कंपनी सेक्रेटरी
कार्पोरेट लॉ, प्रशासन आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील उच्च श्रेणीच्या कौशल्यप्राप्त मनुष्यळाच्या निर्मितीसाठी कंपनी सेक्रेटरी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. त्या अनुषंगाने या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी १२ वी नंतर प्रयत्न करता येणे शक्य आहे.
कंपनी सेक्रेटरी या व्यवसायाला विकसित करणारी आणि नियंत्रित करणारी, द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरिज ऑफ इंडिया ही आपल्या देशातील एकमेव संस्था आहे. संसदेतील विधेयकानुसार ही संस्था स्थापित करण्यात आली असून ती केंद्रीय कार्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेचे मुख्यालय दिल्ली येथे असून मुंबई, कोलकता, चेन्नई येथे विभागीय कार्यालये आहेत. ही संस्था कंपनी सेक्रेटरिचा अभ्यासक्रम चालवते. हा अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षण पध्दतीने अथवा पत्रव्यवहाराव्दारे करता येतो. तथापि विभागीय केंद्रांमध्ये ऑफलाईन वर्गही चालवले जातात. विद्यार्थ्यांची इच्छा असल्यास ते या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन शिकू शकतात. या अभ्यासक्रमाला वर्षातून कधीही प्रवेश घेता येतो. यासाठीwww.icsi.edu या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागते.
विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नॅशनल इलिजिबिलीटी टेस्ट साठी कंपनी सेक्रेटरी हा अभ्यासक्रम पदव्युत्तर पदवी दर्जाच्या समकक्ष समजण्यात येईल, असा निर्णय २०२१ साली घेतला.
कंपनी सेक्रेटरी काय करतो?
नियामक प्राधिकरण, संचालक मंडळ, शेअरधारक आणि कंपनीचे इतर भागधारक यांच्यामधील महत्वाचा दुवा म्हणून कंपनी सेक्रेटरीला कार्य करावे लागते. मंडळाचे कर्तव्य, जबाबदारी आणि अधिकार, विविध कायदे, नियम याविषयी संबंधितांना माहिती द्यावी लागते. कर, व्यवसाय आणि आर्थिक बाबींवर विविध कायदेशीर सल्ला द्यावा लागतो.
इतर जबाबदाऱ्या
(१) कंपनीला औद्योगिक आणि कामगार कायदेकानून याविषयी अवगत करुन सल्ला देणे. (२) कंपनीतील मनुष्यबळाचे नियोजन, (३) कंपनीतील मनुष्यबळाच्या उत्तम कामिगिरीसाठी मानके (स्टँडर्ड्स) ठरवणे, (४) कार्यालयीन व्यवस्थापन आणि कार्याभ्यास करणे, (५) मनुष्यबळाचे अंकेक्षण (ऑडिटिंग) करणे, (६) कार्यक्षमता वाढवण्यासाठी मनुष्यबळास प्रेरित करणे, (७) वेतन- भत्ते आदी वित्तीय प्रोत्साहने देणारी कार्यपध्दती विकसित करणे, (८) कंपनीच्या सकारात्मक प्रतिमा निर्मितीसाठी प्रयत्न, (९) कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अनुषंगाने सल्ला, (१०) संस्थात्मक संरचना तयार करणे, (११) कंपनीच्या इतर शाखाप्रमुखांशी समन्वय, सहकार्य, संपर्क आणि सुसंवाद साधणे, (१२) कंपनी वा फर्मची बाजू मांडण्यासाठी कंपनी लॉ बोर्ड, नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, सेक्युरिटिज ॲपेलेट ट्रायब्युनल, रजिस्ट्रार ऑफ कंपनी, कंझुमर फोरम, टॅक्स ट्रायब्युनल्स आणि इतर अर्धन्यायिक संस्थांसमोर उपस्थित राहणे, (१३) कंपनीच्या वार्षिक परताव्यावर म्हणजेच रिटर्नसवर स्वाक्षरी करणे, (१४) कार्पोरेट अहवाल, कायदेशीर कागदपत्रे आणि इतर महत्वाच्या कागदपत्राचे कस्टोडियन म्हणजेच कायदेशीर देखभालदार/ रखवालदाराची भूमिका बजावणे, (१५) कंपनीसाठी विविध नोंदणी अर्जभरणे , (१६) माहितीतंत्रज्ञान विषयक पुढील कामेही कंपनी सेक्रेटरीला करावी लागतात – सायबर लॉ विषयक कंप्लॉयन्स (तक्रार निवारण) करणे, व्हिडिओ कॉन्फसिंग आणि टेलेकॉन्फरंसिंगद्वारे मंडळाची बैठक घेणे, इलेक्ट्रॉनिक फार्ममध्ये अहवाल तयार करणे, ई-फायलिंग करणे.
