घर बुलाके तो देखो
अहो, तो सारखा सारखा घर बुलाके तो देखो, घर बुलाके तासे देखो असे म्हणत असतो, त्याला तुम्ही घरी एकदा बोलावूनच बघा ना, एके दिवशी बायको सकाळी सकाळी गरजली.
तिचे गरजने या कानाने सोडून त्या कानाने सोडून देण्याच्या श्रेणीतले नव्हते. त्यामुळे आम्हास नाईलाजाने तिच्या गरजन्याला कान द्यावाच लागला.
तिच्या गरजन्यामध्ये तो याचा उल्लेख होता. त्याला कां नाही बोलवत, असं तिला म्हणायचं होतं. आता हा तो कोण ? असा स्वाभाविक प्रश्न आम्हास पडणे स्वाभाविकच होते. पण जेव्हा आम्ही बायकोला हा प्रश्न केला तेव्हा ती अस्वाभाविकरीत्या आमच्यावर उखडली. तिचे ते उखडणे म्हणजे आम्हास, झेंडू प्लस ते बावळट सुपरप्लस ते येडू ट्रिपलप्लस अशा श्रेणीत जगात यच्चयावत जी काही विशेषणे असतील त्यात बसणारे होते.
समजा आमची बायको एखाद्या राज्याची महाराणी असती आणि आम्ही त्यांचे दरबारी असतो तर त्यांनी कोण तो, हा आमचा झेंडू ते येडू प्रश्न ऐकताच आम्हास त्यांच्या राज्यातील टकमक टोकावरुन ढकलून दिले असते. समजा आम्ही त्यांचे पतिराज असतो तर त्यांनी आम्हास तत्क्षणी काडीमोड दिला असता. आम्ही त्याचे प्रधानजी असतो तर त्यांनी आमची रवानगी वेड्यांच्या इस्पितळात केली असती. पण तसे काही नव्हते हे एका दृष्टीने बरे होते.
आम्हास आता केवळ तिच्या तोंडपट्ट्याशी सामना करायचा होता. तो करणे इतक्या वर्षाच्या संसारानंतर अवघड राहिले नव्हते. आमची बायको आमच्यावर उखडल्यावर आमचा आधीच लांबोळका असणारा, एक दात अर्धवट तुटलेला आणि दोन दात समोर आलेला नि फेंदाडलेल्या नाकाचा चेहरा आखणीनच लांब केला आणि कोण तो, हा प्रश्न पुन्हा बायकोच्या पुढ्यात टाकला.
यात काही चुकले असे आम्हास अजिबातच वाटत नाही कारण, हा जो कोण तो असेल, तो आम्ही कोण समजायचा ? तो म्हणजे डोनाल्ड ट्रम राहू शकतो. तो म्हणजे जेम्स बाँड राहू शकतो. तो म्हणजे शक्ती कपूर राहू शकतो. तो म्हणजे अनिल अंबाणी राहू शकतो. तो म्हणजे मार्क झुबेर राहू शकतो. या तो मध्ये प्रिंस चार्लस आणि त्याचे दोन पुत्र राहू शकतात. तो म्हणजे जादुगार के.सी.लाल सुध्दा राहू शकतात. मग या सर्वांनाच आम्ही बोलवायचे काय? हा प्रश्न आम्ही तुम्हास केला आहे. याचे उत्तर तुम्ही, नाही असेच देणार. पण आमच्या बायकोस काही असा विस्तृत प्रश्न टाकण्याची आमची हिम्मत झाली नाही.
जेव्हा कधी आम्ही एखाद्या अपावादात्मक स्थितीत विस्तृतपणे पसरायचा प्रयत्न केला तेव्हा, मग कां झाला नाही ते कलेक्टर- बिलेक्टर, असा भलताच आणि आमच्यासाठी महाअडचणीचा असलेल्या महापसरट प्रश्नाची भेंडोळी आमची बायको आमच्यावर फेकायची. कोण कलेक्टर होणार नि कोण होणार नाही हे फक्त वक्री मंगळ आणि त्यावर डूख धरुन बसलेला शनीच ठरवतो ना. हे तीस सांगायचे कोणी. हे असे करणे म्हणजे मांजरीचे दात पांतजली टुथपेस्टने घासण्यासारखेच होते. म्हणजे त्यास लागणारी हिम्मत आणि शौर्य आमच्याकडे नसल्याने आम्ही कलेक्टर कां झालो नाही ? हा प्रश्न कानावर आदळला की स्वत:चे पाणिपत करुन घेण्याचा सुज्ञपणा दाखवायचो. आम्ही समजा त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा थोडा जरी प्रयत्न केला असता तर मग कां झाला नाही तुम्ही रिझर्व बँकेचे गव्हर्नर ? आणि पुढचा टप्पा मंग कां झाला नाही तुम्ही प्राइममिनिस्टर? हे सुपरसॉनिक प्रश्न आमच्यावर आदळून आमची दातखिळी कायमची बसली असती. वयाच्या पंचेचाळीशित अशी दातखिळी बसवून आमच्याकडे कधीकाळी चुकून-माकून मान वळवून बघणाऱ्या एखाद्या माधुरी/श्रीदेवीच्या ह्रदयास तीक्ष्ण इजा व्हावी हे आम्हास कदापी चालले नसते. आम्ही महात्मा गांधींचे भक्त असल्याने अशी हिंसा व्यर्ज होती. हे टाळण्यासाठी आम्ही बायकोच्या, मग कां झाला नाही ते कलेक्टर ? या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या भानगडित पडलोच नाही. त्यात तिचेही महासमाधान होत राहिले आणि आमची झाकली मूठ दीड लाखाची की सव्वा रुपयाची हे कधीच आमच्या आणि तिच्या लक्षात आले नाही. तेव्हा आम्ही, कोण तो एव्हढाच प्रश्न पुन्हा कां विचारला हे सुज्ञांच्या लक्षात आले असेलच.
