दिशादर्शक कालावधी
करिअरची निवड ही विविध घटकांवर होत
असते. त्यामध्ये 12 वीनंतर निवडलेल्या ज्ञानशाखा
महत्वाच्या ठरतात. त्यामुळेच या ज्ञानशाखांची निवड काळजीपूर्वक व आपल्या आवडीनिवडी, आर्थिक परिस्थिती पाहून करायला हवी.
ज्या विद्यार्थ्यांना आवडीच्या ज्ञानशाखेत प्रवेश मिळाला नाही त्याचे काय ? त्याने काय करायचे ?
अशा
विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपल्यात काहीतरी न्यून आहे किंवा कमतरता आहे, ही बाब
मनातून काढून टाकावी. त्यांनी आपल्या शहरातील अथवा इतर शहरातील नामवंत शिक्षण
संस्थेतील बीए (मानसशास्त्र/
अर्थशास्त्र/भूगोल इत्यादी), बी.एस्सी
वा बी.कॉम, अशा ज्ञानशाखांना प्रवेश घ्यायला हवा. या शाखांमधील पदवीपर्यंतचा
कालावधी हा तीन ते चार वर्षाचा असतो. या कालावधीत त्याने पदवीच्या अभ्यासक्रमाकडे
दुर्लक्ष न करता व्यक्तीमत्व विकासाच्या इतर काही बाबींकडे (उदा- संभाषण कौशल्य, सादरीकरण कौशल्य, संगणकीय कौशल्य, इंग्रजी लेखन/वाचन कौशल्य, सर्वसाधारण गणीतीय
कौशल्य, सामान्य ज्ञान कौशल्य इत्यादी) लक्ष दिले तर त्यालासुध्दा करिअरच्या चांगल्या
संधी पुढील एक दोन वर्षात मिळू शकतात. अशा विद्यार्थ्यांनी केंद्र आणि राज्य
शासनाचे वेगवेगळे विभाग, सार्वजनिक – खाजगी-सहकारी – बँका, विमा-
वित्तीय सल्ला-सेवा कंपन्या/फर्म रेल्वे, लष्कर, पोलीस भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याचे
धेय्य पदवीच्या पहिल्याच वर्षी पक्के करावे. पदवी परीक्षेत उत्तम गुण मिळण्यावर
अधिकाधिक लक्ष केंद्रित करुन आपल्या ध्येय्यासाठी आवश्यक वाचन-मननासाठी वेळेचे
नियोजन करावे.
धेय्य निश्चिती
सध्या
बहुतेक शासकीय , निमशासकीय नोकरीसाठी नोकरीसाठी किमान अर्हता ही कोणत्याही
विद्याशाखेतील पदवी असते. विशिष्ट कालावधीपर्यंत पदवी परीक्षेचा निकाल लागू शकत
असल्यास, अशा परीक्षांना पदवीच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना बसू
दिले जाते. उपरोक्त नमूद पध्दतीने तयारी केली असल्यास विद्यार्थ्यांनी या परीक्षा द्याव्यात. पदवी परीक्षेचा निकाल लागेपर्यंत
किंवा त्यानंतरच्या वर्षभराच्या कालावधीत पदवी आणि नोकरी दोन्ही गोष्टी साध्य करणे शक्य होऊ शकते.
अशा
स्पर्धा परीक्षा या वस्तुनिष्ठ पध्दतीच्या व बहुपर्यायी स्वरुपाच्या असतात. गेल्या
दोन – तीन वर्षात अशा परीक्षांना मोठ्या प्रमाणात मुले बसू लागल्याने प्राथमिक आणि
मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये निवड प्रक्रिया राबवली जाते. या
परीक्षांमध्ये साधारणत: चालू घडामोडी (करंट इव्हेंट), सामान्य अध्ययन (आपल्या
जीवनाशी निगडित विविध विषयातील सर्वसामान्य बाबी), रिझनिंग टेस्ट, आकलन क्षमता, इंग्रजीचे सर्वसामान्य ज्ञान,सामान्य अंकगणित यावर प्रश्न विचारले
जातात. प्रश्नपत्रिकेचा स्तर 12 वीच्या दर्जाचा असतो. पण असे प्रश्न
सोडवण्याची क्षमता व कौशल्य बहुतेक मुलं/मुली प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक
प्रयत्न करत नाहीत वा त्यासाठी शेवटच्या क्षणी प्रयत्न करतात. त्यामुळे बऱ्याच
मुलांची विकेट जाते.
