(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

जिथे परफेक्शन तिथे यश हमखास

माझं शिक्षण ऐकून तुम्ही हसालच. तरीसुध्दा मी सांगतो. माझं शिक्षण झालंय दुसरीपर्यंत. हो इयत्ता दुसरीपर्यंत. माझे आईबाबाला रागावले नाही का? इतकं कमी शिक्षण घेतलं म्हणून. छे छे ! मी चार वर्षाचा होतो, तेव्हाच माझे बाबा म्हणाले की,” तुझ्या मनाला जे भावेल आणि ह्रदयाला जे भिडेल ते कर. वर्षन सथीश हे माझे बाबा. ते कंठ संगीतातील श्रेष्ठ कलावंत आहेत.

मी चार वर्षाचा असताना मला मृदंगम वाजवायला खूप आवडायचं. त्यात मला खूप आनंद मिळायचा. मी आठ वर्षाचा होईपर्यंत मला पियानो वाजवायला खूप आवडू लागलं. मी मोझार्ट आणि चॉपिन या महान संगीतकाराचं संगीत पियानोवर वाजवू लागलो. तेव्हा माझ्या बाबांच्या लक्षात आलं असावं की माझ्यात संगीताविषयी काहीतरी खास आहे. तेव्हाच त्यांनी मला कानमंत्र दिला,शाळेतील गृहपाठात गुंतून राहण्याऐवजी तुझ्या ह्रदयाला जे भिडतं त्यात गुंतून राहा.

बाबांचा असा ठोस पाठिंबा मिळाल्यावर मग मी पियानोचे धडे गिरवू लागलो. दहा वर्षाचा असताना, “ट्रिनिटी स्कूल ऑफ म्युझिकची, श्रेणी ८ही परीक्षा मी उत्तीर्ण केली. तिथे माझे शिक्षक होते महान संगीततज्ज्ञ ऑगस्टिन पॉल!

मी १३ वर्षाचा असताना सीबीएस(कोलबिंया ब्रॉडकॉस्टीं‍ग   शो) या कार्यक्रमात,  द वर्ल्ड्स बेस्ट, हा १ मिलियन (दशलक्ष)डॉलर्सचा पुरस्कार मिळाला.

आता पियानो हाच माझा ध्यास बनला. त्यावर जितकी शक्य असेल, इतकी मेहनत किंवा परीश्रम मी करु लागलो. पियोनावरील बटनांवर सराव रात्रंदिवस करु लागलो. त्यामुळे पियानोवरील बटनांवर माझी बोटं अगदी फुलपाखरासारखी हलकेच पण गतिनं फिरु लागली. ही गती इतकी शक्य झाली की मी १७ वर्षाचा असताना, “फ्लाइट ऑफ बब्मल बी, या गाण्यात एका मिनिटास ३२५ बिटस  वाजवले. हे बघून अनेक संगीतप्रेमी थक्क झाले. हे अगदी सहज आणि हसत हसत मी केलं. कुणीतरी मला विचारलही, “इतक्या गतिने वाजवताना तुला तणाव बिणाव आला नाही का?” मी म्हंटलं, “अजिबात नाही. कारण जिथे मिळतो मनापासून आनंद, तिथे कसला आलाय तणाव बिणाव. नाही का?” या आनंदातच एकदा मी एलेन डीजेनेरेस शोमध्ये, माझी कलाकृती सादर करु शकलो. एलेन डीजेनेरेस शो“, हा जगातील अतिशय महत्वाचा संगीत शो! इथे भल्या भल्यांना संधी मिळत नाही. मोठे कलावंतही इथे आपली कला सादर करताना बरेचदा तणावाखाली येतात म्हणे! पण माझं काही तसं झालं नाही. महान संगीतकार, ए.आर रहमान यांनी एकदा माझी मुलाखत घेतली, तेव्हासुध्दा मी अगदी हसतमुखानेच त्यांच्या प्रश्नांना सामोरे गेलो.जिथे आनंद तिथे तणाव नाही. हा माझा जीवनसिध्दांतच बनलाय जणू.

