एनआयएफटी:उत्तम आणि उत्कृष्ट
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) या संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांसाठी निवड होणे म्हणजे उत्तम करिअर घडण्याच्या दिशेने पडलेले महत्वाचे पाऊल समजावे. संस्थेचे अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात उच्च पदांवर जाण्याची संधी आणि स्वयंरोजगाराच्याही विविध संधी मिळणे सुलभ जाते.
महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या या संस्थेमध्ये समाधानकारक नसली तरी, देशातील विविध प्रांतातील हजारो विद्याथी/ विद्यार्थीनी या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इच्छूक असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी राष्ट्रीय स्तरावर प्रवेश परीक्षा घेतली जाते. फॅशन क्षेत्रातील डिझाइन, कल, तंत्र, कौशल्य याची सर्वसाधारण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या परीक्षेव्दारे केला जातो.
प्लेसमेंट
एनआयएफटीच्या विद्यार्थ्यांना तीन पध्दतीने रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. (१)कॅम्पस प्लेसमेंट – एनआयएफटीच्या सर्व कॅम्पससाठी केंद्रीय पध्दतीने प्लेसमेंट प्रकिया राबवली जाते. प्लेसमेंटसाठी येणाऱ्या कंपन्या कोणत्याही कॅम्पसमधील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या उमेदवाराला निवडू शकतात. या प्रक्रियेमध्ये अंतिम वर्षाचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. (२)प्रि प्लेसमेंट ऑफर-विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या कालावधीत विविध कंपन्यांमध्ये इंटर्नशीप करावी लागते किंवा त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. अशा विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि कामगिरी लक्षात घेउुन अनेक कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटच्या आधीच या उमेदवारांना नियुक्तीचे पत्र देतात. (३)कॅम्पस बाहेरील प्लेसमेंट-कॅम्पस प्लेसमेंट प्रकिया संपल्यावर, ज्या कंपन्या कॅम्पस प्लेसमेंट सहभागी होऊ शकल्या नाहीत, त्यांच्याशी संपर्क आणि समन्वय साधला जातो. शिवाय माजी विद्यार्थ्यांचेही सहाय्य घेतले जाते. कोणताही विद्यार्थी प्लेसमेंटपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न केले जातात. काही परदेशी कंपन्याही प्लेसमेंटसाठी येतात.
प्रवेश परीक्षा
एनआयएफटी मधील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एनआयएफटी ॲडमिशन टेस्ट, देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर आणि पुणे या शहरांचा समावेश आहे.
(१) बॅचरल ऑफ डिझाइन अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी जनरल ॲबिलिटी टेस्ट, क्रिएटिव्ह ॲबिलिटी टेस्ट घेतली जाते. (लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सिच्युएशन टेस्टसाठी निवड केली जाते.)
जनरल ॲबिलिटी टेस्ट (जीएटी)
ही चाळणी बहुपर्यायी वस्तुनिष्ट पध्दतीची (मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह) असते. अचूक उत्तराला एक गुण दिला जातो. चुकलेल्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण कपात केली जाते. या पेपरमध्ये क्वांटिटिव्ह ॲबिलिटी (संख्यात्मक कौशल्य) , कम्युनिकेशन ॲबिलिटी (संवाद कौशल्य), इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन (इंग्रजी आकलन कौशल्य), ॲनालिटिकल ॲबिलिटी (पृथ्थ:करण कौशल्य), जनरल नॉलेज आणि करंट इव्हेन्ट्स (सामान्य ज्ञान चालू घडामोडी) या विषयांवर प्रश्न विचारले जातात.
क्वांटिटिव्ह ॲबिलिटी टेस्ट मध्ये ॲडिशन (बेरिज), मल्टिप्लिकेशन (गुणाकार), डिव्हिजन (भागाकार), फ्रॅक्शन्स (अपुर्णांक), वर्क अॅण्ड टास्क (काम आणि कार्य), रेशो ॲण्ड प्रपोरशन (गुणोत्तर आणि हिस्सा), डिस्टंस (अंतर) ,प्रॉफिट अॅण्ड लॉस (नफा आणि तोटा), परसेंटेज (टक्केवारी), रेट ऑफ इंटरेस्ट (व्याजदर), अलजेब्रा (अंकगणित), जॉमेट्री (भूमिती) यांचा समावेश असतो.
