आळस – धी ग्रेट दागिना
मोरोबा हा एकुलता एक चिरंजीव असल्यानं सूर्यवंशींच्या घराण्यात त्याचं फार कोडकौतुक होत असे. आजी–आजोबा त्याचे सर्व लाड पूर्ण करत असत. मोरोबाने एकदा मला सूर्य पाहिजे असा हट्टच धरला होता. तेव्हा आजोबांनी मोरोबाच्या वडिलांना म्हणजेच त्यांच्या मुलास सूर्याकडे जाण्याचा पत्ता गुगलवरुन शोधायला सांगितलं होतं. सूर्याला आजपर्यंत कुणी आणू शकलं नाही. सूर्याला आणायला गेलेल्या हनुमानाने सूर्य गिळला होता. तुम्ही हनुमान नाहीत. असं नम्रपणे मोरोबाच्या डॅडींनी त्यांच्या बाबांना सांगितलं. तेव्हा कुठे मोरोबाच्या डॅडींच्या बाबांना ते पटलं. पण त्यांना नातवाचा हा हट्ट पूर्ण करता येत नसल्याचं इतक दु:ख झालं की, नथिंग इज इम्पासिबल इन धिस वर्ल्ड असं सांगून ठेवणारा नेपोलियन बोनापार्ट हा ठार वेडा होता अशी एक खरमरित पोस्ट लिहून त्यांनी फेसबूकवर टाकली.
जगज्जेता नेपोलियनलाही धारेवर धरण्याची किमया ज्याच्या हट्टामुळे घडली तो मोरोबा वयोमानानुसार मोठा झाला. वयोमानानुसार यथावकाश आजी आजोबाही निजधामास गेले. इच्छा केली की सर्वकाही मिळण्याची सवय लागलेल्या मोरोबास आजीआजोबांचा अवतीभवती नसण्याचा फार त्रास होऊ लागला.
आजीआजोबांच्या लाडामुळे मोरोबा चांगला आळशी झाला होता. आजीआजोबा अवतीभवती असताना एकदा, हलक्या आवाजात मोरोबाच्या डॅडीने, आळस माणसाचा शत्रू क्रमांक एक असल्याचं वेगवेगळ्या रीतिनं त्याला समजावून सांगण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. देख लेंगे डॅड जब वक्त आयेगा तो. असा हा पठ्ठया डॅडीस तेव्हा मोठ्या दिमाखात म्हणून गेला. आजीआजोबांची ढाल असेपर्यंत मोरोबाची मिजास चालून गेली.
आजीआजोबा गेल्यावर सहाऐक महिन्यांनी, त्याच्या डॅडींनी आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो,असं मोरोबास सांगण्यासाठी घरीच एक गोलमेज परिषद भरवली. या गोलमेज परिषदेत मोरुची आई, मोठी बहीण ,मोरुचा मामा, मामे भाऊ सामील झाले. सगळ्यांनी मोरुच्या आळसावर यथेच्छ प्रवचन दिले. आळसचे शंभर तोटे समजावून सांगितले. भिंतीवर लावलेल्या फोटोतून आजोबा बाहेर यावेत आणि सर्वांचे कान पकडावेत असं मोरोबास त्या क्षणी फार वाटलं. पण तसं काही घडलं नाही. आजोबा, आपले त्या फोटोत ढिम्मच राहिले. आजी गेली तेव्हा तिने डोळे मिटले होते. आता फोटोतही या गोलमेज परिषदेच्या समयी तिने डोळेच मिटले असल्याचा भास मोरोबास झाला. आपल्या सहाय्यास येणारे खंदे समर्थक असे विरोधी पक्षात गेल्यासारखे वागताहेत हे बघून, ग्रँड पा अँड ग्रँड माँ यू टू, असं ब्रुटस यू टू च्या धर्तीवर मोरोबास म्हणावसं वाटलं. पण असं म्हणून काही उपयोग नव्हता. त्याचा पुरताच अभिमन्यू झाला होता नि गोलमेज परिषदेच्या चक्रव्युहातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यास ठाऊक नव्हता. त्यामुळे आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असल्याचं, गोलमेज परिषदेतील उपस्थितांच्या बोल–बाणांनी तो घायाळ झाला. पण त्याने माघार घेतली नाही.
