करिअरची दिशा
१० वी नंतरच करिअरची दिशा स्पष्ट होते
असे समजण्याचे काही कारण नाही. १० वीनंतर कोणत्या ज्ञानशाखेत म्हणजे वाणिज्य-
विज्ञान- कला यामध्ये जायचे का? हे ठरवता येऊ शकते. १२ वीनंतर अभियांत्रिकी – वैद्यकीय- डिझाइन-
फॅशन तंत्रज्ञान- व्यवस्थापन- विधि- संशोधन आदी विविध करिअरचे पर्याय उपलब्ध
होतात. पदवीनंतर याच शाखांमधील पदव्युत्तर पदवी किंवा इतर विषयातील पदव्युत्तर
पदवी (उदा-एमबीए-मास्टर
ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन / मास्टर ऑफ फॅशन टेक्नालॉजी किंवा कलाशाखेतील विषय
इत्यादी),
पदव्युत्तर पदवी नंतर संशोधनाकडे वळता येऊ शकते.
शाखा एकिकडे..करिअर दुसरीकडे
१२ वीनंतर ज्या ज्ञानशाखेला प्रवेश
घेतला त्याच शाखेत करिअर होईल, असे काही ठामपणे सांगता येत नाही. ईलेक्ट्रॉनिक्स
विषयात इंजिनीअरिंग करुनही पहिले
प्लेसमेंट ज्या ज्ञानशाखेशी फारसा संबंध येत नाही अशा संगणक शास्त्राशी सबंधित काम
देणाऱ्या कंपनित मिळते. आयआयटीसह इतर संस्थांमधून अभियांत्रिकीची पदवी घेतलेले
बरेच विद्यार्थी एमबीएचा मार्ग पकडतात. बऱ्याच अभियंत्यांना सार्वजनिक क्षेत्रातील
बँकांचा मार्ग खुणावू लागतो. बरेच जण अखिल भारतीय आणि राज्य प्रशासकीय सेवेसाठी
झटून तयारीला लागतात. अगदी एमबीबीएस झालेले विद्यार्थी हा मोह आवरु शकत नाहीत.
ज्या विषयात इंजिनीअरिंगची पदवी घेतली त्या विषयापेक्षा दुसऱ्या विषयात एमएस (मास्टर ऑफ सायंस) करण्यासाठी विद्यार्थी परदेशात जातात.
सैन्यदलातील अधिकारी पदासाठीही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेतलेले विद्यार्थी
प्रयत्न करतात. याचा अर्थ असा की १२
वीनंतरच करिअरची दिशा ठरते आणि त्यात काही बदल होत नाही, असे अजिबात समजायचे कारण
नाही.
आवाका समजून घ्या
१२ वीनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या
बुध्दिमत्तेचा आवाका समजून घेतला, पालकांनीही मुलांचा आवका समजून घेतला,
विद्यार्थ्यांनी स्वत:च्या आवडीनिवडीच्या किंवा कलाचा लंबक सर्वाधिक कोणत्या
बिंदूवर थांबतो हे प्रामाणिकपणे जाणून घेतले तर बऱ्याच बाबी सुलभ होऊ शकतात.
सर्वांनाच मनासारख्या ज्ञानशाखेत
अभ्यास करायला मिळेलच असे नाही. विद्यार्थ्यांची प्रचंड संख्या आणि उपलब्ध जागा
यांचे प्रमाण लक्षात घेता, तशी अपेक्षा ठेवणे म्हणजे नैराशाला निमंत्रण
देण्यासारखेच ठरते.
सर्वांना सध्या चांगल्या आणि दर्जेदार
अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान या
शाखांमध्ये अग्रक्रमाने प्रवेश हवा आहे. पण ते शक्य होणार नाही ना ! केवळ या शाखांमध्ये प्रवेश घेतल्यांना
रोजगाराची संधी विनासायास मिळते किंवा मिळू शकते म्हणून आपली क्षमता नसतानाही तिकडे
धावायला गेलो तर दम लागणार आणि तोंडाला फेसही येणार.
शिवाय, प्रवेश मिळणे हा एक भाग झाला,
तो महत्वाचाही आहे. पण त्यानंतर संबंधित विषयाच्या ज्ञान ग्रहणाचे काय? इथे कस लागतो आणि विकेटही जाते.
भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील १५ ते २५ टक्क्यापर्यंतचेच विद्यार्थी
अभियांत्रिकी स्नातक किंवा पदवीधर म्हणूण घेण्यास पात्र ठरतात असे बऱ्याच
सर्वेक्षण आणि अभ्यासांमध्ये आढळून आले आहे. तज्ज्ञ मंडळीही असेच मत व्यक्त करतात.
त्यामुळेच शंभरातील २० ते २५ टक्के अभियांत्रिकी पदवीधर हे रोजगारक्षम असतात.
त्यांनाच संधी मिळते. असेच विद्यार्थी पुढे जातात. बाकिच्यांना रडत-रखडत वाट
चोखाळावी लागते. ही वाट खडतर असणार हे सांगायला ज्योतिषाची गरज भासू नये.