या पुन्हा, कोण तो, या प्रश्नावर आमच्या बायकोने आमचा हळदीघाट केला हे सांगणे न लगे.
तुम्हास कोण तो, जर माहीत नसेल तर तुम्हास तुमचा बाप तरी कोण, हे तरी माहीत आहे का? असे काही थेट ती बोलली नाही. पण तिच्या बोलण्याच्या आशयात दडलेला अर्थ हाच होता. आम्ही जरा कसुनसे हसत किंवा केविलवाणे होत किंना दिनवाने होत शरणागती पत्करली व म्हणलो,
गडे, बरे होईल तुम्ही जर आम्हास कोण तो सांगितला तर .. कारण तुम्हास आमच्या सामान्य ज्ञानाचे असामान्यत्व किती शंभर नंबरी आहे हे इतक्या वर्षात चांगलेच ठाऊक झाले आहे. तेव्हा आम्ही अज्ञानाच्या अंधारात चाचपडत राहणे योग्य ठरणारे नाही.
आम्ही आमच्या अज्ञानाच्या टोपलितले ढिगभर ढेमसे बायकोसमोर टाकताच ती जरा शांत झाली. खरे तर, अहमदशहा अब्दालीने पाणिपत जिंकल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जसा आनंद आणि समाधान विलसले असेल तसेच नेमके आमच्या बायकोचे झाले होते.
त्या आनंदाच्या भरात तिने आम्हास क्षमा तर केलीस शिवाय एक कप अत्यंत गोड असा चहा करुन दिला. त्या गोड चहाने आमचे तोंड कडू आणि जीभ तुरट होणे क्रमप्राप्त होते. तसे ते झाले. पण आम्ही चहाच्या बशीवरची आणि आमच्या चेहऱ्यावरची माशी उडू दिली नाही. तेव्हा या आमच्या सूज्ञ बावळटगिरीचे उत्तम फल प्राप्त झाले. आमच्या बायकोने तो म्हणजे कोण याचे रहस्य उघडे करुन टाकले.
तर मंडळी, तो म्हणजे शाहरुख खान. तर या शाहरुन खान यासी तो असे संबोधून त्यास घरी कां बोलवत कां नाही? असे आमची बायको आम्हास आज्ञा करत होती.