गोलमेज परिषदेत त्यास मान खाली घालावी लागली असली तर, युध्दात दोन घरं मागं जाणं याचा अर्थ पराभूत होणं नव्हे, हे अहदमशहा अब्दालीचं पानिपतावरील अमर वचन नेमक्या क्षणी आठवलं. त्या युध्दात अब्दाली सुध्दा आधी दोन घरं मागे गेलाच होता. तेव्हा मराठ्यांना वाटलं आपण जिंकलोच आता. पण छे, ते तसं नव्हतं. ती त्याची स्ट्रॅटेजी होती. तो दोन घरे मागे गेला आणि संधी येताच इतक्या वेगाने चाळीस घरे समोर घुसला की होत्याचं नव्हतं झालं. इतिहास असा नेमक्या क्षणी कामी येऊ शकतो. हे ध्यानात येताच मोरोबा गोलमेज परिषदेत गप्पगार राहिले. आळस हा माणसाचा शत्रू क्रमांक एक काय, तो शत्रूच नाही हे आपण एक ना दिवस सिध्द करुनच दाखवू असा निश्चय त्याने तेव्हाच केला.
०००
घरगुती गोलमेज परिषदेनंतर मोरोबाच्या वागण्यात काही सुधारणा होईल अशी अपेक्षा आईबाबांनी केली होती. पण इंग्लडच्या सरकारसोबत एक– दोन आणि तीन अशा गोलमेज परिषदावर परिषदा होऊनही त्यांच्यात काही सुधारणा झाल्या नव्हत्या, तर मै किस झाड की पत्ती. असं मोरोबास एकदा डॅडींना ऐकवावं वाटलं. पण ते कितीही सत्य असलं तरी आता असं ऐतिहासिक सत्य पुन्हा उगाळणं गांधीबाबांच्या आत्म्यास दु:खी करणारं होतच, शिवाय डॅडीच्या जखमेवर मीठासह तिखट आणि स्पिरिटही चोळण्यासारखं होतं. एवढा शहाणपणा मोरोबाच्या अंगी एवढया वर्षात आला होता. या शहाणपणास स्मरुन मोरोबा पुन्हा गपगार राहिला.
मोरोबा, यू आर यूसलेस. तुझं काहीच होऊ शकत नाही. अशी एक, मोरोबाच्या मते नॉनसेन्स कमेंट, करुन मोरोबाच्या डॅडींनी पुढे काही दिवस त्याचा पिच्छा सोडला. तो आणि त्याचं नशिब, अशी निरर्थक कमेंट आई करुन गेली.
००००
मोरोबासाठी हे पथ्यावरच पडलं. डॅडिंच्या मते तो यूसलेस होता तर आईच्या मते त्याचं नशिबच त्याची काळजी घेणार होतं. हा काळ मोरोबासाठी सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवणारा ठरला. खा प्या, झोपा काढा. लोळत राहा. फेसबुकात गुंता, टीव्हीत रमा. डॅडी कडून कमेंट नाही की आईची कुरकूर नाही. मात्र याकाळात फोटोतला आजोबांचा चेहरा उगाचच चिंताक्रांत झाल्यासारखा मोरोबास वाटला. एकदा तर त्याने डोण्ट वरी ग्रँडपा, कुछ नही होने वाला. सगळं कसं झक्कास होईल. असं त्यांना सांगून टाकलं. फोटोतली आजी मात्र डोळे उघडायला तयारच नव्हती. त्यामुळे यापुढे आजीकडे बघण्याचे कष्ट घ्यायचेच कशाला, असं मोरोबास वाटलं. अगदी बरोबर, असं त्याचं उत्तरही त्याने देऊन टाकलं.
