इचथॉयसॉरस!
देवमासा स्वत:ला देवांचा मासा समजतो की काय? हे मला ठाऊक नाही. पण तो स्वत:ला पाण्यात राहणारा सर्वात मोठा जलचर समजतो, हे मला पक्क ठाऊकाय. मूर्ख आणि निर्बुध्द लेकाचा! तुम्ही लगेच म्हणाल, देवमाशाला मूर्ख म्हणणारा मी उपटसुंभ कोण?
बरोबरच आहे तुमचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर द्यायलाच हवं!
त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ती संपता संपता मी कोण? कुठला? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील.
तर, खूप पूर्वीची ही गोष्ट! म्हणजे किती? एक,दोन,तीन की हजार वर्षापूर्वीची? असं तुम्ही विचाराल. हो ना!तुम्ही विचारण्याआधीच मी सांगतो ना, ही गोष्ट आहे २४६ दशलक्ष वर्षापूर्वीची!
अबाबा ! झालात ना थक्क, हे एैकून? हं, तर इतक्या अतिप्रचंड वर्षापूर्वी “तो“ पाण्यात राहायचा. “त्याचं” संपूर्ण महासागरावर राज्य होतं. खरं तर तो सम्राटच होता. कारण “त्याच्या“पेक्षा कुणीही मोठा जलचर तेव्हा नव्हता आणि आतासुध्दा नाही.
आता तुम्ही म्हणाल याचा पुरावा काय?याचा पुरावा मला देण्याची गरजच नाही कारण, तुम्हा मानवांनीच तो शोधला. इंग्लंड देशात २०२१ साली उत्खननात सहा फूट लांब आणि एक टन वजन असणारं “त्याच्या”डोक्याचं हाड मिळालं. अमेरिकेतल्या नेवाडा राज्यात आगास्टा नावाची पर्वतरांग आहे. त्याच्या कातळातून डोक्याची कवटी,पाठीचा कणा,खांदे,पुढचा कल्ला मिळाला.
तुमच्यातल्या कुणी एक, विलार्ड लिबे या शास्त्रज्ञानं अति प्राचीन वस्तुंचं वय मोजण्याची पध्दती आणि तंत्र शोधलं. त्याला रेडियो डेटिंग म्हणतात. म्हणजे कार्बन,रेडियम,प्ल्युटोनियम,युरेनियम,थोरिअम या किरणोत्सारी पदार्थांचा उपयोग करुन अचूक वय काढलं जातं. आता “ज्याची” कवटी,हाडं,दातं मिळाली त्यावर या किरणोत्सारी पदार्थांचा उपयोग करण्यात आला आणि “त्याचं” वय, २४६ दशलक्ष वर्ष असल्याचं सिध्द झालं. वर्षामागून वर्ष गेली आणि हळूहळू “तो आणि त्याचे भाऊबंद”नष्ट होत गेले.
ते कसं काय?ते मला कसं कळलं?
हे मला कसं कळणार? अगदी बरोबर.
पण तुम्ही मानव फारच हुषार!तुम्हीच मग “तो आणि त्याचे भाऊबंद” कां नष्ट झाले, याचा कसून शोध घेतला. तेव्हा तुम्हाला आढळलं की “तो आणि त्याचे भाऊबंद” फार खादाडे! जे मिळेल ते खात सुटत.या अतिखाण्यात तर कधीकधी त्यांच्याच उंचीचे “थॅलॅट्टोसॉर“ सारखे जलचर असत. तुमच्या मनात आता नक्कीच प्रश्न आला असेल की मग “तो आणि त्याचे भाऊबंद” यांची उंची तरी किती?सांगतो की.
तर ही उंची होती ८५ फूट किंवा २६ मीटर!आहे ना गंमत, म्हणजेच “तो आणि त्याचे भाऊबंद” यांच्या जीवावरच बेतणारं असलं तरी, “त्यांनी” त्यांच्यापेक्षा किंचित कमी उंचीचा जलचर घातला की पोटात! मग फुटणारच ना त्यांचं पोट! इतकं समजायला तेव्हा “त्यांना”बुध्दी नव्हती. अखेर व्हायचं तेच झालं. “तो आणि त्याचे भाऊबंद” नष्ट झाले.
पण गोष्ट इथे संपत नाही, बरं का?कारण देवमाशाचं गर्वहरण कसं झालं ते अजून सांगितलंच नाही ना मी!
अहो, देवमाशाची उंची भरते ८२ फूट किंवा २५ मीटर. याचा अर्थ “तो” देवमाशापेक्षा २ फुटाने अधिक मोठा! म्हणजे सर्वात मोठा जलचर. पण देवमासा समजतो तोच मोठा. समजू द्या. अज्ञानात सुख असतात असं म्हणतात. राहू द्या त्याला सुखी!
पण मी सारखा मी मी करतोय, पण मी कोण ते अजून सांगितलच नाही ना?सॉरी सॉरी.
अहो, मी इचथॉयसॉरस! गोष्टीतला “तो!” आमचं नाव ग्रीकभाषेतील शब्दावरुन पडलं.आमच्या नावातील इचथीस म्हणजे मासा आणि सौरॉस म्हणजे सरडा. म्हणजे पाण्यातला सरडा.(हा हा हा!झाडावरचा सरडा रंग बदलवतो म्हणे! आम्ही पण रंग बदलवू शकायचो का?तुमच्यापैकी कुणीतरी शोध घेईल तेव्हाच कळेल ते!)
शेवटची एक गंमत राहिलीच की, २४६ लाख वर्षापूर्वी जेव्हा पाण्यात म्हणा किंवा पाण्याखाली आमचं राज्य होतं तेव्हा जमिनीवर डायनोसॉरचं राज्य होतं.मात्र आम्हा दोघांनांही ते ठाऊक नव्हतं.ते असतं तर? यापृथ्वीवर तुम्हा मानवांसह आम्ही इतर कुणाचच राज्य येऊ दिलं नसतं! हा हा हा!(कल्पना विलासात रमायला काय जातं?)
सुरेश वांदिले