(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 पर्यटन
मार्गदर्शक
 

पर्यटनावर बऱ्यापैकी खर्च केला जातो. संधी मिळताच, बरेच नागरिक
राज्यात, देशात आणि परदेशातही भ्रमंतीला निघतात. यातील काही पर्यटक हे पर्यटन
कंपन्यांच्या मार्फत आपली हौस भागवतात. तर काही पर्यटक स्वत: सर्वच नियोजन करतात. करोनोत्तर
काळात पर्यटन क्षेत्रानं अपेक्षेपेक्षाही अधिक उंच भरारी घेतली. या क्षेत्रातील
मरगळ दूर झाली आहे.

पूर्वी पर्यटनस्थळी गेल्यावर ते स्वत:च बघण्याकडे कल असे. पण हे बघणं
रटाळ किंवा अगदी मृतवत असतं, याची जाणीव आता बऱ्याच पर्यटकांना होऊ लागली आहे.
एखाद्या स्थळाला जिवंत करण्याचं किंवा त्यात प्राण ओतण्याचं काम, पर्यटक
मार्गदर्शक करतात.

पर्यटन स्थळाशी संबंधित प्रत्येक बाबीचं स्वत:चं एक महत्व असतं.
त्याला इतिहास-भूगोल इतकच नव्हे तर अर्थकारण – समाजकारण आणि धर्मकारणही जोडलेलं
असतं. पर्यटनस्थळ बघताना अशी माहिती कानावर पडत राहिली तर ते स्थळ जिवंत होतं.
त्यामुळे आपण कधी थक्क होतो तर कधी दंग होतो. पर्यटनस्थळातील विविध वास्तूंमागे
दडलेला इतिहास, थरार आणणारा असतो. ही 
किमया पर्यटक मार्गदर्शक करतात.

पर्यटक मार्गदर्शक ही संकल्पना महाराष्ट्रासह देशात चांगली रुजली आहे.
पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता, अशा पर्यटक मार्गदर्शकांच्या संख्येत वाढ
होणं अपेक्षित आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या चांगल्या संधी असल्याचं लक्षात
आल्यानं वेगवेगळया प्रातांतील शासकीय पर्यटन विभागांनी, पर्यटन मार्गदर्शक
होण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला आहे.

प्रशिक्षण संधी

विविध प्रातांत वेगवेगळया ठिकाणी वेगवेळया वास्तू/ स्थळे/ वनवैभव/ मंदिरे/
गड-किल्ले/ वन्यप्राणी असतात. त्यांची प्रत्येकाची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. ही
सर्व वैशिष्ट्ये, पर्यटन स्थळाचे महत्व, इतिहास आणि इतर रंजक बाबी या मार्गदर्शकास
शिकवल्या जातात. उत्तम संवाद कौशल्य असणाऱ्या आणि पर्यटकांसोबत उत्तम व्यवहार करु
शकणाऱ्या हसतमूख व्यक्तिंना संधी मिळू शकते. प्रत्येक पर्यटन क्षेत्रासाठी
शासनानेच अधिकृत मार्गदर्शक नेमले आहेत. त्यांचे दरही निर्धारित केले आहेत. त्यामुळे
फसवणूक होण्याचं किंवा अधिक शुल्क घेण्याचं कारण नाही.

हे मार्गदर्शक स्थानिक असल्याने त्यांना त्या पर्यटन स्थळाविषयी
इत्थंभूत माहिती असते. अजंठा-वेरुळ लेण्याची सफर हे मागदर्शक रोमांचक पध्दतीने
घडवून आणतात. लोणार तलावाच्या परिसरातील इतिहास जिवंत करण्याचं काम हे मार्गदर्शकच
करु शकतात.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत रोजगार आणि स्वयंरोजगाराला
चालना देणाऱ्या बऱ्याच बाबी राबवण्यात येतात. यामध्ये आता पर्यटक मार्गदर्शक या
योजनेचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील १४ प्रमुख पर्यटनस्थळी या
मार्गदर्शकांना नियुक्त केलं जाईल. त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी राज्य शासनानं भारत
सरकारच्या पर्यटन विभागासोबत सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार इंडियन
इंस्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम, या संस्थेनं तयार केलेल्या अभ्यासक्रमाचा
लाभ इच्छूक उमेदवारांना मिळवून दिला जातो.

हा अभ्यासक्रम ऑनलाइन पध्दतीने करता येतो. त्याचं अभ्यास साहित्य iitf.gov.in या वेबपोर्टलवर ठेवण्यात आलं आहे. या
अभ्यासक्रमाचं नोंदणी शुल्क दोन हजार रुपये. परीक्षा शुल्क ५०० रुपये. अनुसूचित
जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना शुक्ल भरावं लागत नाही. प्रमाणपत्र परीक्षा
यशस्वीरीत्या उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना नोंदणी शुल्क परत केलं जातं. कोणत्याही
शाखेतील १२ वी उत्तीर्ण, या अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतो. त्याचं वय किमान वय १८
वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे असावं. ४० वर्षावरील उमेदवारांनी किमान १० वी उत्तीर्ण
होणं आवश्यक.

प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी वर्तन कौशल्य (बिहेव्हिअर स्किल ट्रेनिंग) प्रशिक्षण
आयोजित केलं जातं. त्यानंतर पर्यटन मंत्रालयानं मान्यता दिलेल्या टूर ऑपरेटर्सकडे
सात दिवसांची इंटर्नशीप करावी लागते. त्यानंतर राज्यशासनामार्फत पर्यटन प्रशिक्षक
प्रमाणपत्र दिलं जातं.

संपर्क– संचालक पर्यटन, १५ वा माळा, नरिमन
भवन, नरिमन पॉईंट, मुंबई- ४०००२१, ईमेल-
diot@maharashtratourism.gov.in, दूरध्वनी- ०२२-६९१०७६०० संकेतस्थळ- www.maharashtratourism.gov.in/web//mh-tourism/certified-guide-training

०००

इनक्रेडिबल इंडिया टुरिस्ट फॅसिलेटर

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम, या संस्थेनं दोन
प्रशिक्षण योजना सुरु केल्या आहेत.

() इनक्रेडिबल इंडिया टुरिस्ट
फॅसिलेटर-
या व्यक्तिंना देशातील पर्यटन स्थळांची उत्तम
माहिती असणं आवश्यक आहे. ही पर्यटन स्थळं श्रेष्ठ दर्जाचा आनंदानुभव देतात, याचं
सुध्दा त्याला ज्ञान असणं अपेक्षित आहे. पर्यटकांचा पर्यटन अनुभव अधिक समृध्द आणि
सुकर करण्याची भूमिका यांना पार पाडावी लागते. परदेशी आणि देशी पर्यटकांचा पर्यटन
स्थळातील वास्तव्य – प्रवास आणि भोजन आदी मुलभूत बाबीच्या सुविधा सुलभतेनं उपलब्ध
करुन देणं अपेक्षित असतं.

() इनक्रेडिबल इंडिया टुरिस्ट
गाईड
(आयआयटीजी)
– या मार्गदर्शकांचे दोन प्रकार आहेत. () आयआयटीजी (हेरिटेज-वारसा), () आयआयटीजी (ॲडव्हेंचर/साहस).
या दोन्ही प्रकारातील मार्गदर्शकांना इंग्रजीशिवाय आणखी एखादी परदेशी भाषा
उत्तमरित्या बोलता येणं अपेक्षित आहे.

https://iitf.gov.in
या वेबपोर्टलवर या दोन्ही प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करता येते. या
ठिकाणी प्रशिक्षणासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.