अपयशातून यशाकडे…
विद्यार्थी मित्र-मैत्रीणिंनो तुम्हाला असं वाटत असेल की आपली बुध्दीमत्ता अगदीच सर्वसाधारण आहे.
शैक्षणिक कामगिरी अगदीच सुमार आहे, तर आता कसं होणार आपलं?
पण याचा फार काही विचार करु नका. घाबरु
नका, काळजीही करु नका आणि निराश तर अजिबातच होऊ नका. कारण करिअरमधील तुमचं यश
याशिवाय दुसऱ्या घटकांवरसुध्दा अवलंबून असतं हे कायम लक्षात ठेवा. याचं महत्वाचं
कारण म्हणजे जे तुमचे मित्र किंवा मैत्रिणी तुमच्या मते खूप हुषार किंवा स्टार
कामगिरी करणारे असतात त्यांच्यामध्ये निश्चितपणे काही कमतरता राहू शकते. त्याची
हुषारी ही त्याची सक्षम बाजू असेल पण त्याचे व्यक्तीमत्व परिपूर्ण नसेल किंवा
त्याला अभ्यासाशिवाय इतर कोणत्याही बाबतीत रस किंवा गती नसेल आणि या उलट तुम्ही
असाल तर तुम्हालासुध्दा चांगल्या संधी मिळू शकतात हे लक्षात ठेवा. किंबहुना अशा
संधी बऱ्याच वेळेस तुमच्यापर्यंत चालून सुध्दा येऊ शकतात.
असुरिक्षेतवर मात
प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणत्या ना
कोणत्या प्रकारची असुरक्षितता राहू शकते. या असुरक्षितेवर जर मात करता आली तर
तुमची बुध्दीमत्ता किती उच्च दर्जाची किंवा निम्न दर्जाची आहे हे लक्षात न घेता
सुध्दा यश मिळू शकतं. (इंग्रजी,मराठी,हिंदी किंवा इतर)भाषेवरील प्रभुत्व, प्रभावी
संवाद कौशल्य, सादरीकरण कौशल्य किंवा इतरही कौशल्य हे प्रयत्नपूर्वक मिळवता येतात.
यासाठी विशेष गुणवत्ताच लागते अशातला भाग नाही. अशी कौशल्यं कोणत्याही टप्प्यावर
प्राप्त करता येतात.
दुसरेच ठरवतात…
आपल्याला नेमकं काय व्हायचय किंवा
कोणत्या मार्गानं जायचय हे स्वत: जर ठरवता येत असेल तर अतिशय उत्तम. कारण सध्या
आपण काय व्हायचय याचा निर्णय दुसरे घटकच घेत असतात. त्यासाठी ही मंडळी मार्ग
ठरवतात किंवा दिशा ठरवतात. आपल्याला आग्नेय दिशेला जायचं असेल पण हे इतर घटक
नैऋत्य दिशेला जाण्यासाठी भाग पाडतात. आपण नाईलाजाने किंवा काहीही झापडबंद
पध्दतीने या दिशेने प्रवास करु लागतो. हा प्रवास सुखकर, आनंददायी ठरेलच, असं
ठामपणे सांगता येत नाही. ज्या घटकांनी आपल्यासाठी यशाची व्याख्या ठरवलेली असते,
त्याप्रमाणे घडवून आणण्याचा मोठा ताण, त्यांच्यावर नव्हे तर आपल्यावर पडू शकतो आणि
पुढे विविध टप्प्यांवर याचा परिणाम होऊन आपली व्यक्तीगत व इतरही कामगिरी दुय्यम
दर्जाची होऊ शकते. त्यामुळे तुमच्या आवडीनिवडी, कला, संगीत, क्रीडा, चित्रकला
इत्यादी बाबत ज्यामध्ये तुम्हास मनापासून आणि ह्रदयापासून आनंद मिळतो, याचा
करिअरची दिशा ठरवताना नक्कीच विचार करावा. आपल्यावतीने हे ठरवणाऱ्या घटकांना
सुध्दा स्पष्ट सांगावे किंवा किमान तसा प्रयत्न करावा.
