औषधी निर्मितीक्षेत्राचे व्यवस्थापन
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर औषधी निर्माण उद्योगामध्ये वेगवेगळया करिअर संधी निर्माण होण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. प्रत्यक्ष औषध निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळासोबतच या उद्योगाच्या व्यवस्थापकीय,विक्री आणि विपणन या बाजू सांभाळणाऱ्या मनुष्यबळाचीसुध्दा गरज भासेल. अशी गरज भागवू शकणारा एमबीए इन फार्मा अभ्यासक्रम देशातील पुढील काही संस्थांनी सुरु केला आहे.
(१) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॉर्मास्युटिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च
या संस्थेची स्थापना भारत सरकारच्या रसायने आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या,डिपार्टमेंट ऑफ फॉर्मास्युटिकलने केली आहे. औषधी निर्मिती, संशोधन आणि विकास क्षेत्राला लागणाऱ्या तज्ज्ञ मनुष्यबळाच्या निर्मिती व्हावी,हा त्यामागचा उद्देश. या संस्थेचे हैदराबाद, अहमदाबाद, गौहाटी, हाजीपूर,कोलकता, रायबरेली आणि एस.एस.नगर (नवी दिल्ली जवळ) येथे कॅम्पस सुरु करण्यात आले आहेत.
हैदराबाद कॅम्पस
येथे २००७ संस्थेचे कॅम्पस उघडण्यात आले. या संस्थेस भारत सरकारने इंस्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा दिला आहे. स्थापनेपासून या संस्थेने स्वत:ला विकसित करत नेल्याने आज ही संस्था औषधी निर्माण आणि व्यवस्थापन क्षेत्रातील जागतिक दर्जाची संस्था बनली आहे. देश आणि परदेशातील नामवंत कंपन्यांशी या संस्थेने सहकार्याचे करार केले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील नवीनतम प्रवाह व उद्योगांच्या गरजा जाणून घेणे संस्थेला सुलभ झाले आहे.
या संस्थेने औषधी निर्मितीच्या क्षेत्रातील नव्या प्रवाहांवर संशोधन करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. औषधी निर्माण, माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान या तीन क्षेत्रातील तंत्रांचा अभ्यासक्रमात सुयोग्य संतुलन साधण्याचा प्रयत्न केला जातो.
येथे एमबीए इन फॉर्मास्युटिकल मॅनेजमेंट, हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी – दोन वर्षे. अर्हता- बी.फॉर्म किंवा केमिकल इंजिनीअरिंग मधील बी.टेक किंवा केमिकल अथवा इतर जैविक शास्त्रातील एम.एस्सी.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन घेतली जाते. या परीक्षेत मिळालेले गुण, मुलाखत आणि समूह चर्चा या तीन घटकांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते.
प्लेसमेंट
या अभ्यासक्रमाचा दर्जा आणि गुणवत्ता लक्षात घेऊन पुढील कंपन्या प्लेसमेंट प्रकियेत सामील होतात – नोवॅर्टिस, डॉ.रेड्डीज लेबारेटरी, अबॅाट इंडिया, सन फार्मा, ल्युपिन, सिनजिन,आयएमएस हेल्थ, पीफजेर, कॅडिला, अलेंबिक, जीएसके, बायकॉन, ॲस्ट्रा झेनेका, थर्मोफिशर, इनफिनीटी रिसर्च, ग्लॅन्ड फार्मा, वीवो बायोटे, विरचौ बायोटेक इत्यादी.
संपर्क– बालानगर, हैदराबाद- ५०००३७, दूरध्वनी- ०४०-२३०७३७४१, फॅक्स- २३०७३७५१, ईमेल- director@niperhyd.ac.in, संकेतस्थळ-
www.niperhyd.ac.in, www.niperhyd.edu.
(२) संस्थेच्या एस.ए.एस नगर कॅम्पसमध्येही एमबीए- फार्मा हा अभ्यासक्रम करता येतो. औषधीनिर्माण शास्त्राचा पदव्युत्तर पदवीचा अभ्यास आणि संशोधन कार्यासाठी देशात पहिल्यांदा या ठिकाणी संस्थेचे कॅम्पस सुरु करण्यात आले. या संस्थेला सुध्दा भारत सरकारने, इंस्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा दिला आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती केवळ आपल्या देशासाठीच नव्हे तर दक्षिण पूर्व आशिया, दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतील राष्ट्रांसाठी करता यावी हा उद्देश, ही संस्था स्थापन करण्यामागे आहे.
