाज्यांचं सलाद,मोड आलेली कडधान्य,जमेल तेवढी फळं,सर्व प्रकारच्या भाज्या,कमित कमी तेल,मीठ,साखर यांचा वापर या बाबी उत्तम आरोग्यासाठी सुदृढ शरीरासाठी ,आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं.आरोग्यंम धनसंपदा म्हणतात ते खरच होय.उत्तम आरोग्य असेल तर कोणत्याही समस्येला समर्थपणे भिडता येतं आणि तणावालाही दूर ठेवता येतं.
17}तणावाला दूर ठेवण्यासाठी आपण जे काही निर्णय घेतो,त्याची जबाबदारी खुल्या दिलानं घेणं,गरजेचचं असतं.विशेषत:यशाचं श्रेय तर सर्वजण घेतच असतात.त्यात वावगही काही नाही. पण अपयशाची जबाबदारी सुध्दा घ्यायला हवी ना.व्यक्तिगत असो की सार्वजानिक जीवनातील असो,निर्णय चुकलाच तर त्यासाठी इतरांना दोषारोपण करण्याआधी आत्मपरीक्षण करणं चांगलं असतं.आपला दोष असेल तर त्याची जबाबदारी स्वीकारण्यानं आपलं मन आपल्याला खात नाही.स्वच्छ मन असेल तर तणाव तरी कसा राहणार. नाही का?महात्मा गांधी यांचं याबाबतीतल उदाहरणं आदर्शवत आहे.पण हे सारं गांधीजींचं चरित्र वाचून कळतं.पण आपल्या समोर ज्यानं यशोशिखर अल्पावधित गाठलं,तो महेंद्रसिंग धोनी–आजच्या तरुणाईचा प्रतिनिधी.इंग्लडंमध्ये भारतीय संघाचं पुरतं पानिपत झालं.क्रिकेट हा सांघिक खेळ असूनही त्याने अपयशाची जबाबदारी स्वीकारली.वर्ल्ड कप सामन्यात त्याने श्रीसंतला खेळवण्याच्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारलीच होती.इकडे भारतात त्याने इंग्लंडचं व्हाईट वॉश केलं.पण तो यावेळेला अभिमानानं काही–बाही बोलला नाही.सयंतपणे वागला.अशा समतोल वृत्तीमुळेच त्याचं व्यक्तिमत्व फुललं आणि खुललं.किती कूल असतो.हे सारं तणावाला दूर ठेवल्यामुळेच शक्य होतं.
0000
सुरेश वांदिले
वाय1/15,शासयकीय वसाहत वांद्रे पूर्व मुंबई 51
9324973947