संगीतावरील या अशा माझ्या निष्ठेमुळे इतक्या लहान वयात मला केरळ राज्यातील सुपरस्टार मोहनलाल यांनी दिग्दर्शित केलेल्या “बॅरोज या वैज्ञानिक चित्रपटाचे संगीत देण्याची संधी मिळाली. मोहनलाल सर माझ्या कामावर प्रचंड खूश आहेत. त्यामुळे माझा पहिला जाझ संगीताचा ल्ब, “क्रोमॅटिक ग्रॅमॅटिक याच्या प्रकाशन सोहळयाला ते आवर्जून उपस्थित राहिले.

मला सांगायला कसंतरी वाटतय, पण मी सध्या महान संगीतकार इलय्या राजांकडे संगीताचे धडे गिरवतोय. हे तसं महत्वाचं नाही. महत्वाचं असं की, इतक्या श्रेष्ठ जेष्ठ संगीतकाराचा मी पहिलाच विद्यार्थी ठरलोय. त्यांचं मार्गदर्शन माझ्यासाठी खूप खूप महत्‍वाचं ठरतय. त्यांनी ‍गिटारसाठी तयार केलेली शास्त्रीय संगीताची अतिशय व्यामिश्र मूळ धून मी एका कार्यक्रमात पियानोवर वाजवली. ते बघून इलय्या राजा सर थक्कच झाले. ते म्हणाले, “गेल्या चाळीस वर्षात ही अतिशय इतकी कठीण सुरावट कुणीतरी पहिल्यांदा पियानोवर वाजवली.त्यांनी माझं मनसोक्त कौतुक केलं,यासाठी.

काही दिवसांपूर्वी मला नुयॉर्कवरुन, “स्टेनवे ॲकॉस्टिक ग्रँड पियानो“, भेट म्हणून आला. तो पाठवला होता श्रेष्ठ पियानो वादक, मायकेल नोव्होग्रॅत्ज यांनी. मला तर धक्काच बसला. माझ्यासारख्या नवख्या संगीतकाराला नोव्होग्रॅत्ज सर कां बरं पाठवतील ही भेट? मग मला आठवलं की न्युयॉर्क येथे एका कार्यक्रमात मी पियानो वाजवला होता. त्याठिकाणी नोव्होग्रॅत्ज सर उपस्थित होते. ते माझ्या वादनकौशल्याने फार प्रभावित झाले. तसं ते तेव्हा बोललेही होते. पण माझ्या काही ते स्मरणात राहीलं नाही. त्यांनी पाठवलेली भेट म्हणजे माझ्यासाठी मोठाच पुरस्कार असल्याचं मी समजतो.

तुम्ही जेव्हा तुमच्या ह्रदयाला भिडेल तेच मनापासून करता नि त्यात झोकून देता, तेव्हा किती छान छान घडतं ना. माझ्याही बाबतीत तसच घडतय.

ए. आर. रहमान सर तर माझ्यावर बेहद्द खूश आहेत. त्यांनी मला, रोली किबोर्ड आणि हार्पेजीई सप्रेम भेट दिलाय. ते मला सतत मार्गदर्शन करतात. संगीतात नवे नवे प्रयोग करण्याची प्रेरणा देतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी माझं वर्णन, “भारताचा संगीत सदिच्छा (म्युझिक ॲम्बॅसॅडर ऑफ इंडिया)” असा केलाय. हे त्यांचं मोठेपण. पण त्यांनी दाखवलेला विश्वास आणि माझ्या वडीलांचा माझ्यावरील विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही.

शाळेतील पुस्तकाचे धडे मी गिरवले नसतीलही, पण पियानोचे धडे मात्र मी मनापासून गिरवले. त्यात माझ्या आनंद शोधला नि हा आनंद अधिकाधिक मिळत राहावा म्हणून हे धडे गिरवण्यासाठी अखंड झोकूनही दिले. परिश्रम कराल तरच तुम्हाला परफेक्शन प्राप्त होईल. जिथे परफेक्शन तिथे यश हमखास! हे काही नव्याने सांगायला नको.

तर, मी लायदरन नादस्वर. वय १७ वर्षे. हल्ली मुक्काम चेन्नई.

सुरेश वांदीले