(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आयआयटीतील कलाशाखा

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(आयआयटी) मद्रासमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमासोबतच मानव्यशास्त्राचाही अभ्यास करता येतो. या संस्थेत २००६ साली १२ वी नंतरचा पाच वर्षे कालावधीचा एम.ए इंटिग्रेटेड अभ्यासक्रम, मानव्यशास्त्र शाखेत सुरु करण्यात आला. कलाशाखेत करिअर करण्याची इच्छा, आवड आणि गती असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. आयआयटी सारख्या दर्जेदार संस्थेतून हा अभ्यासक्रम केल्याने करिअरच्या  उत्तमोत्तम संधी सुलभतेने मिळू शकतात.

हा एम.ए अभ्यासक्रम आंतरज्ञानशाखीय  स्वरुपाचा असून यामध्ये इंग्रजी, परकीय भाषा, आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थशास्त्र, सांस्कृतिक अभ्यास, नाट्यशास्त्र, सांख्यिकी आणि तर्कशास्त्र या विषयांचा समावेश आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठीसुध्दा हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो.

हा अभ्यासक्रम केल्यावर सल्लागार कंपन्या, संशोधन करणाऱ्या संस्था, जागतिक संस्था, स्वयंसेवी संस्था ,बँका, अध्यापन, धोरणनिर्मितीत सहभागी असणाऱ्या संस्था किंवा केंद्रे आणि पत्रकारिता या क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी मिळू शकतात.

करिअर संधी

() डेव्हलपमेंट स्टडीज (विकासाचा अभ्यास) या शाखेत स्पेशलायझेशन करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शासकीय किंवा अशासकीय धोरण निर्मिती संस्था किंवा थिंकटँक मध्ये संशोधन अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते. सामाजिक धोरणे, अर्थशास्त्र, पर्यावरण या क्षेत्रांमध्ये सल्लागार म्हणून संधी मिळू शकते किंवा या विषयाशी निगडित वकिली करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

() आंतरराष्ट्रीय विकास – विकास विकासविषयक कामांचे नियोजन, संनियंत्रण, समन्वयन  आणि सल्लागार म्हणून संधी मिळू शकते.

() खाजगी संस्था – कार्पोरेट जगतासाठी सामाजिक जबाबदारीचे प्रकल्प राबवण्यासाठी ही शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी समन्वयक, प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करु शकतात.

() शासकीय संस्था – विविध सामाजिक कल्याण्याच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी क्षेत्रीय व विकास अधिकारी म्हणून संधी मिळू शकते.

() ग्लोबल कन्सलटन्सी फर्म्स – अर्थशास्त्र आणि संशोधन कौशल्य असणाऱ्या विद्यार्थ्यांची निकड अशा संस्थांना भासत असते.

() पत्रकारिता- लेखन कौशल्य व भाषेवर प्रभुत्व मिळवल्यास इंग्रजी पत्रकारितेत कंटेट रायटर – संहिता लेखक, कॉपी एडिटर, समाजमाध्यमे स्पेशॅलिस्ट अशा विविध संधी मिळू शकतात.

() कॉर्पोरेट कम्युनिकेशन – कंपनीशी संबधित माहिती तत्काळ व सुयोग्य पध्दतीने कंपनीचे ग्राहक, कंपनीचे भागधारक, कर्मचारी आणि माध्यमे यांना देण्यासाठी अशा तज्ज्ञांची गरज भासते.

() कॉर्पोरेट ट्रेनर्स- कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये संवादकौशल्य, भाषाकौशल्य, लेखनकौशल्य, व्यक्तिमत्व विकास अशा बाबींचे प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञांची गरज भासते. ही गरज कॉर्पोरेट ट्रेनर्स भागवत असतात.

() अध्यापन – सध्या चांगल्या इंग्रजी अध्यापकांचा सर्वत्र मोठा तुटवडा आहे. त्यामुळे अध्यापनाची तीव्र आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम कामगिरी करता येणे शक्य आहे.

