(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आयटीआय चे महत्व!

१० वी नंतर वेगवेगळया प्रकारचे कौशल्य निर्मितीचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टिट्यूट किंवा औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात करता येऊ शकतात. या संस्था आयटीआय या नावाने सर्व परिचित आहेत.

सक्षम जाळे

महाराष्ट्रात आयटीआयचे मोठे आणि सक्षम असे जाळे आहे. ३५८ तालुक्यांमध्ये ४१९ शासकीय आयटीआय आहेत. यामध्ये एक लाखाच्या आसपास विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. १० वीचा निकाल लागला की लगेच दुसऱ्या दिवशीपासून आयटीआयची प्रवेश प्रकिया सुरु होते. दहावित मिळालेल्या गुणांवर आधारित हे प्रवेश दिले जातात. ही सगळी प्रकिया ऑनलाइन आहे.

आयटीआय मध्ये एक आणि दोन वर्षाचे वेगवेगळया व्यवसायाचे (ट्रेड) प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण हे विद्यार्थ्यांने रोजगार आणि स्वंयरोजगारासाठी सक्षम व्हावे या दृष्टिने दिले जाते. प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. शिकावू उमेदवारी (अप्रें‍टिसशीप) योजनेंतर्गत एक लाखाच्या आसपास विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. त्यामुळे त्याला प्रत्यक्ष कारखान्यात किंवा एखाद्या उद्योगात कसे काम चालते याचे प्रशिक्षण मिळते. आयटीआय केलेला विद्यार्थी सहसा खाली राहत नाही. आयटीआय मधील एक वा दोन वर्षातील प्रशिक्षणामुळे  जे कौशल्य या विद्यार्थ्याने प्राप्त केले असते, त्यामुळे त्याचा आत्मविश्वासही वाढलेला असतो. आयटीआयट केलेल्या विद्यार्थ्यांने त्याच्या ट्रेडमध्ये चांगलीच तज्ज्ञता मिळवली तर तो भविष्यात स्व:ताचा लघु उद्योगही सक्षमरित्या सुरु करु शकतो.

ठाम निर्णय महत्वाचा

त्यामुळे आयटीआयमध्ये प्रवेशाचा निर्णय त्याने ठामपणे घ्यायला हवा. असा निर्णय घेतल्यावर मग मात्र त्याने पुढील एक दोन-वर्षे झोकून देऊन अभ्यास करायला हवा. या कालावधित,अरे आपण काय करुन चुकलो,असल्या पध्दतीचे विचार अजिबात करु नये. त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. अर्धवट मनाने जे विद्यार्थी ‍आयटीआय करतात, त्यांना कोणत्याही ट्रेडमध्ये यश मिळू शकत नाही.

विद्यार्थ्याने त्याचा कल कोणत्या विषयाकडे आहे, हे लक्षात घेऊन ट्रेडची निवड करायला हवी. हे ट्रेड आपल्या जवळच्या तालुक्यातील आयटीआयमध्ये आहेत का? याची  प्रत्यक्ष खातरजमा करायला हवी. पालकांनीसुध्दा सोबत जायला हवे. निकाल लागण्यापूर्वीच्या या कालावधीत याकडे लक्ष द्यावे. आयटीआयची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रिभूत असल्याने कुणालाही महाराष्ट्रात कुठेही प्रवेश मिळू शकतो. या कालावधीत आपला कल असलेल्या ट्रेड शिकवणाऱ्या आयटीआयटचा शोध घ्यायला हवा. ही माहिती https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

समजा या ठिकाणांहून ही माहिती मिळवणे कठीण जात असेल तर आपल्या तालुक्यातील आयटीआयचे प्राचार्य किंवा अध्यापकांना विचारावे. ही मंडळी नक्कीच मदत करतील. योग्य ते मार्गदर्शनही करतील.

उत्तम दर्जा

महाराष्ट्रातील शासकीय आयटीआयचा दर्जा आणि गुणवत्ता ही उच्च दर्जाची असल्याने अनेक उद्योग वेगवेगळया प्रकारे सहकार्यासाठी पुढे येतात. या सहकार्यातूनच विद्यार्थ्यांना रोजगारक्षम होणारे अल्पमुदतीचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले. अद्ययावत यंत्रसामग्री आणि उपकरणे उपलब्ध करुन देण्यात आली. ऑन द जॉब ट्रेनिंग म्हणजे प्रत्यक्ष काम देऊन प्रशिक्षणाच्या सुविधा निर्माण झाल्या, रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या, आयटीआयमधील सुविधांच्या दर्जावाढीसाठी साहाय्य केले गेले.

