सूपर स्मार्ट करिअरची संधी!
गेल्या दोन वर्षात म्हणजे २०२२ आणि २०२३ मध्ये कला- वाणिज्य किंवा विज्ञान यापैकी कोणत्याही ज्ञान शाखेत व केवळ उत्तीर्ण श्रेणीत १२ वी झालेल्या पण मनासारख्या ज्ञान शाखेत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना “सूपर स्मार्ट करिअर” घडवण्याची शंभर टक्के संधी पुन्हा एकदा आली आहे. हे “सूपर स्मार्ट करिअर” म्हणजे मोठ्या कॉर्पोरेट, कंपन्या उद्योग यामध्ये मोठ्या पदावर नियुक्ती, तीसुध्दा शंभर टक्के! ही संधी “इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट-आयपीएम”, हा अभ्यासक्रम देतो.
१२ वीनंतर विद्यार्थ्यांना व्यवस्थापन कौशल्याचे शिक्षण – प्रशिक्षण देऊन जागतिक दर्जाचे उत्कृष्ट व्यवस्थापकीय नेतृत्व निर्माण व्हावे यादृष्टिने इंदोर आयआयएम (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट)च्या या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे.
या अभ्यासक्रमाच्या २०२४ च्या शैक्षणिक प्रवेशाच्या प्रक्रियेची प्रारभिंक सूचना जाहीर करण्यात आली आहे. १४ फेब्रुवारी ते २६ मार्च २०२४ पर्यंत या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागली. २३ मे २०२४ रोजी देशभरातील ३४ शहरांमध्ये संगणकाधारित (कॉम्प्युटर बेस्ड) परीक्षा घेतली जाईल. महाराष्ट्रात नागपूर, पुणे, मुंबई ही परीक्षा केंद्रे आहेत.
असा असतो प्रवास
(१)”आयपीएम” या अभ्यासक्रमाच्या पाच वर्षांपैकी पहिल्या तीन वर्षात उमेदवारांचा विविध विषयातील पाया मजबूत केला जातो. (२) पुढील दोन वर्षे त्यांना नियमित स्वरुपाचा “एमबीए” अभ्यासक्रम शिकवला जातो. (३) या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षी सामाजिक (सोशल) इंटर्नशीप पूर्ण करावी लागते. (४) चौथ्या आणि पाचव्या वर्षांच्या मध्ये बिझिनेस इंटर्नशीप पूर्ण करावी लागते. (५) ९ व्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना परदेशातील व्यवस्थापन शिक्षणाचा अनुभव मिळण्यासाठी एक्स्चेंज प्रोग्रॅम अंतर्गत पाठवण्यात येते.
काय शिकाल?
(१) पहिल्या तीन वर्षात पुढील विषय शिकवले जातात- फंडामेंटल कोर्सेस इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड स्टॅटिस्टिक्स, लिनिअर प्रोग्रॅमिंग, स्टॅटिस्टिकल मेथड्स, सॅम्पलिंग डिस्ट्रिब्युशन ॲण्ड स्टॅटिस्टिकल इन्फरंस, इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक्स, मायक्रो ॲण्ड मॅक्रो इकॉनॉमिक्स, इकॉनॉमेट्रिक्स, डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स, पब्लिक इकॉनॉमिक्स, इंडियन इकॉनॉमी, इंटरनॅशनल ट्रेड, एनव्हीरॉन्मेंटल इकॉनॉमिक्स, इंट्रोडक्शन टू सोशिऑलॉजी, सायकॉलॉजी, फिलॉसॉफी, पोलिटिकल थिअरी- वर्ल्ड हिस्ट्री, पब्लिक पॉलिसी, रिसर्च मेथडॉलॉजी, लॉ, अकाउंटिंग, बिझिनेस हिस्ट्री, बिझिनेस गव्हर्नन्स ॲण्ड सोसायटी, इंग्रजी – फ्रेंच-स्पॅनिश – जर्मन, प्रेझेंटेशन स्किल्स, डान्स- म्युझिक- ड्रामा-स्पोर्ट्स.
