नवी संधी-केबिन क्य्रु
गेल्याच महिन्यात महाराष्ट्र आणि देशात करोनाशी संबंधित जवळपास सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विमान वाहतुकीवरचेही निर्बंध जवळपास उठलेलेच आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून हवाई क्षेत्रात जी मरगळ आली होती. ती दूर होण्यास फार कालावधी लागणार नाही. पर्यटकांनी तर विमानतळावर गर्दी करणे सुरु केलेच आहे. त्याशिवाय आता घरातून काम या कार्यप्रणालीच्या बाहेर पडण्याचीही प्रक्रिया बऱ्याच कंपन्या आणि उद्योगांनी सुरु केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या बैठका- चर्चासत्रे, देश विदेशातील दौरे वाढतीलच. शासकीय अधिकारी व इतर व्यावसायिक कामांसाठी देशांतर्गत कामासाठीही विमान प्रवासाला प्राधान्य देतील.
नवी संधी
करोनापूर्व काळात भारतातील मोठ्या शहरातील विमानतळांवरील दृष्य हे गर्दीच्या एसटी आगार किंवा रेल्वे फलाटवरील गर्दीसारखेच दिसायचे. कोणत्याही वेळेस थोड्याफार फरकाने ही गर्दी कायम असायची. बदलेली जीवनशैली, वाढलेले उत्पन्न, कमी दरातल्या विमानसेवा यामुळे प्रवाशांचा ओढा हवाई वाहतुकीकडे वाढला होता. आतासुध्दा निर्बंध उठल्याबरोबर विमानतळांवरची गर्दी वाढली आहे. भारतातील प्रवासी हवाईवाहतूक क्षेत्र पुन्हा वेगाने वाढण्याची चिन्हे आहेत. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार २०२२ पर्यंत हवाईवाहतूक क्षेत्रात भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश बनेल. २०३० पर्यंत हा क्रमांक पहिला होऊ शकतो. या क्षेत्राची ही गती लक्षात घेता प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज वाढत आहे.
या क्षेत्राला वैमानिक, एरोनॉटिकल अभियंते, केबिन क्र्यु म्हणजेच एअर होस्टेस/स्टिवार्ड अशा कौशल्यप्राप्त उमेदवारांची गरज भासते. काही विमान कंपन्या बंद पडल्या असल्या तरी एअर इंडियाचा ताबा टाटा समुहाने घेतल्याने या क्षेत्रास उर्जा मिळणार आहे. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन इतर कंपन्याही आता नव्या उर्जेने या क्षेत्रात कार्यरत होऊ शकतात. याचाच अर्थ या क्षेत्रामध्ये पुढील काही महिने किंवा वर्षांमध्ये कौशल्य प्राप्त उमेदवारांना रोजगाराची संधी मिळू शकते.
हवाई वाहतूक सेवा सुव्यवस्थित चालण्यासाठी शेकडो प्रकारच्या व्यक्ती विमानतळावर कार्यरत असतात. विमानात वैमानिक महत्वाचा असला तरी अंतर्गत सेवा पुरवणारे मनुष्यबळही महत्वाचे ठरते.
विमानाच्या आतील प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या मनुष्यबळाला केबिन क्र्यु संबोधतात. यात एअर होस्ट किंवा एअर होस्टेस आणि स्टिवार्ड किंवा स्टिवार्डेसेस आणि उड्डाण अटेंडन्ट यांचा समावेश आहे. प्रवाशांची सुरक्षितता, आराम आणि देखभालीकडे लक्ष पुरवण्याचे काम या कर्मचाऱ्यांना करावे लागते.
हे अतिशय जबाबदारीचे काम आहे. वेगवेगळ्या वेळेत उडणाऱ्या विमानांमध्ये सर्व प्रकारातील प्रवाशांचे समाधान करण्याचे कौशल्य त्यांना प्राप्त करावे लागते. यासाठी त्यांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अतिशय सक्षम असणे आवश्यक असते. प्रवाशी आरामात बसलेले असताना या कर्मचाऱ्यांना विविध कारणांसाठी बराच काळ उभे राहावे लागते. कोणत्याही सिस्थित संतुलन कायम ठेवावे लागते. कामांच्या वेळा नियमित नसतात. अतिशय लांब अवधीचा प्रवास करावा लागतो. सार्वजनिक सुट्टयांच्या दिवशीही काम करावे लागू शकते.