विविध संधी
भारतीय बँक व्यवस्था वा अर्थव्यवस्था मोठ्या गतिने वाढत आहे. गेल्या दोन
वर्षात विविध सार्वजनिक बँकांनी अधिकारी आणि लिपिकसंवर्गीय 25 हजाराच्या आसपास पदे भरली आहेत. पुढील
पाच वर्षांत अशाच प्रकारे भरतीची शक्यता आहे. त्याशिवाय एलआयसी, जीआयसी, नाबार्ड, नॅशनल ॲशुरंस कंपनी अशा वित्त/विमाविषयक कंपन्या/संस्थासुध्दा विविध
संवर्गातील (अधिकारी,स्पेशॅलिस्ट,लिपिक) जागा सातत्याने भरत असतात. त्यामुळे
यंदा पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी ही बाब लक्षात
ठेऊन तयारी सुरु ठेवली, त्यासाठी कष्ट घेतले,इंग्रजी भाषेवरील कौशल्य वाढवले, सामान्य अंकगणित, बिजगणित
याच्या संकल्पना पुन्हा नीट समजून घेतल्या, प्रश्न
सोडवण्याचा सतत सराव केला,
या सरावातून लक्षात येणाऱ्या त्रुटी
दूर करण्यासाठी प्रयत्न केले, गरज असल्यास दर्जेदार संस्थेत शिकवणी लावली, वेळेचे नियोजन केले तर या स्पर्धा परीक्षांमध्ये यश
मिळवणे आवाक्यात येऊ शकते.
दरवर्षी साधारणत: वेगवेगळया विभागांच्या 75 हजाराच्या आसपास जागा अशा स्पर्धा परीक्षांद्वारे भरल्या जातात. पुढील
काळ केंद्र आणि राज्य शासनामार्फत हजारो पदे भरली जाणार आहेत. त्याची सुरुवात
सुध्दा झाली आहे. त्याकडे लक्ष ठेऊन तयारी करायला हवी. यातील काही नोकऱ्या कनिष्ठ
स्तरीय असतात. पण पहिल्याच प्रयत्नात वा कमी वयात अशा नोकऱ्या लागल्या तर भविष्यात
पदोन्नतीच्या संधीही टप्प्याटप्प्याने मिळत जावून एका विशिष्ट कालावधीत याच मार्गाने
मोठ्या पदावर पोहचणे शक्य होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन बी.ए,बी.एस्सी आणि बी.कॉम या ज्ञानशाखांना
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी उत्साह आणि उर्जा टिकवून ठेवावी. पालकांनीसुध्दा
आपल्या पाल्यावर विश्वास ठेवावा.
खंत
बाळगू नये
अभियांत्रिकी वा वैद्यकीय शाखांमध्ये प्रवेश मिळाला नाही वा 12वीला चांगले गुण मिळाले नाही वा सीइटी
किंवा जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशनमध्ये हाराकिरी केली किंवा झाली याची खंत बाळगू
नये. त्यासाठी मुलांना दोष देत बसू नये. या परीक्षेत त्याने उत्तम यश मिळवले नाही, याचा अर्थ सारे काही संपले असे होत नाही. उलट नवे चांगले मार्ग
उपलब्ध होण्यासाठी असे झाले असावे, हा
सकारात्मक विचार करावा. स्वत:लाही निराश होण्यापासून वाचवावे आणि मुलांनाही
वाचवावे.