काळ मजेत चालला होता. अपना भी एक दिन आयेगा हा विश्वास मोरोबास होताच. त्या विश्वासाला सार्थ ठरवणारा तो दिवस खरोखरच उगवला. त्या दिवशीच्या वर्तमानपत्रात एक बातमी आली. एक आयडिया जो दुनिया बदल दे, असं काहीसं सिध्द करणारी ती बातमी वाचून मोरोबास हर्षवायूच झाला. जगातल्या सगळ्या प्रकारातले डान्स त्याने मनातल्या मनात करुन घेतले. देव घरातील आजोबांच्या तसबिरीस वंदन केले. तुम्हे भी सलाम ग्रँड मा, असं डोळे मिटल्याचाच आभास देणाऱ्या आजीच्या फोटोकडे बघत मोरोबानं हे वाक्य पुटपुटलं आणि त्याने देवघरातूनच डँडीना जोरदार हाक मारली..
000000
२
डॅडी बघा, डॅडी बघा, असा आवाज आज सकाळी सकाळी मोरोबाच्या डॅडींच्या कानावर पडताच त्यांना आधी मोठाच धक्का बसला. त्याची तीव्रता किल्लारीतील भूकंपापेक्षा थोडी कमी असल्यानं काही पडझड झाली नाही एवढेच. पण तरी मोरोबाचा आवाज तोही सकाळी सकाळी कानावर पडताच मोरोबाच्या डॅडिंनी आधी कँलेडकरकडे धाव घेतली. आज रविवारच आहे की आज शनिवार आहे. याची त्यांनी चार वेळा खात्री करुन घेतली. आपलाच चष्मा घातला आहे की मिसेसचा चष्मा घातला आहे, हे दोन दोनदा त्यांनी बघितलं. चष्मा त्यांचाच होता हे लक्षात आल्यावर त्यांना हायसं वाटलं. आपण वाचलेली कँलेडरची माहिती खरी असल्याचा विश्वास त्यांना बसला. काल शनिवारच होता आणि आज रविवारच आहे. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी ९ वाजेपर्यंत पाय ताणून झोपणारा, रविवारी १० च्या पुढेही अंथरुणातूनही बाहेर पडण्याचं कष्ट न घेणारा मोरोबा सकाळी सकाळी सात वाजताच आपल्याला हाक मारतोय, ही बाब डॅडींच्या अद्याप पचनी पडत नव्हती. हे अपचन दूर करण्यासाठी हाजमोला किंवा हवाबाण हर्डे सारखं काही औषधबिशद लक्षात येतं का याचा विचार सुरु असतानाच … पुन्हा आतल्या खोलीतून आवाज आला, डॅडीबघा, डॅडी बघा, असं जोराचा कल्ला करत मोरोबा वडिलांच्या समोर उभाच ठाकला.
सकाळी सात वाजता मोरोबा आपल्या समोर उभा, हे दृष्य डॅडींसाठी केवळ अविश्वसनीय होते. एकदाचे फोटोतले त्यांचे वडील हार बाजूला करुन समोर उभे ठाकले असते तरी त्यांनी या अवास्तव घटनेस सत्य मानलं असतं. पण मोरोबाच्या बाबतीत वास्तव घटना घडूनही त्यांच्यापुढे अविश्वनीयेतचं भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. त्यामुळे आपल्यासमोर उभा ठाकलेला मुलगा हा आपलाच मुलगा आहे का, याची खात्री न पटून मोरोबाच्या डॅडिंनी त्याला आपादमस्तक, समोरुन मागून न्याहळलं. वायव्येकडून, आग्नेयकडून तपासलं. मोरोबा कोणत्याही कोनातून आणि दिशेतून डुप्लिकेट नसून ओरिजनलच असल्याचं लक्षात आल्यावर त्यांच्या जीवात जीव आला आणि जीव भांड्यात देखील पडला.
काय रे मोरोबा, एवढ्या जोरजोरानं कशाला बोंबा मारतोयस , डॅडी त्याला म्हणाले.
अहो, डॅडी मी बोंबलत नसून, बघा बघा असे म्हणतोय.. मोरोबा उद्गारला.
बरं बरं जास्त शहाणपणा करु नकोस, काय बघा म्हणतोस,ते सांग..