अर्हता- (१) या पदांसाठी साधारणत: कोणत्याही विषयातील पदवी तसेच हॉटेल मॅनेजमेंट या विषयातील पदवी किंवा पदविका असल्यास नियुक्तीच्या वेळेस प्राधान्य मिळू शकते. (काही कंपन्या १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसुध्दा संधी देतात.)
(२) इंग्रजी संभाषण कौशल्य असणे आवश्यक ठरते. (३) शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा. (४) व्यक्तिमत्व आकर्षक असावे. (५) वयोमर्यादा- २५ वर्षाखाली. (६) उंची- पादत्राणाशिवाय किमान १७० ते १८० सेंमी असावी. (७) विमान कंपनीने निर्धारित केल्यानुसार उंचीच्या प्रमाणात वजन असावे. (८) उमेदवार अविवाहित असावा. (९)दृष्टी स्वच्छ आणि सामान्य स्वरुपाची असावी. चष्मा नसल्यास उत्तम. (१०) टॅटू आणि शरीरावर छेदन (पिअर्सिंग) नसावे.
प्रशिक्षण
केबिन क्र्युचे प्रशिक्षण देणाऱ्या काही महत्वाच्या संस्था-
(१) बॉम्बे फ्लाईंग क्लब मार्फत चालविण्यात येणारे कॉलेज ऑफ एव्हिएशन
या संस्थेने डिप्लोमा इन एव्हिएशन सेफ्टी ॲण्ड हॉस्पिटॅलिटी, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्षं. अर्हता- कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण उमेदवारास या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. संपर्क– द बॉम्बे फ्लाईंग क्लब, ५०२ ,पाचवा माळा, एविऑन अपार्टमेंट्स, एस.व्ही रोड, विले पार्ले- पश्चिम, मुंबई-४०००५६,
कॉलेज संपर्क– एन.एस.रोड नंबर ६, जमनाबाई नर्सी शाळेच्या बाजूला, गेट नंबर ४, जेव्हीपीडी, स्कीम, विले पार्ले- पश्चिम, मुंबई – ४०००५६, दूरध्वनी-०२२-२६१०१०२७/ २६६०६४९९/ फॅक्स- २६६११६७२, संकेतस्थळ- http://www.thebombayflyingclub.com, ईमेल- cabincrew@bfcaviation.com
०००
(२) फ्रँकफिन
कौशल्याधारित प्रशिक्षणासाठी या संस्थेस राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाने (नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) सहयोगी संस्था म्हणून मान्यता दिली आहे.
संस्थेचे अभ्यासक्रम- (१) फ्रँकफिन सर्टिफिकेट कोर्स इन एव्हिशन, हॉस्पिटॅलिटी ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट/ अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण/ वय- १७ ते २४ वर्षे./ निवड- मुलाखतीद्वारे /कालावधी- ११ महिने.
(२) सर्टिफिकेट कोर्स इन हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल ॲण्ड कस्टमर सर्व्हिस /अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण/ वय- १७ ते २४ वर्षे/ निवड- मुलाखतीद्वारे /कालावधी- ११ महिने.
(३) ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन एव्हिशन ॲण्ड हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस/ अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी उत्तीर्ण/ वय- १९ ते २४ वर्षे/ निवड- मुलाखतीद्वारे /कालावधी- ११ महिने
(४) ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल ॲण्ड कस्टमर सर्व्हिस /अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी उत्तीर्ण/ वय- १९ ते २४ वर्षे/ निवड- मुलाखतीद्वारे /कालावधी- सहा महिने.
(५) ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन एअरपोर्ट ग्राउंड सर्व्हिसेस/अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी उत्तीर्ण/ वय- १९ ते २४ वर्षे./ निवड- मुलाखतीद्वारे /कालावधी- ११ महिने
(६) सर्टिफिकेट कोर्स इन एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट /अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण/ वय- १९ ते २४ वर्षे./ निवड- मुलाखतीद्वारे /कालावधी- सहा महिने.
