(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 दिव्यांग विद्यार्थींनींसाठी 

दिव्यांग मुलींच्या शिक्षणासाठी पालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. विशेषत: आर्थिक बाबींमुळे दिव्यांग मुलीच्या शिक्षणात अडथळे येऊ शकतात ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय  सक्षमीकरण मंत्रालायच्या अंतर्गत येणाऱ्या अपंग व्यक्ती (दिव्यांगजन) सक्षमीकरण विभागानं वेगवेगळया शिष्यवृत्ती योजना सुरु केल्या आहे.

या शिष्यवृत्तींमध्ये प्री मॅट्रिक म्हणजे मॅट्रिकपूर्व, पोस्ट मॅट्रिक म्हणजे मट्रिकोत्तर आणि टॉप क्लास एज्युकेशन आणि नॅशनल ओव्हरसिज स्कॉलरशीप यांचा समावेश आहे.

अटी आणि शर्ती

() किमान ४० टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थीनी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात. मात्र त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यानं प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे.

() कोणत्याही पालकाची केवळ दोनच अपंग अपत्ये, या योजनेचा लाभ घेऊ शकतात. दुसरे अपत्य हे जुळ्या मुली असतील, तर दोघींनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो.

 

प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती

ही शिष्यवृत्ती- ९ वी आणि १० वीमध्ये असणाऱ्या विद्यार्थींनींना मिळू शकते. शासनमान्य शाळेत किंवा केंद्रिय अथवा राज्य शिक्षण मंडळानं मान्यता प्रदान केलेल्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थीनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करु शकतात.

या शिष्यवृत्तींतर्गत होस्टेलमध्ये राहून शिकणाऱ्या मुलींना दरमहा ८०० रुपये व इतर मुलींना दरमहा ५०० रुपये अर्थसहाय्य १२ महिन्यांसाठी दिलं जाते. पुस्तकांच्या खर्चासाठी वर्षाला १ हजार रुपयांचं सहाय्य केलं जातं. दिव्यांगाचा प्रकार लक्षात घेऊन दोन ते चार हजार रुपयांच्या मर्यादेत, दिव्यांग अनुदान दिलं जातं.

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती

शासन आणि  विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत मान्यताप्राप्त पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या विद्यार्थींनींना ही शिष्यवृत्ती दिली जाते. मान्यताप्राप्त शाळेतील ११ वी व १२ वी मधील विद्यार्थीनीही या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात.

या शिष्यवृत्तीचे चार प्रकार आहेत-

गट एक– पुढील विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थींनींना याचा लाभ मिळू शकतो- वैद्यकीय/अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान/ व्यवस्थापन आणि व्यवसाय (बिझिनेस) /वित्त प्रशासन/ संगणकशास्त्र किंवा संगणक उपयोजिता (ॲप्लिकेशन)/ कृषी, पशुवैद्यकीय आणि संबंधित शाखा/ फॅशन तंत्रज्ञान/ वास्तुकला आणि नियोजन.

या शिष्यवृत्तींतर्गत, वसतिगृहात राहून शिकणाऱ्या मुलींना दरमहा १६०० रुपये व इतर मुलींना दरमहा ७५० रुपये अर्थसहाय्य १२ महिन्यांसाठी केलं जातं.

गट दोन-  पुढील  व्यावसायिक अभ्यासक्रमातील पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमास विद्यार्थींनींना याचा लाभ मिळू शकतो– औषधीनिर्माण शास्त्र/ एलएलबी/ जनसंवाद/ हॉटेल व्यवस्थापन आणि कॅटेरिंग/ पॅरॉमेडिकल/ ट्रॅव्हल-टुरिझम-हॉस्पिटॅलिटी/ इंटेरिअर डेकोरेशन/ डायटेटिक्स -न्युट्रिशन/कर्मशिअल आर्ट/ फायनांशिअल सर्व्हिसेस (बँकिंग/इन्शुरंस/टॅक्सेशन)

या शिष्यवृत्तींतर्गत वसतिगृहात राहून शिकणाऱ्या मुलींना दरमहा ११०० रुपये व इतर मुलींना दरमहा ७०० रुपये अर्थसहाय्य १२ महिन्यांसाठी केलं जातं.

 गट तीन- गट एक आणि दोन मध्ये समाविष्ट नसलेले सर्व पदवी अभ्यासक्रम. उदा-बीए/बीएस्सी/बीकॉम.

या शिष्यवृत्तींतर्गत, होस्टलमध्ये राहून शिकणाऱ्या मुलींना दरमहा ९५० रुपये व इतर मुलींना दरमहा ६५० रुपये अर्थसहाय्य १२ महिन्यांसाठी केलं जातं.

 

गट चार – ११ वी, १२वी, आयटीआय आणि तंत्रनिकेतनचा ३ वर्षे कालावधीची पदविका.

या शिष्यवृत्तींतर्गत, वसतिगृहात राहून शिकणाऱ्या मुलींना दरमहा ९०० रुपये व इतर मुलींना दरमहा ५५० रुपये अर्थसहाय्य १२ महिन्यांसाठी केलं जातं.

चारही गटांना पुस्तकांच्या खर्चासाठी वर्षाला प्रत्येकी दीड हजार रुपयांचं सहाय्य केलं जातं. मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेनं नापरतावा शिक्षण शुल्क आकारल्यास ते परत केलं जातं. या शिष्यवृत्तीचं दरवर्षी नूतनीकरण केलं जातं. दरवर्षी उत्तीर्ण होणं आवश्यक.

संपर्क संकेतस्थळ- www.scholarship.gov.in www.disabilityaffairs.gov.in

०००