कंपनी सेक्रेटरी होण्याचे टप्पे-
१२ वीनंतर तीन टप्पे आहेत – (१) फाउंडेशन अभ्यासक्रम- विज्ञान, कला, वाणिज्य (फाइन आर्ट वगळून) या विषयातील १२ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करता येतो. अभ्यासक्रमाचा कालावधी आठ महिने. एकदा नोंदणी केल्यावर ती तीन वर्षासाठी ग्राह्य समजली जाते. या अभ्यासक्रमाला ३१ मार्चला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा त्याच वर्षिच्या डिसेंबर महिन्यात होते. ३० सप्टेंबरला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा दुसऱ्या वर्षिच्या जून महिन्यात होते.
या अभ्यासक्रमात बिझिनेस एन्व्हायरमेंट ॲण्ड लॉ, बिझिनेस मॅनेजमेंट, इथिक्स ॲण्ड आंत्रप्रिन्युरशिप, फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग ॲण्ड ऑडिटिंग बिझिनेस इकॉनॉमिक्स, असे चार पेपर्स असतात.
(२) एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रम- या अभ्यासक्रमासाठी पुढील अर्हता ग्राह्य धरण्यात येतात. (१) कंपनी सेक्रेटरी फाउंडेशन अभ्यासक्रम उत्तीर्ण, (२) इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट ॲकाउंटन्ट्स ऑफ इंडिया या संस्थेची फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण, (३) इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड ॲकाउंटन्ट्स ऑफ इंडिया या संस्थेची कॉमन प्रोफेसिंएसी टेस्ट, ही परीक्षा उत्तीर्ण, (४) फाइन आर्ट्स पदवीधर सोडून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधर. अभ्यासक्रमाचा कालावधी- ९ महिने. या अभ्यासक्रमासाठी केलेली नोंदणी ५ वर्षासाठी ग्राह्य धरली जाते.
या अभ्यासक्रमात पुढील विषय घटकांचा समावेश असतो. (१) मॉड्युल एक – कंपनी लॉ, ज्युरिसप्रुडन्स, इंटरप्रिटेशन ॲण्ड जनरल लॉ, सेटिंग अप ऑफ बिझिनेस एनटिटीज ॲण्ड क्लोजर, टॅक्स लॉ, (२) मॉड्युल दोन – कॉर्पोरेट ॲण्ड मॅनेजमेंट अकाउंटिंग, सेक्युरिटीज लॉ ॲण्ड कॅपिटल मार्केट्स, इकॉनॉमिक बिझिनेस ॲण्ड कमर्शिअल लॉ, फायनांशिअल ॲण्ड स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट.
(३) प्रोफेशनल प्रोग्रॅम- हा अभ्यासक्रम एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रम केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना करता येतो. या अभ्यासक्रमात (१) मॉड्यूल एक-गव्हर्नन्स, रिस्क मॅनेजमेंट, कम्प्लॉयन्स, ॲण्ड इथिक्स, ॲडव्हान्स्ड टॅक्स लॉज, ड्रॉफ्टिंग, अॅपिअरन्सेस ॲण्ड प्लिडिंग, (२) मॉड्यूल दोन – सेक्रेटरिअल ऑडिट, कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग, रिझोल्युशन ऑफ कॉर्पोरेट डिसप्युटस, (३) मॉड्यूल तीन- कॉर्पोरेट फंडिंग ॲण्ड लिस्टिंग इन स्टॉक एक्सचेंजेस, मल्टिडिसिप्लिनरी केस स्टडीज, या विषयघटकांचा अभ्यास करावा लागतो.
