आयुर्वेदाच्या सहाय्यानं सौंदर्यसाधना
आपल्या शरीराचं प्रत्येकाला कौतुक असतं. आपलं असलेलं किंवा नसलेलं सौंदर्य अधिक खुललं पाहिजे, अशी (अपवाद वगळता) बहुतेक सर्वांची आंतरिक इच्छा असते. सौंदर्याच्या व्याख्येत, केस- त्वचा- नख- चेहरा आदी बाबींचा समावेश होतो. कितीही काळजी घेतली तरी याप्रत्येक घटकावर बाह्य वातावरण, आपली जीवन शैली, ताण-तणाव यांचा परिणाम कळत- नकळत होत राहतो. त्यामुळे आपल्या शरीराच्या विविध भागांवर हे परिणाम दृष्य स्वरुपात दिसू लागतात. यावर उपचार किंवा उपाय करण्याकडे बहुतेकांचा कल असतो. मग त्यासाठी महागड्या औषधी किंवा डॉक्टरांनी सुचवलेल्या उपचार पध्दतींचा अंगिकार केला जातो.
गेल्या काही वर्षांमध्ये शरीरसौंदर्य वाढीस उपयुक्त ठरु शकतील अशा आयुर्वेदिक उपाय आणि उपचारांकडेही बरेचजण वळले आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्याही संधी वाढत आहेत. ही बाब लक्षात घेऊन नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ आयुर्वेद या संस्थेनं अल्पमुदतीचा,सर्टिफिकेट कोर्स ऑन ट्रेनिंग फॉर ब्युटी केअर इन आयुर्वेद सुरु केला आहे.
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ आयुर्वेद ही आयुर्वेदाच्या विविध ज्ञानशाखांमध्ये शिक्षण-प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास चालना देणारी महत्वाची संस्था होय. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या या संस्थेस, राष्ट्रीय महत्वाची संस्था (इंस्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स) म्हणून दर्जा देण्यात आला आहे. या संस्थेमार्फत पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधन अभ्यासक्रमांसोबतच रोजगार आणि स्वयंरोजगारास उपयुक्त ठरतील असे काही प्रशिक्षण अभ्यासक्रम चालवले जातात. यातील काही अभ्यासक्रम हे अल्पमुदतीचे आहेR.
सर्टिफिकेट कोर्स ऑन ट्रेनिंग फॉर ब्युटी केअर इन आयुर्वेद, हा अभ्यासक्रम १६ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु होत आहे. याचा कालावधी दहा दिवसांचा असून तो २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संपेल. हा अभ्यासक्रम या संस्थेच्या डिपार्टमेंट ऑफ सौंदर्य आयुर्वेद मार्फत सुरु करण्यात आला आहे.
प्रवेश प्रक्रिया
अर्हता – कोणत्याही विद्याशाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतो. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश, या तत्वावर प्रवेश दिला जातो. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०२२. अर्जाचे शुल्क खुल्या संवर्गासाठी ३०० रुपये. अनुसूचित जाती/जमाती आणि इतर मागासवर्गासाठी १५० रुपये. या रकमेचा डिमांड ड्रॉफ्ट किंवा एनईएफटी, डायरेक्टर, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ आयुर्वेद-जयपूर यानावे काढलेला असावा.
प्रशिक्षण शुल्क १० हजार रुपये. ही रक्कम एनईएफटीने भरावी लागते. एकदा भरलेले प्रशिक्षण शुल्क पुन्हा परत केले जात नाही. खात्याची माहिती – Name of Account: Director, National Institute of Ayurveda, Jaipur Account no: 3124200215 Name of Bank and Branch: Central bank of India, NIA, Jaipur IFSC Code: CBIN0283634.
निवड करण्यात आलेल्या उमदेवारांना तत्काळ दूरध्वनी अथवा ईमेलव्दारे कळविण्यात येते. त्यानंतर या उमेदवारांनी तीन दिवसात प्रशिक्षण शुल्क भरणं आवश्यक आहे. अन्यथा त्यांचा प्रवेश रद्द केला जातो.
काय शिकाल?
या अभ्यासक्रमामध्ये शरीर सौंदर्य वाढवण्यासाठी आयुर्वेदातील तंत्राचा वापर करण्याचं ज्ञान प्रदान केलं जातं. यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे- (१) त्वचेची संकल्पना आणि पचनक्रिया, (२) आयुर्वेदिक प्रकृतीवर आधारीत त्वचा प्रकाराचे मूल्यांकन, (३) आयुर्वेदातील तत्वं वापरुन त्वचेची स्वच्छता आणि त्वचेचा कोरडेपणा घालवण्याच्या पध्दती, (४) त्वचेवरील डाग नष्ट करणं, (५) दररोजची शरीर स्वच्छता, (६) विविध औषध वनस्पतींचा वापर करण्यात येणाऱ्या आणि सौंदर्य वाढवण्यास उपयुक्त ठरतील अशा स्वेदना, अलेपा यासारख्या आयुर्वेदिक प्रक्रिया/पध्दती,(७) सतेज कांतीसाठी आयुर्वेदिक जीवनशैली,(८) सतेज कांतीसाठी आयुर्वेदिक आहार आणि पोषणमूल्यांचे ज्ञान, (९) विविध मुखलेप (फेसपॅक) निर्मितीचे तंत्र, (१०) मुखअभ्यंग (फेसमसाज) आणि मुखलेपनम (फेसलेप)चा वापर, (११) आयुर्वेद पध्दतीने दंत- डोळे- नख- ओठांची काळजी घेणाऱ्या औषधी वनस्पतीपासूनचे उत्पादन, (१२) हस्तपादप्रसाधनम (आयुर्वेदिक मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर), (१३) केशआयुर्वेदाची संकल्पना – केसांचे प्रकार, वाढ आणि आरोग्यदायी केसांसाठी पोषण आहार, (१४) प्रकृतीनुसार केसांचे मूल्यांकन, (१५) केशप्रकाशलनविधी- आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करुन केस स्वच्छ करण्याचं/धुण्याचं तंत्र, (१६) दररोज घ्यावयाची केसांची काळजी, (१७) केसगळती थांबवण्याचं, कोंड्यावर नियंत्रण ठेवण्याचं आणि अकाली केस पांढरे होण्यापासून थांबवण्याचं आयुर्वेदिक तंत्र आणि व्यवस्थापन, (१८) आयुर्वेदिक हेअर स्पा, आयुर्वेदिक हेअर डाय, हेअर पॅक, (१८) शिरोलेपमचे प्रात्यक्षिक, (१९) शिरोअभ्यंगमचे प्रात्यक्षिक, (२०) धुपना आणि केसांची काळजी घेण्याचे इतर तंत्र इत्यादी.
प्रात्यक्षिकांवर अधिकाधिक भर दिला जातो. हा अभ्यासक्रम इंग्रजी आणि हिंदी मध्ये शिकवला जातो. या अभ्यासक्रमाचं साहित्य उमेदवारांना दिलं जातं.
प्रशिक्षण संपल्यावर सैध्दांतिक (थिअरी) आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत किमान ५० टक्के गुण आवश्यक आहे. हे गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारास प्रमाणपत्र दिलं जातं.
संपर्क –सर्टिफिकेट कोर्स ऑन ट्रेनिंग फॉर ब्युटी केअर इन आयुर्वेद, व्दारा डायरेक्टर, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, जोरवारसिंग गेट, अमर रोड जयपूर -३०२००२, दूरध्वनी – ०१४१- २६३५८१६, संकेतस्थळ- nia.in, ईमेल- nic.innia_rj@nic.in
सुरेश वांदिले