(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

सर्वव्यापी डिझाइन क्षेत्र

डिझाइन (अभिकल्प) क्षेत्र हे सध्या सर्वव्यापी झाले असल्याने या क्षेत्रातील प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या विपूल संधी सध्या तंत्रज्ञान, व्यवस्थापन, निर्मिती, रिटेल, माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा, शासन, नियोजन आणि धोरणे, मनोरंजन, संदेशवहन, जीवनशैली, आदी क्षेत्राच्या प्रभावाची व्याप्ती ही नावीन्यपूर्ण डिझाइनमुळे कितीतरीपटिने वाढली आहे.

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन

डिझाइन विषयातील शिक्षण-प्रशिक्षण देणारी महत्वाची संस्था म्हणजे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन. ही संस्था भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रिनल पॉलिसी ॲण्ड प्रमोशन (डीआयपीपी) आणि वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी स्वायत्त संस्था आहे. या संस्थेचे अहमदाबाद, कुरुक्षेत्र, विजयवाडा, भोपाळ, आणि आसाम येथे कॅम्पस आहेत. या सर्व ठिकाणी बॅचलर ऑफ डिझाइन हा अभ्यासक्रम  करता येतो. नाविण्यपूर्ण अभिकल्प (डिझाइन) चा विचार आणि अशा कल्पना प्रत्यक्षात साकारु शकण्याची क्षमता व कौशल्यप्राप्त केलेल्या उमेदवारांना गेल्या काही वर्षात करिअरच्या उत्तमोत्तम संधी कॅम्पसच्या माध्यमातून मिळल्या आहेत. हा अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये शिकवला जातो. अभ्यासक्रमाचा कालावधी प्रत्येकी चार वर्षाचा आहे.

 

स्पेशलायझेशन

अहमदाबाद/ गांधीनगरस्थित नॅशनल इंस्टिटयूट ऑफ डिझाइन येथे  () कम्युनिकेशन डिझाइन अंतर्गत पुढील चार विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते- () ॲनिमेशन फिल्म डिझाइन (जागा १९) , () एक्झिबिशन डिझाइन- (जागा १३), () फिल्म ॲण्ड व्हिडिओ कम्युनिकेशन डिझाइन (जागा १३) , () ग्रॅफिक डिझाइन- (जागा १९). () इंडस्ट्रियल डिझाइन या विषयांतर्गत पुढील विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते- () सेरॅमिक ॲण्ड ग्लास डिझाइन – (जागा १३), () फर्निचर ॲण्ड इंटेरिअर डिझाइन (जागा १३), () प्रॉडक्ट डिझाइन- ( जागा- १९). () टेक्सटाइल, ॲपेरल आणि लाइफस्टाईल डिझाइन या विषयांतर्गत टेक्सटाइल डिझाइन या विषयात स्पेशलायझेशन करता येते. एकूण जागा १९.

एनआयडी कुरुक्षेत्र, विजयवाडा, भोपाळ आणि जोरहट (आसाम) येथील कॅम्पस मध्ये इंडस्ट्रिअल डिझाइन, कम्युनिकेशन डिझाइन, टेक्सटाइल ॲण्ड ॲपेरल डिझाइन या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते.

प्रवेश प्रक्रिया

एनआयडी मधील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रकियेचे वेळापत्रक ठरलेले असते. यात फारसा फरक होत नाही. ही प्रवेश प्रकिया साधारणत: दरवर्षी ऑक्टोबर/नोव्हेंबर महिन्यात सुरु होते. (२०२३ मधील शैक्षणिक सत्राची प्रवेश प्रकिया ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२२ मध्ये सुरु होईल. याविषयीची विस्तृत माहिती देशातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमधून प्रकाशित केली जाते. त्यामुळे आतापासून इच्छूक विद्यार्थी – पालक आणि शिक्षकांनी ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२२ हे महिने कॅलेंडरमध्ये एनआयडीसाठी नमूद करुन ठेवावेत. २०२२ मधील शैक्षणिक सत्राची सुरुवात नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरु झाली होती. प्राथमिक परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात आली.) अर्ज ऑनलाइन भरावा लागतो. यापरीक्षेचा निकाल  मे महिन्यात  संस्थेच्या संकेतस्थळावर घोषित केला जातो.