सक्षमतेचा विचार
तुमच्या कमकुवत बाजू कितीही
असल्यातरी तरी एक किंवा दोन किंवा यापेक्षा अधिक सक्षम बाजूही असणारच किंबहुना
प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये, व्यक्तीमध्ये काहीतरी वैशिष्ट्ये असतातच. त्यामुळे
तुमच्या सक्षम बाजूला अधिक पैलू पडू शकेल, अशाच मार्गाचा विचार होणं गरजेचं
असल्याची बाब संबंधितांना समजून सांगण्याचा प्रयत्न करायला हवा.
आपल्या सक्षम बाजूंबद्दल शंभर
टक्के खात्री बाळगा म्हणजे आत्मविश्वास वाढेल. आपल्याबद्दल कुणाला काय वाटतं हे
अंतिमत: कधीच उपयुक्त ठरत नाही. आपल्यालाच संघर्ष करुन संकटांवर मात करावी लागते.
त्यावेळी, आम्ही हे सांगितलं होतं किंवा ते सांगितलं होतं, असे सल्ला देणारी मंडळी
आपल्या मदतीसाठी येतीलच याची खात्री देता येत नाही.
सदा-सर्वकाळ तुम्ही उत्कृष्ठ किंवा
सर्वोत्कृष्ठ ठरण्याचा अट्टाहास करण्यात अर्थ नसतो. अशी ज्या घटकांची अपेक्षा असते
त्या घटकांकडे दुर्लक्ष करायला हवं. तुम्ही जे आणि जसे असता ते उत्कृष्ठच आहात,
असं समजायला हवं. कुणीही परिपूर्ण असत नाही. क्रिकेटचा देव समजले जाणारे सचिन
तेंडूलकर, लॉन टेनीस मध्ये हीच प्रतिमा असलेले रॉजर फेडेरर किंवा फुटबॉलमधील दिओगो
मेरिडोना, लिओनॉ मेसी आणि पेले हे सुध्दा
परिपूर्ण नव्हते. अभिनयाचे सर्वश्रेष्ठ गुरुकुल वगैरे ज्यांना ज्यांना संबोधण्यात
आले किंवा सध्या येते, ते अभिनेतेही परिपूर्ण नव्हते. कोणत्या ना कोणत्या
टप्प्यावर त्यांना अपयशांचा सामना करावा लागला. तो सुध्दा अनेकदा. त्यामुळे
परिपूर्णतेचा ध्यास ठेवणं उत्तम पण तेच सत्य समजणं हे चुकिचं याची खुणगाठ मनात
बांधून ठेवायला हवी.
०००
अपयशातलं सुयश
अपयशातून शिकण्यासारख्या काही बाबी पुढीलप्रमाणे नोंदवता येतील.
1) एकदा अपयश आलं की पुढच्या प्रयत्नांच्या वेळी विचारपूर्वक पावलं टाकायला हवीत. घिसडघाई टाळायला हवा. अधिक सूक्ष्मपणे गृहपाठ करायला हवा. कृती करण्यासाठी विलंब लागत असला तरी सुक्ष्म नियोजन करायला हवं. अनावश्यक धाडस दाखवणं धोक्याचं ठरु शकतं.
2) अपशयाची जबाबदारी ही आपली स्वत:ची असते. त्यामुळे इतर कुणालाही दोष देऊ नका. त्यामुळे आपली चूक लक्षात येऊनही इतरांवर दोषारोपण केल्यानं खोटं समाधान मिळतं हे कायम लक्षात ठेवा. असं खोटं समाधान हे फसवं तर असतच शिवाय स्वत:च्या चुकांची दुरुस्ती करण्याकडे कानाडोळा करण्यास आपणास बाध्य करत असतं.