डॅडी, या बिल गेट्सला बघा…. आजच्या वर्तमानपत्रात छापून आलेल्या बिल गेट्स यांच्या छायाचित्रासह प्रकाशित एका कथनाकडे बोट दाखवित मोरोबा म्हणाला.
अरे, मोरोबा बिल गेट्स म्हणजे कॅट्रिना कैफ आहे की दीपिका पदुकोन की केट विंस्लेट आहे की मी बघायला हवं. मोरुचे डॅडी चटदिशी बोलून गेले. आपल्या बोलण्याचा मथितार्थ वेगळा होऊ शकतो, हे त्यांच्या ध्यानात आलं नाही. हुषार मोरोबानं मात्र या मथिर्थाचा धागा बरोबर पकडला…
अँ हँ डॅडी तुम्हीसुध्दा..मोरु डोळे मिचकावित म्हणाला.
तुम्हीसुध्दा म्हणजे… याचा अर्थ तू सुध्दा.. मोरुचे बाबा जीभ चावत म्हणाले. आपल्या बोलण्यातली गफलत आणि गल्लत त्यांच्या लक्षात आली होती.
अहो डॅडी माझं वयच आहे तसं आणि ते..पण तुम्ही..
मी काय…डॅडी त्याच्यावर डोळे वटारुन म्हणाले.
काही नाही डॅडी, मम्मीस कळलं की तुम्ही घरात राम नामक मुखवटा घालत असला तरी मात्र, मनात प्ले बॉयचा चेहरा घेऊन वावरता, तर काय होईल, तुम्हीच विचार करा..
मोरोबा , तू मला ब्लॅकमेक करतोस..बघून घेईन..
डॅडी मला नंतर बघा आधी या बिल गेट्सला बघा ना..तेच मी सांगतोय ना मघापासून..
काय बघू आणि कशासाठी बघू मी त्याला…
अहो डॅडी, बिल गेट्स किती मोठा आणि महान माणूस आहे. तुम्हाला ठाऊकाय का?
मोरोबा, माझ्या सामान्य ज्ञानाची परीक्षा घेतोयस का. अरे बिल गेटस किती मोठा आणि महान आहे ते सगळ्या जगालाच नाही तर भविष्यात मंगळावर आणि पुढच्या कोणत्यातरी युगात प्ल्युटोवर जन्मास येणाऱ्या जीवजंतुनांही ठाऊक आहे. उगाच माझा वेळ खाऊ नको. तुझ्यासारख्या आळशाला वेळेची किंमत काय कळणार म्हणा. म्हणे मला बिल गेट्स ठाऊक आहे का ? स्वत:चं ज्ञान जरा उजळव जरा आधी… डॅडीचिडून म्हणाले.
डॅडी माझी किंमत तुम्हाला नाही कळली पण बिल गेट्स सरांना कळली बघा..
तुझी किंमत बिल गेट्सला कळली म्हणजे तुझे भाग्य की त्याचे दुर्भाग्य. डॅडी गडगडाट करत बोलते झाले.
अहो डॅडी आळशी होणं हे काही येरागबाळ्याचं काम नोहे, त्यासाठी सुपर–ड्युपर भाग्यचीच गरज असते.
म्हणजे तो महा–भाग्यवान तू आहेस तर..तुझा हेवा करायला हवा मोरोबा.
करायलाच पाहिजे डॅडी. माझा हेवा करायलाच पाहिजे. कारण बिल गेट्स सर तेच म्हणतात.
काय म्हणतो तो बिल – फिल. त्याच्या नावावर काहीही थापा हाणू नकोस.
अहो डॅडी, मी थापा हाणत नाहीय. तुम्हीच खात्री करुन घ्या ना..बिल गेट्स सर काय म्हणताहेत ते वाचाना. असं बोलून मोरोबानं वडिलांच्या हाती पेपर डकवला.
मोराबाचे डॅडी उत्सुकतेने बिल गेट्स काय म्हणाताहेत ते वाचू लागले. बिल गेट्स म्हणाले होते की, त्यांना आळशी माणसं आवडतात. कारण अशी माणसं स्वत:ची कामं कमी वेळेत करण्यासाठी बरोबर युक्ती शोधून काढतात. आपला वेळ वाचवतात. थोडक्यात काय ती स्मार्ट असतात. बिल गेट्स यांचं हे कथन वाचून संपता क्षणीच मोरोबाच्या डॅडिंना काय बोलावं नि काय नाही हे कळेना. ते त त प करु लागले.