आम्हास प्रश्न पडला की शाहरुख खानास आम्ही आमच्या घरी कां बरे बोलावयचे? तो आपला कधीच सोयरा होऊ शकत नाही. एखादे वेळेस तो चिनच्या राष्ट्राध्यक्षाच्या मुलासोबत आपल्या कन्येचा निकाहाचा विचार दूरुन कां होईना करु शकेल. पण आमच्या लेकाने पुढचे दहा जन्म संतोषी मातेची तपश्चर्या केली तरी शाहरुख खान आमच्या लेकासोबत त्याच्या कन्येच्या विवाहाच्या विचाराची शिंक सुध्दा द्यायचा नाही. आम्हास दुसरा प्रश्न पडला की हा शाहरुख खान आमच्याकडे आमच्या बायकोच्या हातचा अती गोड चहा पिऊन आपले तोंड एरोंडेल पिल्यासारखे करण्यासाठी कां बरे येणार ? आम्ही राहत असलेल्या 450 चौरस फुटाच्या पाचपट मोठे असलेल्या त्याच्या बाथरुममध्येच आमच्या 450 चौरस फुटाच्या फ्लॅटएवढे शौचालय असताना सुबह की शांती करण्यासाठी सुध्दा 450 च काय 4500 डॉलर्स देऊनही तो आला नसता. असे असताना त्यास आमच्याकडे बोलावयचे ते कां? त्यास आम्ही बोलवत नाही याचे आमच्या बायकोस एव्हढे दु:ख का? असले प्रश्न पडून ते डुकराच्या पिलावळीसारखे वाहून जायला हवे. पण आम्हीह ते होऊ दिले नाही आणि असले प्रतिप्रश्न विचारायची हिम्मत होत नसताना आम्ही एक पाऊल पुढे टाकले. श्रीयूत हिटलर यांसी, तुमची हापकट मिशी ही जोकरासारखी दिसते असे म्हणण्याची हिम्मत दाखवण्यासारखेच हे आमचे पाऊल होते. एकदाच काय ते गर्दन छाटली जाईल किंवा हिटलरांची दया बुध्दी जागृत झालीच तर या गर्दनेत ते मोत्याबित्यांचा हारही घालतील, हा त्यामागचा आमचा उद्देश होता. पण तसे काही झाले नाही. आम्ही विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर म्हणून बायकोने थेट टीव्ही सुरु केला. कोणत्यातरी चॅनेलवर सुरु असलेल्या मालिकेचा मध्यंतर झाला होता.. नि जाहिराती सुरु झाल्या होत्या. पहिल्याच जाहिरातीत शाहरुख खान दत्त म्हणून उभे ठाकले होते. लाडिकपणे गालावर खळी खुलवत नि डोळे मिचकावत, घर बुलाके तो देखो असे सांगत होते. त्यांचे हे स्वयं-निमंत्रण बघून आम्हास धक्का बसला.
हे निमंत्रण ते कोणला देत होते ? टीव्ही पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला की केवळ आमच्या बायकोला? हे निमंत्रण बघून बघूनच आमच्या बायकोला त्यास घरी कां बोलवत नाही असे वाटू लागले होते. ही जबाबदारी ती आमच्यावर टाकू इच्छित होती.
अहो, आम्ही साधा भाजीपाला आणण्याची जबाबदारी धड पार पाडू इच्छित नाही. साडेपाच रुपये एका इस्त्री केलेल्या कपड्यास लागतात असे 13 कपड्यांचे किती होतील हे चटकन सांगता सांगता आमची दमछाक होते. तर शाहरुख खान यांसी घरी बोलवण्यासाठी तर आमच्या अंगी टीव्ही मालिकेतील हनुमानाच्या अंगी जशी शक्ती असते ना तशीच असणे गरजेचे होते. तशी शक्ती आमच्याकडे नाही हे आमच्या बायकोस ठाऊक नव्हते अशातला भाग नव्हता. पण एखाद्यास सुळावर चढवायचेच असे ठरवल्यावर निर्बुध्द सुध्दा मागे हटत नाहीत. महाभारत युध्दात एखादेसमयी दुर्योधनाने स्वत:चे सैन्य मागे घेण्याचे ठरवले असते. पण आमच्या बायकोने पंचेवीस दुर्योधन कोळून प्याले होते. त्यामुळे तिने आम्हास शाहरुख खान यांनी दिलेले, घर बुलाके तो देखोचे आव्हान स्वीकारायलाच लावले.
अगं, माझ्या प्रयत्नाने तो आपल्या घरी आलाच तर त्याच्याकडून काय तू धुणे-भांडे करुन घेशील का? आम्ही सहज म्हणून बोलून गेलो.
अहो, तो कशाला धुणे भांडे करेल. तुम्हांस नाही का मी करायला लावेल तेव्हा. तुम्ही काही त्याच्यासोबत ततपप शिवाय काही बोलू शकणार नाही. मलाच मेलीला त्यास एंटरटेन करावे लागेल. मग एवढ्या वेळेत तुम्ही धुणीभांडी करुन टाका.
म्हणजे यासाठी तुला शाहरुख खान आपल्या घरी आयला हवा आहे होय.
मला यायला नको. तो स्वत: सांगतो ना घर बुलाके तो देखो असे.
अगं ती जाहिरात आहे. जाहिरातीत असं काहीबाही बोललच जातं. त्यास कॅचलाइन म्हणतात.
मग मी पकडली की कॅच त्याची असं समजा नि त्याला तुम्ही बोलावूनच आणा. एवढा घर बुलाके तो देखो, घर बुलाके तो देखो म्हणतो तर बघूया ना कशासाठी चाललय त्याचं हे सारं.
बरं समजा, तो माझ्या प्रयत्नानं घरी आलाच तर पुढे काय ?
काय म्हणजे? अहो मी त्याला माझी ऑडिशन घ्यायला सांगेन की..
आँ..
आँ काय करता? ऑडिशन म्हणतात. त्याला आता नव्या हिराईन पाहिजे आहेत त्याच्या नव्याचित्रपटांसाठी. त्याच्या वयाला शोभेल अशी. त्याच्या चेहऱ्याला शोभेल अशी. मी आहे तशी .