प्राथमिक परीक्षेसाठी महाराष्ट्रातील केंद्रे- नागपूर आणि मुंबई.

अशी असते परीक्षा-

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर दोन स्तरीय चाळणी परीक्षा घेतली जाते.

पहिला टप्पा हा डिझाइन ॲप्टिट्यूड टेस्ट (डॅट)– प्राथमिक परीक्षा असा आहे. या पेपरमध्ये दोन भाग असतात. पहिल्या भागात बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पध्दतीचे प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांचे सामान्यज्ञान व अवतीभवतीच्या घटनांचे आकलन, तार्किक क्षमता, उताऱ्यावरील प्रश्न, संख्यात्मक चाचणी, आकृत्या, कार्यकारण भाव ,तपासण्यासाठी प्रश्नाची रचना केली जाते.

भाग दोन हा निबंधात्मक स्वरुपाचा असतो. या भागात वेगवेगळया परिस्थितीचे वर्णन करणारे उतारे दिले जातात. त्यावर आधारित चित्र काढावे लागतात. उमदेवारांच्या चित्रांकनाचे कौशल्य तपासणीसाठी या भागाचा उपयोग केला जातो. या पेपरचा कालावधी तीन तास असतो. तथापि यामध्ये बदल होण्याची शक्यता राहू शकते. पेपरचा कालावधी प्रवेश पत्रावर नमूद केला जातो. प्रश्नपत्रिका इंग्रजी भाषेत असेल.

 

 दुसरा टप्पा, डिझाइन ॲप्टिट्यूड टेस्ट(डॅट)– मुख्य परीक्षा, असा आहे. प्राथमिक परीक्षेतील गुणांवर धारित विशिष्ट संख्येत विद्यार्थ्यांची निवडसुची तयार केली जाते. ही  यादी admissions.nid.edu या संकेतस्थळावर जाहीर केली जाते. या यादितील विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलावलं जातं. ही मुख्य परीक्षा अहमदाबाद येथे किंवा बेंगळुरु, गांधीनगर, कुरुक्षेत्र आणि विजयवाडा येथील कॅम्पसमध्ये स्टुडिओमध्ये घेतली जाते. अभिकल्प शिक्षणासाठी विद्यार्थ्याची कलचाचणी करणा-या विविध प्रकारच्या चाळणीचा यात समावेश असतो. चाळणीची भाषा इंग्रजी राहील.

गुणवत्तायादी तयार करण्याची पध्दती

प्राथमिक आणि मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित अंतिम निवड केली जाते. प्राथमिक परीक्षेला ३० टक्के वेटेज आणि मुख्य परीक्षेला ७० टक्के वेटेज दिले जाते. प्राथमिक आणि मुख्य परीक्षेला बसलेल्या उमेदवारांचाच विचार अंतिम गुणवत्ता यादीसाठी केला जातो.

प्राथमिक परीक्षेत दोन विद्यार्थ्यांना समान गुण मिळाल्यास अंतिम गुणानुक्रम देताना पुढील कार्यपध्दतीचा अवलंब केला जातो- () प्राथमिक परीक्षेच्या पेपरमधील पार्ट बी मध्ये ज्या विद्यार्थ्यास अधिक गुण मिळालेले असतील त्याला वरचा क्रमांक दिला जातो. () अशा स्थितीतही दोन्ही उमेदवारांना समान गुण मिळाले असतील तर प्राथमिक परीक्षेतील पार्ट ए मध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारास वरची श्रेणी/गुणानुक्रम दिला जातो. () याही स्थितीत दोन्ही उमेदवारांचे समान गुण राहिल्यास दोघांनाही एकच गुणानुक्रम दिला जातो.