3) अपयशामुळे आपणास नवी आव्हानं दिसू लागतात. ती स्वीकारण्याची मानसिक तयारी ठेवल्यास आपणास यशप्राप्तीसाठी नव्या उत्साहानं प्रयत्न करण्याची उर्जा मिळू शकते.
4) अपयश आपणास नवे बदल स्वीकारण्याची प्रेरणा देतात. हे बदल आपण सकरात्मकतेनं स्वीकारल्यास अधिक जोमानं आपण उद्दिष्ट्यसाठी प्रयत्न करु शकतो.
5) अपयशामुळे आपणास निराशा येणं स्वाभाविक असतं. पण या निराशेला आपल्या मनावर स्वार होऊ दिलं नाही तर आपलं व्यक्तीमत्व अधिक कणखर बनू शकतं. अशा कणखर व्यक्तींची कोणत्याही आव्हानांचा समर्थपणे मुकाबला करण्याची त्यांची तयारी असते.
6) आपणास आपल्या चुकांची आणि घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारण्याचा धडा अपयश देत असते. हा धडा आपण जर प्रामाणिकपणे गिरवला तर आपल्या प्रयत्नांमधील उणिवा आणि त्रुटी स्पष्टपणे दिसू लागतात. त्यामुळे त्यावर मार्ग काय काढायचा याचा आराखडा आपण स्पष्टपणे तयार करु शकतो.
7) अपयशामुळेच आपणास यशाचं महत्व थेट लक्षात येतं. त्यामुळे यशप्राप्तीसाठीचे आपले प्रयत्न अधिक प्रामाणिक आणि वस्तुनिष्ठ होतात.
8) अपयशामुळे इतरांशी तुलना करण्याचा मोह होत असला तरी त्यातून काही साध्य होत नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या मगदुराप्रमाणे आणि अनुभवानुसार मार्ग काढून वा आराखडा आखून पुढचं पाऊल उचलत असते. ती पावलं आपल्यासाठी जशीच्या तशी उपयुक्त ठरतील असे नाही. त्यामुळे इतरांशी तुलना न करता स्वत:चा मार्ग स्वत:च निर्धारित करायला हवा.
9) अपयशामुळे नैराश्य येणं हे स्वाभाविकच आहे. पण त्यामुळे हातपाय गाळून बसणं अयोग्य ठरतं. कारण यश आणि अपयश या तात्कालिक बाबी असतात. यश किंवा अपयशापेक्षा जीवनाचा आनंद हा अधिक मोठा आणि अधिक मौल्यवान असतो. ही बाब ध्यानात घ्यायला हवी. त्यामुळे यशासाठीचे प्रामाणिक प्रयत्न जरी अपुरे पडले तरी त्यामुळे ,आता सारं काही संपलं असं अजिबात समजू नये. आपलं व्यक्तिमत्व अधिकाधिक सकारात्मक घडवण्यावर आपण लक्ष केंद्रित केलं तर ते आपलं सर्वात मोठं आणि कायमस्वरुपी यश ठरु शकतं.
10) अपयशामुळे आपणास कळतं की या जगात कुणीही परिपूर्ण राहू शकत नाही.हे वास्तव आपण स्वीकारायला हवं. त्यामुळे अपयश आल्यावर चुकांचा शोध घेणं सोपं जातं. तसच या चुकांवर मात करणारे वस्तुनिष्ठ उपायही सुचतात.
11) अपयशामुळे आपणास इतरांबद्दलच्या उत्तम गुणांची पारख करण्याची आणि त्यामुळे त्यांचा आदर करण्याची संधी मिळते.
12) अपशायावर मात करण्यासाठी केलेल्या आपल्या प्रयत्नांमुळे आपलं व्यक्तिमत्व अधिकाधिक समृध्द होऊ शकतं.
13) कोणत्याही आव्हानांवर मात करण्याची आपणास क्षमता सुध्दा प्राप्त होऊ शकते.