तंत्रनिकेतन: सुलभ संधी,उत्तम करिअर
महाराष्ट्रामध्ये तंत्रशिक्षणाचे जाळे तंत्रशिक्षण संचालनालयाने विणले आहे. या संचालनालयामार्फत उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा आणि अध्यापक असणाऱ्या तंत्रनिकेतन महाविद्यालयांची (पॉलिटेक्निकची)स्थापना करण्यात आली आहे. या तंत्रनिकेतन संस्थांमध्ये १० वी, १२ वी (विज्ञान/ टेक्निकल/ व्होकेशनल उत्तीर्ण) आणि १० + २ दोन वर्षे कालावधीचा अभियांत्रिकी गट अभ्यासक्रम करणारे आयटीआय विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.
तंत्रनिकेतन अभ्यासक्रम करण्याचे फायदे
(१) अभियांत्रिकी पदवीच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश मिळू शकतो. याचा अर्थ विद्यार्थ्यांना जाँईट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेईई) किंवा एमएच – सीईटी/अभियांत्रिकी परीक्षा देण्याचा ताणतणाव सहन करण्याची आवश्यकता नाही. १२ वीनंतर अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थ्याला १२ वी विज्ञानशाखेत भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विषयांमध्ये किमान ४५/५० टक्के गुण मिळवावे लागतात. या बाबीपासून पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यास मुक्तता मिळते.
(२) अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमात पदवी अभ्यासक्रमाचे बरेच विषयघटक शिकवले जातात. त्यामुळे पदवी अभ्यासक्रम तुलनेने इतरांपेक्षा सुलभ जाऊ शकतो.
(३) विद्यार्थ्यांना पदविका आणि पदवी अशा दोन अर्हता/पात्रता प्राप्त होतात. अशा उमेदवारांना खाजगी किंवा शासकीय आस्थापनांच्या भरती प्रकियेत अधिक संधी मिळू शकते,किंवा प्राधान्य मिळू शकते.
(४) खाजगी किंवा शासकीय क्षेत्रात कनिष्ट अभियंता अथवा निरीक्षक/पर्यवेक्षक म्हणून रोजगार संधी मिळू शकते. स्वयंरोजगारही सुरु करता येतो.
प्रवेश प्रकिया
(१) १० वीनंतर प्रवेश – दहावीमध्ये ३५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. हा प्रवेश स्थापत्य, यंत्र, विद्युत, अणुविद्युत, माहिती तंत्रज्ञान, रसायन, खनिकर्म, वस्त्रनिर्माण, उत्पादन, ड्रेस डिझाइन, प्रिंटिंग, उपकरणीकरण इत्यादी शाखेत मिळू शकतो.
(२) १२ वीनंतरचे पदविका अभ्यासक्रम – १२ वीनंतर पुढील शाखांमधील प्रथम वर्षं पदविका अभ्यासक्रमास प्रवेश दिला जातो. (१) औषधी निर्माणशास्त्र – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एक विषय घेऊन १२ वी उत्तीर्ण.(२) हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटेरिंग टेक्नॉलॉजी – कोणत्याही विषयातील ३५ टक्के गुणांसह १२ वी उत्तीर्ण, (३) सर्फेस कोंटिंग टेक्नॉलॉजी – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र गणित आणि इंग्रजी या विषयांसह १२ वी उत्तीर्ण.
दहावी नंतर पदविका अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्गात प्रवेशासाठी संबंधित उमेदवारांने पुढील पैकी कोणत्याही तीन विषयात १२ वीची परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे – भौतिकशास्त्र/ गणित/ रसायनशास्त्र/ जीवनशास्त्र/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ इन्फॉर्मेटिक्स पॅक्टिसेस/ बायोटेक्नॉलॉजी/ टेक्निकल व्होकेशनल विषय/ कृषी/ अभियांत्रिकी ग्रॅफिक्स/ बिझिनेस स्टडीज/ आंत्रप्रिन्युरशीप. या घटकातील उमेदवारांसाठी ७५ टक्के जागा राखीव असतात तर १० वी नंतर दोन वर्षे कालावधीचा सुयोग्य अशा (विशेषीकरणासह/अप्रोप्रियेट ट्रेड) आयटीआय अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव असतात.)
महत्वाची कागदपत्रे
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पुढील कागदपत्रांची गरज भासते – (१) दहावीची गुणपत्रिका- प्रथम वर्षं पदविका अभ्यासक्रम प्रवेश, (२) दहावी आणि बारावी गुणपत्रिका – प्रथम वर्षं औषधी निर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजी आणि सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम प्रवेश, (३) शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला, (४) मागासवर्गीय उमेदवारांना आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी जात/जमात प्रमाणपत्र, (५) नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र – अनुसूचित जाती आणि जमाती संवर्ग सोडून भटक्या जमाती (क आणि ड) इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी, (६) दिव्यांग/ सैन्यदल/ अल्पसंख्याक प्रमाणपत्र – संबंधित संवर्गाचा लाभ घेण्यासाठी.