विद्यार्थ्यांनी कोणत्याही शाखेत
प्रवेश घ्यावा, पण त्यांनी स्वत:ला रोजगारक्षम बनवणे आवश्यक आहे, तरच तो सध्याच्या
अत्यंत स्मार्ट आणि थकवून टाकणाऱ्या स्पर्धेच्या युगात टिकू शकेल. रोजगारक्षम होणे
याचा अर्थ जे काही तीन ते चार वर्षात ज्ञान ग्रहण केले त्याचा प्रत्यक्ष
प्रभाविरीत्या वापर करता येणे. विद्यार्थ्याने फॅशन डिझाईनच्या अभ्यासकमास प्रवेश
घेतला पण पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यावरही त्याला कपड्यांचा पोतही ओळखता येत नसेल
किंवा कात्रीने कापड कापणे जमत नसेल तर त्याला कोण नोकरी देणार किंवा हा असा
विद्यार्थी स्वत:च्या पायावर कसा उभा राहणार ? पत्रकारिता/ जनसंवाद/ जनसंपर्क/
जाहिराती/ इलेक्ट्रॉनिक माध्यमे या क्षेत्रांमध्ये सध्या विपुल संधी आहेत. मात्र
पदवीच्या काळात, भाषा- व्याक्रण- सादरीकरण- आवाज- तांत्रिक कौशल्य- चौफेर वाचन याकडे पाठ
फिरवलेल्या किंवा टाइमपास म्हणून बघणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी कशी मिळणार? समजा संधी मिळाली तर ती टिकून कशी
राहणार ? या
क्षेत्रात पाऊल टाकता क्षणापासूनच बाप दाखव नाहीतर श्राध्द कर अशी स्थिती असते. ही बाब सर्वच क्षेत्रांसाठी लागू पडते.
बऱ्याच जणांना कुणाचे तरी बघून-ऐकून-
पाहून विधि म्हणजे लॉ क्षेत्राकडे जायचे असते. या क्षेत्रातील ज्ञान ग्रहण
करण्यासाठी चांगले इंग्रजी वाचता येणे, बोलता येणे, लिहिता येणे, गरजेचे आहे. तशी
क्षमता पदवीच्या काळात विकसित केली का? असा प्रश्न विद्यार्थ्याने स्वत:ला
विचारायला हवा. किंवा पालकांनी त्यांच्या पाल्यांना विचारायला हवा.
वास्तुकलाशास्त्रात संधी आहेत म्हणून तिकडे जायला हवे, असे म्हणणाऱ्या
विद्यार्थ्याने स्वत:ला उत्तमरित्या रेखाटने किंवा लाईन ड्राईंग करता येते का? याची खातरजमा नको का करायला? आता सॉफ्टवेअरच्या मदतीने या गोष्टी
सुलभ झाल्या असल्या तरी मूलभूत कौशल्य तर अंगी असायलाच हवे. तुम्ही जी काही माहिती
देणार, त्यानुसार त्याच्या पोटात दडलेल्या विविध शक्यतांना जुळवत सॉफ्टवेअर,
ड्राईंग झटक्यात सादर करणार. पण त्यात भावनांचा लवलेश नसणार. वास्तूकला ही निर्जीव
वस्तूत जीव आणणारी कला आहे. ती केवळ सॉफ्टवेअरच्या मदतीने साध्य होऊ शकत नाही.
आपल्या हातात अशी कला आहे किंवा नाही, हे विद्यार्थ्याला कळलं पाहिजे.
कौशल्याची जाण हवी
आपल्या अंगी असलेली जी कोणती कला/
कौशल्य/ तंत्रकुशलता याची पक्की जाण ठेवली तर करिअर निवडायला सोपे जाउु शकते.
विज्ञान आणि भौतिकशास्त्रात गती असल्याने एनडीए (नॅशनल डिफेंस ॲकॅडेमी) ला जायला काहीच हरकत नाही असं जे पालक
आणि विद्यार्थी समजतात ते बऱ्याचदा तोंडघशी पडतात. या दोन विषयात गती तर हवीच पण
त्याशिवाय विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सर्वार्थाने सक्षम असला पाहिजे. कारण अशा
विद्यार्थ्याला कोणत्याही क्षणी युध्दासाठी आणि युध्दात वापरता येणाऱ्या
यंत्र-सामग्रीचा वापर करण्याठी सज्ज असणे ही सर्वात मूलभूत अट आहे. त्यामुळे
विद्यार्थी शारीरिकदृष्ट कमकुवत असेल आणि त्याला आपले शरीर बळकट करण्यात रसही नसेल
तर केवळ गणित आणि भौतिकशास्त्रात गती आहे म्हणून एनडीएचे स्वप्न बघणे चुकिचे ठरते.
लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढे कठीण अशा शारीरिक- मानसिक- वैद्यकीय चाळणित तो
नाकारला जाऊ शकतो. १० वी पर्यंतचे सर्वसाधारण गणितही विशेष जमत नसेल तर अशा
विद्यार्थ्याला वाणिज्य शाखेतही फार प्रगती करता येत नाही.
करिअरच्या गरजा लक्षात घ्या
प्रत्येक क्षेत्रातील करिअरच्या गरजा
आपण भागवू शकतो का? हे प्रारंभापासूनच लक्षात घेतले पाहिजे. बँकेच्या परीक्षा देऊन
उत्तम करिअर घडवता येते, यात काही शंका नाही. मात्र बँकांच्या अधिकारी आणि कारकून
सवंर्ग परीक्षेत विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे इंग्रजी भाषेवरचे सर्वसाधारण
प्रभुत्व, निबंध लेखन, तार्किक क्षमता वापरुन सोडवायचे प्रश्न, दिलेल्या माहितीवर
आधारित चकवा देणाऱ्या प्रश्नांची उत्तरे, सर्वसामान्य ज्ञान आणि घडामोडी या घटकांसंदर्भात
आपली तयारी किती? आपले पाणी किती खोल? आपल्या संकल्पना किती स्पष्ट? या बाबी खूप महत्वाच्या ठरतात. याचे
आकलन हे इतर कुणांपेक्षाही स्वत:ला झाल्यास ते फायदेशीर ठरते. म्हणजे त्यानुसार
विद्यार्थ्याला त्याच्या तयारीची दिशा ठरवणे सोपे जाऊ शकते.
सुरेश वांदिले