औषधीनिर्माण क्षेत्रातील संधी
गेल्या काही वर्षात देश आणि जगातील औषधीनिर्माणक्षेत्राची झपाट्याने वाढ होत आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे एकिकडे वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीत मानवी कर्तृत्वाचा आलेख उंचच उंच जात असला तरी या आलेखाला काळवंडण्याचे कार्य विविध प्रकाराचे रोग – आजार- विषाणूंचा प्रादुर्भाव यांनी सुरु ठेवले आहे. त्यामुळे दर तीन-चार वर्षांनी कोणत्या ना कोणत्या नव्या विषाणुचा सामना मानवास करावा लागतो. त्यासाठी औषधाचा शोध आणि त्यानंतर त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करावे लागते.
जगातील अनेक राष्ट्रांपेक्षा भारतातील काही राज्यांची लोकसंख्या अधिक आहे. या लोकसंख्येच्या आरोग्यविषयक समस्या सुध्दा वर्षागणिक वाढत आहेत. एकिकडे भारतीयांच्या वयोमर्यादेत वाढ झाली असतानाच वायू-जल व इतर प्रदूषण आणि इतर कारणांनी भारतीय विविध प्रकाराच्या आजार आणि रोगांच्या विळख्यात सापडले आहेत. देशातील औषधीनिर्माण क्षेत्राची वाढ या दुर्देवी वास्तवाला कवटाळून होत आहे. इतरही विकसनशील देशात थोड्याफार फरकाने अशीच स्थिती दिसून येते.
या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार पुढील तीन चार वर्षात या क्षेत्राची वाढ दरवर्षी 3 ते 6 टक्के राहील. ही स्थिती लक्षात घेऊन मोठ्या औषधीनिर्माण कंपन्या या आणखी विस्तारीकरण्याच्या तयारीला लागल्या आहेत. नागरिकांना परवडणाऱ्या औषधांची अधिकाधिक निर्मिती आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चात घट करण्याची व्यूहनीती या कंपन्यांनी आखली आहे. यामुळे औषधी-निर्माणशास्त्र विषयात पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात.
गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि जागतिक दर्जाशी स्पर्धा करु शकतील अशा औषधींच्या निर्मिती प्रक्रियेचे खरे सूत्रधार हे या विषयातील तज्ज्ञ ठरतात. या तज्ज्ञांना प्रत्यक्ष प्रयोगशाळेत काम करावे लागते. उपकरणे हाताळावी लागतात. गुणवत्ता आणि दर्जाचे थेट संनिंयत्रण करावे लागते. त्याची शुध्दता तपासावी लागते, तसेच औषधाच्या निर्मितीमध्ये निर्धारित घटक योग्यरीत्या अंतर्भूत झाले किंवा नाही यावर बारकाईने लक्ष ठेवावे लागते.
रसायनशास्त्रात बी.एस्सी वा एम.एस्सी वा बॅचलर ऑफ फार्मसी हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना औषधीनिर्माणशास्त्रात करिअर करण्याची संधी मिळू शकते.औषधीनिर्मितीच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी ऑर्ग्यानिक केमिस्ट्री या विषयात बी.एस्सी वा एम.एस्सी केलेल्या विद्यार्थ्यांची गरज भासते. प्रत्यक्ष निर्मिती प्रक्रियेमध्ये औषधीनिर्मितीचे ज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. हे ज्ञान डिप्लोमा इन फार्मसी किंवा बॅचलर ऑफ फार्मसी तसेच मास्टर ऑफ फार्मसी या अभ्यासक्रमामुळे मिळू शकते.
फार्म डी – सहा वर्षे कालावधीचा हा अभ्यासक्रम डॉक्टर ऑफ फार्मसी या नावाने ओळखला जातो. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला डॉक्टर अशी उपाधी लावता येते.
या अभ्यासक्रमात बॅचलर ऑफ फार्मसी या अभ्यासक्रमासाठी असलेल्या विषयांसोबतच हॉस्पिटल फार्मसी, कम्युनिटी फार्मसी, क्लिनिकल फार्मसी, ड्रग मॉनिटेरिंग, क्लिनिकल रिसर्च , क्लिनिकल टॉक्सिकॉलॉजी, फार्माको-इपिडेमॉलॉजी, ड्रग मॉनिटोरिंग, फार्माको-इकॉनॉमिक्स, फार्माको-थेरेपॅटिक्स अशा विषयांचा समावेश करण्यात आला आहे. फार्म-डी अभ्यासक्रम केलेले विद्यार्थी थेट पीएचडीसाठी नाव नोंदवू शकतात.
