(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

प्रगतीचे पंख

मुलींना शिक्षणाच्या अधिकाधिक संधी मिळाव्यात यासाठी शासनामार्फत अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. याव्दारे उच्च अभ्यासक्रमांमध्ये मुलींची संख्या वाढवी व त्यांच्यासाठी प्रगतीचे नवे व्दार उघडले जावे, हे अपेक्षित आहे. अशा काही योजना,उपक्रम,निर्णय यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

(१) इंडियन ‍ इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट( आयआयएम)

 ही आपल्या देशातील व्यवस्थापनविषयक   शिक्षण-प्रशिक्षण देणारी महत्वाची संस्था. या संस्थेत प्रवेश ‍मिळालेले सर्वच विद्यार्थी भविष्यात कॉर्पोरेट क्षेत्रात  सर्वोच्च स्थानी जातात. अनेक विद्यार्थी  स्वत:चा उद्योग सुरु करतात. आयआयएमच्या प्रवेशासाठी,” कॉमन एंट्रस टेस्ट म्हणजेच कॅट परीक्षा”, द्यावी लागते. या परीक्षेव्दारे  मुले व मुली, अभ्यासक्रमासाठी निवडले जातात. तथापि ज्या प्रमाणात मुलींची निवड व्हायला हवी त्याप्रमाणात होत नाही. त्यामुळे आयआयएममध्ये मुले व मुलींच्या संख्येत गेली अनेक वर्षे तफावत पडत चाललीय.  ही तफावत दूर व्हावी व  जास्तीतजास्त  मुलींना प्रवेश मिळावा यासाठी बऱ्याच आयआयएममध्ये मुलींना काही गुणांचे अतिरिक्त वेटेज दिले जाते. उदा- (१) मुंबई आयआयएम अतिरिक्त ५ टक्के, (२) बेंगळुरु आयआयएम ५ टक्के, (३) लखनौ आएआएएम ५ टक्के, (४) कोलकता आएआयएम ४ टक्के, (५) इंदोर आयआयएम ६ टक्के , (७) कोझीकोड आयआएम १० टक्के , (८) अमृतसर आयआयएम १० टक्के, (९) नागपूर आयआयएम १५ टक्के (१०) विशाखापट्टणम आयआयएम १० टक्के. (११) आयआयएम शिरमौर येथे एकूण मंजूर जागांपेक्षा मुलींना आणखी ५० जागांवर प्रवेश दिला जातो. (१२) आयआयएम काशीपूर येथे एमबीए (जनरल) ला प्रवेश घेऊ ईच्छिणाऱ्या मुलींना ६ टक्के आणि एमबीए(ॲनॅलि‍टिक्स)ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलींना ७.५ टक्के  अतिरिक्त  वेटेज  दिले जाते. या कॅम्पसमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुली व त्यांच्या पालकांना प्रवेश घेण्यापूर्वी संस्थेतील सोई – सुविधा प्रत्यक्ष बघण्यासाठी  निंमत्रित केले जाते. जाण्यायेण्याचा खर्च संस्थेमार्फत केला जातो.

०००

(२) आयआयटीमधील सुविधा

इंडीयन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आयआयटीमध्ये मुलींची संख्या वाढावी यासाठी अनेक योजना राबवण्यात येतात. प्रत्येक आयआयटीमध्ये किमान २०  टक्के मुलींचा प्रवेश  व्हावा यासाठी एकूण प्रवेश संख्येपेक्षा  अधिक जागा मुलींना देण्याची मुभा देण्यात आलीय. त्यामुळे मुलींची आयआयटीमधील संख्या वाढण्यास मदत होत आहे. आयआयटी मुंबई  व आयआयटी दिल्ली येथे केवळ मुलींसाठीचे वसतीगृह  उपलब्ध करुन देण्यात आले आहे. आयआयटी मंडीमध्ये प्रवेश घेतलेल्या प्रत्येक मुलीचे शैक्षणिक शुल्क माफ केले जाते. तसेच त्यांना दरमहा १००० रुपये विद्यावेतनही दिले जाते. आयआयटी दिल्लीमध्ये मुलींसाठी विशेष  शिष्यवृत्ती दिली जाते.

आयआयटी मुंबई येथे मुलींसाठी “मेरीट कम  मिन्स” या प्रकारातील  शिष्यवृत्ती  दिली जाते. संबधित मुलीच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न लक्षात घेऊन ही शिष्यवृत्ती पुढीलप्रमाणे प्रदान केली जाते- (१) वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये- (अ) शैक्षणिक शुल्क माफ, (ब) दरवर्षी ४० हजार रुपये शिष्यवृत्ती, (क) दरवर्षी १० हजार रुपये गुणवत्ता  शिष्यवृत्ती.

(२) वार्षिक उत्पन्न एक लाख ते ३ लाख रुपये- (अ) शैक्षणिक शुल्क माफ, (ब) दरवर्षी ३० हजार रुपये शिष्यवृत्ती, (क) दरवर्षी १० हजार रुपये गुणवत्ता  शिष्यवृत्ती (ड) वार्षिक उत्पन्न तीन लाख ते पाच लाख रुपये- (अ) शैक्षणिक शुल्क माफ, (ब) दरवर्षी २० हजार रुपये शिष्यवृत्ती, (क) दरवर्षी १० हजार रुपये गुणवत्ता  शिष्यवृत्ती. (अशा प्रकारच्या शिष्यवृत्ती प्रत्येक आयआयटी वेगवेगळया पध्दतीने देत असते.)

000

(३) उषा मित्तल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

एसएनडीटी विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत असणारी आपल्या राज्यातील  केवळ महिलांसाठी असलेली ही एक महत्वाची संस्था. यामध्ये  अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेत पदवी,पदव्युत्तर पदवी  व पीएचडी अभ्यासक्रम करता येतात.

पदवी अभ्यासक्रमांमध्ये बीटेक इन (१)  आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, (२) डेटा सायंस, (३) कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, (४) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनिअरींग, (५) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी, (६) इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. या शाखांमध्ये केवळ मुलींनाच प्रवेश दिला जातो.

महाराष्ट्र शासनाच्या सीईटी परीक्षेमधील गुणांवर आधारीत कॉमन ॲडमिशन प्रोसेस (सामायिक प्रवेश प्रक्रिया) व्दारे प्रवेश दिला जातो.

उद्योग जगतात या संस्थेचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्तेचे महत्व अधोरेखित झाले असून दरवर्षी नामांकित कंपन्या प्लेसमेंटसाठी येतात. यामध्ये (१) केपजेमीनी, (२) ॲक्सेंच्युर, (२) टाटा मोटर्स, (३) कोलगेट, (४) टाटा कंसलटन्सी सर्व्हीस, (४) एरिक्सन, (५) इन्फोसीस, (६) बँक ऑफ अमेरिका, (७) मॉयक्रोसॉफ्ट, (८) ओरॅकल, (९)  फ्लीपकार्ट, (१०) जे.पी मॉर्गन, (११) एचएसबीसी, (१२) डेऊस्चे बँक, (१३) बर्कले, (१४) पर्सिस्टंट अशा सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. बहुतेक सर्व मुलींना त्यांच्या गुणवत्तेनुसार प्लेसमेंट व  वार्षिक वेतन मिळते. प्रवेश मिळालेल्या सर्व पात्र मुलीना केंद्र  व राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात.

संपर्क-https://www.umit.ac.in/admissions, ईमेल- office@umit.sndt.ac.in, दूरध्वनी- ०२२-२६६०६०४०.

०००