कम्युनिकेशन ॲबिलिटी टेस्ट मध्ये उमेदवाराच्या इंग्रजी भाषेचे ज्ञान तपासले जाते. यामध्ये सिनोनिम्स (समानार्थी शब्द) , अँटोनिम्स (विरुधार्थी शब्द), शब्दांचे अर्थ, अचूक स्पेलिंग, एक वचनी–अनेक वचनी शब्द, वाक्प्रचार इत्यादींचा समावेश असतो.
इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन टेस्टमध्ये दिलेल्या उताऱ्यावर प्रश्न विचारले जातात. त्याद्वारे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता तपासली जाते.
ॲनॅलिटिकल ॲबिलिटी टेस्ट मध्ये दिलेल्या माहितीवरुन तार्किकभावाने (लॉजिकली) व समक्यपणे विचार आणि विश्लेषण करण्याची उमेदवाराची क्षमता तपासली जाते.
जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स टेस्ट – यामध्ये उमेदवाराचे सामान्यज्ञान आणि चालू घडामोडीचे ज्ञान तपासले जाते.
क्रिएटिव्ह ॲबिलिटी टेस्ट
यामध्ये फॅशन डिझाइनच्या अनुषगांने उमेदवारांचा सर्जनशील कल तपासला जातो. यामध्ये त्याची विचार करण्याची क्षमता, रंगसंगतीबाबतचे आकलन, निरीक्षण, एखाद्या नावीन्यपूर्ण संकल्पनेची निर्मिती, रेखांकनाची क्षमता यासारख्या बाबींची चाचपणी केली जाते. या टेस्टला ३० टक्के वेटेज देण्यात येते.
सिच्युएशन टेस्ट
एखाद्या डिझाइनसाठी उपलबध असलेल्या साहित्याचा वापर संबधित उमेदवार कोणत्या कौशल्याने करतो, ही बाब या चाळणीद्वारे तपासली जाते. या टेस्टला २० टक्के वेटेज देण्यात येते.
जनरल ॲबिलिटी टेस्ट मध्ये पुढील बाबींचा समावेश असतो. (१) क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी (२० प्रश्न) , (२) कम्युनिकेशन ॲबिलिटी (२५ प्रश्न), (३) इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन (२५ प्रश्न) (४) अॅनॅलिटिकल ॲबिलिटी (१५ प्रश्न), (५) जनरल नॉलेज आणि करंट इव्हेंट्स (१५ प्रश्न) असे एकूण १०० प्रश्न विचारले जातात. या पेपरचा कालावधी १२० मिनिटे. या टेस्टला ५० टक्के वेटेज देण्यात येते. पेपर इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये असतो.
(२) बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी फक्त जनरल ॲबिलिटी टेस्ट घेतली जाते. यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी (३० प्रश्न), कम्युनिकेशन ॲबिलिटी आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन (४५ प्रश्न), ॲनॅलिटिकल आणि लॉजिकल ॲबिलिटी (२५ प्रश्न), जनरल नॉलेज आणि करंट इव्हेंट्स (२५ प्रश्न) आणि केस स्टडी (२५ प्रश्न) यांचा समावेश असतो. एकूण १५० प्रश्न विचारले जातात.या पेपरचा कालावधी १८० मिनिटे. या टेस्टला १०० टक्के वेटेज देण्यात येते.
परीक्षेचा निकाल एनआयएफटीच्या संकेतस्थळावर घोषित केला जातो आणि पोस्टाव्दारे उत्तीर्ण उमेदवारांना कळविला जातो.
शासनाच्या नियमानुसार वेगवेगळ्या संवर्गासाठी जागा राखीव ठेवल्या जातात.