महाराष्ट्रात हा अभ्यासक्रम पुढील संस्थांमध्ये करता येतो – १) शासकीय औषधी निर्माण महाविद्यालय,शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या पाठिमागे उस्मानपुरा औरंगाबाद-४३१००५,दूरध्वनी-०२४०-२३२११३०,फॅक्स-२३४६८, ईमेल-gcpaurangabad@gmail.com gcpharma.ac.in२)शासकीय औषधी निर्माण महाविद्यालय काठोरा नाका,अमरावती-४४४६०४,टेलेफॅक्स-०७२१-२५३१६९० ,ईमेल-office.gcopamravati,संकेतस्थळ- gcopamravati.ac.in
अर्हता- विज्ञान शाखेतील विषयांसह १२वी उत्तीर्ण. शाखेतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो.
बी.फॉर्म
तंत्रशिक्षण मंडळाने मान्यता प्रदान केलेल्या शासकीय आणि खाजगी संस्थांमधील बॅचलर ऑफ फार्मसी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएच-सीइटी ही परीक्षा द्यावी लागते. परीक्षेतील गुणानुक्रमानुसार व पसंतीक्रमानुसार प्रवेश दिला जातो.
०००
इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी
ही महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत कार्यरत असणारी स्वायत्त संस्था आहे. या संस्थेने दर्जेदार शैक्षणिक संस्था म्हणून देश विदेशात नाव कमावले आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या लसीच्या शोधासाठी या विभागाने पुढाकार घेतला आहे. या संस्थेतील बी.फॉर्म अभ्यासक्रम उत्तम करिअर घडवण्यासाठी उपयुक्त ठरत आला आहे. हा अभ्यासक्रम १९५९ साली सुरु करण्यात आला. अशा प्रकारचा हा पहिला अभ्यासक्रम आहे.
या अभ्यासक्रमामध्ये औषधी निर्मिती क्षेत्रासाठी आवश्यक असणारे, मेडिकल केमिस्ट्री, फार्माकॅलॉजी, फार्मास्युटिकल ॲनालिसीस या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. औषधी निर्मितीसाठी आवश्यक असणारे संपूर्ण सैध्दांतिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे, औषध निर्मिती सूत्रांचा विकास करता यावा, औषधांचा प्रभाव, उपयुक्तता आणि परिणामांचे विश्लेषण करता यावे आणि प्रत्यक्ष निर्मितीचे तंत्रही अवगत करता येणे शक्य व्हावे या अनुषंगाने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा सैध्दांतिक पाया मजबूत व्हावा यासाठी ऑर्ग्यनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबॉयलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फॉरेन्सिक फार्मसी, मॅनेजमेंट या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
हा अभ्यासक्रम संस्थेच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजीमार्फत चालवला जातो. विद्यापीठ अनुदान आयोगाने या विभागाला सेंटर ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज इन फार्मास्युटिकल सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी अशी मान्यता प्रदान केली आहे. याविभागात अत्याधुनिक अशी उपकरणे आणि यंत्रसामग्री संशोधन कार्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. देश आणि विदेशातील औषधी उद्योगासाठी अनेक प्रकल्प विभागामार्फत राबवण्यात येत आहेत.या अभ्यासक्रमाला एमएच-सीइटी मधील गुणांवर प्रवेश दिला जातो. संपर्क – इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, नाथालाल पारेख मार्ग, माटुंगा, मुंबई- ४०००१९, दूरध्वनी- ०२२-३३६१११११,ईमेल-vc@ ictmumbai.edu.in ,संकेतस्थळ-ictmumbai.edu.in
000
बिट्स पिलानी
बिट्स (बिट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड सायन्स) पिलानी, या संस्थेने बॅचलर ऑफ फार्मसी (ऑनर्स) हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. औषधी निर्मिती क्षेत्रात उत्तम करिअर करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरत आलाय. हा अभ्यासक्रम आठ सत्रांमध्ये पूर्ण केला जातो. औषधी निर्मितीच्या सैध्दांतिक ज्ञानासोबतच या अभ्यासक्रमाला उपयुक्त ठरणारे, मानव्यशास्त्र, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या ज्ञानशाखांतील, विषय घटक शिकवले जातात. विविध संशोधन कार्यपध्दती, उपकरणे आणि साहित्य हाताळणीचे तंत्र, या क्षेत्रातील नवे प्रवाह आणि प्रत्यक्ष औद्योगिक घटकांमधील कार्यपध्दती या बाबींचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे. प्रकल्पकार्य किंवा प्रयोगशाळेतील संशोधन अशा बाबींना प्राधान्य दिले जाते.
संपर्क- हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ फार्मसी,बिर्ला इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड सायन्स, पिलाणी- ३३३०३१,दूरध्वनी-०१५९६-२५५२०६,टेलेफॅक्स-२५५२२६ ईमेल-hemantrj@pilani.bits-pilani.ac.in, संकेतस्थळ- https://www.bits-pilani.ac.in/pharmacy
०००