आरक्षण लाभ
या अभ्यासक्रमांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नॉन क्रिमी लेअर इतर मागास वर्ग या व इतर घटकांच्या आरक्षणासोबतच पुढील आरक्षण ठेवण्यात येते. (१) महिला – ३० टक्के, (२) अनाथ संवर्ग- १ टक्के, (या संदर्भातील शासन निर्णय २ एप्रिल २०१८ प्रसिध्द करण्यात आला. त्याचा क्रमांक- महिला व बाल विकास विभाग, अमुजा-२०११/प्र.क्र.२१२/का-३ असा आहे.) (३) दिव्यांग- ५ टक्के, (४) आर्थिक दृष्ट्यादुर्बल घटक संवर्ग- १० टक्के, (५) संरक्षण सेवा कर्मचारी यांच्या मुला-मुलींसाठी- ५ टक्के,
एकूण जागा
शासकीय, अशासकीय अनुदानित आणि विनाअनुदानित एकूण ३७८ संस्था असून त्यामध्ये प्रथम वर्षाच्या १ लाखांपेक्षा अधिक जागा आहेत. दुसऱ्या वर्षाच्या थेट प्रवेशासाठी ८२ हजारांहून अधिक जागा आहे. औषधी निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या ३९४ संस्था जागा असून त्यात २४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटेरिंग टेक्नॉलॉजी च्या ३ संस्थांमध्ये (गव्हर्नमेंट इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटेरिंग टेक्नॉलॉजी नागपूर/ महात्मा गांधी विद्यामंदिर इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटेरिंग टेक्नॉलॉजी नासिक/ महाराष्ट्र स्टेट इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटेरिंग टेक्नॉलॉजी पुणे) १८० विद्यार्थी आणि सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजीच्या एका संस्थेत (डेक्कन एज्युकेशन सोसासटीची तांत्रिक संस्था पुणे) ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या सर्व जागांमध्ये वेळोवळी बदल होण्याची शक्यता असते, ही बाब लक्षात ठेवावी.
महत्वाच्या संस्था आणि अभ्यासक्रम
(१) शासकीय तंत्रनिकेतन औरंगाबाद – सिव्हिल, इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, ड्रेस डिझायनिंग ॲण्ड गार्मेंट मॅन्युफॅक्चुरिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग,
(२) शासकीय तंत्रनिकेतन पुणे- सिव्हिल, इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (अल्पसंख्याक), इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग (अल्पसंख्याक), इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग, मेटॅलर्जी इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, ड्रेस डिझायनिंग ॲण्ड गार्मेंट मॅन्युफॅक्चुरिंग,
(३) शासकीय तंत्रनिकेतन नागपूर- सिव्हिल, कॉम्प्युटर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन, मेटॅलर्जी, मेकॅनिकल, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, टेक्सटाईल मॅन्युफॅक्चुरर, मायनिंग ॲण्ड माईन सर्व्हेईंग, ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग , ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम, मेकॅट्रॉनिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग,
(४) शासकीय तंत्रनिकेतन मुंबई- सिव्हिल, कॉम्प्युटर, कॉम्प्युटर (अल्पसंख्याक), इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (अल्पसंख्याक) इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, लेदर गुड्स ॲण्ड फूटवेअर टेक्नॉलॉजी, लेदर टेक्नॉलॉजी, रबर टेक्नॉलॉजी, इंस्ट्रुमेंटेशन,
, (५) शासकीय तंत्रनिकेतन नासिक- सिव्हिल, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी,इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पॉलिमर टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, ड्रेस डिझायनिंग ॲण्ड गार्मेंट मॅन्युफॅक्चुरिंग, इंटेरिअर डेकोरेशन ॲण्ड डिझायनिंग, मेकॅट्रॅानिक्स
(६) शासकीय तंत्रनिकेतन अमरावती- सिव्हिल, , कॉम्प्युटर, केमिकल,न्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल,प्लॅस्टिक ॲण्ड पॉलिमर,फार्मसी
शैक्षणिक शुल्क
(१) शासकीय स्वायत्त आणि स्वायत्त नसलेल्या व अशासकीय अनुदानित तंत्रनिकेतन (२०२१- २२ या शैक्षणिक वर्ष)– खुल्या सवंर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क – १० वीनंतर पहिल्या आणि थेट दुसऱ्या वर्ष प्रवेश – दरवर्षी ७५५० रुपये. (२) १२ वीनंतर पहिल्या वर्षासाठी प्रवेश- दरवर्षी ९५५० रुपये. अनुसूचित जाती/ जमाती संवर्ग, व्हीजे (विमुक्त जाती)/ डीटी(निरधिसूचित जमाती) एनटी(भटक्या जमाती)-ए/ एनटी-बी/ एनटी-सी/ एनटी-डीआणि विशेष मागास प्रवर्गासाठी शिक्षण शुल्क माफ. इतर मागास वर्ग संवर्ग आणि ट्यूशन फी वेव्हर स्किम संवर्गासाठी शिक्षण शुल्कात ५० टक्के सूट. (यासाठी संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. एकूण मंजूर जागांच्या ५ टक्के जागा या योजनेंतर्गत भरल्या जातात.) (३) विनाअनुदानित संस्थांसाठीचे शैक्षणिक शुल्क, शुल्क नियामक प्राधिकरणामार्फत ठरवले जाते. अनुसूचित जाती/जमाती संवर्ग, व्हीजे/ डीटी एनटी-ए/ एनटी-बी/ एनटी-सी/ एनटी – डी आणि विशेष मागास प्रवर्गासाठी शिक्षण शुल्क माफ. इतर मागास वर्ग संवर्ग आणि ट्यूशन फी वेव्हर स्किम संवर्गासाठी शिक्षण शुल्कात ५० टक्के सूट.
तंत्रनिकेतन संस्थांमध्ये प्लेसमेंट सेल उघडण्यात आले असून, त्याव्दारे विद्यार्थ्यांना विविध उद्योग आणि कारखान्यांमध्ये प्लेसमेंट मिळवून देण्यासाठी साहाय्य केले जाते. इंटर्नशीपची सुविधा सुध्दा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाते.
संपर्क- तंत्र शिक्षण संचालनालय, ३, महापालिका मार्ग, एलफिंस्टन टेक्निकल इंस्टिट्यूट कॅम्पस मुंबई- ४००००१, दूरध्वनी- ०२२-२२६५२२६१, संकेतस्थळ- www.dtemaharashtra.gov.in
सुरेश वांदिले