या शिवाय पुढील आठ विषय घटकांपैकी कोणताही एक विषय अभ्यासावा लागतो – बँकिंग लॉ ॲण्ड प्रक्टिस, इन्शुरन्स लॉ ॲण्ड प्रक्टिस, इंटलेक्चुअल प्रॉपर्टी लॉ ॲण्ड प्रक्टिस, डायरेक्ट टॅक्स लॉ ॲण्ड प्रॅक्टिसेस, लेबर लॉ ॲण्ड प्रॅक्टिसेस, इनसॉलव्हेन्सी लॉ ॲण्ड प्रॅक्टिसेस, फारेंसिक ऑडिट, व्हॅल्युएशन ॲण्ड बिझिनेस मॉडेलिंग.
(४) पदवी अभ्यासक्रमानंतर हा अभ्यासक्रम करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन टप्पे आहेत – एझिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल प्रोग्रॅम.
फाउंडेशन प्रोग्रॅम मधील बिझिनेस कम्युनिकेशन हा विषय सोडून सर्व परीक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषेत देता येते. तिनही अभ्यासक्रम पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. प्रत्येक विषयात किमान ४० टक्के आणि सरासरीने ५० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला उत्तीर्ण घोषित केले जाते.
पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम
इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया या संस्थेने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने कंपनी सेक्रटरीशिप अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
(१) बी.कॉम (कॉर्पोरेट अफेअर्स ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन), अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी आणि कंपनी सेक्रेटरीशिप फाउंडेशन अभ्यासक्रमाला नोंदणी. हा अभ्यासक्रम इंग्रजी आणि हिंदीमधून करता येतो. हा अभ्यासक्रम किमान ३ वर्षे आणि कमाल ६ वर्षामध्ये पूर्ण करता येतो.
(२) एम.कॉम (बिझिनेस पॉलिसी ॲण्ड कॉर्पोरेट गव्हर्नन्स), अर्हता – कोणत्याही विषयातील पदवी आणि कंपनी सेक्रटरीशिप एक्झिक्युटिव्ह परीक्षा उत्तीर्ण. हा अभ्यासक्रम किमान २ वर्षे आणि कमाल ५ वर्षामध्ये पूर्ण करता येतो.
हे दोन्ही अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षण पध्दतीने करता येतात.
संपर्क- डायरेक्टर, स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, मैदान घारी, नवी दिल्ली-११००६८, दूरध्वनी- ०११-२९५३२०७३.
इंटिग्रेटेड अभ्यासक्रम
द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी आणि सेंटर फॉर कार्पोरेट गर्व्हनन्स आणि रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग या संस्थांनी संयुक्त सहकार्याने एक वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड कंपनी सेक्रेटरी कोर्स (एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम) हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमास ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अर्हता- कंपनी सेक्रटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रान्स टेस्ट उत्तीर्ण विद्यार्थी.
संपर्क (१) आयसीएसआय-सेंटर फॉर कॉर्पोरेट गर्व्हनन्स, रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग,प्लॉट क्रमांक – १०१, सेक्टर १५, इंस्टिट्युशनल एरिआ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४, दूरध्वनी – ०२२ – ४१०२१५०१ 27577814
(२) डायरेक्टोरट ऑफ ॲकॅडेमिक्स ॲण्ड प्रोफेशनल डेव्हलपमेंट, द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरिज, आयसीएसआय हाऊस, 22 इन्स्टिट्यूशनल एरिया, लोधी रोड, न्यू दिल्ली- 110003 / support.icsi.edu ईमेल-info@icsi.edu.in , दूरध्वनी- ०११-४१५०४४४४
(३) वेस्टर्न इंडिया रिजनल काउंसिल – १३, जॉली मेकर चेम्बर्स, क्रमांक २, पहिला माळा, नरिमन पॉईंट, मुंबई- ४०००२१, दूरध्वनी – ०२२-२८२७९८९८, ईमेल- siro@icsi.edu
सुरेश वांदिले
आज करिअर कंसेप्ट(https://www.facebook.com/Career-concept-100260352041907)मध्ये कंपनी सेक्रेटरी- कार्पोरेट लॉ, प्रशासन आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील उच्च श्रेणीच्या कौशल्यप्राप्त मनुष्यळाच्या निर्मितीसाठी कंपनी सेक्रेटरी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. त्या अनुषंगाने या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी १२ वी नंतर प्रयत्न करता येणे शक्य आहे.