स्पेशलयाझेशन
संस्थेने औषधी निर्माण क्षेत्राशी संबंधित पुढील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम स्पेशलायझेशनसह सुरु केले आहेत. – एम.एस फार्मा इन (१) नॅचरल प्रॉडक्टस, (२) ट्रॅडिशनल मेडिसिन, (३) फार्मास्युटिकल ॲनालिसीस, (४ ) फार्माकॉलॉजी ॲण्ड टॉक्सिकॉलॉजी, (५) फार्मास्युटिक्स (मेडिकल केमिस्ट्री), (६) रेग्युलेटरी टॉक्सिकॉलॉजी.
एम.फार्म इन (१) फार्माकोइन्फर्मेटिक्स, (२) फार्मसी प्रॅक्टिस, (३) फार्मा टेक्नॉलॉजी – फॉर्म्युलेशन्स.
एम.टेक इन (१) फार्मा टेक्नॉलॉजी -प्रोसेस केमिस्ट्री, (२) फार्मा- बायोटेक्नॉलॉजी.
प्रवेशासाठी संस्थेमार्फत घेण्यात येणारी जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेश द्यावी लागते.
संपर्क– नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॉर्मास्युटिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, सेक्टर ६७, एस.ए.एस नगर- १६०००२, टेलेफॅक्स – ०१७२-२२९२२०००, ईमेल- registrar@niper.ac.in, संकेतस्थळ- http://www.niper.nic.in/c
०००
(३) नर्सी मोन्जी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स-डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ बिझिनेस मॅनजमेंट या संस्थेने एमबीए इन फार्मास्युटिकल मॅनेजमेंट, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे.
औषधी निर्मिती क्षेत्रातील व्यवस्थापकीय बाजू सांभाळण्याचे तंत्र आणि कौशल्य या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शिकवले जाते. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना औषधी निर्मिती कंपन्या, सल्ला-सेवा कंपन्या, आंतरराष्ट्रीय कंपन्या यामध्ये प्लेसमेंट मिळाले आहे. या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्येक आठवड्यात संपूर्ण एक दिवस या क्षेत्राशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी आणि अर्धा दिवस या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी द्यावा लागतो.
काय शिकाल? विद्यार्थ्यांना देशातील महत्वाच्या औषधी निर्मिती कंपन्यांमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून लागताना प्राधान्य मिळावे, यासाठी अभ्यासक्रमाच्या विषय घटकांची रचना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमामध्ये अर्थकारण, औषधी निर्मिती उद्योगाशी संबंधित कायदे, बौध्दिक संपदा अधिकार, निर्मिती प्रक्रिया, या प्रकियेशी जोडलेल्या उत्तम प्रथा, गुणवत्तेची हमी, वित्त, विक्री आणि विपणन, विक्रीच्या उत्तम प्रथा, मूल्य निर्धारण आणि लेखा, मनुष्यबळ विकास, पुरवठा साखळी आणि वितरण, खरेदी, आंतरराष्ट्रीय विपणन (मार्केटिंग), ब्रँड व्यवस्थापनाची व्यूहनीती, संवाद संप्रेषन, औषधींची प्रसिध्दी आदी विषयघटकांचा समावेश आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला सहा महिन्यासाठी एखाद्या ब्रँडशी संबंधित शोध प्रबंधावर (डेझर्टेशन) काम करावे लागते. स्पॅनिश किंवा मँड्रिन/चिनी भाषेपैकी कोणतीही एक भाषा शिकावी लागते. दोन महिन्यांच्या उन्हाळी प्लेसमेंटची सुविधा वेगवेगळया औषधी निर्मिती कंपन्यांमध्ये उपलब्ध करुन दिली जाते.
प्लेसमेंट-
पुढील कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले आहे-अबॉट,एसीसी वर्ल्डवाइड, अलेंबिक, अलकेम, बेअर, बायकॉन,डॉ.रेड्डीज लेबॉरेटरी, इसाई फार्मा, जीएसके,आयएमएस हेल्थ, इंडेजेन्स, इंफोसिस, नोवो नॉरडिस्क, फिपरेज, रॅनबॅक्सी, सन फार्मा, टॉरेन्ट फॉर्मा, वर्गो फार्मा, झायडेस कॅडिला, मायक्रोलॅब्स, एमएसडी-इंडिया, अलेग्रॅन, जेनझाइम, यूएसव्ही लिमिटेड.