अर्हता- या संस्थेच्या अभ्यासक्रमांसाठी पुढीलप्रमाणे अर्हता आहेत- (१)वयोमर्यादा- इच्छूक उमेदवाराचे वय १ ऑगस्ट रोजी कमाल २४ वर्षे असावे. अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग संवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट दिली जाते. (२) शैक्षणिक अर्हता – बॅचलर ऑफ डिझाइन इन (फॅशन/ लेदर/ ॲक्सेसरी/ टेक्सटाइल/ निटवेअर आणि फॅशन कम्युनिकेशन)– कला/ वाणिज्य/ विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण, किंवा केंद्रीय तंत्रशिक्षण मंडळाने अथवा राज्याच्या तंत्रशिक्षण मंडळाने मान्यता प्रदान केलेली ३ किंवा ४ वर्षे कालावधीची पदविका.
(२) बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी-गणित, भौतिकशास्त्र आाणि रसायनशास्त्र या विषयांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (मान्यताप्राप्त राज्य /केंद्रीय माध्यमिक/ उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ/ कौन्सिल फॉर इंडियन स्कूल ऑफ सर्टिफिकेट एक्झामिनेशन-नवी दिल्ली)
एकूण जागा
एनआयएफटीचे पुढील १७ शहरांमध्ये कॅम्पस आहेत-
श्रीनगर, भुवनेश्वर, जोधपूर, कांग्रा, शिलाँग, रायबरेली, पाटणा, पंचकुला, नवी मुंबई, कोलकता, कानपूर, हैदराबाद, चेन्नई, गांधीनगर, बेंगळुरु, भोपाळ. या कॅम्पसमधील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी एकूण ५०२३ जागा आहेत. शासनाच्या नियमानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नॉन क्रिमी लेअर-ईतर मागास वर्ग, आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक आणि दिव्यांग या सवंर्गासाठी राखीव जागांचा यात समावेश आहे.
मुंबई कॅम्पस
खारघर येथे असणा-या मुंबई कॅम्पसमध्ये फॅशन डिझाइन, ॲक्सेसरी डिझाइन, फॅशन कम्युनिकेशन, निटवेअर डिझाइन, लेदर डिझाइन आणि फॅशन टेक्नॉलॉजी या पदवीस्तरीय अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी ३८ अशा एकूण २७६ जागा आहेत. मास्टर ऑफ फॅशन मॅनेजमेंट आणि मास्टर ऑफ फॅशन डिझाइन या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी ३८ अशा एकूण ७६ जागा आहेत. मात्र यापैकी कोणत्याही जागा महाराष्ट्रातील मुलांसाठी राखीव नाहीत. मुंबई कॅम्पससह देशातील इतर कॅम्पसमधील निवड ही चाळणी परीक्षेतील एकूण गुण आणि कॅम्पसचा दिलेला पर्याय यावर अवलंबून असते. याचाच अर्थ चाळणी परीक्षेत उत्तम गुण मिळाल्यास इच्छित कॅम्पसमध्ये प्रवेश मिळू शकतो.)
०००००
अर्थसहाय्य
एनआयएफटीच्या चार वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी साधारणत: ११ ते १२ लाख रुपयांचे शैक्षणिक शुल्क लागते. शैक्षणिक शुल्काच्या कारणाने प्रवेशापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी वेगवेगळ्या योजनांमार्फत अर्थसाहाय्य केले जाते.
एनआयएफटी-सार्थक या योजनेमार्फत विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन लक्षात घेऊन शैक्षणिक शुल्कात सूट दिली जाते. मिन्स कम मेरिट या योजनेमधूनही विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सूट दिली जाते. बऱ्याच एनआयएफटी राष्ट्रीयकृत बँकांसमवेत करार करुन विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज सुलभरीतिने मिळवून देण्यासाठी साहाय्य करतात. उदा-एनआयएफटी मुंबईने आयडीबीय या बँकेशी सांमजस्य करार केला आहे. या करारानुसार विद्यार्थ्यांना २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ७.५ टक्के व्याज दराने विनातारण दिले जाते.
सुरेश वांदिले