स्मार्ट व्हा
या
कालावधीत मुलाचे व्यक्तीमत्व चौफेर विकसित होईल या साठी लक्ष द्यावे. त्यावर खर्च
करावा. त्याच्या अंगात एखादी कला असल्यास त्याला अधिक आकार मिळण्यासाठी मदत करावी, प्रोत्साहन द्यावे. भरपूर चौफेर वाचन
करण्यासाठी प्रेरित करावे. इंग्रजी, मराठी
आणि हिंदी या तिन्ही भाषेत बोलणे, लिहिणे, सादरीकरणाचे कौशल्य हस्तगत करुन त्यात
प्रावीण्य मिळवणे यासाठी साहाय्य करावे. आजच्या काळात स्मार्ट किंवा चुणचुणितपणा
म्हणजे केवळे गोरगोमटे दिसणे वा फॅशनेबल कपडे परिधाण करणे वा चित्रविचित्र केशभूषा
करणे असे नव्हे. या एकदम तकलादू बाबी आहेत. तुम्ही स्वत:ला प्रभावीरीत्या
कशापध्दतीने सादर करु शकता. ही बाब अधिक महत्वाची! अशी मुले दिसायला यथातथाच असली तरी ती
स्मार्टच समजली जातात. चुणचुणीत समजली जातात. 12
वीनंतरचा पदवी मिळवेपर्यंतचा कालावधी हा स्मार्टपणा मिळवण्यासाठी व तो अधिक
प्रभावी करण्यासाठी घालवायला हवा.
स्वत:च्या दिसण्याचा न्यूनगंड काढून टाकण्यासाठी हा कालावधी उपयोगी पडू
शकतो. बी.ए, बी.कॉम आणि बी.एस्सीमध्ये उत्तम
कामगिरी केल्यास पदव्युत्तर पदवी, भारतात
किंवा परदेशात संशोधन, अध्यापन, लेखन अशाही संधी उपलब्ध होतात. मात्र हा सर्व कालावधी पूर्णपणे
सकारात्मकरीत्याच घालवणे आवश्यक आहे. काहीच करता आले नाही वा मित्रमंडळींना
चांगल्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळाला, आपणास
मिळाला नाही याच व्यथेत वा कुंठितावस्थेत हा कालावधी जर काढला तर कोणतीही प्रगती
होणार नाही. स्पर्धापरीक्षांमध्ये पाहिजे तसे यश मिळवण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या
कष्टाकडे दुर्लक्ष होईल. अर्धवट मनाने केलेली कोणतीही तयारी ही फारशी फलद्रुप होत
नाही. शिवाय पदवी वा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रांमध्येही फारशी चमक दाखवता येणार
नाही. दोन्ही बाजूंनी अशी कोंडी झाली की येणारे नैराश्य हे फार मोठे राहू शकते.
दिशादर्शक कालावधी
12 वींनतरचा तीन वा पाच वर्षाचा कालावधी
हा कोणत्याही ज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील करीअर व आयुष्याला
दिशा दाखवणारा कालावधी असतो. हे जसे अभियांत्रिकी वा वैद्यकीय शाखेतील
विद्यार्थ्यांसाठी लागू पडते, तसेच
ते बी.ए,बी.एस्सी वा बी.कॉम या ज्ञान शाखेंची
निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लागू पडते. त्यामुळे या ज्ञानशाखेची निवड
करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वा त्यांच्या पालकांना हा तीन ते पाच वर्षाचा कालावधी
वाया जाणारा कालावधी समजू नये. या कालावधीत धरसोड करु नये. हे कर, ते कर आणि तेही करुन बघ असे करु नये.
एका ना धड भाराभार चिंध्या ही म्हण कायम लक्षात ठेवावी. अभ्यासक्रम वा विषय जितका
महत्वाचा तितकेच त्या विषयाचे ज्ञान संपादन आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग करण्याचे
कौशल्य प्राप्त करणे महत्वाचे. हे कौशल्य धरसोड केल्याने प्राप्त होऊ शकत नाही.
यात वेळ, परिश्रम आणि पैसा या तिन्ही गोष्टी
खर्च होतात. त्यामुळे एक वा दोनच गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे व त्यात प्रावीण्य
मिळण्यासाठी स्वत:ला झोकून द्यावे.
सुरेश वांदिले
000