अर्हता– प्रवेशासाठी पुढील विषयांमध्ये पदवी मिळालेली असावी- फार्मसी, सायन्स, बी.एस्सी इन बायोटेक्नॉलॉजी, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस. एमबीबीएस आणि बी.टेक इन बायोटेक किंवा बायोमेडिकल. अर्थशास्त्र, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी घेतलेले विद्यार्थी सुध्दा अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात. अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते.
संपर्क– स्कूल ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट,व्ही.एल.मेहता रोड, विलेपार्ले- (पश्चिम), दूरध्वनी- ०२२-४२३५५५५५, फॅक्स-२६११४५१२, ईमेल- enquiry@nmims.edu, संकेतस्थळ- nmims.edu
या संस्थेच्या शोभाबेन प्रतापभाई पटेल स्कूल ऑफ फार्मसी ॲण्ड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट या संस्थेमध्ये,बी.फॉर्म ॲण्ड एमबीए(फार्मा टेक,कालावधी-पाच वर्षे.)आणि एम.फॉर्म ॲण्ड एमबीए(फार्मा टेक ॲण्ड हेल्थकेअर मॅनेजमेंट) हा अभ्यासक्रम करता येतात.
कालावधी-तीन वर्षे.दूरध्वनी-०२२-४२३३२००
०००
एमबीए इन फार्मा- बायोटेक्नॉलॉजी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्स या विभागामार्फत एमबीए इन फार्मा- बायोटेक्नॉलॉजी, हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. जैविक औषधी/ कृषी/ पुरवठा/ माहितीशात्र/ आरोग्यसेवा या क्षेत्रातील व्यवस्थापकीय मनुष्यबळ निर्मिती करण्यासाठी या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. व्यवसाय विकास, उद्योजकता, मार्केटिंग, बौध्दिक संपदा हक्क, इनोव्हेशन आणि नॉलेज मॅनेजमेंट या विषय घटकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. जैवतंत्रज्ञान कंपन्यांमध्ये उन्हाळी प्लेसमेंट मिळवून दिले जाते.
अर्हता – जीवशास्त्र, जैवरसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, वनस्पती शास्त्र, पर्यावरणशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जेनेटिक्स, सागरीय जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र या विषयांपैकी कोणत्याही एका विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी. कृषी, अभियांत्रिकी, औषधी निर्माणशास्त्र ,तंत्रज्ञान, आयुर्वेद, पशुवैद्यक शास्त्र या विषयातील पदवीधर या अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतात. प्रवेशासाठी ATMA (एआयएमस टेस्ट फॉर मॅनेजमेंट ॲडमिशन) चाळणी परीक्षा द्यावी लागते. चाळणी परीक्षेसाठी संपर्क- http://atmaaims.com
संपर्क- डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायंस, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, गणेशखिंड,पुणे- ४११००७, दूरध्वनी-०२०-२५६९३३८०, फॅक्स- २५६९०५४५,संकेतस्थळ- http://www.pumba.in/programs/mba-biotech-
०००
पीजीडीएम – फार्मा
आयइएस- मॅनेजमेंट कॉलेज ॲण्ड रिसर्च सेंटर या संस्थेने पीजीडीम (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट) – फार्मा, हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमांतर्गत हेल्थकेअर मॅनेजमेंट आणि फार्मा मार्केटिंग या दोन विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. अर्हता- फार्मसी, जीवशास्त्र ,रसायनशास्त्र, वैद्यकीय या विषयातील पदवी. प्रवेशासाठी एमएच-सीइटी-एमबीए/एमएमएस किंवा एटीएएमए किंवा सीमॅट किंवा मॅट किंवा झॅट किंवा कॅट किंवा जीमॅट या परीक्षांमधील गुण प्राथमिक चाळणीसाठी ग्राह्य धरले जातात.
संपर्क – आयइएस-एमसीआरसी-विश्वकर्मा, एम.डी लोटलीकर विद्या संकूल, ७९१, एस.के मार्ग, बांद्रा-रिक्लेमेशन, मुंबई- ४०००५०, संकेतस्थळ- https://www.ies.edu/management/
०००