अहो, डॅडी तुम्ही सगळ्यांनी मला आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, असं सांगून सांगून माझं डोकं किटवलं ना…पण बघा, आळस माणसाचा शत्रू नसतो हे खुद्द बिल गेट सांगातहेत. दि बिल गेट्सज्यांचं दररोजचं उत्पन्न १०० लाख डॉलर्स आहे, ते.
बिल गेट्स याचं डोके ठिकाणावर आहे काय? असं काहीसं लोकमान्य टिळकांचा क्रांतिकारी आदर्श घेऊन मोरोबाच्या डॅडिंना म्हणावयाचं होतं. पण बिल गेट्सचा अदभूत पराक्रम त्यांना स्वत:ला पुढचे पन्नास जन्म घेतले तरी साध्य होणार नव्हता. हे पक्के ठाऊक होते. त्यामुळे ते गप्प राहिले
बघा डॅडी, आळसाचा सदगुण घेउुन निपजलेल्या तुमच्या या स्मार्ट कुलदीपकाचा तुम्हास अभिमान आणि आनंद आजपर्यंत वाटत नव्हता. पण आाता बिल गेट्स सरांच्या या कथनानंतर तुमचे आभाळ मोकळे आणि स्वच्छ झाले असणार नाही का…
आपल्या आळसशिरोमणी दिवट्या चिरंजीवाचं हे कथन कानी पडताच त्याच्या थोबाडित हाणावी की आपणच स्वत: कान पकडून उठा-बशा करायच्या की हनुमान चालीसाचे चाळीस वेळा पारायण करावं हा प्रश्न सध्या मोरोबाच्या डॅडिंना पडला आहे.
००००
३
मोरोबाने बिल गेट्स यांच्या कथनाचा पुरावाच समोर टाकल्यावर मोरोबाच्या डॅडींची बोलतीच बंद झाली. या बोलतीला कडी कुलुपात टाकणारं नवं संशोधन त्यांच्या परवाच वाचनात आलं. अमेरिकेतल्या फ्लोरिडा गल्फ कोस्ट युनिव्हर्सिटीच्या श्रीयूत टॉड मॅकएलरॉय या संशोधक साहेबांच हे संशोधन म्हणंत की, आळशी माणसं हे अधिक बुध्दीमान असतात. आपला आळसातला अधिकाधिक काळ ते विचार करण्यात घालवतात. आळशी नसणाऱ्या व्यक्ती लवकर कंटाळतात. त्यामुळे ते सतत काहीना काही करत राहून आपला कंटाळा घालवतात. त्यामुळे त्यांना विचार करायला सवड मिळत नाही…
हे संशोधन नक्किच मोरोबाच्या आजोबांनी प्रायोजित केलं असावं अशी एक दाट शंका, मोरोबाच्या डॅडींना आली आहे. नातवासाठी हा म्हातारा पूर्वी सूर्य आणायला निघाला होताच की. पेडन्यूज सारखं पेड संशोधन छापून आणणं त्याच्यासाठी काहीच अशक्य नाही.. मोरोबाचे डॅडी स्वत:वर त्रागा काढत म्हणाले. आता त्यांनी वडिलांच्या तसबिरीकडे बघणही सोडून दिलं आहे. मोरोबाने आपल्या खोलीत बिल गेट्सचा फोटो लावलाय. आता दररोज तो या फोटोस हार टाकतो. प्रार्थना म्हणतोय…
काहीच न करणारा मोरोबा हे जे काही सध्या करतोय ते बघून आई आनंदून गेली आहे. आजीचे डोळे मात्र उघडण्याची कोणतेही चिन्ह दिसत नाही. हेच काय फळ मम तपाला म्हणून फोटोतल्या आजोबांनीही आपले डोळे आता मिटून घेतले आहेत..
–सुरेश वांदिले