(२) चौथ्या आणि पाचव्या वर्षी पुढील विषय शिकवले जातात–
कम्युनिकेशन, इकॉनॉमिक्स, फायनांस ॲण्ड अकाउंटिंग, ह्युमॅनिटीज ॲण्ड सोशल सायंस, इन्फॉर्मेशन सिस्टिम्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स ॲण्ड ऑर्गनाझेशनल बिहेव्हियर, ऑपरेशन मॅनेजमेंट ॲण्ड क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स, स्ट्रॅटेजी, रुरल इर्मशन प्रोग्रॅम, हिमालय आऊट बाउंड प्रोग्रॅम, इंडस्ट्री व्हिजीट वर्कशॉप
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर बॅचलर ऑफ आर्ट्स (फाउंडेशन ऑफ मॅनेजमेंट) ॲण्ड मास्टर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन ही पदवी प्रदान केली जाते. ३ वर्षानंतर विद्यार्थ्याला अभ्यासक्रमातून बाहेर पडता येते. त्याला बीए (फाउंडेशन ऑफ मॅनेजमेंट) ही पदवी प्रदान केली जाते.
अशी असते प्रवेश परीक्षा
या अभ्यासक्रमासाठी निवड, (१) कल चाचणी (ॲप्टिट्यूड टेस्ट) आणि (२) मुलाखत या दोन घटकांवर आधारित केली जाते.
कल चाचणीच्या पेपरमध्ये तीन विभाग (सेक्शन) असतात (१) संख्यात्मक क्षमता (क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी)- बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल चॉईस), (२) क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी – लघुउत्तरी प्रश्न (शॉर्ट ॲन्सर). क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटीच्या भागात अलजेब्रा, मॉर्डन मॅथेमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग, जॉमेट्री, डाटा ॲनॅलिसिस, अॅरिथमॅटिक यावरील प्रश्नांचा समावेश असतो.
(३) भाषा क्षमता (व्हर्बल ॲबिलिटी) बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल चॉईस)-या भागात व्हर्बल रिझनिंग, रिडिंग कॉम्फ्रिहेन्शन, एरर्स इन युसेज, या घटकांवर प्रश्न विचारले जातात.
प्रत्येक अचुक उत्तरास चार गुण दिले जातात आणि प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जातो. परीक्षेचा कालावधी 2 तास. प्रत्येक सेक्शनसाठी प्रत्येकी ४० मिनिटांचा कालावधी दिला जातो. उमेदवारांना पेपरमध्ये ठरवून दिलेल्या सेक्शनच्या क्रमानुसारच प्रश्न सोडवावे लागतात. या तिनही भागांसाठी विशिष्ट असा कटऑफ (किमान गुण) ठरवण्यात येतो. तो कटऑफ प्राप्त करणे आवश्यक आहे. हे किमान गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी केली जाते . (प्रत्येक संवर्गासाठी हे किमान गुण वेगवेगळे राहतात. प्रत्येक संवर्गासाठीची मेरिट यादी वेगवेगळी तयार केली जाते.)
कलचाचणी सोबतच मुलाखतीमध्ये उत्तम कामगिरी करणे आवश्यक आहे. अशाच उमेदवारांची निवड अंतिम यादीसाठी केली जाते. कल चाचणीस ६५ टक्के वेटेज आणि मुलाखतीस ३५ टक्के वेटेज दिले जाते.
अंतिम यादित ज्या उमेदवारांची निवड होत नाही, त्यांना कळवले जात नाही.
या अभ्यासक्रमांना १५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. १० टक्के जागा आर्थिकदृष्ट्य्या कमकुवत घटक (इकॉनॉमिकली बॅकवर्ड कॅटेगरी) आणि ५ टक्के जागा दिव्यांगांसाठी राखीव असतात. यासाठी ४० टक्के अपंगत्व ग्राह्य धरले जाईल. तसे प्रमाणपत्र अधिकृत डॉक्टरकडून सादर करावे लागेल. इतर राखीव जागा शासनाच्या नियमानुसार भरल्या जातात.
यंदा म्हणजे २०२४ मध्ये कोणत्याही ज्ञानशाखेत १२ वीची परीक्षा देत असलेले विद्यार्थी सुध्दा आयपीएम प्रवेशचाळणी परीक्षेला बसून शकतात. मात्र त्यांचा निकाल ३१ जुलै २०२४ पर्यंत लागायला हवा. उमेदवाराचा जन्म १ ऑगस्ट २००५ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. राखीव संवर्गासाठी वयोमर्यादेत पाच वर्षाची सूट दिली जाते.
गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न ९ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. या शिष्यवृत्तीसाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागतो.
संपर्क – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदौर, राऊ -पितमपूर रोड, इंदौर- 453556, दूरध्वनी- 0731-2439686,२४३९६८७ संकेतस्थळ -www.iimidr.ac.in, ईमेल-ipmadmissions @iimid.ac.in
000