आयटीआयकडे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी वळावे यासाठी राज्यशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार  आयटीआय मधून दोन वर्षाचे प्रशिक्षण घेतलेले १० वी उत्तीर्ण जे विद्यार्थी,  राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या दोन भाषांचा अभ्यासक्रम पूर्ण करतील त्यांना १२ वीचा दर्जा दिला जाईल. तर आयटीआय मधून दोन वर्षाचे प्रशिक्षण घेतलेले १०वी अनुत्तीर्ण/नापास विद्यार्थी  राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या दोन भाषांचा अभ्यासक्रम पूर्ण करतील त्यांना १०वीचा दर्जा दिला जाईल.

दोन वर्षे कालावधीचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश मिळू शकतो. अशाप्रकारे आयटीआयच्या विद्यार्थ्यांना चार प्रकारच्या पुढील संधी मिळतात. (१) रोजगार, (२) स्वयंरोजगार, (३) शिकावू प्रशिक्षण योजनेतंर्गत रोजगार, (४) उच्च शिक्षण.

सर्वांना संधी

महाराष्ट्रात वेगवेगळया समजघटकांसाठी विशेषत्वाने आयटीआयची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये महिलांसाठी १५ आयटीआय, आदिवासी भागात आदिवासी मुला/मुलींसाठी ६१ संस्था, नवबौध्द उमेदवारांसाठी-४ संस्था, अल्‍पसंख्याकांसाठी स्वतंत्र २ संस्था आणि ४३ विशेष तुकड्या, नक्सलग्रस्त भागातील मुला/मुलींसाठी ‍२ संस्था यांचा समावेश आहे. याशिवाय दिव्यांग (शासकीय आयटीआय वर्धा), अनाथ (चिल्ड्रेन एड सोसायटी, खाजगी आयटीआय मानखुर्द-मुंबई), कुष्ठरुग्ण (द लेप्रसी मिशन खाजगी आयआयटी पचंवटी, नाशिक) या घटकांसाठी स्‍वतंत्र आयटीआय सुरु करुन महाराष्ट्राने आपले पुरोगा‍मित्व सिध्द केले आहे.

संपर्क – संचालक प्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, ३ महापालिका मार्ग, टपाल पेटी क्रमांक १००३६, मुंबई ,दूरध्वनी- ०२२-२२६२०६०३, ईमेल-itiadmission@dvet.gov.in

 

000

तंत्रसिध्द व्हा!

इंडो जर्मन टूल ही संस्था भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी संस्था आहे.औरंगाबाद येथे असणाऱ्या या संस्थेमार्फत तंत्रकौशल्य निर्मितीचे विविध कालावधीचे अभ्यासक्रम चालवले जातात. हे अभ्यासक्रम केल्यावर संबंधित उमेदवारांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी सहजतेने उपलब्ध होऊ शकतात. हे अभ्यासक्रम १० वी १२वी,पदवी झालेले उमेदवार करु शकतात. काही दीर्घ मुदतीचे अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत-

(१) ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन टूल ॲण्ड डाय मेकिंग- १० वीध्यमे किमान ६० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यास या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.राखीव संवर्गासाठी गुणांची मर्यादा ५०  टक्के . वयोमर्यादा १५ ते १९ वर्षे.अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना ३ वर्षाची सूट.अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षाचा आहे.या अभ्यासक्रमात वेगवेगळया प्रकारचे साचे,साहित्य/उपकरणे निर्मितीचे अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाते.

(२) डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स. १० वीध्यमे किमान ६० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यास या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.राखीव संवर्गासाठी गुणांची मर्यादा ५०  टक्के. वयोमर्यादा १५ ते १९ वर्षे.अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना ३ वर्षाची सूट. कालावधी तीन वर्षे.या अभ्यासक्रमात औद्योगिक स्वयंचलनासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान शिकवले जाते.

(३)सर्टिफिकेट कोर्स इन मशिनिस्ट (टूल रुम). १० वीध्यमे किमान ६० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यास या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.राखीव संवर्गासाठी गुणांची मर्यादा ५०  टक्के. वयोमर्यादा १५ ते १९ वर्षे.अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना ३ वर्षाची सूट.अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षाचा. या अभ्यासक्रमात वेगवेगळया प्रकारचे साचे,साहित्य/उपकरणे निर्मितीचे पारंपरिक पध्दतीचे प्रशिक्षण दिले जाते.

संपर्क- पी ३१, एमआयडीसी,इंडस्ट्रिअल एरिया,चिखलठाणा-४३१००६, दूरध्वनी- ०२४०-२६१०१००, ईमेल-gm@gtr-aur.org,संकेतस्थळ- igtr-aur.org

सुरेश वांदिले