प्राथमिक आणि मुख्य परीक्षेतील पेपरच्या पुर्नतपासणीची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली जाते. एकूण जागांच्या तुलनेत प्रत्येक संवर्गात ३ पट अधिक विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी निवडले जातात.

अंतिम गुणवत्ता यादी प्रत्येक संवर्गनिहाय (खुला/ खुला- आर्थिकदृष्ट्या दुर्बळ संवर्ग, अनुसूचित जाती/ जमाती/ एनसीएल-ओबीसी/ दिव्यांग) तयार केली जाते. ही यादी तयार करताना प्राथमिक आणि मुख्य परीक्षेतील गुणांचे एकूण वेटेज लक्षात घेतले जाते.

ओबीसी एनसीएल उमेदवारांना अधिकृत प्रमाणपत्र सादर करता आले नाही तर त्या उमेदवारास मुख्य परीक्षेसाठी खुल्या संवर्गातील समजले जाते. ओबीसी एनसीएल संवर्गातील उमेदवारास प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यातही संबंधित प्रमाणपत्र सादर करता आले नाही तर, त्याचा प्रवेश रद्द केला जातो. ओबीसी एनसीएल संवर्गातील जागा कोणत्याही कारणांमुळे खाली राहिल्यास त्या खुल्या संवर्गाला दिल्या जातात. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील खाली राहिलेल्या जागा तशाच ठेवल्या जातात. अर्जामध्ये ज्या संवर्गात उमेदवाराने नाव नोंदवले असेल तोच संवर्ग शेवटपर्यंत कायम राहतो. त्यात बदल करता येत नाही.

अर्हता- () वयोमर्यादा- या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या खुल्या सवंर्गातील उमेदवारांचा जन्म १ जुलै २००३  रोजी वा त्यानंतर झालेला असावा. ओबीसी-नॉनक्रिमी लेअर, अनुसूचित जाती आणि जमाती सवंर्गातील उमेदवारांचा जन्म १ जुलै २००० रोजी वा त्यानंतर झालेला असावा. दिव्यांग सवंर्गातील उमेदवारांचा जन्म १ जुलै १९९८ रोजी वा त्यानंतर झालेला असावा.

() शैक्षणिक- () कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील पास श्रेणीत १२ वी उत्तीर्ण किंवा बारावीला असलेले विद्यार्थी किंवा () ३ वर्षे कालावधीचा तंत्रशिक्षण मंडळाचा पदविका अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी किंवा () किंवा नॅशनल ओपन स्कूलिंग अतंर्गत पाच विषयांसह सिनिअर सेकंडरी स्कूल परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी किंवा () हायर  सेकंडरी सर्टिफिकेट व्होकेशनल एक्झामिनेशन.

परीक्षा शुल्क- खुला संवर्ग,खुला आर्थिक दृष्ट्या दुर्बह संवर्ग आणि ओबीसी एनसीएल प्रत्येकी ३ हजार रुपये आणि अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग संवर्गासाठी प्रत्येकी दीड हजार रुपये.

०००

एनआयडी एकूण जागा- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन मधील विविध कॅम्पसमध्ये पुढील प्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अहमदाबाद कॅम्पस- एकूण जागा १२५, विजयवाडा, भोपाळ  ,कुरुक्षेत्र आणि जोरहट (आसाम) कॅम्पस प्रत्येकी एकूण जागा – ७५  खुल्या संवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. एकूण ५ टक्के जागा दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात येतात.

एनआयडी संपर्क-

 नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन (एनआयडी) पालडी अहमदाबाद- ३८०००७, ईमेल- admissions@nid.edu, प्रवेश प्रक्रिया संकेतस्थळ-www.admissions.nid.edu दूरध्वनी- ०७९- २६६२३४६२मुख्य संकेतस्थळ- http://www.nid.edu () एनआयडी विजयवाडा-vadmissions@nid.edu () कुरुक्षेत्र- nidkadmissions@nid.edu

००००