संपर्क- बेस्ट बिल्डिंग, ए विंग, पाचवा माळा, एस.व्ही.रोड, अंधेरी रेल्वेस्टेशन –पश्चिम, मुंबई-४०००५८,दूरध्वनी-०२२-२६७०६०३९ संकेतस्थळ- http://www.frankfinn.com, ईमेल- corporate@frankfinn.com
०००
(५) इंस्पायर अकॅडेमी
या संस्थेत १० महिने कालावधीचा केबिन क्रु हा अभ्यासक्रम चालवला जातो. अर्हता- १२वी उत्तीर्ण.
इतर अभ्यासक्रम-
(१) डिप्लोमा इन एअरपोर्ट ग्रॉउंड हँडलिंग ॲण्ड ट्रॅव्हल टुरिझम मॅनेजमेंट/ कालावधी- ९ महिने/ अर्हता- १२वी अथवा पदवी/ वयोमयर्यादा- १८ ते २८ वर्षे
(२) डिप्लोमा इन एअरपोर्ट ग्रॉउंड हँडलिंग /कालावधी- ९ महिने/ अर्हता- १२वी अथवा पदवी/ वयोमयर्यादा- १८ ते २८ वर्षे
(३) डिप्लोमा इन एअर कार्गो ॲण्ड एव्हिएशन लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट /कालावधी- २ महिने/ अर्हता- १२वी/
संपर्क- इंस्पायर अकॅडेमी, ६१०, पर्ल प्लाझा, न्यू मॅकडोनाल्ड्स, अंधेरी रेल्वे स्टेशन, अंधेरी-पश्चिम, मुंबई-४०००५८, ईमेल- info@theinspireacademy.com
,संकेतस्थळ- http://www.theinspireacademy.com/air-hostess-training
इंदिरा गांधी इंस्टिट्यूट ऑफ ॲरोनॉटिक्स
गेल्या अनेक वर्षापासून ही संस्था हवाई वाहतुकीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळास शिक्षण-प्रशिक्षण देत आहे. या संस्थेने सुरु केलेले अभ्यासक्रम- (१) डिप्लोमा इन केबिन क्र्यु सर्व्हिसेस ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कालावधी- एक वर्षं, अर्हता – कोणत्याही विषयातील १२वी, वयोमर्यादा – १७ ते २६, उंची- (मुले-१७०सेमी/मुली-१५७). मुलाखत आणि समूह चर्चेव्दारे प्रवेश दिला जातो.
(२) एअरपोर्ट ग्राऊंड सर्व्हिसेस, कालावधी – सहा महिने/अर्हता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी.
(३) एअर टिकेटिंग ॲण्ड ट्रॅव्हल एजंट – कालावधी सहा महिने (पार्ट टाइम) अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण
संपर्क– इंदिरा गांधी इंस्टिट्यूट ऑफ ॲरोनॉटिक्स आय ए, ३०४, तिसरा माळा, सुनेजा टॉवर, १,जनकपुरी डिस्टिक्ट सेंटर, जनकपुरी वेस्ट मेट्रो स्टेशन, जनकपुरी,नवी दिल्ली-११०००५८, दूरध्वनी-०११-४९४०८१५२, ईमेल – delhi@igiaindia.in संकेतस्थळ-igiaindia.in
०००
हिंदुस्थान एव्हिशन ॲकॅडेमी
या संस्थेने इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोशिएशनच्या सहकार्यान पुढील कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
एअरलाइन कस्टमर सर्व्हिस, एअरपोर्ट ऑपरेशन्स, एअरपोर्ट रॅम्प सर्व्हिसेस, एअर ट्रान्सपोर्ट फंडामेंटल्स,बेसिक एअरसाईड सेफ्टी कोर्सेस,फाऊंडेशन ऑफ ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम. सर्व अभ्यासक्रमासाठी अर्हता-कोणत्याही विद्याशाखेतील १२वी उत्तीर्ण.
संपर्क- पोस्ट बॉक्स नंबर-३७७६अश्वथानगर,मराथापल्ली,बेंगळुरु-५६५००३७/दूरध्वनी-०८०-२५२३८६५०,फॅक्स-२५२३२४४८,ईमेल-contactus@hindustanacademy.edu.in admissions@ hindustanacademy.edu.in
सुरेश वांदिले(ekank@hotmail.com/९३२४९७३९४७)
०००