व्हा गणितज्ज्ञ
गणित या विषयाचे महत्व सर्वकालिक असे आहे. गणिताच्या काठीण्य पातळीचा खूप गवगवा सतत होत राहिल्याने केवळ गणित या विषयात करीअर करण्याची इच्छा ठेवणाऱ्या मुला-मुलींची संख्या कमी होत गेली. विशेषत: प्रज्ञावंत मुले-मुली अभियांत्रिकी क्षेत्राकडे वळत राहिली. त्यामुळे शुध्द गणिताच्या अभ्यासक्रमाकडे जाण्याची अशी तीव्र इच्छा दिसून येत नाही. गणित हाच विषय घेऊन संशोधन, अभ्यापन, विश्लेषण अशा विविध क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध होत असल्यातरीही गणितज्ज्ञच व्हावे असे वाटणाऱ्या मुलामुलींची संख्या अल्पप्रमाणात आहे. बी.एस्सीच्या एका विषयापैकी एक विषय म्हणून गणित विषय घेतला जातो. गणित विषयाचाच अभ्यासक्रम चालवणाऱ्या नामवंत दर्जेदार संस्थांकडे वळणाऱ्या मुला-मुलींची संख्या अल्पच राहिली आहे. आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान, वास्तुकला यांचा खरापाया हा गणितच राहिला आहे. वित्तीय व्यवस्थापन, अभियांत्रिकी आणि आता तर सामजिक शास्त्राला सुध्दा वेगळया उंचीवर नेण्यात गणित आणि गणितज्ज्ञ मोठी भूमिका बजावत आहे.
यंदाचा करीअर पाथ निश्चित करताना विद्यार्थी आणि पालकांना शुध्द गणिताचा अभ्यासक्रम करण्याविषयी विचार करायला हरकत नाही.
आयआयटी-मुंबई
पदव्युत्तर स्तरावर गणितामध्ये स्पेशलायझेशनचे अभ्यासक्रम आयआयटीसह अनेक महत्वाच्या संस्थांमध्ये होतेच. तथापी पदवीस्तरावरच गणिताला प्राधान्य देणारे अभ्यासक्रम अतिशय अल्प प्रमाणात आपल्या देशात चालवले जातात. अशा संस्थेमध्ये आता आयआयटी मुंबईचा समावेश झाला.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आयआयटी मुंबई, बॅचलर ऑफ सायन्स इन मॅथेमॅटिक्स (बी.एस इन मॅथेमॅमिटक्स) अभ्यासक्रम सुरु करत आहे.
या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षाचा आहे. या अभ्यासक्रमाला जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन –अडॅव्हान्स्ड (जेईई–अडॅव्हान्स्ड) या परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारचे गणितीय कौशल्य निर्मिती व्हावे या दृष्टिने या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे.
इतर अभ्यासक्रम
आयआयटी मुंबईमध्ये पाचवर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड एम.एस्सी इन मॅथेमॅटिक्स हा अभ्यासक्रम संस्थेतील विद्यार्थ्यांना करता येतो. मात्र यासाठी विद्यार्थ्यांनी किमान एक वर्षे पदवी अभ्यासक्रमात व्यतित केलेला असावा. ज्या विद्यार्थ्यांना इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांना डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्सला अर्ज करावा लागतो. प्रत्येक अर्जाच्या तपासणीनंतर प्रवेशाविषयी अंतिम निर्णय घेतला जातो. हा अभ्यासक्रम केलेले अनेक विद्यार्थी पुढे जगातील नामवंत शैक्षणिक संस्थांमधील पीएचडी अभ्यासक्रमासाठी निवडले गेले आहेत.
एम.एस्सी मॅथेमॅटिक्स- हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. एमएस्सी इन ॲप्लाइड स्टॅटिस्टिक्स ॲण्ड इंफॉर्मेटिक्स हा स्पेशलाइज्ड अभ्यासक्रमही चालवण्यात येतो. दोन्ही अभ्यासक्रमांना जॉईंट ॲडमिशन टेस्ट फॉर एम.एस्सी (जेएएम-जॅम/http://www.gate.iitb.ac.in/jam2018/home.php.
) द्वारे प्रवेश दिला जातो. संपर्क- संपर्क- डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्स, आयआयटी बॉम्बे, पवई-मुंबई-४०००७६, दूरध्वनी- ०२२-२५७६७४५१, ईमेल- ,head.math@iitb.ac.in, संकेतस्थळ- http://www.math.iitb.ac.in
000
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स
या संस्थेमार्फत बॅचलरऑफ सायन्स (रिसर्च) इन मॅथेमॅटिक्स हा अभ्यासक्रम चालवता जातो. या अभ्यासक्रमाचा कालावधी- चार वर्षे.
अर्हता- गणित,भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयासह १२वी विज्ञान परीक्षेत खुल्या संवर्गातील विद्यार्थ्याला ६० टक्के गुण मिळायला हवेत. अनुसूचित जाती आणि जमातीसंवर्गातील विद्यार्थ्यांना ही मर्यादा केवळ उत्तीर्ण होण्यापुरतीच ठेवण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड पुढील कोणत्याही एका परीक्षेतील गुणांवर आधारित केली जाते. (१) किशोर वैद्यानिक प्रोत्साहन योजनेतील फेलोशिपसाठी निवड, (२) आयआयटी जेईई मेन परिक्षेत खुल्या संवर्गातील विद्यार्थ्याने ६० टक्के, एनसीए- ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्याने ५४ टक्के, अनुसूचित जाती/जमाती आणि दिव्यांग संवर्गातील विद्यार्थ्याने ३० टक्के गुण मिळवायला हवेत. (३) आयआयटी जेईई ॲडव्हान्स्ड परिक्षेत खुल्या संवर्गातील विद्यार्थ्याने ६० टक्के, एनसीए- ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्याने ५४ टक्के, अनुसूचित जाती/जमाती आणि दिव्यांग संवर्गातील विद्यार्थ्याने ३० टक्के गुण मिळवायला हवेत. (३) नीट (NEET)-यूजी परिक्षेत खुल्या संवर्गातील विद्यार्थ्याने ६० टक्के, एनसीए- ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्याने ५४ टक्के, अनुसूचित जाती/जमाती आणि दिव्यांग संवर्गातील विद्यार्थ्याने ३० टक्के गुण मिळवायला हवेत. केंद्र शासनाच्या नियमानुसार जागा राखीव ठेवण्यात येतात.
संपर्क- असिस्टंट रजिस्ट्रार-अकॅडेमिक, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरु-५६००१२, दूरध्वनी-०८०-२२९३२२१० ,ईमेल- academic.admin.iisc.ernet.in .संकेतस्थळ- www.iisc.ac.in
किशोर वैद्यानिक प्रोत्साहन योजना आणि जेईईमधील गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात.
०००