(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

चर्चित असलेल्या करीअरसंधी

सध्याच्या काळात करीअर
करण्यासाठी वेगवेगळी नवी क्षेत्रे उपलब्ध आहेत. आव्हान स्वीकारण्याची तयारी, अथक
परीश्रम आणि कल्पकता या गुणांच्या बळावर या क्षेत्रांमध्ये यश मिळवता येऊ शकतं.
असे काही सध्या चर्चित असलेले करीअर —

(1) फूड ब्लॉगर– हे नवे उदयमान होत
असलेले क्षेत्र आहे. वेगवेगळया रेस्टाँरेंट्समधील विविध अन्नपदार्थांची लज्जतदार
ओळख करुन देणाऱ्या ब्लॉगला वाचक मिळतातच. शिवाय संबंधित रेस्टॉरेंटही सेवा किंवा
प्रसिध्दी शुल्क देऊ शकतात. अशा ब्लॉगला अधिकाधिक वाचक मिळाले तर
गुगल-शोध-यंत्रणेमार्फत जाहिरातीही येऊ लागतात. त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळते.

(2) रेडिओ जॅकी– तुम्हास बोलण्याची वा
बडबड करण्याची कला उत्तमरीत्या जमत असेल तर या क्षेत्रात करीअर करता येणे शक्य
आहे. मनोरंजन व चालू घडामोडींची बिंत्तमबातमी ठेवणाऱ्या आणि उत्कृष्ट संभाषणकौशल्य
साध्य केलेले तरुण-तरुणी या क्षेत्रात नाव कमावू शकतात. विनोदाची जाण, हजरजबाबीपणा
आणि भारदस्त किंवा चांगला आवाज असल्यास सोने पे सुहागा. या क्षेत्रात यश मिळवल्यास
जाहिराती, कॉर्पोरेट चित्रपटांसाठी आवाज देण्याची संधी मिळू शकते.

(3) पेट ग्रुमिंग– हे आणखी एक नवे
क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. पाळीव प्राण्यांची देखभाल हा अनेकांचा अतिशय
आवडीचा विषय झाला आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांबद्दल आस्था आणि ममता असलेल्या
तरुण-तरुणी या क्षेत्राकडे वळू शकतात. ग्राहकांच्या पाळीव प्राण्यांची आरोग्यविषयक
काळजी, त्याची स्वच्छता, त्याला चांगल्या सवयी लावणे, त्याला फिरायला नेणे, अशा
बाबींची सेवा, पेट ग्रुमरकडून अपेक्षित असते. मोठे ग्राहक अशा सेवेसाठी मोठी
रक्कमही मोजू शकतात.

(4) साहसी खेळ प्रशिक्षक– स्कुबा डायव्हिंग,
पॅरासेलिंग, स्काय डायव्हिंग, खडक चढणी अशा सारख्या साहसी खेळांकडे तरुण- तरुणी
मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत. या खेळातील तज्ज्ञ प्रशिक्षकांना त्यामुळे
उत्तमोत्तम करीअर संधी मिळू लागल्या आहेत.

(5) डिस्क जॉकी– तुम्हास संगीताची
उत्तम जाण असेल आाणि आधुनिक संगीताची साधने वाजवता येत असतील तर या क्षेत्रात
उत्तम करीअर करता येणे शक्य आहे. डीजेंना क्लबसोबत कॉर्पोरेट इव्हेंट्स, मोठे लग्न
समारंभ यात कला दाखण्याची सातत्याने संधी मिळते. इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक
म्हणजेच ईडीम प्रकारच्या संगीतात प्राविण्य मिळवले असल्यास या संधी मोठ्या
प्रमाणावर मिळू शकतात.

(6) छायाचित्रकार– छायाचित्रकारांना
पूर्वीपासूनच चांगली मागणी आहे. तथापि आता पर्यटन छायाचित्रकार, वेडिंग
छायाचित्रकार, वन्यजीव छायाचित्रकार, फॅशन छायाचित्रकार अशा स्पेशलाईज्ड
छायाचित्रकारांची सेवा घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढत चालला आहे. त्यामुळे
छायाचित्रणाच्या मूलभूत तत्वांवर हुकूमत मिळवलेले तरुण-तरुणी या क्षेत्रात चांगले
करीअर घडवू शकतात.

(7) टी टेस्टर– चाय पे चर्चा आणि चाय
पे खर्चा, हे कधी शक्य होतं, तर चहाची चव उत्तम असेल तेव्हा. ही चव कोण बरं ठरवतं
? हे
ठरवणाऱ्या व्यक्तिस टी टेस्टर असं म्हणतात. चहा उत्पादकांकडे या टेस्टर्सना
करीअरची संधी मिळते. प्रत्यक्ष उत्पादन निर्मिती होण्याआधी चहाची चव, सुगंध यांचं
परीक्षण केलं जातं. हे परीक्षण करण्याचं कौशल्य प्रशिक्षणानं प्राप्त करता येतं.
मात्र त्याचबरोबर या वेगळया करीअरबाबत पॅशनही हवं. चहाची चव सांगण्याची कला अवगत
केलेल्या उमेदवारांना चांगल्या संधी मिळू शकतात.
(संस्था- () डिप्रास इंस्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल स्टडीज,
कोलकता. संपर्क-
http://www.dipras.in/ अभ्यासक्रमाचा
कालावधी- दोन महिने. हा
अभ्यासक्रम कुणासही करता येतो. () संस्था-
दार्जिलिंग टी रिसर्च ॲण्ड मॅनेजमेंट असोशिएशन, संपर्क-
http://nitm.in/tea_tasting.html. अभ्यासक्रम- सर्टिफिकेट कोर्स इन टी टेस्टिंग/ अर्हता- पदवी/
कालावधी-चार महिने.
)

(8) नववधू पोषाख निर्मितीकार– सध्या नववधूंचा कल
पारंपरिक, अपारंपरिक आणि समकालीन पोषाख परिधान करण्याकडे असतो. फक्त लग्न
सोहळयापुरतच मर्यादित राहणाऱ्या अशा खास पोषाखांना मोठी मागणी आहे. अशा पोषाखांची
डिझाइन आणि निर्मिती करण्याचे कौशल्य प्राप्त केल्यास चांगले करीअर करता येऊ शकते.