आँ.
पुन्हा आँ काय करता बैलासारखं. हिऱ्याची पारख जोहरीच करु शकतो की. नाहीतर कोळसा आणि हिऱ्यात यातला फरक कुणालाच कळला नसता..
म्हणजे तू स्वत:ला हिरा समजतेस.
न समजायला काय झालं. तुमची बायको झाले नसते तर मी हिरॉईनच झाले असते. पण गेली काळी मांजर आडवी तेव्हा.
आँ.
अहो असे आँ आँ काय करता. ओकारी बिकारी येते कां ?
आँ..
कितीही सरळ नळीत घाला, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच..
म्हणजे मी कुत्रा. शाहरुख खानसाठी तू मला कुत्रा म्हणण्यापर्यंत पोहचलीस.
असं कुठं म्हणाले मी राव. उगाच पराचा कावळा करु नका.
आता मी कावळा सुध्दा झालो.
अहो थोडे तरी सिरियस व्हा. अशी संधी पुन्हा मिळणार नाही. शाहरुख खान स्वत:हून आग्रह करुन करुन त्याला घरी बोलण्याचं निमंत्रण देत आहे. त्याचा लाभ घ्या.
तुझ्या बोलण्याने मी आधीच सिरीयस झालो आहे. अशीच बोलत राहिलीस तर आयसीयूमध्ये जाइल नि नंतर लाइफ सपोर्टिंग सिस्टिमवर..
अहो शुभ शुभ बोला. एवढ्या लवकर हे राम म्हणू नका. बायकोची प्रगती जरा एन्जॉय करा. शाहरुख खानने एकदा का माझी ऑडिशन घेतली की मग आधी त्याची हिरोईन मग सलमान खानची मग आमीर खानची नि मग रणबीर कपूरची मग टॉम क्रुजची आणि मग तैमूर खानची हिरोईन झालीच म्हणून समजा.
अगं तो तैमूर खान फक्त सहाच महिन्याचा आहे अजून. त्याची कशी हिरोईन होशील तू?
त्याची नाही तर त्याच्या बापाचीतर होईनच ना. सुपरस्टार हिरोईनचा नवरा म्हणून तुम्हास मिरवायला मिळेल तुम्हास, इकडेतिकडे. ऑस्कर मिळाल्यावर डोनाल्ड ट्रॅम्प साहेब आपणास हाय टीसाठी बोलावतील. तेव्हा मी मग हळूच त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये तुमच्या हायर ग्रेड स्टेनोसाठी शब्द टाकेन. तुमचा अमेरिकेत आणि माझा इंडियात जलवा राहील. स्टेनो म्हणजे कलमदाने. ध चा मा आणि मा चा ध करण्याची शक्ती प्राप्त झालेला सुपरमॅनच जणू. अशी संधी तुम्ही साधली की बघा तुम्हीच पुढचे ट्रम्प साहेबांचे सल्लागार. मग काय मी हॉलिवूडच्या पिक्चरमधील हिरोईन.
आँ..
असंख्य वेळेस आमच्या मुखातून बाहेर पडलेल्या आँने यावेळी आमची विकेट पडली. बायकोला आमचा प्रचंड राग आला. तो राग तिने टीव्हीवर काढला. रिमोटने टीव्ही बंद करण्याऐवजी चालू टीव्हीच तिने थेट स्वीच ऑफ करुन टाकला..
आमच्यासमोर मेथीच्या जुड्या आणून टाकल्या. पुढचे तीन तास आम्हास मेथीच्या जुड्या तोडाव्या लागल्या.
000
थेट टीव्ही स्वीच ऑफ केल्याने टीव्हीची पिक्चर ट्यूब ऑफ झाली. त्यामुळे आमच्या घरचा टीव्ही गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. घर बुलाके तो देखोच्या नादात भुललेल्या आमच्या बायकोला तिची ही चूक काही मान्य नाही. आता सकाळ संध्याकाळ ती टीव्ही दुरुस्त करुन आणण्याच्या पाठीमागे लागलीय.. त्याने माझे डोके विटलेय. त्यातूनच मज एक आयडियाही सुचली. ज्या शाहरुख खानमुळे घर बुलाके तो देखो प्रकरण घडले त्याला खरोखरच घरी बोलवायचे नि त्याजकडूनच टीव्ही दुरुस्त करुन घ्यायचा..
कशी काय वाटली तुम्हास आयडीया. सध्या गुलदस्त्यात आहे. प्रत्यक्षात साकारली तर तुम्हास ब्रेकिंग न्यूज मिळेल, शाहरुख खान यास टीव्ही सुध्दा दुरुस्त करता येतो.
आँ..
(असं तुमच्याही मुखातून निघालय ना..धिस इज द पॉवर ऑफ कॉमन मॅन…हा हा हा)
सुरेश वांदिले