अर्हता – कोणत्याही विद्याशाखेतील ५० टक्के गुणांसह १२ वी उत्तीर्ण. यंदा १२ वीला असणारे विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या चाळणी परीक्षेला बसू शकतात.

प्रवेश प्रक्रिया – या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एचएसइइ (ह्युमॅनिटिज ॲण्ड सोशल सायन्स एंट्रन्स एक्झामिनेशन) परीक्षा द्यावी लागते. ही ऑनलाइन बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पध्दतीची परीक्षा आहे. मानव्य आणि समाजशास्त्राच्या अभ्यासाकडे विद्यार्थ्यांचा कल तपासणीसाठी या परीक्षेत प्रश्न विचारले जातात. या शिवाय ५०० शब्दांमध्ये निबंध लिहावयाचा असतो. निबंधाचा विषय दिला जातो. कल चाचणीत पुढील भागांवर प्रश्न विचारले जातात. () इंग्रजी – यामध्ये शब्दसंग्रह, उताऱ्याचे आकलन, व्याक्रण, म्हणी आणि वाक्प्रचार, वांड्मयीन आयुधे यावर प्रश्न  विचारले जातात. इंग्रजीचे प्रभुत्व तपासण्यासाठी या चाळणीची रचना केलेली असते. () ॲनॅलिटिकल आणि मॅथेमॅटिकल ॲबिलिटी- विद्यार्थ्याचे गणितीय आणि विश्लेषणात्मक कौशल्य तपासण्याठी कोडे, श्रुंखला पूर्ण करणे, काळ-काम-वेग, नफा-तोटा, समानता, दिलेल्या माहितीचे विश्लेषण इत्यादी घटकांवर प्रश्न विचारले जातात.() सामान्य ज्ञान – चालू घडामोडी, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, समकालीन जागतिक परिस्थिती, पर्यावरणशास्त्र आदी विषयांबाबतची विद्यार्थ्यांची जागरुकतता जोखली जाते.

परीक्षेची तयारी-मागील दहा वर्षाचे पेपर सोडवून बघितल्यास अभ्यासाची व्यूहनीती तयार करण्यास मदत होऊ शकते. इतिहास, अर्थशास्त्र या विषयाची एनसीइआरटीची पुस्तके वाचल्यास या विषयातील प्रश्न सोडवणे सोपे जाते. ऑनलाइन मॉक टेस्ट दिल्याने परीक्षेचा सराव होतो. इंग्रजी वर्तमानपत्राचे दररोज वाचन केल्यास दैनंदिन घडामोडी, सामान्य ज्ञानाचे प्रश्न सोडवण्यासाठी व निबंध लेखनासाठी उपयोग होऊ शकतो. लेखन कौशल्य वाढवण्यासाठी समकालीन विविध विषयांवर निबंध लेखनाचा सराव करायला हवा. सामान्य ज्ञान वाढीसाठी किंवा भर घालण्यासाठी चांगले ॲप्स, संकेतस्थळ किंवा इंडिया इअरबूक सारख्या दर्जेदार पुस्तकांचा वापर करावा. अंकगणितीय कौशल्यात वाढ करण्यासाठी नफा-तोटा, सरळव्याज, चक्रवाढव्याज, काळ-काम-वेग, अंतर अशा सारख्या मूलभूत अंकगणितीय संकल्पना स्पष्ट होण्यासाठी सराव करावा. इंग्रजी विषयाचा अभ्यास करण्यासाठी व्याक्रण आणि शब्दांची तयारी करावी.

संपर्क– डिपार्टमेंट ऑफ ह्युमॅनिटी ॲण्ड सोशल सायंसेस, रुम नंबर- एचएसबी-३३३, आयआयटी-मद्रास, चेन्नई- ६०००३६, दूरध्वनी- ०४४-२२५७४५००, फॅक्स-२२५७४५०२, ईमेल- hsse@iitm.ac.in,संकेतस्थळ- https://hss.iitm.ac.in/